अजूनकाही
काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रात्री नऊ वाजून नऊ मिनिटांनी नऊ मिनिटापर्यंत घरातील सर्व विजेचे दिवे बंद करून पणत्या, मेणबत्ती किंवा मोबाईलमधील लाईट वा टॉर्च यांचा प्रकाश करावा, असे आवाहन भारतीय जनतेला केले. हे आवाहन त्यांनी आपल्याही देशात थैमान घातलेल्या करोना विषाणूच्या विरुद्ध चालू असलेल्या लढ्याचा भाग म्हणून, अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचा एक मार्ग म्हणून, तसेच सर्व भारतवासीयांना या करोनाच्या संकटाविरुद्ध एकजुटीने लढण्याचा संकल्प करायचा असल्याचे आपल्या तीन एप्रिल भाषणातून सांगितले.
असे आवाहन करण्यापूर्वी त्यांनी केंद्रीय ऊर्जामंत्र्यांशी अथवा ऊर्जा खात्याच्या सचिवाशी, अथवा वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली असेल, असे वाटत नाही. महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी देशभर एकाच वेळी असे एकाएकी लाईट बंद करणे आणि दहाव्या मिनिटाला एकाएकी सर्वांनीच ते सुरू करणे, याचा इलेक्ट्रिक पुरवणाऱ्या ग्रिडवर विपरीत परिणाम होऊ शकतो, अशा अर्थाची वक्तव्ये केली. स्वाभाविकच असे काही होणार नाही, अभियंत्यांनी त्याबाबतची सोय केली आहे, असे वरिष्ठ अभियंत्याकडून सांगण्यात आले. ते काहीही असले तरी लाईट चालू-बंद केल्याने करोनाच्या विरुद्ध कसा संघर्ष होईल व तो एकजुटीने कसा लढवता येईल, याचे तर्कशास्त्र मात्र पटले नाही.
याचे साधे कारण असे आहे की, आधी असलेला लख्ख प्रकाश बंद करायचा, त्यानंतर मिणमिणत्या पणत्या, मेणबत्त्या अथवा दिवे लावायचे, असे करण्याने प्रकाशातुन अंधाराकडे जाणे होते की, अंधाराकडून प्रकाशाकडे? तरीही देशातील बहुसंख्य जनतेने या आवाहनाची अंमलबजावणी केली, यात मात्र काहीही शंका नाही.
यामागील दुसरा जो तर्क सांगितला गेला, तो म्हणजे करोनाच्या विरुद्ध सर्वांनी एकजुटीने लढण्याचा. दिवे व मेणबत्त्या लावणे व विझवणे, घरातील लाईट बंद व चालू करणे, या मार्गाने करोनाशी लढा कसा देता येईल? जगात कोणत्या देशाने या मार्गांनी करोनाशी लढा दिला आहे? सध्यातरी त्याच्याशी लढण्याचा एकमेव मार्ग म्हणजे डॉक्टर, नर्स व इतर कर्मचाऱ्यांना पीपीई पुरवणे, नागरिकांच्या त्याबाबतच्या टेस्ट वाढवणे, व्यक्ती व्यक्तीमधील अंतर वाढवणे, होम क्वारंटाइन करणे, आयसोलेशनमध्ये ठेवणे, लॉकडाऊनची अंमलबजावणी करून घेणे, हेच मार्ग जगातील इतर देशांनी अवलंबले आहेत.
करोनाशी लढा करण्याबाबत यशस्वी झालेल्या चीनचे अध्यक्ष शी जिन पिंग यांना याचा चांगलाच अनुभव आहे. ते नरेंद्र मोदी यांचेही चांगले मित्र आहेत. साबरमतीच्या किनाऱ्यावर त्यांनी त्यांना झुल्यावर झुलवले होते. तामिळनाडूतील महाबली पुरम या ऐतिहासिक ठिकाणी त्यांचे स्वागत केले होते. त्यांच्याशी जरी फोनवरून त्यांचा अनुभव विचारला असता, तर त्यांनीही याबाबत त्यांना योग्य सल्ला दिला असता.
दुसरे म्हणजे करोनाविरुद्ध सर्वांनी एकजुटीनने लढले पाहिजे, असा जो दुसरा तर्क दिला गेला, त्याची तर खुद्द करोनानेच गरज ठेवलेली नाही. कारण या विषाणूने कोणतीही भौगोलिक मर्यादा न पाळता, कोणताही धर्मभेद न करता, स्त्री-पुरुष असा लिंगभाव न जुमानता, जातीभेद न करता, तरुण अथवा म्हातारा याचीही फिकीर न करता, सर्वांवरच हल्ला केला आहे. एका अर्थाने त्यानेच या सर्वांची एकजूट घडवून आणली आहे. कम्युनिस्ट चीनपासून तर भांडवली अमेरिकेपर्यंत, दक्षिण कोरियापासून तर उत्तर आयर्लंडपर्यंत त्याने आपले हात पाय पसरले आहेत. तेव्हा या साऱ्यांना एकजूट होऊनच या करोनाशी संघर्ष करावा लागत आहे. म्हणूनच कम्युनिस्ट रशियाचे विमान वैद्यकीय मदतीचे सामान घेऊन अमेरिकेत उतरते. कम्युनिस्ट क्युबाचे डॉक्टर्स सामानासह स्पेनमध्ये जातात, तर चीनची मदत इटलीला मिळते.
तेव्हा करोनाशी संघर्ष हा आताच्या काळात निसर्ग विरुद्ध मानव असा मूलभूत झालेला आहे. मानवामानवामधील वर्गविरोध हा आताच्या काळात दुय्यम स्थानी गेलेला आहे. याचे भान सर्वच कम्युनिस्ट परंपरा असलेल्या राष्ट्रांना आहे. म्हणूनच ते जबाबदारीने वागत आहेत. याचे भान खरेतर भांडवली मार्ग स्वीकारलेल्या राष्ट्रांनी ठेवायला पाहिजे. पण ते त्यांच्याकडून ठेवले जातेच असे नाही.
कम्युनिस्ट व भांडवली हाच अंतर्विरोध अव्वलस्थानी आहे असे मानल्यामुळेच सुरुवातीला या विषाणूकडे दुर्लक्ष करण्यात आले. चीनमध्ये जेव्हा या विषाणूचा पहिला बळी गेला आणि त्यांनी लॉकडाऊनचे अस्त्र वापरले, त्या वेळी ट्रम्प-मोदी अहमदाबादला जास्तीत जास्त गर्दी जमवण्याच्या कामी लागले होते. ‘चायनीज व्हायरस’, ‘वूहान विषाणू’ असे म्हणून त्याची टिंगल करत होते. पण या चुका आता त्यांच्या देशातील जनतेला भोगाव्या लागत आहेत. शी जिन पिंग स्वतः मात्र अशा भानगडीत पडले नाहीत. त्यांनी याबाबत अमेरिकेला एवढाच सल्ला दिला की, तुम्ही आमच्यावर आरोप करण्यात वेळ घालवण्याऐवजी या विषाणूमुळे मृत्यूमुखी पडत असलेल्या आपल्या जनतेकडे लक्ष द्या.
आपल्या भारतात मात्र या विषाणू विरोधात एकजुटीने लढण्याऐवजी, हा लढा जणू काही हिंदू-मुस्लीम असाच आहे, हे ठसवण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक होत आहे. हे काम केवळ सोशल मीडियातूनच नव्हे तर प्रमुख मीडियातूनही चालू आहे. मुस्लीमधर्मीय जसे अंधश्रद्धाळू आहेत, तसेच हिंदू धर्मातही आहेत. इतर धर्मही त्याला अपवाद नाहीत. मुस्लिमांमधील तबलिगी लोकांच प्रकार हा त्या अंधश्रद्धाळूंपैकीच एक आहे. त्यांच्यातील अंधश्रद्धाही आपणाला व त्या धर्मीयातील सुधारणावाद्यांना प्रयत्नपूर्वक दूर कराव्या लागतील. पण जणू काही आपल्या देशात करोनाचा प्रसार व्हायला जणू काही तेच एकमेव जबाबदार आहेत, अशा रीतीने मुस्लीम धर्मीयावर हल्ला करण्यात येत आहे. मुस्लिम धर्मीयावर हल्ला करण्यासाठी जणू काही ही नामी संधीच मिळाली आहे, अशा पद्धतीने आपल्या देशातील राज्यकर्त्यांकडून प्रयत्न होत आहेत. पंतप्रधानही त्याला अपवाद नाहीत. मूकदर्शकाचा आव आणून ते हे सर्व पाहत आहेत. त्याला आळा घालण्याचा त्यांनी कोणताही प्रयत्न केलेला नाही.
जगातील सर्व देशांचे मोठे नेते करोना विरुद्ध संघर्षात व्यस्त असताना आपल्या देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोठे आहेत, असा प्रश्न सोशल मीडियातून विचारला जात होता. स्वतःच्या जीवाच्या भीतीने, विदेशातील काही पुढाऱ्यांना जसे त्यांच्या तपासणीमध्ये करोना पॉझिटिव्ह निघाल्यानंतर त्यातून बरे होण्यासाठी त्यांनी स्वतःला ‘होम क्वारंटाईन’ करून घेतले, गृहमंत्री अमित शहा त्यांना तसे काहीही झाले नसले तरी सावधगिरी म्हणून त्यांनी स्वतःला ‘होम क्वारंटाईन’ केले असेल तर ते चूक आहे, असे म्हणता येणार नाही. पण तेथेही त्यांचे ‘वर्क फ्रॉम होम’ चालूच आहे. अशाही धामधुमीच्या काळात त्यांनी काश्मीरमध्ये १५ वर्ष काम केलेल्या कर्मचाऱ्यांना व त्यांच्या अपत्यांना तेथील नागरिकत्व मिळण्याच्या कायद्याचा आराखडा तयार केलाच. त्यावरून काश्मीरमध्ये गदारोळ उठला, म्हणून आता त्यात त्यांनी काही दुरुस्त्या केल्या.
तेव्हा पंतप्रधान म्हणतात त्याप्रमाणे खरोखरच सर्वच धर्मीय भारतीय जनतेला एकजुटीने करोनाच्या विरोधात लढायचे आहे की, याही संधीचा फायदा घेऊन आपल्या हिंदूराष्ट्र उभारणीच्या विरोधात असलेल्या विचारवंतांना, राजकीय कार्यकर्त्यांना, समाजसुधारकांना वेगळे पाडायचे आहे? तसे वेगळे पाडण्याचा एक कार्यक्रम म्हणून विजेचे दिवे बंद करण्याचा तर मार्ग त्यांनी अवलंबला नाही?
अफगाणिस्तानमध्ये ज्यावेळेस तालिबानी सत्तेवर आले, त्यावेळेस त्यांनी ‘सच्च्या मुस्लिमां’नी आपल्या घरावर झेंडे लावावेत असे फर्मान काढले होते. ज्या घरावर असे झेंडे लावले नव्हते, त्या घरावर नंतर हल्ले करण्यात आले. घरावरील झेंडे हे त्यांच्या शरिया सत्तेचे समर्थक असल्याचे निदर्शक होते.
पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शहा, ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत, तो उगीचच असा काहीतरी कार्यक्रम देईल, असे वाटत नाही. त्यामागे त्यांची निश्चितच ‘सोची-समझी साजिश’ आहे.
.............................................................................................................................................
लेखक कॉ. भीमराव बनसोड मार्क्सवादी कार्यकर्ते आहेत.
bhimraobansod@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment