'कौल' : जगण्याच्या केऑसचा अॅबस्ट्रॅक्ट दृश्यानुभव
कला-संस्कृती - मराठी सिनेमा
संदेश मुकुंद कुडतरकर
  • ‘कौल’चं पोस्टर
  • Sun , 15 January 2017
  • मराठी सिनेमा कौल Kaul आदिश केळुस्कर Aadish Keluskar रोहित कोकाटे Rohit Kokate

'कौल'ची बरीच परीक्षणं वाचून चित्रपट पाहायला गेलो. त्यामुळे साहजिकच अपेक्षा खूप वाढल्या होत्या. त्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करूनही या चित्रपटानं त्याहून जास्त आणि एवढं भरभरून दिलं आहे की, ते यापुढील किती काळापर्यंत सोबत करेल ते आता सांगता येणं कठीण आहे. या अनुभवापेक्षा प्रभावी अनुभव जेव्हा दुसरा एखादा चित्रपट देऊ शकेल तेव्हाच 'कौल'चा परिणाम पुसला जाणं शक्य होईल. तोपर्यंत कदाचित मी ठार वेडा झालेलो असेन किंवा सगळं काही समजल्याने मन शांत तरी झालेलं असेल. यापैकी पहिलीच शक्यता जास्त आहे.

काही वर्षांपूर्वी मी लँडमार्क फोरमच्या तीन दिवसांच्या शिबिराला गेलो होतो. तिथं ध्यानधारणेचा जो अनुभव आला होता, तसाच किंबहुना त्याहून अधिक प्रभावी आणि परिणामकारक अनुभव 'कौल'ने दिला. चित्रपट पाहून एक गोष्ट आठवली. मी पुण्यात एका आजींकडे पेइंग गेस्ट म्हणून राहत असताना त्यांनी सांगितलेली. त्यांच्या नात्यातला एक मुलगा सी.ए. झाला होता. नोकरी करत होता. अचानक ती नोकरी सोडून त्याने मृतदेहांची ने-आण करणारे ट्रक्स चालवायला सुरुवात केली. एकदा त्याला त्या ट्रकमधून एका स्त्रीच्या मृतदेहाचा हिरवा चुडा भरलेला हात बाहेर आलेला दिसला. ते दृश्य पाहून त्याला काय वाटलं कोण जाणे! आयुष्य निरर्थक आहे, असं त्याच्या मनानं घेतलं आणि ते काम सोडून तो संन्यासी झाला. घरोघरी भिक्षा मागून पोट भरू लागला. या घटनेचा काय अर्थ लावायचा? असाच काहीतरी विचित्र, गूढरम्य आणि सगळं आयुष्य बदलून टाकणारा अनुभव हा चित्रपट देतो.

चित्रपटाच्या तांत्रिक बाजू, कॅमेरा अँगल्स, वगैरे सगळ्या कौतुकास्पद बाबींबद्दल बऱ्याच जणांनी बोलून झालं आहे. त्यामुळे त्याची पुनरावृत्ती करत नाही. आदिश केळुस्करांचं काम यापूर्वी मी पाहिलेलं नाही. पण आता मात्र युट्युबवरचे त्यांचे सगळे लघुपट पाहणार आहे. हा चित्रपट पाहून या माणसाला कुर्निसात करावासा वाटतो. अगदी नीट सरळ चाललेल्या माझ्या आयुष्यात संथ पाण्यात भसकन एखादा मोठा दगड फेकावा त्याप्रमाणे त्यांनी उलथापालथ केल्यामुळे प्रचंड रागही आलाय त्यांचा. बॉक्स ऑफिसवरचे आकडे मोडण्याची एकीकडे स्पर्धा लागलेली असताना असा चित्रपट बनवण्याची गरज या माणसाला का वाटावी? चित्रपटाकडे केवळ मनोरंजन किंवा प्रबोधन या एवढ्याच संकुचित दृष्टिकोनातून पाहणाऱ्यांना एक धोक्याची सूचना. अशी कुठलीही अपेक्षा ठेवून हा चित्रपट पाहायला जाऊ नका. तुम्ही बोअर व्हाल, कधी संपतोय एकदाचा असं तुम्हाला वाटेल. चित्रपट संपला तरी त्यात काय चाललंय हे तुम्हाला समजणार नाही. किंबहुना चित्रपट संपला हेही समजणार नाही. आणि हे सगळं झालं तरच हा चित्रपट त्यातून जे काही सांगायचंय त्यात यशस्वी झाला, असं म्हणता येईल. चित्रपटाच्या प्रमोशन्स आणि ट्रेलरमध्ये दिलेलं वचन मात्र हा चित्रपट सर्वार्थानं पाळतो.

कोकणाची पार्श्वभूमी, त्यामुळे आपसूकच लाभलेला गूढतेचा पोत, यामुळे जी.ए.कुलकर्णींच्या कथांची हटकून आठवण होते. चित्रपटातल्या म्हाताऱ्याने सांगितल्याप्रमाणे नायकाची पत्नी त्याला 'आज शुक्रवार का?' असा प्रश्न कसा काय विचारते, एका सेकंदात रात्रीचा दिवस झाल्याचा नायकाला आलेला अनुभव खरा की फक्त आभासी, त्या विश्वाचा नाश करणाऱ्या घंटेचं नायक शेवटी काय करतो, त्याने खरंच दोन खून केले आहेत का, यातल्या कुठल्याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यात अर्थ नाही. डोकं भंडावून जाईल, पण हाती काहीच लागणार नाही. काही दृश्यांनी थरकाप उडेल, काळजाचा ठोका चुकेल क्षणभर. पण हे सगळं म्हणजेच हा चित्रपट आहे. मध्यंतरानंतर नायकाचा आणि त्या म्हाताऱ्याचा जो संवाद चालू असतो, त्यात आणि पडद्यावर दिसणाऱ्या चित्रचौकटींत रूपकात्मक संगती असली तरी तार्किक संबंध शोधायला जाऊ नये. हाती काहीच लागत नाही. पण त्या संवादातच दिग्दर्शकाने प्रेक्षकांना अडकवून ठेवण्याची अशी काही किमया केली आहे की, इतका मोठा संवाद ऐकत असताना तंद्री लागते. मनातल्या मनात आपण भोवतालच्या सगळ्याच गोष्टींचा विचार करू लागतो. रोहित कोकाटेचा अभिनय उल्लेखनीय. शेवटच्या पाच-दहा मिनिटांत त्याने जी अखंड बडबड केली आहे, ती अंगावर येणारी आहे. आता मेंदू फुटणार आणि संपणार आपण इथंच, असा अनुभव देणारं ते बोलणं आहे. तो डोंगर हेही कथेतलं एक अत्यंत महत्त्वाचं पात्र आहे. आणि सतत कोसळणारा, आपण फक्त पडद्यावर पाहत असूनही वैताग आणणारा पाऊसही.

लिहायचं म्हटलं तर हा चित्रपट एका प्रबंधाचा विषय आहे आणि चित्रपट या माध्यमाच्या आजवर न अनुभवलेल्या ताकदीचा अनुभव देणारा चित्रपट म्हणून अतिशय महत्त्वाचा. हल्ली तोंड फाटेस्तोवर स्तुती करणारं परीक्षण लिहावं असे चित्रपट फार दुर्मीळ होत चालले आहेत. 'कौल'सारखा चित्रपट न जाणे किती दशकांत एखादा होत असेल. शोधायचं तर भरपूर आहे अजून या चित्रपटातलं हाती न गवसलेलं, पण आता इथंच थांबतो. कारण 'शोधूचा थांबवलंस की सगळा सापडतला' असं चित्रपटच म्हणतो!

लेखक मुंबईस्थित 'अक्सेंचर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड' या कंपनीत टीम लीड म्हणून कार्यरत आहेत.

msgsandesa@gmail.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......