अजूनकाही
५ एप्रिल १९१९ रोजी ‘लॉयल्टी’ ही भारतीय मालकीच्या सिंदिया शिपिंग कंपनीची पहिली बोट मुंबईहून इंग्लंडला जायला निघाली. उद्या त्याला १०१ वर्षं पूर्ण होतील. तेव्हापासून आधुनिक युगातलं भारताचं मर्चंट नेव्ही - व्यापारी नौवहन - सुरू झालं. १९६४ पासून तो दिवस भारताचा ‘नॅशनल मॅरिटाईम डे’ (‘राष्ट्रीय सागर दिन’) म्हणून साजरा केला जातो. ब्रिटिश शिपिंग कंपन्यांनी ब्रिटिश सरकारच्या मदतीने सिंदियाला जगू न देण्यासाठी सगळे प्रयत्न केले. सिंदियाचा अस्तित्वासाठीचा लढा भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचाच भाग, पण एक वेगळा विषयच आहे.
व्यापार हे देशाचं जीवनदायी रक्तच. ते रक्त कायम खेळत राहिलं पाहिजे. म्हणजे आयात-निर्यात अविरत आणि अनिर्बंध चालू असली पाहिजे. त्यात अजिबात खंड पडता कामा नये. ही आयात-निर्यात म्हणजे माल नेण्या-आणण्याचं काम व्यापारी जहाजं करत असतात. काही वेळा काही आयातीवर देशाचं अस्तित्वच अवलंबून असतं. उदा. १९६०-७०च्या दशकात भारताला करावी लागलेली गहू आणि इतर धान्याची आयात. त्याचं वर्णन त्या वेळेस ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने ‘शिप टू माऊथ’ असं केलं होतं. ते अति महत्त्वाचं कार्य त्यावेळेस व्यापारी जहाजांनी केलं. १९४२-४३ साली बंगालातील दुष्काळात चर्चिलने ऑस्ट्रेलियन गहू भारतास आणण्यास बंदी करून लाखो माणसं मारली ही गोष्ट सर्वश्रुत आहे.
भारतात वापरलं जाणारं पेट्रोल-डिझेल आयात केलं जातं. तेलवाहू टँकर ते काम अहोरात्र सात समुद्र ओलांडून करतात. थंड प्रदेशातल्या अनेक देशांना तेल नुसतं वाहतुकीसाठीच नव्हे तर हिवाळ्यात उबदार राहण्यासाठीही आवश्यक असतं. त्याशिवाय त्यांचं जीवनच अशक्य होईल. यातली कुठलीही गोष्ट परदेशी शक्तीच्या हातात गेली, तर ती देशाची सहज गळचेपी करू शकते. दोन्ही महायुद्धात शत्रूच्या व्यापारी बोटी बुडवून त्याला भुकेनं मारणं किंवा थंडीने गारठवून टाकणं, यासाठीच मोठ्या आरमारी लढाया झाल्या.
या महाकाय बोटी बांधण्याचा आणि त्यात नित्य सुधारणा करण्याचा मोठा उद्योग जगातल्या प्रगत देशात असतो. त्या बोटी महासागरातून नेण्या-आणण्यासाठी नौकानयन करू शकणारे प्रशिक्षित नाविक लागतात. त्यांना शिक्षण देणाऱ्या नॉटिकल अकॅडमी- नेव्हिगेशन स्कुल असतात. त्यात प्रवेश मिळवायला स्पर्धा परीक्षांना बसावं लागतं.
केल्याने देशाटन, पंडित मैत्री, सभेत संचार |
शास्त्र ग्रंथ विलोकन, मनुजा येतसे चातुर्य फार ||
मोरोपंतांच्या या प्रसिद्ध आर्येमध्ये मनुष्याच्या अंगी हुशारी येण्यासाठी देशाटनाचा उल्लेख सर्वांत आधी केला आहे. देशाटन हा तर सर्व नाविकांचा व्यवसायच. बोटीवर काम करताना विविध देशातल्या इमिग्रेशन, कस्टम, पोर्ट हेल्थ, एजंट, चार्टरर अशा अनेक लोकांशी संबंध येत असतो. भारतीय वकिलातीत जाण्याचे प्रसंग येतात. तिथल्या फर्स्ट सेक्रेटरीपासून कॉन्सल, राजदुताशी गाठीभेटी होतात. त्यामधून शिकायला तर मिळतंच, पण आपलं जीवन समृद्धही होत असतं. `
भो पंचम जॉर्ज, भूप, धन्य धन्य ! विबुधमान्य सार्वभौम भूवरा! ॥
नयधुरंधरा, बहुत काळ तूंचि पाळ ही वसुंधरा ॥
शोभविशी रविकुलशी कुलपरंपरा ॥ध्रु॥
ही अज्ञात कवींनी राजे पंचम जॉर्ज यांच्या राज्यारोहणावेळी रचलेली कविता १९१२ ते १९३८ या कालखंडात महाराष्ट्रातल्या शाळातून म्हटली जात असे. कवितेत सुरुवातीसच कवीने त्या सार्वभौम भूवरास ‘नयधुरंधर’ संबोधलं आहे. म्हणजे ‘मास्टर मरीनर’. इतिहासात झालेल्या सर्वांत विशाल साम्राज्याचा सम्राट दुसरा-तिसरा कोणी नसून एक मास्टर मरीनर आहे. शिक्षणं अनेक प्रकारची, अनेक व्यवसायांसाठी आहेत, पण ज्या नृपतीपुढे दिल्ली दरबारात भारतातले मी मी म्हणणारे सर्व राजेरजवाडे वाकून अभिवादन करून गेले, त्यास नाविकाचं सर्वोच्च शिक्षणच सार्थ होतं. म्हणून इंग्लंडचे राजे, राजपुत्र हे नेहमी नौदलातलं शिक्षण घेतात. आणि कुठल्याही अधिकृत समारंभात नौदलाच्या गणवेशात असतात.
दोन्ही महायुद्धात अतिजरुरीचा माल भरभरून आणणारी जहाजे शत्रूनं बुडवून अतोनात नुकसान केलं. त्यात भारतीय मालकीची थोडी जहाजं होतीच, पण कित्येक हजार भारतीय नाविक बुडून पावले. त्यांचं ना कुठे थडगं, ना समाधी. त्या त्यागाप्रीत्यर्थ राजे पंचम जॉर्जनी ‘मर्चंट नेव्ही’ हा शब्दप्रयोग रूढ केला. मर्चंट नेव्हीला ‘फोर्थ आर्म ऑफ डिफेन्स’ म्हटलं जाऊ लागलं.
१९२८मध्ये पंचम जॉर्जनी मोठा राजपुत्र ‘क्राऊन प्रिन्स’ आठवा एडवर्ड याला ‘मास्टर ऑफ मर्चंट नेव्ही अँड फिशिंग फ्लीट’ हा किताब बहाल केला. तो त्याने राज्यारोहणानंतरही चालू ठेवला. त्यांनी राज्यत्याग केल्यावर नवीन राजे सहावे जॉर्ज यांनी तो स्वतःला लावला. त्यांच्यानंतर राणी एलिझाबेथ सध्या तो लावतात. भारत कॉमनवेल्थचा सदस्य आहे म्हणून १९६१ साली राणीसाहेब आणि प्रिन्स फिलिप भारत दौऱ्यावर आलेले असताना ‘कंपनी ऑफ मास्टर मॅरिनर्स ऑफ इंडिया’च्या बोलावण्याला मान देऊन ‘गेटवे ऑफ इंडिया’ समोर त्यांच्यासोबत छायाचित्रं काढण्यासाठी राणीसाहेब स्वतः उभ्या राहिल्या. प्रिन्स फिलिपनी ट्रेनिंग शिप ‘डफरीन’ला भेट दिली.
१९६५ चं भारत-पाकिस्तान युद्ध सुरू झालं, त्यावेळेस भारताची तीन व्यापारी जहाजं पाकिस्तानी बंदरात होती. ती पाकिस्ताननं ताबडतोब पकडून ठेवली. जहाजावरील मुस्लीम, ख्रिस्ती आणि पारशी ऑफिसर व खलाशांना एका घरात स्थानबद्ध केलं, तर सर्व हिंदूंना वेगळं करून तुरुंगात पाठवलं. दैवयोगे तीन पाकिस्तानी जहाजं भारतात पकडली गेली. चार महिन्यांनी अदलाबदलीत त्यांची सुटका झाली. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या जिनीव्हा कन्व्हेन्शनमध्ये व्यापारी जहाजांच्या नाविकांनादेखील ‘प्रिझनर ऑफ वॉर’ म्हणजे ‘युद्धकैदी’ हा दर्जा मिळाला आहे.
समुद्रावर काम करणाऱ्यांना समुद्र भरभरून देतो. कोकणातला दर्यावर्दी समाज शिवाजीमहाराजांच्या वेळेपासून ‘कुशल दर्यावर्दी’ म्हणून प्रसिद्ध आहे. तो एक स्थानिक ‘अॅरिस्टोक्रसी’ आहे. पंचक्रोशीतल्या इतर सामान्यांपेक्षा ते जास्त प्रगत असतात. बाहेर न दिसणाऱ्या आणि गाजावाजा न होणाऱ्या या व्यवसायास आणि व्यावसायिकांना ५ एप्रिल या ‘राष्ट्रीय सागर दिनी’ अभिवादन!
............................................................................................................................................
लेखक कॅ. मिलिंद परांजपे निवृत्त नौदल अधिकारी आहेत.
captparanjpe@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright Aksharnama, 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment