अजूनकाही
कोविड-१९ या करोनाच्या विषाणूने सध्या जगभर थैमान घातले आहे. काही लहानसहान देशांचे अपवाद वगळता संपूर्ण युरोप, बराचसा आशिया व आफ्रिका, मध्य पूर्वेकडील देशांना या विषाणूने आपला विळखा घट्ट केला आहे. इतकेच नव्हे तर दिवसेंदिवस तो आणखीच आवळत चालला आहे. इटली, स्पेन, फ्रान्स व आता अमेरिका इत्यादी देशांत या रोगाची लागण झालेल्यांची व त्यातील मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. आपल्या भारतातही हीच परिस्थिती आहे. अपवाद फक्त चीनच्या ज्या हूबेई प्रांतातील हुआन शहरातून या रोगाचा विषाणू जगभर पसरला, त्या प्रांतातील जनजीवन मात्र पूर्ववत होत चालले आहे. गेले तीन महिने तेथेही जनजीवन पूर्णपणे ठप्प झाले होते. तेथे मात्र आता ते पूर्वपदावर आले आहे.
हा विषाणू जगात प्रथमच सार्स, ईबोला, स्वाईन फ्ल्यू यांसारख्या विविध अवस्थांतून संक्रमित झालेला नवीनच प्रकारचा विषाणू असल्यामुळे अजून त्यावर परिणामकारक होईल असे कोणतेही औषध उपलब्ध नाही. जगातील सर्व संशोधन संस्था, वैज्ञानिक त्याच कामी लागले असले तरी अजून त्यात त्यांना यश आलेले नाही. यश आल्यानंतरसुद्धा त्याबाबतची लस सर्वसामान्य लोकांना मिळेपर्यंत वर्ष-दीड वर्षाचा कालावधी लागेल, असे त्यांनी सांगितले आहे.
थोडक्यात परिस्थिती अत्यंत बिकट आहे. म्हणून त्यावरचा सध्याचा एकमेव इलाज म्हणजे सोशल डिस्टन्सिंग (सामाजिक अंतर). परस्परांतील अंतर वाढवणे हाच एकमेकांचा संसर्ग न होण्याचा एकमेव मार्ग असल्याचे प्रथमच या रोगाचा मुकाबला करणाऱ्या चीनने जगाला दाखवून दिले आहे व जगानेही ते स्वीकारले आहे. हेच सामाजिक अंतर त्यांनी यशस्वीपणाने राखल्यामुळेच या विषाणूला ते आवर घालू शकले आणि संपूर्ण जनजीवन पूर्वपदावर आणू शकले. लोक त्यालाच आता ‘लॉकडाऊन’ म्हणतात.
पण इतर देशांनी मात्र हा प्रकार चीन इतक्या प्रभावीपणाने अंमलात आणलेला नाही. सुरुवातीला ज्या त्या देशातील सरकारनेच अशा लॉकडाऊनकडे फारशा गंभीरतेने पाहिले नाही. ज्या सरकारने त्याची गंभीरता लक्षात घेतली व लॉकडाऊन जाहीर केले, तेथील जनतेने त्याला पाहिजे तितका प्रतिसाद दिला नाही, किंबहुना जनतेनेही सुरुवातीला त्याकडे दुर्लक्ष केले. त्याचे परिणाम आता त्या त्या देशातील जनता भोगत आहे. परिणामी या विषाणूची लागण झालेल्यांची व त्यांच्यातील मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
आपल्या भारतातील परिस्थितीही यापेक्षा वेगळी नाही. एक तर विदेशातून येणाऱ्या प्रवाशांवर प्रतिबंध घालणे, विदेशातून आलेल्या भारतीयांची योग्य तपासणी करणे याकडे आपण दुर्लक्ष केले. काही राज्यांनी अगोदरच टप्प्याटप्प्याने लॉकडाऊनची घोषणा केली होती. केंद्र सरकारने असे लॉकडाऊन करण्यासही थोडा उशीरच केला. जेव्हा केले तेव्हाही त्याची कोणतीही पूर्वतयारी न करता केल्यामुळे, नोटबंदीच्या वेळेस अथवा कलम ३७० हटवताना सामान्य लोकांची, कामासाठी आलेल्या प्रवासी मजुरांची जी दाणादाण उडाली, त्यापेक्षाही भयंकर परिस्थिती आताच्या लॉकडाऊन घोषणेनंतर झाली. परिणामी लॉकडाउनचाच फज्जा उडाला. वेगवेगळ्या राज्यांतून मजुरांचे लोंढेच्या लोंढे आपापल्या गावाकडे पायीच जायला मजबूर झाले. ना त्यांच्या खाण्यापिण्याची, ना इतर कोणती सुविधा त्यांना उपलब्ध होती. लॉकडाऊनमुळे सर्वच बंद होते. त्यातच पोलिसांनी त्यांच्यावर जो मारहाणीचा, औषधे फवारण्याचा कहर केला तो वेगळाच!
करोनाच्या या साथीबद्दल विविध देशांच्या राष्ट्रप्रमुखांनी आपापल्या जनतेशी संवाद साधून त्यांना सावध केले. याबद्दल जनतेने कशी सावधगिरी बाळगावी, हे सांगत असतानाच सरकार त्यासाठी काय करणार आहे, याचीही माहिती आपापल्या जनतेला दिली. आपल्या देशाच्या पंतप्रधानांना तर भाषणे करण्याचा चांगला सराव आहे. त्यांनीही आपल्या जनतेशी याबाबत संवाद साधला. त्यात जनतेने काय करावे हे त्यांनी सांगितले. पण सरकार त्यासाठी काय करणार आहे, याबद्दलचा उल्लेख त्यांच्या भाषणात नव्हता. सुरुवातीच्या संवादात लोकांनी डॉक्टर्स, परिचारिका, इतर जे कर्मचारी रुग्णांची सेवा करतात त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी टाळी व घंटानाद आपापल्या घरूनच करण्याचे त्यांनी सुचवले. लोकांनीही त्याची अंमलबजावणी मोठ्या उत्साहाने, लॉकडाऊनचा उद्देश बाजूला सारत एखाद्या उत्सवाप्रमाणे साजरा केला.
आता पुन्हा त्यांनी उद्या, रात्री नऊ वाजून नऊ मिनिटांनी आपल्या घरातील सर्व दिवे बंद करून मेणबत्त्या, दिवे लावून रोशनाई करावी, हे न जमल्यास मोबाईल फ्लॅश व इतर टॉर्च लावावेत असे जनतेला आवाहन केले आहे. आणि जनताही मोठ्या आनंदाने हे कार्य पार पाडेल.
उद्या ते काय बोलतील, माहीत नाही, पण त्यांच्या पहिल्या भाषणांत तरी सरकार म्हणून ते काय करणार आहेत, याचा फारसा उल्लेख नव्हता. निदान त्यांनी त्यांचे चाहते असलेल्या गो-भक्तांना जनतेत पसरवत असलेल्या अंधश्रद्धेबद्दल जरी आवरले असते किंवा त्यांना आळा घालण्याबद्दल आवाहन केले असते, तरीही बरेच काही मिळवले असते. गोमूत्र पिल्याने अथवा गाईचे शेण अंगाला लावल्याने आपण करोनाचा मुकाबला करू शकतो, असेच त्यांचे गो-भक्त सोशल मीडियातून प्रचार करत आहेत. गोमूत्र किंवा गोबर यामुळे करोनाचा मुकाबला होणार नाही, त्यासाठी वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब करावा लागेल. निदान हे तरी त्यांनी त्यांच्या भाषणात सांगणे गरजेचे होते. पण एवढे साधे आवाहनसुद्धा त्यांनी ना त्यांच्या भक्तांना केले, ना जनतेला केले. नाही म्हणायला या आजाराशी मुकाबला करण्यासाठी आपल्यापेक्षा फारच लहान असलेल्या देशांच्या तुलनेत नगण्य वाटणारी १५ हजार कोटी रुपयांची तरतूद मात्र त्यांनी केली.
हॉस्पिटलच्या ज्या स्टाफसाठी, लॉकडाऊनची अंमलबजावणी करणाऱ्या पोलीस इत्यादी कर्मचाऱ्यांसाठी त्यांनी टाळी, थाळी आणि आता मेणबत्ती अथवा टॉर्च, फ्लॅश लाईट इत्यादीचे आवाहन केले आहे, पण या लोकांना काम करण्यासाठी आवश्यक असलेले मास्क, हँड ग्लोव्हज, सॅनिटायझर, यासारखी साधनं उपलब्ध करून देण्याबाबत फारशी उत्सुकता दाखवली नाही. किंबहुना लॉकडाऊनची घोषणा होईपर्यंत या बाबींची निर्यात आपल्या देशातून केली जात होती.
दुसरे म्हणजे सर्व जगाने, विविध कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ची सुविधा उपलब्ध करून दिली. आपल्या देशानेही ती सोय उपलब्ध करून दिली. पण त्यासाठी लागणारे फोर-जी इंटरनेट सेवा मात्र कमजोर ठरावी अशीच आहे. त्यात सुधारणा करण्याच्या दृष्टीने तर सोडाच पण काश्मीरमधील कलम ३७० हटवल्यानंतर तेथे जे लॉकडाऊन भारत सरकारने लष्कराच्या भरवशावर केले, तेथे तेव्हा इंटरनेट पूर्णच बंद होते. आताही जे सुरू करण्यात आले, ते टू-जी पर्यंतच. तेथेही करोनाची लागण झालेली आहे. पण तेथे अद्यापपर्यंत फोर-जी इंटरनेटची सुविधा भारत सरकारने उपलब्ध करून दिलेली नाही. पंतप्रधानांच्या भाषणातही त्याचा कोणताच उल्लेख नव्हता. हीसुद्धा तशी चिंता करावी अशीच बाब आहे.
याबाबत इतर कोणा राष्ट्रप्रमुखाशी त्यांची तुलना करायची झाल्यास ती फक्त त्यांचे जिगरी दोस्त अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशीच होऊ शकते. तेही लॉकडाऊनबद्दल अनुत्सुक होते. अजूनही त्यांनी अधिकृतपणे न्यूयार्कसारख्या शहरातून लॉकडाऊन जाहीर केलेले नाही. लोकांच्या आरोग्यापेक्षा त्यांना आपली अर्थव्यवस्था महत्त्वाची वाटते. एवढा मोठा प्रगतीशील देश असूनही तेथेसुद्धा मास्क, ग्लोव्हज, सॅनिटायझर यांसारख्या साधनांची वानवा आहे. पण याची ट्रम्प यांना फारशी फिकीर वाटत नाही. ‘मास्क नाहीत तर रुमाल बांधा’ असे त्यांनी सर्वांना सांगितले आहे, पण ‘मी मास्क पुरवण्याचा प्रयत्न करतो’ असे ते बोलले नाहीत. उलट ‘एक ते दोन लाखाच्या आत लोक मेल्यानंतर जरी करोना आटोक्यात आला, तरी आम्ही बरेच काही मिळवले असे म्हणता येईल,’ असे त्यांचे उद्गार आहेत.
जी अमेरिका विदेशात असलेल्या आपल्या नागरिकांच्या, कर्मचाऱ्यांच्या, अथवा सैनिकांच्या जिविताबद्दल इतकी जागरूक असते की, त्यांच्या जीविताला थोडाही धक्का लागला तर त्या देशावर आक्रमण करण्यालासुद्धा मागे पुढे पाहत नाही, ती आपल्याच देशात आपलेच नागरिक, कर्मचारी पटापट मरत असतानाही इतकी असंवेदनशील कशी, असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडू शकतो. विदेशातील आपल्या नखशिखान्त सशस्त्र असलेल्या सैनिकांना कोणत्याही शस्त्रास्त्रांची वा अण्वस्त्रांची कमतरता पडू न देणारी अमेरिका आपल्या हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांना साधे वैद्यकीय कीट पुरवू शकत नाही, याचे आश्चर्य वाटते. यावरून त्यांना खरोखरच आपल्या नागरिकांच्या जीविताची फिकीर आहे की, आपल्या हितसंबंधांची फिकीर आहे, हे उघड होते.
.............................................................................................................................................
लेखक कॉ. भीमराव बनसोड मार्क्सवादी कार्यकर्ते आहेत.
bhimraobansod@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment