साधारण नोव्हेंबर २०१९पासून म्हणजे फक्त पाचेक महिन्यांत संपूर्ण जगामधील मानवी आयुष्य एका छोट्याशा विषाणूने विस्कळीत केले आहे. आपल्या केसाच्या जाडीच्या साधारण हजारपट लहान, इतक्या छोट्या असलेल्या या विषाणूमुळे आपले रोजचे सामाजिक, आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. आज संपूर्ण जग फक्त या विषाणूची लागण कशी थांबवता येईल आणि ते करताना आपल्या मूलभूत जीवनावश्यक गरजा कशा भागवता येतील, हे सोडून इतर काहीही विचार करू शकत नाही आहे. करोना, SARS-CoV2, कोविड-१९ अशा विविध नावांनी आज कुप्रसिद्ध झालेला हा विषाणू कुठून आला, कसा पसरला, या विषाणूमुळे पुढे नेमके काय काय होईल आणि यावर उपाय कधी येणार असे अनेक प्रश्न पडलेले आहेत. फ्लूसारख्या नेहमी होणाऱ्या आजाराचाच हा प्रकार असेल तर त्याला कशाला घाबरायचे, असाही प्रश्न अनेकांना पडलेला आहे.
या नवीन विषाणूचे नाव SARS-CoV-2 म्हणजे severe acute respiratory syndrome coronavirus 2 असे ठेवण्यात आलेले आहे. त्यापासून होणाऱ्या श्वसनाच्या आजाराला ‘COVID-19’ (Corona Virus Disease – 2019) असे नाव ठेवण्यात आले आहे. Corona प्रकारचा, म्हणजे ज्या विषाणूंची रचना इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खाली मुकुट म्हणजे corona सारखी दिसते, त्या प्रकारातला हा विषाणू आहे. SARS-CoV2/COVID-19 हा नक्की काय प्रकार आहे, तो कुठून आला, त्यावरील उपाय काय याविषयीचे अनेक समज-गैरसमज या विषाणूच्या पसरण्याच्या वेगापेक्षाही जास्त वेगाने जगभर पसरलेले आहेत. गैरसमजामुळे नुकसान करून घेण्यापेक्षा त्याबद्दल आज जी वैज्ञानिक माहिती उपलब्ध आहे, ती जाणून घेणे चांगले!
त्याबरोबर हेही लक्षात ठेवले पाहिजे की, या विषाणूवर फक्त गेले तीन महिने संशोधन झालेले आहे. SARS-CoV-2 विषाणूची किंवा COVID-19 आजाराची माहिती ही करोना प्रकारच्या विषाणूंबद्दल आधीपासून उपलब्ध असलेली माहिती, तीन महिन्यांचा अनुभव आणि तीन महिने चाललेले वेगवेगळ्या प्रकारचे संशोधन यांवर आधारित आहे. या साथीचे गांभीर्य लक्षात घेऊन गेल्या तीन महिन्यांत जगभर SARS-CoV2/COVID-19 वर मोठ्या प्रमाणात संशोधन व माहितीची देवाणघेवाण चालू आहे, शक्य तितक्या वेगाने प्रश्नांची उत्तरे शोधली जात आहेत. तरी, आज ही माहिती अपुरी आहे आणि येत्या काही महिन्यांत ही माहिती वेगाने बदलत जाणार आहे, त्यात सुधारणा होत जाणार आहे. याच्या अद्ययावत माहितीची देवाणघेवाण करत राहणे हे या साथीवर मात करण्यासाठी आवश्यक आहे.
COVID-19 साथीची सुरुवात
या आजाराचे रुग्ण, म्हणजे श्वसनाचे त्रास आणि ताप असलेले, न्यूमोनिया झालेले रुग्ण सर्वप्रथम नोव्हेंबर २०१९मध्ये चीनच्या हुबे (Hubei) प्रांतामधील वूहन (Wuhan) या शहरामध्ये दिसून आले. या रुग्णांमध्ये दिसत असलेल्या लक्षणांमागे आजवर माहीत असलेला कुठलाही जंतू नाही आणि हा नवीन प्रकारचा आजार आहे, हे लक्षात येईपर्यंत काही आठवडे गेले. मग या रुग्णांमधील समान धागा काय आणि त्यांना हा आजार कशामुळे झाला असेल हे शोधण्यात अजून काही आठवडे गेले. माहिती गोळा होऊन ३१ डिसेंबर २०१९ला चीनमधील World Health Organization म्हणजे WHOच्या कार्यालयाला या नव्या आजाराबद्दल माहिती देण्यात आली आणि ४ जानेवारीला WHO तर्फे या आजाराची पहिली अधिकृत माहिती जगासमोर मांडण्यात आली. म्हणजे फक्त तीन महिन्यांपूर्वी या आजाराची माहिती अधिकृतपणे जगासमोर आली. तोपर्यंत या आजारामागचे कारण आणि त्याचे परिणाम यांबद्दल काहीही माहिती नव्हती. त्यानंतर साधारण दहा दिवसांनी चीनमधील संशोधकांनी या रुग्णांमध्ये सापडलेल्या एका नव्या विषाणूची माहिती जगासमोर मांडली. काही वर्षांपूर्वी ज्या SARS, MERS या विषाणूंची साथ आली होती, त्या विषाणूंप्रमाणेच हा नवीन विषाणू ‘करोना’ प्रकारातील विषाणू असून तो आधी कधीही माणसांमध्ये दिसून आलेला नाही, असे या अभ्यासातून लक्षात आले.
ही प्राथमिक माहिती समोर आली, तोपर्यंत या विषाणूची लागण चीनबाहेरही पसरली होती. १३ जानेवारीला या विषाणूची लागण झालेला चीनबाहेरील पहिला रुग्ण थायलंडमध्ये आढळला. त्यानंतर दोन महिन्यांपेक्षाही कमी काळात, ७ मार्चला संपूर्ण जगात पसरलेल्या करोना विषाणूबाधित रुग्णांची संख्या एक लाख झालेली होती. ११ मार्चला या विषाणूमुळे होणारा आजार ‘pandemic’ म्हणजे ‘जगभर पसरलेला संसर्गजन्य आजार’ आहे असे WHOने जाहीर केले. २८ मार्चपर्यंत १८१ देशांमध्ये या आजाराचे जवळजवळ सहा लाख रुग्ण दिसून आले आहेत. यातील २७,००० पेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.
एका शहरात सुरू होऊन फक्त पाच महिन्यात हा आजार संपूर्ण जगात मोठ्या प्रमाणात पसरला आहे. एकापासून दुसऱ्याला अगदी सहज लागण करण्याची क्षमता असलेला विषाणू, लागण झाल्यापासून आजाराची लक्षणे दिसण्यासाठी लागू शकणारा दोन आठवडे इतका मोठा कालावधी, मधल्या काळात संसर्ग होऊनही आजाराची लक्षणे न दिसणारे पण इतरांना लागण करू शकणारे बाधित लोक आणि मोठ्या प्रमाणात प्रवास करून जगभर विषाणू पसरवणारे आजचे जग या सगळ्याचा हा एकत्रित परिणाम आहे.
SARS-CoV2 विषयी
कुठल्याही प्राण्याला विषाणूंची लागण होताना विषाणू सर्वप्रथम प्राण्याच्या शरीरामधील पेशींमध्ये शिरतो. आत शिरण्यासाठी विषाणूच्या आवरणावरील प्रथिने पेशींच्या आवरणावरील विशिष्ट प्रथिनांना चिकटतात. एखादे कुलूप किल्लीने उघडावे आणि दारामधून आत जावे, त्याप्रमाणे विषाणू स्वतःकडील ‘किल्ली’ने पेशींचे दार उघडून आत जातो. ठराविक प्रकारच्या विषाणूकडे ठरावीक किल्लीच असते आणि त्याने विशिष्ट प्रकारच्या पेशींवरीलच कुलूप उघडू शकते. पेशीच्या आत जाऊन विषाणू पेशींची संपूर्ण यंत्रणा स्वतःच्या अनेक प्रतिकृती बनवून, त्या पुढे इतर पेशींमध्ये आणि इतर प्राण्यांमध्ये पसरवण्यासाठी वापरू लागतो.
विषाणूची लागण झाल्याचे लक्षात आल्यावर त्या प्राण्याची रोगप्रतिकारकशक्ती त्याचा प्रतिकार करण्यासाठी सक्रिय होते, विषाणूंचा नायनाट करण्यासाठी वेगवेगळे उपाय करते. ताप येणे, अंग दुखणे, शरीराचा एखादा भाग लाल दिसणे हे सर्व या प्रक्रियेचा भाग असतात. Inflammation मध्ये विषाणूला मारणे किंवा त्याची वाढ थांबवणे, बाधित पेशींना मारून टाकणे, विषाणूमुळे खराब झालेल्या ऊतींची (tissue) विल्हेवाट लावणे या प्रक्रिया होत असतात. कधी कधी या प्रक्रिया गरजेपेक्षा जास्त प्रमाणात होतात आणि त्यामुळे शरीराला मोठ्या प्रमाणात अपाय होऊ लागतो.
सध्याच्या साथीला जबाबदार SARS-CoV-2 या विषाणूमुळे श्वसनसंस्थेमध्ये मोठ्या प्रमाणावर असे inflammation होऊन त्याचा परिणाम फुप्फुसांवर, श्वसनसंस्थेवर होतो. फुप्फुसांमधील ऊतींची हानी होऊन त्यांची कार्यक्षमता कमी होते आणि श्वसनाचे त्रास सुरू होतात. रोगप्रतिकारकशक्ती मोठ्या प्रमाणात सक्रिय झाल्यामुळे होणारे हे परिणाम आहेत. आज संचारबंदी, टाळेबंदीचे आदेश असताना जगण्यासाठी आवश्यक असलेल्या सेवा पुरवणाऱ्यांवरही पोलीस जसे चौकशी न करताच लाठ्या चालवून नुकसान करत आहेत तसेच हे आहे. पोलिसांच्या नियंत्रणाची आवश्यकता आहेच, पण त्याचा अतिरेक नको, तसेच रोगप्रतिकारकशक्ती गरजेपेक्षा जास्त सक्रिय झाल्यास दुष्परिणाम होऊ लागतात.
करोना हे चीनचे जैविक शस्त्र आहे?
चिनी सरकारने इतर देशांच्या विरुद्ध जैविक शस्त्र म्हणून वापरण्यासाठी मुद्दाम हा विषाणू तयार केला आहे, असा एक गैरसमज पसरलेला आहे. सध्या उपलब्ध असलेले संशोधन सांगते की, हा विषाणू कोणीही प्रयोगशाळेत मुद्दाम बनवलेला नसून हा विषाणू वटवाघूळामधून चुकून माणसात पसरलेला आहे. असे विषाणू वटवाघूळापासून माणूस आणि इतर सस्तन प्राण्यांमध्ये यापूर्वीही अनेकदा पसरलेले दिसून आले आहेत. वटवाघळांच्या शरीरात अनेक प्रकारचे विषाणू नांदत असतात. यांतील रेबीज, इबोलाच्या विषाणूसारखे काही विषाणू वटवाघळांमध्ये नेहमीच वास्तव्य करतात. तर काहींचा उगम किंवा उत्क्रांती, जसे निपा आजारासाठी कारणीभूत असलेल्या विषाणूंचा उगम वटवाघळामध्ये झाला असावा असे वैज्ञानिक संशोधनातून दिसते.
वटवाघळाचे शरीर अनेक विषाणूंचे माहेरघर का असते याचे उत्तर वटवाघळाच्या विशिष्ट रोगप्रतिकारकशक्तीमध्ये आहे. वटवाघळामध्ये विषाणूंची लागण झाल्यानंतर त्यांची रोगप्रतिकारकशक्ती लवकर सक्रिय होते, विषाणूंचा नायनाट करते. त्यानंतर लगेचच त्यांचे शरीर विशिष्ट anti-inflammatory प्रक्रियाही घडवून आणते, आणि inflammation नियंत्रित राहते. त्यामुळे वटवाघळांना सक्रिय रोगप्रतिकारकशक्तीचे दुष्परिणाम भोगावे लागत नाहीत, ते इतर सस्तन प्राण्यांसारखे विषाणूंमुळे आजारी पडत नाहीत. लवकर आणि जोमाने सक्रिय होणाऱ्या रोगप्रतिकारकशक्तीशी गाठ असल्यामुळे जे विषाणू पेशींच्या आत गेल्यावर पटकन आपली संख्या वाढवू शकतात, तेच वटवाघळांमध्ये टिकू शकतात. या सर्वांचा एकत्रित परिणाम होऊन वटवाघळे आणि त्यांच्यामधील विषाणू यांच्यात एक संतुलन निर्माण होते. यात वटवाघळांच्या आत विषाणू टिकून राहतात, पण त्यांच्या उत्तम रोगप्रतिकारशक्तीमुळे त्यांना त्यापासून आजार होत नाही. यामुळे वटवाघळांचे शरीर म्हणजे विषाणूंचा संग्रहच असतो. वटवाघळांपासून, त्यांची थुंकी, विष्ठा यांमधून, त्यांच्यामधील विषाणूंची लागण इतर प्राण्यांनाही होऊ शकते. रेबीज, इबोलासारखे विषाणू निसर्गात टिकवून ठेवण्यासाठी वटवाघळे अशा प्रकारे मोठा हातभार लावतात.
कधीकधी नैसर्गिक जनुकीय बदलांमुळे विषाणूच्या फक्त वटवाघळाच्या पेशींना चिकटण्याच्या क्षमतेमध्ये किंवा वर लिहिल्याप्रमाणे विषाणूंच्या ‘किल्ली’मध्ये बदल घडू शकतात. बदलांमुळे या नव्या किल्लीत वेगळ्या जातीच्या प्राण्याच्या पेशींवरील कुलपे उघडण्याची क्षमता निर्माण होते. नेमक्या याच वेळी वटवाघळे या दुसऱ्या प्राण्याच्या सान्निध्यात आली, तर हा बदललेला विषाणू नवीन यजमानाला लागण करू शकतो. निपा (Nipah), सार्स (SARS) या विषाणूंचा उगमही अशाच प्रकारे झाला असावा, असे संशोधनांमधून लक्षात आले आहे. SARS-CoV-2च्या बाबतीतही हेच घडले असावे, असे आजवर झालेले संशोधन सांगते.
SARS-CoV-2 च्या जीनोमच्या (genome) अभ्यासामधून दिसून आले आहे की, वटवाघळामध्ये सापडणाऱ्या अशाच प्रकारच्या Coronavirus प्रकारच्या समूहांमधील विषाणूचा जीनोम आणि SARS-CoV-2 चा जीनोम यात ९६ टक्के साम्य आहे. या दोन विषाणूंमध्ये जे फरक आहेत, त्यातील एक बदल यजमानाच्या पेशींना चिकटण्यासाठी आवश्यक जी प्रथिने असतात, त्यात घडलेला आहे. या बदलांमुळे या विषाणूमध्ये माणसाच्या पेशींना चिकटण्याची क्षमता निर्माण झाली आहे. मुद्दाम प्रयोगशाळेमध्ये असे बदल घडवून आणतात, तेव्हा असे केल्याच्या काही खुणा जीनोमच्या सिक्वेन्समध्ये दिसून येतात. SARS-CoV-2च्या जीनोम सिक्वेन्समध्ये अशा कोणत्याही खुणा अजून तरी दिसून आलेल्या नाहीत. नैसर्गिकपणे होणारे बदल ज्या विशिष्ट प्रकारे होतात, तसेच हे बदल झालेले आहेत. हा बदललेला विषाणू वटवाघळांमधून दुसऱ्या जंगली प्राण्यामध्ये आणि त्या प्राण्यांमार्फत वूहनमधील प्राण्यांच्या बाजारपेठेमध्ये पोहोचला असावा. या बाजारपेठेमधील प्राण्यांमधून हा विषाणू आजूबाजूच्या माणसांमध्ये पोहोचला असावा, असे मानले जाते. निसर्गात नवीन प्रजाती ज्या पद्धतीने बनतात, त्याच प्रकारे हा विषाणू उत्क्रांत झाला असावा, असे आज उपलब्ध असलेले संशोधन सांगते. मुद्दाम प्रयोगशाळेमध्ये जैविक शस्त्र म्हणून बनवलेला हा विषाणू आहे, या विचारला सध्या तरी काहीच वैज्ञानिक आधार नाही.
SARS-CoV-2चा संसर्ग
SARS-CoV-2 हा विषाणू इतक्या वेगाने का पसरला याची मुख्य दोन कारणे आहेत. एक म्हणजे आजाराची काहीही लक्षणे नसलेले किंवा अगदी थोडी लक्षणे दिसणारे, पण विषाणूंनी बाधित असलेले अनेक लोक दिसून आले आहेत. या लोकांना विषाणूची बाधा झालेली असते, पण काही कारणामुळे, कदाचित रोगप्रतिकारकशक्तीमुळे, त्यांच्यात विशेष लक्षणे दिसून येत नाहीत. मात्र विषाणू त्यांच्यामार्फत पसरू शकतो. आजारी नसल्यामुळे हे लोक आपले रोजचे व्यवहार चालू ठेवत असतात आणि त्यामुळे यांच्यापासून जास्त लोकांना लागण व्हायची शक्यता असते.
चीनमधील अभ्यासानुसार सुरुवातीच्या काळामधील, म्हणजे वाहतुकीवर आणि लोकांच्या हालचालीवर निर्बंध येण्यापूर्वी, बाधित लोकांपैकी साधारण ८६ टक्के लोक बाधा होऊनही COVID-19ची फारशी लक्षणे दाखवत नव्हते. अशा लोकांमुळे हा आजार झपाट्याने पसरला. इटलीमधील अभ्यासाचेही हेच निष्कर्ष आहेत, येथील ६० टक्के बाधित लोकांना काहीही लक्षणे दिसत नव्हती. काही अभ्यासांमध्ये हा आकडा २० टक्के आहे, हाही मोठाच आकडा आहे. अशा बाधितांमुळे विषाणू मोठ्या प्रमाणात पसरला असावा. विषाणूच्या बाधेनंतर लक्षणे दिसण्यासाठी साधारण दोन ते चौदा दिवस लागतात. आपल्याला आजार झालेला आहे, हेच लक्षात न आल्यामुळे या काळात बाधित लोक या काळात आपले रोजचे व्यवहार चालू ठेवतात आणि अनावधानाने विषाणू पसरवायला मदत करतात.
एका बाधित माणसापासून सरासरी २.२ लोकांना या विषाणूची बाधा होते. चाचण्यांद्वारे ज्यांना बाधा झाल्याची दिसून आले आहे, त्यापैकी साधारण २० टक्के बाधितांना हॉस्पिटलमध्ये उपचार करावे लागतात आणि साधारण ५ टक्के लोकांना ICU मध्ये श्वसनाला मदत करणाऱ्या कृत्रिम श्वसनयंत्रणेची गरज भासते. साधारण २-३ टक्के बाधितांचा multiple organ failure, septic shock, respiratory failure यांमुळे मृत्यू होतो. पण मुळात बाधितांची संख्या किती आहे, हेच नक्की माहीत नसल्यामुळे ही टक्केवारी कदाचित बरोबर नसेल. बाधित पण लक्षणे नसलेल्या लोकांचा खरा आकडा मिळाल्यास ही टक्केवारी कमी व्हायची शक्यता आहे.
एकूण COVID-19 मुळे होणारी मृत्यूची टक्केवारी इतर आजारांपेक्षा कमी आहे. पण अडचण ही आहे की, एका छोट्या कालावधीत SARS-CoV-2 ची बाधा होऊन मोठ्या संख्येने रुग्ण निर्माण होणार आहेत. या वेगाने वाढणाऱ्या रुग्णांच्या संख्येपैकी २० टक्के रुग्णांना हॉस्पिटलमधील उपचारांची आणि त्यातील अनेकांना कृत्रिम श्वसनयंत्रणेची गरज आहे. मोठ्या संख्येने एकदम दाखल होणाऱ्या या सर्व रुग्णांसाठी पुरेशा सुविधा कुठल्याही देशाकडे नाहीत.
आधी चीन आणि मग इटली, स्पेन या देशांमध्ये COVID-19 मुळे झालेल्या मृत्यूंपैकी अनेक मृत्यू वेळेत पुरेसे उपचार न मिळाल्यामुळे झाले आहेत. अमेरिका, इंग्लंड, जर्मनी या इतर देशांमध्येही तसे व्हायची शक्यता आहे. (लेख प्रकाशित होईपर्यंत अमेरिकेतून आणि जर्मनीतून आलेले आकडे हा करोनाच्या प्रसाराच्या वेगाचा थेट पुरावा आहे) हे टाळण्यासाठी विषाणूची बाधा होण्याच्या गतीचे प्रमाण कमी करून, एकावेळी रुग्णांची संख्या कमीत कमी राहावी (flatten the curve) यासाठी जगभर प्रयत्न चालू आहेत. यात social distancing म्हणजे एकमेकांपासून अंतर राखणे, बाधा झाल्याची शंका आल्यास त्या व्यक्तींना इतर व्यक्तींपासून म्हणजे अगदी घरातल्या सदस्यांपासूनसुद्धा वेगळे ठेवणे आणि त्यांच्या चाचण्या करून बाधा झाली आहे का, हे तपासणे असे उपाय करणे आवश्यक आहे.
हे उपाय ज्या देशांनी केले, त्यांना SARS-CoV-2 ची साथ नियंत्रित ठेवणे शक्य झाले आहे. दक्षिण कोरिया, सिंगापूर या देशांमध्ये SARS-CoV-2 सुरुवातीला खूप पसरला, पण या देशांनी वेगाने या विषाणूच्या चाचण्या करण्याची सोय केली. COVID-19ची बाधा कोणाला झाली आहे, हे लवकर लक्षात आल्यामुळे या देशांमध्ये बाधित लोकांना इतरांपासून योग्य वेळेत वेगळे करणे शक्य झाले. त्यामुळे या देशांमध्ये लागण होऊनही COVID-19 मुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या कमी आहे, तेथील साथ नियंत्रणाखाली आहे.
करोना आणि भारत
भारतात SARS-CoV-2ची लागण झालेला रुग्ण प्रथम ३० जानेवारीला केरळमध्ये दिसून आला. ही संख्या झपाट्याने वाढत २८ मार्चपर्यंत भारतात ९०० पेक्षा जास्त रुग्ण आहेत आणि २०हून अधिक रुग्णांचे मृत्यू झालेले आहेत. गेल्या काही दिवसांत ही संख्या झपाट्याने वाढत आहे. COVID-19 चे पहिले १५० रुग्ण १७ दिवसांत आढळले, पण आता दर दोन ते तीन दिवसांमध्ये नवीन १५० रुग्णांची त्यात भर पडत आहे. भारताची जनघनता बघितल्यास हा आजार किती झपाट्याने वाढू शकेल, याची कल्पना करता येईल. पुरेशा चाचण्या न केल्यामुळे COVID-19ची लक्षणे नसलेले, पण बाधित असे कितीतरी लोक आपल्या समाजात असू शकतात.
भारतात या साथीचे पुढे काय होणार याचा अंदाज मांडला जात आहे. The Center For Disease Dynamics, Economics & Policy (CCDEP) ही आरोग्याशी संबंधित आणि विविध अभ्यास करून त्याप्रमाणे आखता येणारी धोरणे कोणती याचा अभ्यास करणारी संस्था आहे. या संस्थेने COVID-19 हा आजार भारतात कशा प्रकारे पसरेल, त्याचे किती रुग्ण भारतात असतील याचा अभ्यास केला आहे. यासाठी चीन आणि इटली या दोन देशांमध्ये हा आजार कसा पसरला आणि भारतातील परिस्थितीनुसार तो इथे कसा पसरेल, याचा त्यांनी अभ्यास केला. इतर देशांमधील अभ्यासांप्रमाणेच modeling studies म्हणजे उपलब्ध माहितीनुसार computer simulations वापरून आजार कसा पसरेल, याचे आडाखे बांधले आहेत.
CCDEPच्या अभ्यासानुसार भारतात community transmission म्हणजे COVID-19 ची बाधा कोणापासून झाली याची कल्पना नसलेले रुग्ण मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच असावेत. काहीही उपाय केले नसते तर जुलै महिन्यापर्यंत भारतात ३० ते ४० कोटी लोक SARS-CoV-2 मुळे बाधित झाले असते. यातील बहुतेकांना सौम्य लक्षणे दिसली असती किंवा कोणतीही लक्षणे दिसली नसती. एप्रिल आणि मे महिन्यांमध्ये सर्वांत जास्त म्हणजे दहा कोटी रुग्ण बाधित असते आणि त्यातील एक कोटी रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात लक्षणे दिसली असती. दोन ते चार कोटी लोकांना हॉस्पिटलमधील उपचारांची गरज पडली असती. एवढ्या मोठ्या प्रमाणावर उपचार करण्यासाठी आपल्याकडेही संसाधने अथवा मानवी क्षमता (डॉक्टर, नर्सेस, कर्मचारी, इ.) नाही.
आज केलेल्या Social distancing किंवा अंतर राखण्याच्या उपायांनी, आंतरराष्ट्रीय/आंतरदेशीय वाहतूक थांबवून हे आकडे ७५ टक्क्यांनी कमी होऊ शकतात असा अंदाज आहे. तरीही एप्रिल आणि मे महिन्यांत मिळून हॉस्पिटलमधील उपचारांची गरज असलेले पन्नास लाख ते एक कोटी इतके रुग्ण असू शकतात. इतक्या रुग्णांसाठीदेखील पुरेशी हॉस्पिटल्स, पुरेसे कर्मचारी आपल्याकडे नाहीत. शिवाय अशा संसर्गजन्य रोगाच्या रुग्णांची सोय करताना उपचार करणाऱ्या डॉक्टर्स, नर्सेस आणि कर्मचारी यांच्यासाठी आवश्यक असलेली वैयक्तिक सुरक्षा उपकरणे, रुग्णांना लागणाऱ्या खाटा आणि कृत्रिम श्वसनयंत्र यांचीही सोय करणे आवश्यक आहे. कर्फ्यू लावून जो तीन आठवड्याचा अवधी मिळाला आहे, त्यात लवकरात लवकर मोठ्या प्रमाणावर चाचण्यांची सोय करून बाधित लोक शोधून वेगळे करण्याची गरज आहे, हॉस्पिटल्समध्ये तयारी करणे आवश्यक आहे.
मुख्य म्हणजे हॉस्पिटलमधील सेवा पुरवणारे डॉक्टर्स, नर्सेस, आया, इतर कर्मचारी यांच्या सुरक्षिततेची, वेळ पडली तर त्यांच्या हॉस्पिटलमध्ये राहण्याची, जेवणाचीही सोय होईल, याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. त्यांना वैयक्तिक सुरक्षा उपकरणे मिळाले नाहीत, तर त्यांना SARS-CoV-2चा संसर्ग होण्याची शक्यता खूप जास्त आहे आणि त्यांच्या सुरक्षिततेमध्ये कोणताही हलगर्जीपणा झाला तर त्याची किंमत सर्वांना चुकवावी लागेल.
परिस्थिती नक्कीच गंभीर आहे. त्यामुळे आपण आज सर्वांत वाईट परिस्थिती काय होऊ शकते, याचे भान ठेवून त्या परिस्थितीला तोंड देण्याची तयारी केली पाहिजे. मुख्य म्हणजे तीन आठवड्यांच्या कर्फ्यूमुळे SARS-CoV-2चे उच्चाटन होणार नाही हे लक्षात ठेवले पाहिजे. त्याची लागण बऱ्याच प्रमाणात नियंत्रणात येईल. पण अनेक कारणांमुळे आपल्या देशात याचा मर्यादितच उपयोग होणार आहे. भारतामधील मोठी जनसंख्या, लहान घरांमध्ये राहणारी मोठी कुटुंबे (जिथे बाधित व्यक्तींना वेगळे ठेवणे अशक्य आहे), बस/रेल्वेच्या गर्दीत होऊ शकणारी बाधा, जिथे social distancing पाळणे शक्य आहे, तिथेही ते पाळण्याबद्दल असलेली उदासीनता किंवा आडमुठेपणा, स्वच्छतेसाठी लागणाऱ्या सुविधांचा अभाव किंवा त्याबद्दलचे अज्ञान अशा अनेक कारणांमुळे हे शक्य नाही. SARS-CoV-2ची लागण जेव्हा फक्त परदेशामधून येणाऱ्या लोकांपुरती मर्यादित होती, तेव्हा मोठ्या संख्येने चाचण्या करून त्यांना वेगळे करण्याची संधी आता हुकली आहे. SARS-CoV-2ची लागण आता भारतातीलच व्यक्तींकडून होण्याची सुरुवात झाली आहे. कर्फ्यूला चाचण्यांची जोड देऊन बाधितांना ताबडतोब वेगळे करण्याची, विलगीकरणाच्या काळात त्यांच्या सुरक्षिततेची तातडीने सोय करणे गरजेचे आहे. हे प्रयत्न सरकारी पातळीवरच होऊ शकतात. ते कितपत यशस्वी होणार हे येत्या काही दिवसात कळेल.
उपचार, लस आणि चाचण्या
COVID-19 वर आज तरी काही औषध उपलब्ध नाही. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती आजारावर मात करेपर्यंत श्वसनयंत्रणेला आधार देणे हाच मार्ग सध्या वापरला जात आहे. औषध शोधण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर चालू आहेत. WHO तर्फे चार वेगवेगळ्या औषधांच्या चाचण्या सुरू झाल्या आहेत. साधारण परिस्थितीमध्ये रुग्णांमध्ये नवीन औषधाची चाचणी करण्यापूर्वी रुग्णाची सुरक्षितता आणि आजार बरा करण्याची क्षमता याची मोठ्या प्रमाणावर चाचणी करण्यात येते. पण COVID-19 साठी औषधाची तातडीची गरज बघता या चाचण्या नेहमीपेक्षा कमी अभ्यासाच्या आधारावर करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
तपासली जाणारी काही औषधे इतर आजारांसाठी वापरात आहेतच. त्यांचा COVID-19 बरा होण्यासाठी उपयोग होतो आहे काय, हे या चाचण्यांमधून कळेल. यातील Remdesivir हे इबोला या आजारासाठी विकसित केले होते, पण चाचण्यांमध्ये इबोला उपचारासाठी त्याचा उपयोग नाही असे लक्षात आले. हे औषध SARS आणि MERS या करोना प्रकारच्या इतर विषांणूची वाढ थांबवते असे लक्षात आले आहे. हे औषध SARS-CoV-2ची लागण थांबवते का, हे आता तपासण्यात येईल.
तसेच Chloroquine आणि Hydroxychloroquine या दोन रसायनांमुळे COVID-19 वर नियंत्रण ठेवता येऊ शकते असे काही ठिकाणचे निरीक्षण आहे. या रसायनांची चाचणी सुरू होत आहे. याशिवाय अजून दोन चाचण्यांमध्ये एड्ससाठी वापरले जाणारे Ritonavir/Lopanivir हे औषध आणि Ritonavir/ Lopanivir/ Interferon-beta या मिश्रणाच्या चाचण्यादेखील करण्यात येणार आहेत. लवकरात लवकर उपचार उपलब्ध व्हावेत यासाठी हे प्रयत्न होत आहेत. modeling studies वापरून आज उपलब्ध असलेल्या औषधांपैकी कोणती औषधे COVID-19 बरा करण्यासाठी वापरता येतील याचे अभ्यासही सुरू आहेत. यातील काही औषधे इतर आजारांसाठी वापरली जात असल्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेसंबंधी चाचण्या आधीच झालेल्या आहेत. आता त्यांची COVID-19 बरा करण्याची क्षमता तपासली जात आहे. SARS-CoV-2 चा जीनोम आणि त्यातून मिळालेल्या त्याच्या प्रथिनांसंबंधी, त्याच्या पेशींवर हल्ला करण्याच्या क्षमतेसंबंधी मिळालेल्या माहितीचा उपयोग होत आहे.
तसेच The Coalition for Epidemic Preparedness Innovations (CEPI) तर्फे या विषाणूवर लस शोधण्याचे कामही चालू आहे. यातील काही चाचण्या मार्च-एप्रिल महिन्यांमध्ये सुरू होणार आहेत. तसेच क्षयरोग टाळण्यासाठी देण्यात येणारी BCG लस काही विषाणूंच्या प्रतिकारासाठीही उपयोगी आहे असे दिसून आले आहे. SARS-CoV-2ची लागण टाळण्यासाठी किंवा झाली तरी त्यामुळे होणाऱ्या आजाराची तीव्रता त्यामुळे कमी होऊ शकेल का, याचीही चाचणी चालू झाली आहे. चाचण्या पूर्ण होऊन त्यातून लस मिळाली तरी या सर्व प्रक्रियेला एक ते दीड वर्ष तरी लागेल. त्यामुळे लस हा ताबडतोब वापरता येण्यासारखा उपाय नाही.
SARS-CoV-2ची लागण झाली आहे हे तपासण्याच्या कमीत कमी वेळात आणि खर्चात करता येतील अशा चाचण्या विकसित करण्याचे कामही जगभरच्या अनेक सरकारी/खासगी प्रयोगशाळांमध्ये चालू आहे. या चाचण्यांचा निकाल काही मिनिटांपासून ते काही तासांत मिळू शकेल, असे या चाचण्या विकसित करणारे सांगतात. हे जर खरे असेल तर या चाचण्यांमुळे COVID-19ची साथ रोखण्यासाठी खूपच मदत होऊ शकते. येत्या काही आठवड्यांमध्ये हे स्पष्ट होईल.
एकूणच तीन महिन्यांच्या कालावधीत या साथीवर मोठ्या प्रमाणात संशोधन झाले आहे आणि यासाठी संबंधित प्रश्नांची उत्तरे जगभरचे संशोधक शक्य तितक्या वेगाने शोधत आहेत. हीच तत्परता आणि सहकार्य जगभरची सरकारे, संशोधक आणि जनता इतर आजारांबाबतही भविष्यात दाखवू शकतील का असा विचार मनात आल्याशिवाय रहात नाही.
याशिवाय इतरही काही घटक भारतामधील संसर्ग कमी करण्यासाठी मदत करू शकतात. भारतामधील अर्धी जनसंख्या तरुण, म्हणजे २८ वर्षांच्या खालची आहे. COVID-19मुळे वृद्ध, किंवा मधुमेह, हृदयविकार किंवा इतर विकार झालेल्यांमध्ये जास्त तीव्र आजार होऊन त्यांना हॉस्पिटलमधील उपचारांची गरज पडण्याची शक्यता अधिक असते. भारतामध्ये असलेल्या तरुण लोकांच्या मोठ्या संख्येमुळे कदाचित सौम्य COVID-19 आजाराचे प्रमाण जास्त असू शकेल. तसेच काही प्रमाणात भारतामध्ये असलेलं जास्त तापमान, काही ठिकाणी असलेली जास्त आर्द्रता यामुळे विषाणूचा प्रसार व्हायचे प्रमाण थोडे कमी होऊ शकते. फ्लूसाठी कारणीभूत इतर करोना विषाणूंचा प्रसार अशा वातावरणात कमी प्रमाणात होतो. पण या क्षणीतरी ही निव्वळ गृहितके (hypothesis) आहेत, त्याबद्दल खात्रीपूर्वक काहीच सांगता येत नाही. त्यामुळे हा संसर्ग आपोआप कमी होईल अशा विचारात गाफील राहून चालणार नाही.
पुढील परीक्षा
पुढील दोन महिन्यांत संपूर्ण जगाचीच मोठी परीक्षा आहे. जग आणि भारतही SARS-CoV-2च्या साथीचा कितपत सामना करू शकते हे एप्रिल-मे अखेरीपर्यंत लक्षात येईल. सर्व तज्ज्ञांची हीच इच्छा आहे की, त्यांनी केलेले अंदाज चुकावेत आणि SARS-CoV-2 ची लागण मोठ्या प्रमाणावर न होवो. यासाठी सर्वांनीच शक्य ते सर्व उपाय करणे, स्वछता पाळणे, आणि सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. कोणीही कितीही सुदृढ असले तरी SARS-CoV-2 ची बाधा होऊ शकते, हे लक्षात ठेवून कोणीही गाफील राहू नये.
स्वच्छतेच्या नावाखाली एक प्रकारची अस्पृश्यता पाळणाऱ्या (जसे हाऊसिंग सोसायट्यांमध्ये कर्मचाऱ्यांसाठी वेगळी लिफ्ट ठेवणे) उच्चभ्रू, परदेश पर्यटन करणाऱ्या लोकांपासून या आजाराची सुरुवात भारतामध्ये झालेली आहे, ही साथ आता सगळीकडे पसरत आहे. परदेशवाऱ्या करणारा हा समूह कधी अनावधानाने तर कधी स्वतःला संसर्ग झालेला असू शकतो हे माहीत असूनही वैद्यकीय सूचना डावलून देशात विषाणू पसरवण्यास कारणीभूत ठरला आहे. त्यात शासनाने विलगीकरण आणि चाचण्यासंबंधीचे निर्णय वेळेत न घेतल्यामुळे ही साथ पसरण्याचा मोठी शक्यता आहे. दाटीवाटीच्या वस्तीमध्ये राहणारे लाखो लोक ज्यांना पाणी, संडास या मूलभूत गरजांसाठी सार्वजनिक व्यवस्थेचा वापर करावा लागतो, जे गच्च भरलेल्या बसने किंवा रेल्वेने प्रवास करतात, ज्यांची रोगप्रतिकारकशक्ती कुपोषणामुळे कमजोर झाली आहे, अशा लोकांपर्यंत हा विषाणू लवकरच पोहोचू शकतो, कदाचित पोचलाही असेल.
जिथे दिवसातून अनेकदा साबणाने हात धुणे, ६ फूट अंतर राखणे, बाधा झालेल्या कुटुंबियांनी वेगळ्या खोलीत राहणे हे शक्यच नाही, अशी ही ठिकाणे आहेत. शिक्षणाची आणि आरोग्यकेंद्रांची सोय नसल्याने स्वच्छता म्हणजे काय हे न समजणारे अनेक लोक आहेत. विषाणू पसरू नये म्हणून केलेल्या उपायांमुळे उपास घडलेले, रोजंदारी गमावलेले अनेक मजूर आणि त्यांची कुटुंबे आहेत, या कुपोषित लोकांमध्ये विषाणूची लागण झाल्यास त्यांना गंभीर आजार होऊ शकतो. या दुर्लक्षित गोष्टींमुळे आज COVID-19 सारख्या साथीच्या रोगाचा धोका आणि त्यामुळे होणाऱ्या सामाजिक/आर्थिक प्रश्नांचा प्रभाव इतर देशांपेक्षाही भारतावर जास्त आहे, याच्यावर मात करणे हे जास्त मोठे आव्हान आहे.
COVID-19 च्या साथीमुळे या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणे संपूर्ण समाजासाठीच हानीकारक आहे याची कदाचित जाणीव होईल. मग धर्म, भाषा, जात यांच्या अस्मितेसाठी लढण्याऐवजी अन्न, पाणी, निवारा, शिक्षण आणि स्वास्थ्यसेवा सर्वांना मिळावी यासाठी प्रयत्न सुरू होतील अशी आशा करूया.
.............................................................................................................................................
SARS-CoV2/COVID-19 संबंधी माहिती देणारी काही संकेतस्थळे
https://www.who.int/health-topics/coronavirus#tab=tab_1
https://www.who.int/emergencies/diseases/novel-coronavirus-2019/events-as-they-happen
https://www.cdc.gov/coronavirus/2019-ncov/index.html
https://www.thelancet.com/coronavirus
.............................................................................................................................................
‘आजचा सुधारक’ या ऑनलाईन त्रैमासिकाच्या एप्रिल २०२०च्या अंकातून साभार.
मूळ लेखासाठी पहा- http://www.sudharak.in/2020/04/2421/
............................................................................................................................................................
लेखिका यशोदा घाणेकर ‘DeepSeeq Bioinformatics’ या कंपनीच्या सह-संस्थापक आहेत.
yashoda.ghanekar@gmail.com
............................................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment