अजूनकाही
आयुष्यात कधीही, कोणत्याही चळवळीत न उतरलेले पंतप्रधान नरेंद्र दामोदरदास मोदी करोना विषाणूच्या विरोधातील उपाय एका चळवळीत पालटायच्या प्रयत्नात दिसत आहेत. मात्र त्यांचे संघसंस्कारित आणि संघपुष्ट मन गांधीजींनी एखादी चळवळ जिवंत ठेवण्यासाठी केलेले उपाय कधीही स्वीकारू शकणार नाही. स्वातंत्र्य-चळवळीत खंड पडताच गांधीजींनी वेळोवेळी लोकांना खूप कार्यक्रम दिले. गांधीजी राजकीय कृती होत नसतानाही लोकांच्या मनामधून स्वातंत्र्याची आकांक्षा नाहीशी होऊ नये, म्हणून त्यांना गुंतवून ठेवण्याची युक्ती करत. सूतकताई, खादीचे कापड, ग्रामस्वच्छता, अस्पृश्यता निर्मूलन, दारूबंदी, स्वावलंबनातून निर्मिती, आश्रम, रुग्णसेवा, सामूहिक प्रार्थना, निरक्षरांना अक्षरज्ञान… असे खूप.
केवळ बहिष्कार वा असहकार भारतीयांना दिशा देऊ शकणार नाही, म्हणून भारतीयांना विधायक उपक्रमात भाग घ्यायला लावून स्वतंत्र, स्वाभिमानी देशाची उभारणी गांधीजी करू इच्छित होते. स्वत:ला हिंदू म्हणवून घेत त्यांनी ना कधी धार्मिक विधी-परंपरा-प्रथा-सण आदींचा स्वातंत्र्य-जागृतीसाठी उपयोग केला, ना कधी ते यज्ञात वा उत्सवात उतरले.
मोदींना गांधीजींची जागा घेऊन आपण कसे करोनाला ‘क्विट इंडिया’ करायला लावले, याची प्रचंड ओढ निर्माण झालेली दिसते. पण त्यासाठी गांधीजींसारखे सतत लोकांत राहावे लागते. कशाचाही आडपडदा ठेवायचा नसतो आणि सत्य बोलावे लागते, याचा त्यांना विसर पडलेला दिसतोय. कित्येक छोटे-मोठे आणि सामान्य-असामान्य लोक सोबत ठेवावे लागतात. मोदी गांधीजींचे कार्य न स्वीकारता त्यांचे नेतृत्व हिसकावू पाहत आहेत.
टीव्हीवरून भाषणे करून कशाचीही चळवळ होत नसते. किंबहुना चळवळीचा अनुभव शून्य असताना पदाचा लाभ घेऊन आणि दहशत उत्पन्न करून मोदी ‘करोना हटाव’ची चळवळ उभी करू पाहत आहेत. अनुशासन व सेवा या दोन मुद्द्यांनी मोदी जी चळवळ उभी करू इच्छितात, ती मुळातच एका भयामधून उगवलेली आहे. भीतीपोटी माणसे काहीही करतात. गांधीजींनी आधी इंग्रजी साम्राज्याचे भय लोकांच्या मनातून काढून टाकून त्यांना ‘निर्भय बनो’ म्हटले.
गांधीजींच्या कार्यक्रमांची तेव्हा हिंदू महासभा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांनी भरपूर टिंगल केली होती. तशीच आता मोदींच्या ध्वनी-प्रकाश योजनेची होते आहे. याचा अर्थ मोदींना गांधीजींचे वलय प्राप्त झाले असे नाही. कारण संघ व महासभा यांना सत्याग्रह, उपोषणे, चरखा, तुरुंगवास, स्वावलंबन आणि असहकार यांमधून स्वातंत्र्य मिळणार नाही, त्यासाठी सशस्त्र कारवाईच हवी, असे वाटत होते. मोदींच्या उपायांची टिंगल होण्याचे कारण ते श्रद्धा-अंधश्रद्धा आणि बळ-बाष्कळ यांच्या हद्दीवर उभे आहेत.
मोदी यांनी तीन एप्रिलच्या भाषणात वापरलेले शब्द पाहा – विराटता, दिव्यता, जनताजर्नादन ईश्वर का रूप, महाशक्ती, साक्षात्कार, विराट रूप, अंध:कार, प्रकाश की ताकद, जागरण, महासंकल्प, कृतीसंकल्प, लक्ष्मणरेखा, रामबाण उपाय, माँ भारती स्मरण इत्यादी.
ही सारी धर्म व अध्यात्म यांची शब्दकळा आहे. मोदींनी काही दिवसांपूर्वी नवरात्र पाळले. त्या दिवसांत ते उपवास करतात, त्याप्रमाणे ते नऊ हा आकडा पाच एप्रिलच्या सामुदायिक कार्यक्रमांसाठी निवडतात का? नऊ वाजता नऊ मिनिटे विजेचे दिवे बंद करून, मिणमिणत्या ज्वाला पेटवून कोणती महाशक्ती उत्पन्न होणार?
पाच एप्रिल रोजी हिंदू कॅलेंडरनुसार चैत्र शुक्ल द्वादशी असून तेव्हा प्रदोषही आहे. रविवारी येणारे प्रदोष व्रत स्वास्थ्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जाते. ‘रविप्रदोषव्रत’ या नावाने ते ओळखतात. जे लोक हे व्रत करतील त्यांचे स्वास्थ्यविषयक प्रश्न सुटतील असा निर्वाळा दिला जातो. मोदी शिवभक्त असून त्यांनी जाणीवपूर्वक काशी मतदारसंघ निवडलेला आहे.
ते त्यांची वैयक्तिक श्रद्धा अशा रीतीने देशाला पाळायला लावतात का? विजेचे दिवे मालवून त्याऐवजी तेलाचे दिवे वा मेणबत्ती उजळवून मध्ययुगात परतायचा नऊचा उपाय आहे का?
मोदी गेली काही वर्षं आपली श्रद्धा अधिकाधिक व्यक्त करत आहेत. भाषा व कृती दोन्हींमधून त्यांचे सश्रद्ध मन डोकावते. हरकत नाही! मात्र ते सरकार म्हणून करोनासारख्या संकटाच्या वेळी नागरी जीवन व्यापू लागल्यास हरकत घ्यावीच लागेल. कारण वैज्ञानिक उपाय अजूनही भारत सरकार धड उभारू शकलेले नाही. त्याऐवजी मोदी स्वत:हून अन्य कोणालाही विश्वासात न घेता, राष्ट्रीय कार्यक्रम म्हणून काही आचरटपणा सुचवून स्वत:चे हसे करवून घेत असतील, तर ते बरे दिसेल का?
मोदींचा एककल्ली, एकारलेला कारभार करोनाच्या काळात आणखी ठळक झाला आहे. करोना आटोक्यात येईलच. तो विज्ञान आणि मनुष्य यांनाच हटवता येईल. दैवी कल्पना अथवा ईश्वराचा धावा करून काहीही साध्य होणार नाही. मात्र मोदी यांना जे हिंदूराष्ट्र उभारायचे आहे, त्याच्या आड येणाऱ्या ‘करोना दैत्या’चे निर्दालन एखादी महाशक्ती निर्मून होणार नाही, हे कळत नाही असे नाही. तरीही ते तसे करणार. कारण एकांड्या व हुकूमशाही वृत्तीच्या नेत्याला हाताखालच्या नेत्यांचे सतर्क, सुविद्य व शास्त्रीय म्हणणेही ऐकायचे नसते. त्याने ते ऐकले तर तो त्यांच्या पातळीवर जाऊन बसेल म्हणून!
स्वत:चा बचाव करायला तो हाताखालच्यांना बळीचा बकरा व दोषाचे खापर फोडण्याची जागा बनवत राहतो. खरे तर असा हट्टी, दुराग्रही, आत्मलुब्ध नेताच ‘सोशल डिस्टन्सिंग’ फार काळजीपूर्वक वापरत असतो.
इतकेच काय, तो आपल्या रयतेपासूनही लांब अंतरावर राहत असतो. म्हणून मोदी कधीही कोणत्याही चळवळीत नव्हते आणि नसतील. आताचे त्यांचे ‘करोना चले जाव’ नुसते भाषणे करून कधीच यशस्वी होणार नाही. कारण चळवळ करण्याचा त्यांना अनुभव नाही. म्हणून ते त्यांचे जे सामर्थ्य आहे, ते भाषण, संवादकौशल्य ईश्वराच्या रूपाला व अदृश्य अशा महाशक्तीच्या आभासाला चिकटवत आहेत!
.............................................................................................................................................
लेखक जयदेव डोळे माध्यम विश्लेषक आहेत.
djaidev1957@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment