अजूनकाही
शोएब मन्सून दिग्दर्शित ‘इन द नेम ऑफ गॉड’ (खुदा के लिए) या सिनेमात समरद हा तरुण गायक मौलानांच्या सांगण्यावरून गाणं सोडून देतो. जीन्स, टी शर्ट घालणं सोडून सलवार घालायला लागतो. जिहादी विचारांचं विष मौलाना त्याच्या डोक्यात भिनवतात. मार्यम या त्याच्या काकाच्या (हुसेन शहाच्या) मुलीचं आंतरधर्मीय लग्न होणार असतं. हे लग्न धर्माच्या विरोधात होईल, तिला ख्रिस्ती होण्यापासून वाचवलं पाहिजे म्हणून समरद तिच्याशी लग्न करतो. तिच्यावर अत्याचार करतो. तो मूलतत्त्ववाद्यांच्या जाळ्यात गुरफटून जातो.
समरदचा भाऊ मन्सूर मात्र आधुनिक विचारांची कास धरतो. पवित्र इस्लामच्या नावाखाली मौलाना काढत असलेले फतवे चुकीचे आहेत, आपला भाऊ या चुकीच्या माणसांच्या संगतीत गेलाय, याचं त्याला मनोमन वाईट वाटत राहतं. गायनासाठी मन्सूर अमेरिकेत जातो. तिथल्या मुक्त जगात रममाण होतो. दरम्यान ९/११च्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी मुस्लीम असल्याकारणाने मन्सूरवर संशय घेतला जातो. त्याचा अमेरिकेतील धर्मांध अधिकारी अतोनात छळ करतात.
सारांश, मौलाना, समरद किंवा अमेरिकेतील धर्मांध अधिकारी, धर्माचं विष डोक्यात भिनलेले कुठलाही विचार वा कृत्य करायला तयार होतात.
हा सिनेमा आठवण्यामागे तीन कारणं आहेत.
एक - निझामुद्दीन (दिल्ली) येथील तबलिगी जमातीचा मरकझ हा धार्मिक कार्यक्रम,
दोन - या कार्यक्रमानंतर गोदी मीडियानं चालवलेला आरोप प्रत्यारोपाचा प्रपोगंडा
तीन - तबलिगींच्या निमित्ताने एकूणच मुस्लीम धर्मीयांबद्दल हिदुत्ववादी मंडळींनी चालवलेला विखारी प्रचाराचा एककलमी कार्यक्रम.
जगावर आणि देशावर करोना व्हायरसचं महाभयानक संकट आलं असताना धर्माच्या नावाखाली ही सर्व मंडळी कोणतंही कृत्य करायला, बोलायला मागेपुढे पाहत नाहीत. त्याचा देशाच्या सांस्कृतिक एकात्मतेवर गंभीर परिणाम होतो आहे.
मुस्लीम समाजातील विवेकी विचारांची मंडळी तबलिगींनी कार्यक्रम घेऊन खूप मोठी चूक केली, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, असा विचार मांडत आहेत. असा विचार मांडणाऱ्यांना आज हिंदू धर्मियांनी पाठिंबा देण्याची गरज आहे. जे चूक आहे ते चूकच, चूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायलाच हवी; पण त्या चुकीसाठी संपूर्ण मुस्लीम समाजाला जबाबदार धरता कामा नये, असा विवेकी विचार सच्च्या हिंदू धर्मियांनी मांडायला हवा. तो मांडण्याची ही योग्य वेळ आहे. कारण आजच्या सामाजिक-राजकीय वातावरणात मुस्लीम म्हणून वावरणं आणि त्याच वेळी विवेकी भूमिका घेणं, हे मुस्लीम धर्मियांसाठी तारेवरच्या कसरतीसारखं झालंय. बहुसंख्याक समाजासमोर विरोधी भूमिका मांडल्यास एकीकडे मुस्लीम म्हणून टीकेचा सामना करावा लागतो, तर आधुनिक भूमिका घेऊन स्वधर्मियांच्या विरोधात पावलं टाकल्यास घरातील आणि धर्मातील लोकांच्या टीकेचं धनी व्हावं लागतं. म्हणून बहुसंख्याक असणाऱ्या मंडळींनी अल्पसंख्याक समाजाशी आपलेपणाची भावना निर्माण करणारं वर्तन करायला हवं.
तबलिगींनी ज्या पद्धतीनं वर्तन केलं आहे, त्याचा निषेध करायलाच हवा. मलेशिया, इंडोनेशिया आणि जगात इतरत्र करोनाचं सावट होतं. चीनमधून मध्यपूर्वेकडे या साथीच्या रोगाचा फैलाव होत होता. अशा काळात या देशांतून तबलिगी जमातीचे प्रसारक भारतात कार्यक्रमासाठी आले. १३-१४ मार्च दरम्यान देशातील विविध राज्यांतील तबलिकी जमातीचे लोक आणि हे परदेशातून आलेले धर्म प्रसारक यांचा कार्यक्रम झाला. टाळेबंदीनंतर जे बाहेर पडू शकले नाहीत, ते मशिदीतच राहिले. परदेशातून आलेल्या धर्म प्रसारकांना करोनाची बाधा झाली होती. त्यांच्यामुळे भारतातील अनेकांना लागण झाली. हा गुणाकार कुठपर्यंत पोहोचलाय याचा कुणालाही अंदाज नाही. सरकारी यंत्रणा कार्यक्रमात उपस्थित असलेल्यांचा, त्यांच्या सान्निध्यात आलेल्यांचा शोध घेत आहेत.
परदेशातून येणाऱ्या प्रसारकांना आणि कार्यक्रमाच्या आयोजकांनाही हे टाळता आलं असतं, पण धर्माचा कार्यक्रम म्हटलं की, डोक्यात एक हवा जाते. त्यात भर घालायला धर्माचे ठेकेदार असले की, वातावरण अजून तापतं. त्यातूनच अशा गोष्टी घडतात. तबलिगींचा इतिहास विसाव्या शतकातील आहे. हे लोक वर्तमान परिस्थितीवर कधीही बोलत नाहीत. स्वर्ग, पाताळ अशा आभासी कल्पनांमध्ये ते रमतात. सुफींबद्दल त्यांचे फार चांगले विचार नाहीत. धर्मांध, मूलतत्त्ववाद्यांचा त्यांच्यात भरणा आहे. कोणाच्याही जीवाला धोका होईल असं कृत्य करणं, हे ‘कुराणा’ला मान्य नाही. हा कार्यक्रम म्हणजे अनेकांच्या जीवाला धोका होता. तबलिगी जमातीचा जो कार्यक्रम झाला, तो इस्लामच्या विचारांच्या विरोधात आहे.
कार्यक्रमात सहभागी तबलिगींचा एवढाच दोष नाही. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांशी वाईट वर्तन, आपण अल्लाहचे लोक आहोत आणि आपल्याला काहीही होऊ शकत नाही हा उद्दामपणा, मशिद खाली करायला आलेल्या स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांना न जुमानल्यामुळे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांना त्यासाठी जावं लागणं इत्यादी इत्यादी. इथून पुढच्या काळात कार्यक्रमात सहभागी किती तबलिगींना आपली यंत्रणा शोधून काढणार आहे, ते यंत्रणेला कसा प्रतिसाद देणार आहेत आणि ज्यांना ताब्यात घेतलं आहे, ते कसं नियमांचं पालन करणार आहेत, याबद्दल फार सकारात्मकता बाळगता येत नाही.
महाराष्ट्रात संगमनेर, शिरूर या ठिकाणी ते लपून बसल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. असंच इतर राज्यांतही घडत आहे. स्थानिक तबलिगी बांधवांनी त्यांना मदत करून चूक केली. सरकारने मरकझसाठी परदेशातून आलेल्या लोकांना आता काळ्या यादीत टाकलं आहे. भारतीय दंड विधान कलम २६९, २७०, २७१, तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५नुसार गुन्हा दाखल करण्याबद्दल सूतोवात केलं आहे. हे योग्यच आहे. शिक्षा व्हायलाच हवी, याबाबत दुमत नाही.
या वेळी आपल्या कायदा सुव्यवस्थेकडेही कानाडोळा करून चालणार नाही. हा कार्यक्रम होत असताना आपली कायदा सुव्यवस्था त्याला रोखू कशी शकली नाही? तबलिगी काही आपल्या राज्यव्यवस्थेपेक्षा ताकदवान नाहीत. आपल्या सुस्त यंत्रणेलादेखील यासाठी दोषी धरलं पाहिजे. महाराष्ट्रात या कार्यक्रमाला परवानगी नाकारली, तशी दिल्लीतही नाकारता आली असती. १५ मार्चपर्यंत कार्यक्रम घेणाऱ्या तबलिगींना आपण ज्या वेळी दोष देतो, तेव्हा हे सोयीस्कररित्या विसरतो की, आपल्या देशाच्या संसदेचं अधिवेशन २३ मार्चपर्यंत चालू होतं. म्हणजे आपल्या सरकारलाही करोनाचं गांभीर्य समजायला उशीर झाला.
तबलिगींचा कार्यक्रम हे हिंदुत्ववादी मंडळींच्या हाती मिळालेलं आयतं कोलीत आहे. गोदी मीडियातील मोठी फौज कोमात गेल्यासारखी होती, ती कडाडून जागी झाली. त्यांच्यामुळे परिस्थिती आणखी चिघळली. ‘मशिदीवरचे भोंगे अजून बंद झाले नाहीत’, ‘तुम्ही नमाज पढण्यासाठी एकत्र यायचे बंद केले नाही’, ‘तुम्ही पोलिसांशी उद्धटपणे वागता’ इथपासून ते ‘देशात कोविड-१९चा प्रसार व्हायला तुम्ही मुस्लीमच जबाबदार आहात’, असे अनेक तारे तोडले. अर्णव गोस्वामी तर नळावरचं भांडण असल्यासारखं तावातावानं वाद घालत आहेत.
प्रसारमाध्यमांनी वार्तांकनाचे, चर्चेचे सारे संकेत पायदुळी तुडवल्यावर काय होतं, ते आपण गेल्या पाच–सहा वर्षांपासून अनुभवतोच आहोत. मूलतत्त्ववादी तबलिंगींवर हिंदुत्ववादी संघटनांची मंडळी तुटून पडली आहेत. याबद्दल विश्व हिंदू परिषदेनं पत्रक काढून तबलिगींचा कार्यक्रमच कसा करोनाच्या भूकंपाचा केंद्रबिंदू आहे, हे दाखवून देण्याचा प्रयत्न केलाय. पत्रकात तरी बरे शब्द आहेत, खाजगी चर्चांमध्ये मुस्लीम समुदायाविषयी अत्यंत घृणास्पद शब्दांचा वापर होत असताना दिसत आहे.
राज ठाकरेंनी तर ‘या लोकांना गोळ्या घालून ठार केलं पाहिजे’, असं विधान केलं आहे. असं जर वातावरण तापत राहिलं तर निझामुद्दीन मरकझला गेलेले समोर कसे येणार? गोदी मीडियाच्या आणि हिंदुत्ववादी मंडळींच्या अपप्रचारामुळे संपूर्ण मुस्लीम समाजाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जात आहे.
सोशल मीडियातून इतका गैरसमज पसरवला जात आहे की, आज ग्रामीण भागातील लोकही या परिस्थितीला मुस्लिमांनाच जबाबदार धरत आहेत. हे सर्व जाणूनबुजून घडवलं जात आहे. पोलिसांच्या अंगावर मुस्लीम तरुण थुंकत असल्याचा एक व्हिडिओ खूप व्हायरल केला गेला. वृत्तपत्रांनी ‘फॅक्ट चेक’ केल्यावर तो बनावट असल्याचं समोर आलं आहे. असं अनेक बनावट संदेश, व्हिडिओ सोशल मीडियातून व्हायरल केले जात आहेत.
काही मशिदींमधील होणारा सामुदायिक नमाज बंद व्हायला उशीर लागला, हे नाकारता येणार नाही; पण अशी अनेक उदाहरणं आहेत, जिथं मुस्लीम बांधवांनी मशिदीत नमाजाला जाणं टाळून गर्दी करू नका, चिकन सेंटर बंद ठेवा, कुठलेही कार्यक्रम घेऊ नका, हा संदेश दिला आहे. आरोग्य आणि पोलीस खात्यात असणारे सर्व मुस्लीम धर्मीय बंधू-भगिनी कोविड-१९च्या प्रतिबंधासाठी आपलं कर्तव्य बजावत आहेत. मुस्लीम समाजात सुधारणा घडून यायला हवी, असाही चर्चेचा सूर आहे.
मुस्लीम धर्मातील ज्येष्ठ कार्यकर्ते तसेच काही तरुणांनी मांडलेल्या भूमिका समजून घेणं महत्त्वाचं आहे. सामाजिक कार्यकर्ते अन्वर राजन यांनी ‘सुजाण मुस्लिमांनी समाजाला समज द्यावी’ अशा शीर्षकाची एक फेसबुक पोस्ट लिहिलीय. ते म्हणतात, “तबलिगच्या वैचारिक भूमिकेशी मी सहमत नाही; पण ही वेळ वैचारिक चर्चा करण्याची नाही, तर शांत चित्ताने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन समाजाला मार्गदर्शन करण्याची आहे.दिल्लीच्या मेळाव्यानंतर गावोगावी गेलेल्या जमातीच्या सभासदांनी जवळच्या ठिकाणी तपासणीसाठी आरोग्य केंद्रात जायला हवे. करोनाची पाहणी करायला येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांवर होणारे हल्ले चिंताजनक आहेत. खरे तर या कर्मचाऱ्यांना सहकार्य करणे आपल्याच हिताचे आहे. तबलिग जमात व सर्व नागरिकांनी या संकटाचा सामना एकजुटीने व परस्पर सहकार्याने करावा.”
पत्रकार म्हणून कार्यरत असणाऱ्या हालिमा कुरेशीनं समाजाला असं आवाहन केलंय की, “मरकझमधून आलेल्या सर्व मुस्लीम बांधवांनी स्वत: जाऊन तपासणी करून घ्यावी, प्रशासनाला कळवावे, ही माझी नम्र विनंती आहे. तुम्ही सगळ्या समाजाला संकटात टाकताय, हे लक्षात घ्या. मी काल एएनआयची बातमी वाचली. ज्यात मरकझमधून परतलेले अनेक जण आरोग्य कर्मचाऱ्यांशी गैरवर्तणूक करत असल्याचं म्हटलं आहे. एक मुस्लीम म्हणूनही मला खूप त्रास झाला हे वाचून. खरा इस्लाम आपल्या मेंदूत पाझरावा.”
वरील दोन्ही प्रतिक्रिया दोन वेगळ्या पिढ्यांतील प्रतिनिधींच्या आहेत. मुस्लीम समाजाला सुधारणेच्या दिशेनं नेणाऱ्या आहेत. ही अत्यंत सकारात्मक बाब आहे. याला इतर धर्मीयांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळायला हवा. मात्र वास्तवात तसं फार घडताना दिसत नाही. विशेषतः हिंदू धर्मियांनी जर योग्य भूमिका घेतली नाही, तर धर्मांध लोक याचा फायदा घेतील. आपल्या सकारात्मक प्रतिसादामुळे मुस्लिमांना आश्वस्त वाटेल, हिंदू-मुस्लीम ऐक्य दृढ होईल. असं घडलं नाही, तर समाजात आणखी दुरावा निर्माण होईल.
आपल्या राज्यघटनेत नागरिक म्हणून ११ कर्तव्यं सांगितली आहेत. त्यापैकी तीन ते आठ क्रमांकाची कर्तव्ये अशी आहेत - भारताचे सार्वभौमत्व, एकता व एकात्मता उन्नत ठेवणे व त्यांचे संरक्षण करणे, धार्मिक, भाषिक व प्रादेशिक किंवा वर्गीय भेदांच्या पलीकडे जाऊन भारतातील सर्व जनतेमध्ये सामंजस्य व बंधुभाव वाढीस लावणे, स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या प्रथांचा त्याग करणे, आपल्या संमिश्र वारशांचे मोल जाणून तो जतन करणे, विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, मानवतावाद आणि शोधकबुद्धी व सुधारणावाद यांचा विकास करणे.
या कर्तव्यांचं आचरण करून या देशातल्या बहुसंख्य असणाऱ्या हिंदूंनी आपल्या सद्सद्विवेकबुद्धीला जागं करण्याचा हा काळ आहे. विविधतेत एकता ही भारताची खरी ओळख आहे. बुद्ध-शंकराचार्यांपासून ते आपल्या राज्यघटनेपर्यंत हेच तत्त्वज्ञान आपल्याला सांगितलं आहे. देशाचा वारसा कुणा एका धर्माचा नाही, तो बहुसांस्कृतिक, संमिश्र स्वरूपाचा आहे. या संमिश्र वारशाला नख लावणारे लोक आपल्या आजूबाजूला सरसावले आहेत. हिंदू आणि मुस्लिमांमध्ये वाद निर्माण करणे, गैरसमज वाढीस लावणे आणि आपले राजकारण साधणे हा या मंडळींचा धंदा आहे. आपण सुजाण नागरिकच हा धंदा बंद करू शकतो.
धर्माचा अर्थ नेमका काय आहे, हे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींनी सांगितले आहे. ‘जीवन परिपूर्ण व कृतार्थ करणारी, हे अपरिपूर्ण, दोषमय, अशांत जीवन बदलून टाकणारी, उच्चत्तम ध्येयाच्या म्हणजे दिव्यत्वाच्या प्राप्तीची पद्धती म्हणजे धर्म होय. त्या ध्येयातच शाश्वत सत्य असते.’ आजचे धर्माचे ठेकेदार हा अर्थ लोकांना सांगत नाहीत. हिंदूंनी मुस्लिमांना कमी लेखणे हे हिंदुत्व नाही. हिंदू हीसुद्धा एक संमिश्र संस्कृती आहे. हिंदूंनी मुस्लिमांचा द्वेष न करता, द्वेष पसरवणाऱ्यांना थारा न देणं हेच हिताचं आहे. जी मंडळी हिंदू धर्माला हायजॅक करत आहेत त्यांच्यापासून धर्म वाचवायला हवा. नामदेवांपासून निळोबारायांपर्यंत अनेक हिंदू होते, पण द्वेषाचा कुठे लवलेशही नव्हता. या द्वेषरहित परंपरेचा स्वीकार करण्यातच हिंदूहित आहे.
कोविड-१९च्या संकटातून आपली आज ना उद्या नक्की सुटका होणार आहे, पण या संकटाचा फायदा घेऊन धर्मांध मंडळी राष्ट्रीय एकात्मतेला करत असलेली जखम कायम भळभळत राहील. यासाठी स्वतः ला ‘खुदा के लिए कुछ भी करनेवाला बंदा’ किंवा ‘भक्त’ होण्यापासून वाचवायला हवं.
.............................................................................................................................................
लेखक सतीश देशपांडे मुक्त पत्रकार आहेत.
sdeshpande02@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
??? ?????
Mon , 06 April 2020
काही लोकांच्या डोक्या ला जंग लागला आहे थोडया लोकांना साठी पूर्ण लोकांना दोष देत आहे सर्व धर्मा मदे असे लोक असतात पण जे उगडीस पडले ते गुन्हेगार आहे हा समाजाचा नियम आहे