अजूनकाही
त्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे मी ताळेगावहून पणजीला जाणाऱ्या बसमध्ये बसलो होतो. त्या काळात म्हणजे १९८०च्या दशकात सांत इनेज- ताळेगाव- करंझले- मिरामार -पणजी अशा मार्गे बस जात असे. ‘नवहिंद टाइम्स’चा बातमीदार म्हणून मी साधारणतः सकाळी साडेनऊला पणजीतल्या सचिवालयातल्या प्रेस रूममध्ये जात असे. त्या दिवशी आम्ही काही प्रवासी त्या खासगी बसमध्ये चढलो आणि कंडक्टरने ती धक्कादायक घोषणा केली - “सोगळे ध्यान द्या हांव कित्ये सांगता त्ये. पोणजिचो मांडवीचो पूल मोडलोय. म्हापश्याचे अन नॉर्थ गोयांक आता सोगळी बस बंद असात.” बहुतेक प्रत्येक बस स्टॉपवर तो ती घोषणा करता असावा.
कंडक्टर काय सांगत होता त्याचा मला अर्थ स्पष्ट होण्यास काही क्षण जावे लागले. इतकी ती धक्कादायक आणि भयानक घटना होती. पणजी शहर हे मुंबईसारखेच एक बेट आहे, अनेक बाजूंनी पाण्याने घेरलेले. म्हणजे एका बाजूने मांडवी नदीने, दुसऱ्या बाजूने झुआरी नदीने आणि बाकी अरबी समुद्राच्या पाण्याने घेरलेला. पंडित नेहरूंनी १९६१ साली लष्करी कारवाई करून गोव्याची पोर्तुगीज सत्तेतून मुक्ती केली. हा चिमुकला प्रदेश भारतात सामिल झाल्यानंतर पणजी आणि म्हापशाला जोडणारा मांडवी नदीवरचा पूल बांधण्यात आला होता. तो ‘नेहरू पूल’ आता कोसळला आहे आणि त्यामुळे म्हापसा वा उत्तर गोव्याला जाऊ इच्छिणाऱ्या प्रवाशांनी इथेच उतरून घ्यावे असे कंडक्टर सूचवत होता.
कंडक्टरच्या बोलण्याचा अर्थ डोक्यात शिरल्यानंतर माझ्या काळजाचा ठोकाच चुकला. मी क्राईम रिपोर्टर होतो. मांडवीचा पूल कोसळला ही मोठी बातमी मला कळाली नाही आणि मी ती दिलीही नाही. आता माझे काय होणार असा प्रश्न मला पडला. मी बातमीदारीत नवा असलो तरी एखादी मोठी बातमी चुकल्यावर त्या बातमीदाराचे काय होते, याचे अनेक किस्से माझ्या कानावर पडले होते. मांडवी पूल कोसळल्याच्या घटनेच्या धक्क्याऐवजी ही बातमी चुकल्याने आता माझे काय होणार, या विचाराने मीच कोसळलो होतो! सुदैवाने काही सेकंदातच माझ्या जीवात जीव आला.
थक्क झालेल्या प्रवाशांच्या प्रश्नांना उत्तर देताना कंडक्टरने सांगितलं की, अर्ध्या तासापूर्वीच मांडवीचा पूल कोसळला आहे. चला, म्हणजे मी काल रात्री ऑफिसातून घरी गेल्यानंतर पूल कोसळला नव्हता तर. म्हणजे माझं शीर आणि नोकरी दोन्ही सहीसलामत होती. मी दीर्घ श्वास घेतला आणि पूल कोसळल्याच्या बातमीमुळे आता जवळजवळ निम्म्या मोकळ्या झालेल्या बसमध्ये एका सीटवर पटकन आरामात बसलो. मला लवकरात लवकर घटनास्थळी जाणं आवश्यक होतं. बातमीदार म्हणून आता पूल कोसळल्याची बातमी मला द्यावी लागणार होती.
बस अखेरच्या स्टॉपला - प्रासाला - म्हणजे बस स्टँडला पोहोचली आणि गर्दीचा लोंढा जात होता, त्या दिशेनं मीही निघालो. तोपर्यंत दहा वाजत आले होते. मांडवीच्या तीरावर त्या काळात (हा परिसर अगदी मोकळा होता) उभं राहून मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे, सार्वजनिक खात्याचे मंत्री डॉ. विल्फ्रेड डिसोझा झालेल्या दुर्घटनेचा आढावा घेत होते. गोवा भारतात विलीन झाल्यानंतरची ही सर्वांत मोठी दुर्घटना होती. कारण उत्तर-दक्षिण गोव्याला जोडणारा हा एकमेव पूल कोसळल्यानं गोवा, दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशाचं कंबरडंच मोडलं होतं.
त्या काळात झुआरी नदीवर पूल नव्हताच. त्यामुळे पणजीहून मडगाव वा वोस्कोला जाताना आम्ही आगाशी इथं बसमधून उतरून फेरीबोटीनं झुआरीच्या दुसऱ्या तीरावर म्हणजे कोरतालीम इथं जाऊन दुसरी बस पकडत असू. मांडवीचा पूल पडल्यावर आता पणजीहून पोरवोरीम वा म्हापशाच्या दिशेनं कसा प्रवास करणार हा मोठा प्रश्न होता. हातात पेन आणि कागद वा छोटंसं नोटपॅड घेतलेल्या पत्रकारांनी मुख्यमंत्री राणे यांना घेरलेलं होतं. त्यामध्ये आमच्या ‘नवहिंद टाइम्स’चे मुख्य वार्ताहर प्रमोद खांडेपारकर, ज्येष्ठ वार्ताहर रवि प्रभुगावकरही होते. पोरवोरीम इथं टुमदार बंगले असलेल्या पत्रकार कॉलनीमध्ये राहणाऱ्या या पत्रकारांनी मांडवीचा पूल कोसळल्यानंतर जवळच्या बेती गावाकडे जाऊन तेथून फेरीबोटीनं पणजीत धाव घेतली होती, हे उघड होतं.
पुढे दोन-तीन वर्षं या मार्गावर सर्वांसाठी वाहतुकीचा काय पर्याय असणार याची ती चुणूकच होती. त्या काळात मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांची शासकीय निवासस्थाने पणजीतच अल्तिनो इथं असायची. त्यामुळे अल्तिनोवरून (पोर्तुगीजमध्ये अल्तिनो म्हणजे टेकडी) ताबडतोब खाली येऊन दुर्घटनास्थळी दाखल होणं त्यांना शक्य झालं होतं. अल्तिनोला मुख्यमंत्र्यांचा बंगला गोव्याचे आर्चबिशप पॅट्रियार्क राऊल गोन्सालवीस यांच्या भल्यामोठ्या बिशप्स पॅलेस समोर असायचा. म्हणजे गोव्यातील ही दोन प्रमुख सत्ताकेंद्रं अगदी आमनेसामने असायची.
आमच्या दैनिकातील दोन ज्येष्ठ बातमीदारांना त्या पत्रकार परिषदेत नोट्स घेताना पाहून आपल्या हातातून ही बातमी सटकली याची मला लगेच जाणीव झाली. मांडवीच्या तीरावरून मग मुख्यमंत्री, इतर मंत्री आणि सरकारी अधिकाऱ्यांचा ताफा पुलाचे दोन खांब निखळले होते, त्या दिशेनं जाऊ लागला. चालताना मुख्यमंत्री राणे बोलत होते, मध्येच मुख्य सचिव आणि गोवा केंद्रशासित प्रदेशाचे एकमेव जिल्हाधिकारी काही माहिती पुरवत होते. पूल कोसळल्याची दुर्घटना नुकतीच घडल्यानं पुलावरून काही वाहनं वाहत्या नदीत पडली काय आणि इतर स्वरूपाची जीवितहानी झाली की नाही वगैरे तपशील लगेच वा आजच मिळण्याची शक्यता नव्हतीच.
हा दिवस होता शनिवार, ५ जुलै १९८६. रशियन डिझाईन तंत्रावर बांधलेल्या या नेहरू पुलाचं केंद्रीय मंत्री बाबू जगजीवन राम यांनी १७ वर्षांपूर्वी उदघाटन केलं होतं. योगायोग म्हणजे जगजीवन राम यांनी दिल्लीत अखेरचा श्वास घेतला, त्याच्या आदल्या दिवशीच मांडवी पुलाचंही कंबरडं मोडलं होतं. पुलाचे पणजीकडील दोन खांब पडल्यानं नदीच्या दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली होती. यातील सर्वांत सुदैवाचा भाग म्हणजे शनिवारची सुट्टी असल्यानं सकाळी पणजीला विद्यार्थ्यांना आणणाऱ्या स्कुल बसेस या पुलावरून त्यावेळेस धावत नव्हत्या. इतरही वाहतूक अगदी तुरळक होती. त्यामुळे पूल कोसळला तरी एकाही मोठ्या वा छोट्या वाहनाला वा दुचाकीचालकाला मांडवीत जलसमाधी मिळाली नाही, हे नंतर निष्पन्न झालं. फक्त पुलाच्या खांबाखाली आश्रयास असलेल्या एका अनोळखी इसमाचा मृत्यू झाला होता!
ही मानवनिर्मित आपत्ती होती. निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे वा कुणाच्या हलगर्जीपणामुळे हे संकट कोसळलं होतं. या आपत्तीनं पणजी आणि म्हापसा या दोन्ही शहरांचं अचानक ‘लॉकडाऊन’ झालं! मांडवीचा पूल कोसळला अन लगेचच पणजीवासीय आणि मांडवीच्या पलीकडच्या तीरावर असलेल्या गोमंतकीयांचा प्रवासाचा दैनंदिन संघर्ष सुरू झाला.
राजधानी पणजी इथं पोरवोरीम, म्हापसा, तिव्हीम आणि बार्देझ तालुक्यातून इतर गावांतून शेकडो लोक नोकरी, व्यवसाय आणि इतर कामानिमित्त दररोज ये-जा करत होते आणि पणजीतून अनेक लोक बार्देझ तालुक्यात आणि इतरत्र जात होते. त्याशिवाय पणजीहून कलंगुट, अंजुना, वागातोर वगैरे प्रसिद्ध समुद्रकिनाऱ्यांवर जाऊ इच्छिणाऱ्या हजारो पर्यटकांचा मार्ग बंद झाला होता. भाजीपाला, फळं, विविध धान्यं याबाबतीत पणजी हे राजधानीचं शहर पूर्णतः म्हापसामार्गे होणाऱ्या मालवाहतुकीवर अवलंबून होतं. बेळगाव आणि कर्नाटकाच्या इतर भागांतून गोव्यात दरदिवशी मोठ्या प्रमाणावर बीफचा पुरवठा होतो. ही वाहतूक व्यवस्था आता पूर्ण कोलमडून पडली होती.
या काळात गोव्यात औरंगाबाद आणि मराठवाड्याच्या इतर भागाप्रमाणे छोट्या आकाराची आणि कमी वेगानं व क्षमतेनं धावणारी मिटरगेज रेल्वे होती. ही रेल्वे सेवा दक्षिण गोव्याच्या काही तुरळक भागात मर्यादित होती. महाराष्ट्रातून मिरजहून आणि कर्नाटकातील लोंढा व दूधसागर धबधब्यामार्गे येणाऱ्या या रेल्वेची गोव्यात काणकोण, मडगाव आणि वॊस्को दा गामा हीच प्रमुख रेल्वे स्टेशन्स होती. दिवसातून फक्त दोनदा म्हणजे सकाळी दहा आणि रात्री नऊला असणाऱ्या वॊस्कोवरून या प्रवाशी रेल्वे गाड्या परत कर्नाटकात मागे जायच्या, मांडवी पूल कोसळल्यानं रेल्वेमार्गाचा एक पर्यायी व्यवस्था म्हणून वापर होणं शक्य नव्हतं.
यावर तात्पुरता उपाय म्हणून गोवा सरकारच्या नदी परिवहन खात्यातर्फे चालवल्या जाणाऱ्या अनेक फेरीबोटी पणजी जेटीवरून मांडवीच्या दुसऱ्या किनाऱ्यावर असलेल्या बेती या गावाकडे सोडण्यात आल्या. बेती गावापासून लोकांना मग पोरवोरीम आणि म्हापशाला जाण्यासाठी बसेसची सोय करण्यात आली. अशा प्रकारे पणजीतून बार्देझ तालुका आणि उत्तर गोव्यातील इतर ठिकाणी जाण्यासाठी पणजी जेटी आणि बेती येथून प्रवाशांना घेऊन दर दहा-पंधरा मिनिटाला फेरीबोटी सुटू लागल्या. या विशिष्ट प्रकारच्या मोठ्या आकाराच्या यांत्रिकी बोटी असतात, ज्यात प्रवाशांबरोबर त्यांच्या दुचाकी, रिक्षा, जीप्स, चारचाकी वाहने, ट्रक्स वगैरे वाहनं यांचीही वाहतूक केली जाते. गोव्यात ज्यांनी शोराव, दिवार वगैरे छोट्यामोठ्या बेटांवर आपल्या वाहनांसह फेरीबोटीनं प्रवास केला आहे, त्यांना या प्रवासाची कल्पना येईल.
मांडवी पूल कोसळल्यावर काही दिवस पणजी व म्हापसा या शहरांतील वाहतूक काही काळ ठप्पच झाली. तुटपुंज्या संख्येनं असलेल्या फेरीबोटींवर प्रचंड ताण आला. त्यामुळे हजारो प्रवाशांना फेरीबोटीनं ने-आण करण्याचा खर्च कोण करणार?- प्रवाशांना या बोटप्रवासासाठी तिकीट लावलं तर लोकांच्या प्रक्षोभास तोंड द्यावं लागेल, म्हणून गोवा सरकारनं हा प्रवास सर्वांसाठी फुकट ठेवण्याचा निर्णय घेतला. मांडवीवर नवा पर्यायी पूल होईपर्यंत म्हणजे दोन-तीन वर्षं हा निर्णय कायम राहिला. मांडवीच्या दोन्ही तीरांवरून हजारो प्रवाशांची त्यांच्या वाहनांसह प्रवासाची सोय करण्यासाठी गोवा सरकारनं केंद्र सरकारकडून अतिरिक्त फेरीबोटी मागवल्या. गोवा, दमण आणि दीव त्या काळी केंद्रशासित प्रदेश असल्यानं ही मागणी तात्काळ मंजूर झाली.
अशा प्रकारे पणजीत राहणारे आम्ही आणि दहा-बारा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या पोरवोरीम वा म्हापसा येथील लोक दररोज फेरीबोटीनं आपल्या वाहनांसह (त्या काळी प्रामुख्यानं फक्त बजाजच्या दुचाकी वाहनांसह) प्रवास करू लागले आणि आम्हा सर्वांना लवकरच त्याची सवयही झाली. त्या काळात सोशल मीडिया नसल्यानं आम्ही सर्वांनी ही मजबुरी विनातक्रार स्वीकारली. दुसरा पर्यायही नव्हता.
मात्र सुशेगाद गोयंकरांना अशा प्रकारच्या अडीअडचणींना निमूटपणे तोंड देण्याची त्या वेळी सवय होती असं म्हणावे लागेल. मला आठवतं, पणजीवरून पोंडामार्गे मडगावला जाताना सर्व बसेस आणि इतर वाहनांतील प्रवाशांना बोरी येथील पूल आल्यावर वाहनातून उतरावं लागं. त्यानंतर त्या पुलाच्या दुसऱ्या टोकापर्यंत पायी चालत जाऊन नंतर आपापल्या बस वा वाहनांत बसावं लागं. याचं कारण काय तर पोर्तुगीजांनी बांधलेला तो पूल आता कमकुवत झाला होता. विशेष म्हणजे गोवामुक्तीनंतर २० वर्षांहून अधिक काळ बोरी पुलावर हा प्रकार चालू होता.
या काळात पणजी जेटी आणि बेती येथील जेटी यादरम्यान मांडवी नदीच्या प्रवाहात तब्बल सहा फेरीबोटी दिवसभर प्रवाशांची ने-आण करत असत. त्यापैकी दोन बोटी दोन्ही जेटींवर प्रवाशांना उतरवत वा घेत असत आणि इतर चार बोटी पणजी किंवा बेतीच्या दिशेनं एकमेकींना चुकवत आणि सुरक्षित अंतर राखत नदीतून वेगानं जात-येत असत. हा प्रवास केवळ पाच-दहा मिनिटांचा असायचा. मात्र हजारो लोकांच्या या फुकटच्या प्रवासासाठी सरकारला फेरीबोटींच्या इंधनासाठी आणि इतर बाबींसाठी दररोज किती खर्च करावा लागत असेल, याची केवळ कल्पनाच केलेली बरी!
या काळात गोव्यात अनेक ठिकाणी आपला कॅम्प असलेल्या सैन्यदलानं अडचणीत आलेल्या प्रवाशांच्या मदतीसाठी मोठं योगदान दिले. मांडवी पूल कोसळल्यानंतर पणजी बसस्टँडजवळ असलेल्या खाडीवर सैन्यदलानं चोवीस तासांच्या अवधीत एक बेली ब्रिज उभारला. युद्धाच्या काळात शत्रुसैन्यानं एखादा पूल उडवल्यास सैन्यदल काही तासांच्या अवधीत असा प्री-फेब्रिकेटेड बेली ब्रिज उभारतात. यामुळे पणजीच्या दिशेनं ये-जा करणाऱ्या लोकांची मोठी सोय कझाली. मात्र या सोयीनं सोकावलेल्या गोवा सरकारनं हा बेली पूल मांडवीवर नवा पूल बांधून होईपर्यंत ठेवावा, अशी मागणी केली होती. सैन्यदळानं या मागणीस दाद दिली नाही. त्यामुळे सैन्यदलातर्फे ज्या वेगानं हा बेली ब्रिज उभारण्यात आला होता, त्याच वेगानं काही महिन्यांनंतर तो खाली उतरवून नाहीसा झाल्याचंही आम्ही पाहिलं.
यानंतर मांडवीच्या पुलाच्या दुर्घटनेबाबत झालेल्या घडामोडी आता तशा फार महत्त्वाच्या राहिल्या नाहीत. पणजीत पोर्तुगीजांनी ४५० वर्षांपूर्वी बांधलेला, मुख्य बस स्टँडला आणि रिओ दि ओरेम या रस्त्याला जोडणारा पाटो कॉलनीशेजारचा छोटासा पाटो ब्रिज आजही दणकट आहे. मात्र केवळ १७ वर्षांपूर्वी बांधलेला मांडवी नदीवरचा ‘नेहरू पूल’ का कोसळला याची चौकशी करण्यासाठी त्या वेळी गोवा सरकारनं मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश देवीदत्त मंगेश रेगे यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय चौकशी आयोग नेमला. पणजीत सांत इनेझ इथं एका सरकारी इमारतीत या चौकशी आयोगानं सुनावणी सुरू केली, तेव्हा सुरुवातीची चार-पाच महिने ही सुनावणी मी अधूनमधून ‘नवहिंद टाइम्स’साठी कव्हर करत होतो.
सरकारी नोकरीतून १०-२० वर्षांपूर्वी निवृत्त झालेल्या राज्ज्य आणि केंद्र सरकारच्या सार्वजनिक बांधकाम खात्यांचे संचालक, मुख्य इंजिनीयर वगैरे सर्वोच पदांवरील अनेक अधिकाऱ्यांना देशाच्या विविध ठिकाणांहून या आयोगानं चौकशीसाठी बोलावलं होतं. या सुनावणीला मी हजर राहिल्यानं सिव्हिल इंजिनीअरिंगमधील अनेक संज्ञा मला माहीत झाल्या. मांडवी पुलाचं बांधकाम निकृष्ट दर्जाचं झालं होतं काय आणि त्यास जबाबदार कोण, हे ठरवण्याचं काम या चौकशी आयोगाचं होतं. या सुनावणीदरम्यानच या चौकशी कामातील फोलपणा माझ्या लक्षात आला. या चौकशी आयोगाला मुदतवाढ होत राहून यथावकाश चौकशी पूर्ण झाली. आयोगाचा अहवाल गोवा विधानसभेत मांडण्यात आला आणि कुणावरही काहीही कारवाई न होता, तो दफ्तरी दाखल करण्यात आला.
आज पणजीतील मांडवी नदीवर एकतर्फी वाहतूक असलेले दोन पूल आहेत आणि सध्या तिसऱ्या मोठ्या महत्त्वाकांक्षी फ्लायओव्हरचंही काम चालू आहे. या पुलांवरून जाताना साडेतीन दशकांपूर्वी या नदीवरचा एकमेव पूल कोसळल्याची आणि त्यामुळे पणजी या राजधानीचं आणि म्हापसा या प्रमुख व्यापारी केंद्राचं कसं ‘लॉकडाऊन’ झालं होतं, याची हमखास आठवण येते!
.............................................................................................................................................
लेखक कामिल पारखे ज्येष्ठ पत्रकार आहेत.
camilparkhe@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment