पृथ्वीवरील हजारो प्रकारचे विषाणू व जिवाणू हे वनस्पतीसृष्टीस, प्राणीसृष्टीस, तसेच मानवजातीस नेहमीच संक्रमित करत आलेले आहेत. अस्तित्वाचा हा संघर्ष जसा करोडो वर्षांपासून अविरतपणे चालू आहे, तसाच तो भविष्यातही चालू राहणार आहे.
सजीवांप्रमाणे विषाणू (व्हायरस) हे पेशीरूपात नव्हे तर डीएनए किंवा आरएनएच्या रूपात अस्तित्वात असतात. सजीव व निर्जीवांच्या सीमारेषेवर मोडणारे ते केवळ एक ‘जैविक रेणू’ आहेत. जीवाणूंच्या (बॅक्टेरिया) तुलनेत ते आकाराने खूप छोटे, परंतु संख्येने अनेक पटीने अधिक असतात. काही प्रकारचे विषाणू हे जीवाणूंनाही संक्रमित करतात. त्यांची संख्या नियंत्रणात ठेवतात व जीवसृष्टीतील संतुलन राखण्यास मदत करतात.
सूक्ष्मजीवांच्या तुलनेत विषाणू तसे बरेच क्षीण असतात आणि त्यांचे संक्रमण माणसाला सहसा धोका पोहचवत नाही, असे ढोबळमानाने म्हणता येते. सर्दी, फ्लू, गोवर, कांजण्या व असे अनेक साधारण आजार विषाणूजन्य आहेत. एखाद्या विषाणूचे माणसाला बाधित करू शकणे, हे त्याच्या ताकदीवर निर्भर करते, ज्यास आपण त्याची ‘संसर्ग-क्षमता’ (Virulence factor) असे म्हणतो. संसर्ग झाल्यानंतर विषाणू मानवाच्या पेशींमध्ये प्रवेश करतो. ज्या प्रमाणे आपण झेरॉक्स शॉपमधील यंत्रणा वापरून कागदपत्रांच्या प्रती तयार करतो, तसे पेशींची यंत्रणा वापरून तो स्वतःच्या अनेक प्रती बनवतो व नंतर इतर पेशींमध्ये प्रवेश करतो. हे सर्व घडत असताना आपले शरीर या विषाणूच्या विरोधात अँटिबॉडीज बनवते, ज्या विषाणूंना चिकटून त्यांचा ताबा घेतात व त्यांना नष्ट करतात. मानवाची प्रतिकारयंत्रणा या विशिष्ट अँटिबॉडीजच्या प्रती राखून ठेवते. भविष्यात त्या विषाणूशी पुन्हा संबंध आल्यास शरीर तत्परतेने या अँटिबॉडीज बनवून संक्रमणास अटकाव करते. अशा प्रकारे बहुतांश विषाणूजन्य आजारांचे एकवेळचे संक्रमण आपणास आयुष्यभराची प्रतिकार-क्षमता प्रदान करून जाते.
आज बऱ्याच संसर्गजन्य आजारांकरता आपल्याकडे कार्यक्षम लसी (Vaccine) उपलब्ध आहेत. एखाद्या आजाराची लस म्हणजे त्या विषाणूचाच एक विलग केलेला अंश असतो, जो आपण निरोगी व्यक्तीस टोचतो. आपले शरीर मग त्या विषाणूच्या लसरूपी अंशाच्या विरोधात अँटिबॉडीजच्या प्रती तयार करून ठेवते व पुढे प्रत्यक्ष संसर्ग होण्यापासून आपला बचाव करते.
विषाणूजन्य आजारातील मूळ औषध म्हणजेच ‘विशिष्ट अँटिबॉडीज’ हे आपले शरीर स्वतःच बनवत असते, हा मुद्दा लक्षात घेणे आवश्यक आहे. रुग्णास मग गरजेनुसार ताप, अंगदुखी, उलटी यांसारख्या लक्षणांशी संबंधित तेवढे औषधोपचार घ्यावे लागतात. वृद्धापकाळात ज्याप्रमाणे ऐकण्या-बघण्याच्या व इतर शारीरीक क्षमता कमी होतात, त्याप्रमाणे रोगप्रतिकारशक्तीही कमी होत जाते; परिणामस्वरूप वृद्धांची संसर्गजन्य आजारांमुळे दगावण्याची शक्यता बळावते.
विशिष्ट विषाणू हे प्राणी किंवा वनस्पतींच्या विशिष्ट प्रजातींनाच संक्रमित करतात. परंतु उत्क्रांती प्रक्रियेत काही विषाणू हे एकापेक्षा अधिक प्राण्यांस बाधित करण्याची क्षमता प्राप्त करतात. मानव आणि त्याच्या संपर्कात येणाऱ्या प्राणी जगतातदेखील विषाणूंची देवाण-घेवाण चालू असते. दरम्यान जर प्राण्यांकडून माणसात संक्रमित झालेल्या एखाद्या विषाणूची ‘संसर्ग-क्षमता’ पुरेशी निघाली, तर मग तो वेगाने स्वतःची संख्यावाढ करतो आणि सोबतच विशिष्ट प्रकारची ‘संक्रमण पद्धती’ वापरून एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरत जातो.
उदाहरणादाखल काविळीचा विषाणू दूषित पाण्याद्वारे, डेंग्यूचा विषाणू मच्छरांद्वारे तर फ्लूचा विषाणू हा खोकल्यातून उडणाऱ्या तुषारांद्वारे संक्रमित होतो. अशा वेगवेगळ्या संक्रमण पद्धतींपैकी खोकण्या-शिंकण्यातून होणारे संक्रमण हे अधिक कार्यक्षम पद्धतीने आजार पसरवत असते. अशा प्रकारे एखादा नवा विषाणू जेव्हा मानव-जगतात प्रवेश घेऊन कमी वेळात अनेक लोकांना बाधित करत जातो, तेव्हा आपण त्या विशिष्ट आजाराची ‘साथ’ आलेली आहे, असे म्हणतो.
अशी साथ जर एखाद्या भूभागापुरतीच सीमित राहिली तर तिला ‘epidemic’ (साथीचा रोग) आणि जगभरात पसरली तर तिला ‘pandemic’ (सर्व देशभर किंवा खंडभर असलेला साथीचा रोग) असे म्हणतात. अशा साथींमध्ये बाधित झालेला एक रुग्ण त्याच्या आजारपणात इतर किती लोकांमधे संक्रमण पोहोचवू शकतो या संख्येस त्या साथीची ‘पुनरुत्पादन क्षमता’ (R0, Basic reproduction number) असे म्हणतात.
तसेच लागण झालेल्या प्रत्येक शंभर रुग्णांमागे किती रूग्ण दगावले या संख्येस त्या आजाराचा ‘मृत्युदर’ (केस फॅटॅलिटी रेट) असे म्हणतात. एखाद्या साथीचा R0 हा तीन बाबींवर निर्भर करतो. पहिली विषाणूची ‘संसर्गक्षमता’, दुसरी आजाराची ‘संक्रमण पद्धती’ व तिसरी बाब म्हणजे ‘समाजाची संचारगती’. दळणवळणाची साधने, औद्योगिकीकरण, शहरीकरण इत्यादी गोष्टी या मानवाची संचारगती वाढवतात. संचारगती जेवढी अधिक तेवढा साथीचा वेगही जास्त. इतिहासात प्लेग, एनफ्लूएन्झा, देवी, कॉलरा व इतर अनेक आजारांनी वेळोवेळी पॅन्डेमिक साथी निर्माण करून मोठ्या प्रमाणात लोकसंख्येचे बळी घेतलेले आहेत.
आधुनिक वैद्यकीय ज्ञान हे मागच्या शतकभरात विकसित झालेले आहे, ज्याचा वापर करून मानवाने संसर्गजन्य आजारांवर आज बरेच नियंत्रण मिळवले आहे. मागील दोन दशकांत काही साथी येऊन गेल्या जसे की, SARS-CoV-1 या करोना विषाणूमुळे पसरलेली ‘सार्स’, H1N1 या एनफ्लूएन्झा विषाणूमुळे पसरलेली ‘स्वाईन फ्ल्यू’ व MERS-CoV या करोना विषाणूमुळे पसरलेली ‘मर्स’.
१) सार्स एपिडेमिक २००२
बाधित रुग्ण ८०००, मृत्युदर १० टक्के, R0 01
२) स्वाईन फ्ल्यू पॅन्डेमिक २००९
बाधित रुग्ण ७० कोटी, मृत्युदर ०.०२ टक्के, R0 02
३) मर्स एपिडेमिक २०१२
बाधित रुग्ण २५००, मृत्युदर ३० टक्के, R0 0.5
साथीच्या आजारांशी संबंधित एक महत्त्वाचा नियम लक्षात यावा, या हेतूने ही आकडेवारी दिली आहे.
साथीची पसरण्याची क्षमता व तिचा मृत्युदर यात विषम प्रमाण असते. मृत्युदर कमी असल्याशिवाय साथ वेगाने पसरू शकत नाही. या नियमामागील तर्क सहज लक्षात येण्यासारखा आहे. रुग्ण जर जास्त संख्येने गंभीर आजारी पडून अंथरुणास खिळले किंवा मृत्युमुखी पडायला लागले तर मोकळे फिरून विषाणू पसरवू शकणाऱ्या रुग्णांची संख्या त्या प्रमाणात कमी होते आणि साथीचा पसरण्याचा वेगही कमी होतो.
मागील काही महिन्यांपासून जगभरातील २००पेक्षा अधिक देशांमध्ये एका नवीन प्रकारच्या करोना विषाणूची साथ किंवा पॅन्डेमिक सुरू आहे. या नवीन करोना विषाणूला ‘SARS-CoV-2’ आणि त्यामुळे होणाऱ्या आजाराला ‘COVID-19’ असे नाव देण्यात आले आहे. कोविड-१९ मुळे आज जगभरातील लाखो लोक बाधित झालेले आहेत, तर हजारोंच्या संख्येने लोक दगावत आहेत. हा आजार रुग्णाच्या खोकण्या-शिंकण्यातून जे तुषार बाहेर पडतात त्यामार्फत पसरतो.
आजवरच्या झालेल्या अभ्यासांनुसार या साथीचा R0 हा जवळपास तीन, तर मृत्युदर हा जवळपास दोन आहे. सध्या अनेक देशांकडे मोठ्या प्रमाणात तपासणी करण्याच्या क्षमता नाहीत. त्यामुळे सहसा अतिसौम्य किंवा नगण्य लक्षणे असलेले रुग्ण जे संख्येनेही बरेच जास्त असतात, ते या तपासणींतून वगळले जातात व मृत्युदर वाढत असल्यासारखा भासतो. साथ ओसरल्यानंतर इपिडेमियाजिस्ट म्हणजेच साथरोगतज्ज्ञ ज्या सिरॉजिकल टेस्ट्स (शरीराने राखून ठेवलेल्या अँटिबॉडीजच्या प्रतींची तपासणी) करतील, त्यातून खरी रुग्णसंख्या आणि खरा मृत्युदर कळेल. या साथीचा खरा मृत्युदर हा ०.५च्यादेखील खालीच असणार, परंतु सध्यातरी हाती आलेल्या आकडेवारीनुसारच विश्लेषण करून उपाययोजना आखाव्या लागतात.
‘करोना’ हे आरएनए गटातील विषाणूंच्या एका फॅमिलीचे नाव आहे. जसे लोकांची आडनावे असतात, त्याप्रमाणे हे नाव आहे असे म्हणता येईल. करोना फॅमिलीत २० पेक्षा अधिक प्रकारचे विषाणू आहेत, जे सहसा सस्तन प्राणी व पक्षी यांना संक्रमित करतात. करोना फॅमिलीतील काही नियमित विषाणूंमुळे आपणास सर्दी हा आजार होतो. SARS-CoV-2 हा करोना विषाणू मात्र मानवजातीस नवा आहे. तो वटवाघळांकडून थेटपणे अथवा दुसऱ्या एखाद्या प्राण्याच्या मध्यस्थीने संक्रमित झालेला असण्याची शक्यता सूक्ष्मजीवतज्ज्ञ वर्तवत आहेत. हा नवा करोना विषाणू सहसा रुग्णाच्या नाक-घशात न थांबता म्हणजेच त्यास सर्दी वगैरेची बाधा न करता थेट श्वसननलिका व फुप्फुसांकडे आपला मोर्चा वळवतो.
वर नमूद केल्याप्रमाणे अतिसौम्य किंवा नगण्य लक्षणे असलेले जे रुग्ण तपासणींमधून वगळले जात आहेत, त्यांना आपण ‘अ-ज्ञात कोविड-१९ रुग्ण’ असे संबोधुयात आणि तपासण्यांद्वारे निश्चित झालेल्या जगभरातील बाकी रुग्णांस आपण ‘ज्ञात कोविड-१९ रुग्ण’ असे म्हणूयात. या साथीवर मागील काही महिन्यांत जे संशोधन झालेले आहे, त्यानुसार या ‘ज्ञात कोविड-१९ रुग्णां’ची तीन गटात विभागणी करता येते.
सौम्य आजार गट (गट अ)
कोविड-१९ची बाधा झालेले १०० पैकी ८० रुग्ण या गटात मोडतात. यांना श्वसननलिकेचा संसर्ग होतो, ज्यास आपण ‘अॅक्युट ब्राँकायटीस’ किंवा ‘श्वसननलिका दाह’ असे म्हणतो. या रुग्णांना ताप व कोरडा खोकला अशी लक्षणे जाणवतात व लक्षणांवर आधारीत बाह्य उपचारांनीच हे रुग्ण बरे होतात. या गटात सर्व वयाचे रुग्ण आढळून येत आहेत. या रुग्णांना ओपीडी रूम व डॉक्टर एवढीच उपचार संसाधने लागतात.
मध्यम आजार गट (गट ब)
कोविड-१९ची बाधा झालेले १०० पैकी १६ रुग्ण या गटात मोडतात. यांना फुप्फुसांचा साधारण संसर्ग होतो, ज्यास आपण ‘माइल्ड न्यूमोनिया’ किंवा ‘साधारण फुप्फुस दाह’ असे म्हणतो. या रुग्णांना ताप, खोकला व शिवाय दमही लागतो. यांना जनरल वार्डात भरती करून उपचार करावे लागतात. त्यातून हे सर्व रुग्ण काही दिवसांत पूर्ण बरे होतात. या गटातही सर्व वयाचे रुग्ण आढळत आहेत. अर्थातच या रुग्णांना जास्तीची उपचार संसाधने लागतील जसे की, रुग्णालय इमारत, डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफ, कॉट्स इत्यादी.
तीव्र आजार गट (गट क)
कोविड-१९ची बाधा झालेल्या १०० रुग्णांपैकी ०४ रुग्ण हे या गटात मोडतात. यांना फुप्फुसांचा तीव्र संसर्ग होतो, ज्यास आपण ‘सिव्हिअर न्यूमोनिया’ किंवा ‘तीव्र फुप्फुस दाह’ असे म्हणतो. यात रूग्णांना ताप, खोकला व अत्याधिक दम लागलेला असतो. यांना तात्काळ अतिदक्षता विभागात भरती करावे लागते. बहुतेकांना व्हेंटीलेटरदेखील जोडावा लागू शकतो. या गटातील चारपैकी दोन रुग्ण उपचारांनी वाचू शकतात, तर दोन दगावू शकतात. या गटात सहसा ६० पेक्षा अधिक वयाचे लोक मोडत आहेत. त्यातही ज्यांना हृदयविकार, डायबेटीस, बीपी किंवा दमा असे आजार आहेत, तेच रुग्ण सहसा दगावत आहेत. या गटातील रुग्णांनाही मोठ्या प्रमाणावर उपचार संसाधने लागणार- जसे की रुग्णालय इमारत, डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफ, कॅट्स, ऑक्सिजन, व्हेंटीलेटर्स व इतर आयसीयू उपकरणे.
आपण पाहिले की, साथीचा R0 हा विषाणूची संसर्ग-क्षमता, आजाराची संक्रमण-पद्धती, तसेच समाजाची संचारगती यावर अवलंबून आहे. तेव्हा हे स्पष्टच आहे की, कोविड-१९ची साथ नियंत्रणात आणण्याकरतादेखील या तीन घटकांशीच संबंधित उपाययोजना आखाव्या लागतील.
विषाणूच्या संसर्ग-क्षमतेशी संबंधित उपाययोजना (लसीकरण आदी)
लसीकरणाद्वारे आपण आपली प्रतिकारशक्ती वाढवत असतो, म्हणजेच अप्रत्यक्षपणे आपल्याला बाधित करण्याची विषाणूची संसर्ग-क्षमता कमी करत असतो. लस बनवण्यासाठी शास्त्रज्ञ त्या विषाणूच्या विविध भागांचा अभ्यास करून त्यातील योग्य तो भाग निवडतात आणि मग त्यापासून लस बनवतात. लसीची उपयोगिता व दुष्परिणाम जाणण्यासाठी आधी प्राण्यांवर व मग मानवी स्वयंसेवकांवर परीक्षण करावे लागते. हे सर्व टप्पे पार पडण्याकरता कमीत कमी वर्षभराचा कालावधी लागू शकतो, त्यानंतरच लस वापराकरता उपलब्ध होते.
आजाराच्या संक्रमण-पद्धतीशी संबंधित उपाययोजना (मास्क आदी)
रुग्णाच्या खोकण्या-शिंकण्यातून पाच मायक्रॉनपेक्षा छोटे व मोठे असे दोन प्रकारचे तुषारकण बाहेर पडत असतात. त्यातील मोठे तुषारकण हे आजार पसरवण्यास जास्त प्रमाणात कारणीभूत असतात. मोठे तुषारकण त्यांच्या वजनामुळे एक मीटरपेक्षा अधिक अंतर कापू शकत नाहीत. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी सहसा एकमेकांमध्ये कमीत कमी तेवढे अंतर ठेवणे गरजेचे आहे. आपण सहसा वापरतो ते सर्जिकल मास्क मोठ्या तुषारकणांपासून जवळपास ९० टक्क्यांपर्यंत संरक्षण देत असतात. चांगली उपलब्धता असेल तर लोकांनी सहसा हे मास्क वापरण्यास काही हरकत असू शकत नाही. कारण त्यांचा वापर हा अपायकारकही नाही. परंतु जर तुटवडा असेल तर मग कमीत कमी संशयित रुग्णांनी, बाधित रुग्णांनी आणि त्यांची काळजी घेणाऱ्यांनी हे मास्क वापरणे आवश्यक ठरते. या रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर व इतर स्टाफ यांनी अधिक उच्च दर्जाचे रेस्पिरेटर मास्क (N-95 मास्क) वापरणे आवश्यक असते, जे त्यांना छोट्या व मोठ्या अशा दोन्ही तुषारकणांपासून चांगले संरक्षण देतात.
रुग्णाच्या खोकण्या-शिंकण्यातून बाहेर पडणारे तुषार हे जवळच्या वस्तूंवरदेखील पडतात. अशा वस्तूंना स्पर्श केल्यानंतर एखादा निरोगी व्यक्ती जेव्हा चेहऱ्यास स्पर्श करतो, तेव्हा त्यातूनही त्यास विषाणू संसर्ग होऊ शकतो. हे टाळण्याकरता कमीत कमी २० सेकंद साबणाने हात स्वच्छ धुणे आवश्यक ठरते.
समाजाच्या संचारगतीशी संबंधित उपाययोजना (लॉकडाउन आदी)
सहसा एखाद्या आजाराची साथ आलेली असेल तर आजारी रुग्णांचे विलगीकरण करणे, सार्वजनिक ठिकाणी दक्षता बाळगण्यास सांगणे, शाळा व इतर गर्दीची ठिकाणे बंद करणे आदी उपाय केले जातात.
कोविड-१९ साथीचा सरासरी मृत्युदर हा दोन टक्क्यांच्या आसपास आहे, म्हणजे एकुण १०० रुग्णांपैकी ९८ वाचतील तर २ दगावतील. परंतु वयोगटानुसार मृत्युदर तपासला तर ६०पेक्षा कमी वयोगटातील रुग्णांचा मृत्युदर हा ०.२ टक्के एवढा अल्प आहे, म्हणजे १००० रुग्णांपैकी ९९८ वाचतील, तर केवळ २ दगावतील. वृद्धांमधील मृत्युदर १० टक्के एवढा आहे. या वयोगटातही १०० रुग्णांपैकी ९० वाचतील तर १० दगावतील.
तेव्हा कोविड-१९चा मृत्युदर तुलनेने तसा बराच कमी असूनही साथरोगतज्ज्ञ डॉक्टरांनी बहुतांश देशांत संचारबंदी किंवा टोटल लॉकडाउनचा मार्ग सुचवलेला आहे. या मागील तर्क समजून घेणे अतिशय आवश्यक आहे, अन्यथा या साधारणशा आजाराची प्रचंड व अवास्तव दहशत जनमानसात तयार होणार, जी प्रत्यक्ष आजारापेक्षाही भयंकर ठरू शकते. केवळ आजाराचे शास्त्रशुद्ध ज्ञान हेच आपणास या अनाठायी भीतीतून मुक्त करू शकते. साथीचे नेमके स्वरूप समजले तर लोक निर्भीड तर राहतीलच, परंतु स्वतःहून लॉकडाउन इत्यादींमध्ये सहकार्यही करतील.
काही विकसित देशांचे अपवाद वगळता जवळपास सर्वच देशांकडे आज नियमित रुग्णांना पुरतील एवढ्यादेखील वैद्यकीय संसाधनांची, मनुष्यबळाची उपलब्धता नाही. कोविड-१९ साथ जर झपाट्याने पसरली, तर मग एकुण रुग्णसंख्या वेगाने वाढणार आणि त्यात ‘अ’, ‘ब’, ‘क’ या तिन्ही गटांतील रुग्णही त्या-त्या प्रमाणात वाढणार. परंतु मनुष्यबळ, रुग्णालये, साधनसामग्रीदेखील याच गतीने वाढवणे अशक्य असते. या परिस्थितीत संसाधनांच्या अभावामुळे ‘ब’ आणि ‘क’ गटातील बरेच रुग्ण जे एरवी सहज वाचले असते, ते दगावणार आणि मग मुळातील ०२ टक्के मृत्युदर वाढून १५ टक्के किंवा त्याहीपुढे जाणार.
मानवजातीस नवा असलेला SARS-CoV-2 हा विषाणू वेगाने पसरण्याची क्षमता बाळगून आहे यात शंका नाही. लसीची अनुपलब्धता, मास्क आदी साधनांचा तुटवडा, उपचार संसाधनेही जेमतेम अशा परिस्थितीत मग समाजाची संचारगती कमी करणे हाच तेव्हढा R0 कमी करण्याचा अत्यावश्यक व शेवटचा उपाय ठरतो. भविष्यात नव्या रुग्णांच्या वाढत्या संख्येनुसार संचारबंदी ही काही महिन्यांपर्यंतही वाढवावी लागू शकते. तेव्हा या ‘लंपडावा’त व्यवस्थित दडून राहणे व डाव लांबवणे हेच आपल्या हिताचे आहे. करोनाने जर आपल्याला लवकर शोधले तर अनेकांना आयुष्याचे डाव अर्ध्यावर सोडावे लागतील.
लॉकडाउन केल्याने अशा साथीचा फक्त वेगच कमी होतो, विषाणू स्वतःहून मानवजगतातून बाहेर पडत नाही. लॉकडाउन करून साथीचा वेग सुरुवातीलाच कमी केल्यास जगभरातील जेवढे रुग्ण तो विषाणू एरवी काही महिन्यांतच बाधित करू शकला असता; तेच काम करावयास त्यास आता एक-दोन वर्षांचा कालावधी लागेल. हे नक्की की, या कालावधीत SARS-CoV-2 जगभरातील मोठ्या जनसंख्येस ज्ञात व खासकरून अ-ज्ञात कोविड-१९ रुग्णांच्या मार्फत बाधित करणार व शेवटी तो नियमित करोना विषाणूंच्या रांगेत जाऊन बसणार!
करोना विषाणूने नव्हे तर आपल्याच अपुऱ्या व जेमतेम आरोग्यव्यवस्थेने आपणास लॉकडाउन केलेले आहे. करोनाने आपल्या आरोग्यव्यवस्थेसहीत अर्थव्यवस्थेचे, राजकीय व्यवस्थेचे व इतर मूलभूत समाज-व्यवस्थांचे नासलेपण उघड केलेले आहे. या टोकाच्या अव्यवस्था एका मोठ्या व व्यापक अशा सामाजिक दुष्टचक्राची उपज आहेत. अतिशय वेगाने विज्ञानाचा वेध घेत उज्ज्वल भविष्याकडे झेप घेण्यास सक्षम असलेल्या मानवाच्या पायात त्याच्या भांडवलकेंद्री, भ्रष्ट व मागास अशा राजकीय-सामाजिक-धार्मिक संस्थांनी बेड्या टाकलेल्या आहेत. या बेड्या शीघ्र तोडाव्या लागतील. निसर्गाची प्राथमिकता व संतुलन अबाधित राखत, आधुनिक मानवाच्या सृजनशक्तीशी एकरूपता साधू शकणाऱ्या व त्यास बळ देतील, अशा विज्ञानवादी, प्रगतिशील व मानवकेंद्री समाज-व्यवस्था निर्माण कराव्या लागतील, अन्यथा अनेक सूक्ष्मजीव रांगेत आहेतच.
.............................................................................................................................................
लेखक डॉ. सचिन सरोदे नांदेडस्थित प्रॅक्टिसिंग फिजीशियन आहेत.
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment