अजूनकाही
विसाव्या शतकात काही महत्त्वाच्या घटना घडल्या, ज्यांचा परिणाम जगाला आजही या ना त्या प्रकारे भोगावा लागत आहे. १९१७ची रशियन क्रांती, पहिले महायुद्ध (१९१४-१८), दुसरे महायुद्ध (१९३९-४५), ऑगस्ट १९४५ मध्ये हिरोशिमा व नागासाकींवर टाकण्यात आलेले अणुबॉम्ब, त्यामुळे सुरू झालेले शीतयुद्ध, माओची क्रांती, १९४७ साली भारतात झालेले सत्तांतर, १९९० साली कोसळलेले सोव्हिएत युनियनचे साम्राज्य इत्यादी. यातही साहित्य, कला, राजकारण वगैरे सर्व क्षेत्रांत मोठे बदल घडून युरोप-अमेरिकेतील तरुण पिढीचा प्रस्थापित समाजव्यवस्थेवरचा विश्वासच उडाला. त्यातून तिरकस प्रकारचे लेखन समोर आले आणि प्रस्थापित व्यवस्थेला उत्तरं देता येणार नाहीत, असे प्रश्न लेखक- कलाकार उपस्थित करू लागले.
दुसरे महायुद्ध १९४५ साली संपले, ते अणुशक्तीच्या वापराने. माणूस किती क्रूर होऊ शकतो आणि यापुढे जर तिसरे महायुद्ध झाले तर अखिल मानवी वंशच नष्ट होईल, असे वातावरण निर्माण झाले होते. म्हणूनच ऑक्टोबर १९४५ मध्ये ‘संयुक्त राष्ट्रसंघ’ स्थापन झाला. तोपर्यंत जगभर लष्करी यंत्रणा, त्यांच्या समाजविघातक कारवायांबद्दल विद्वानांमध्ये चर्चा सुरू झाली होती. ‘लष्करी सामग्री’ हा फार मोठा नफा मिळवून देणारा धंदा आहे व या व्यवसायाचा प्रभाव अनेक देशांच्या प्रमुखांवर दिसून येतो. शस्त्रं बनवणारे कारखानदार, ते विकणारे एजंट यांचा प्रभाव किती अमानुष आहे, याचा उल्लेख १७ जानेवारी १९६१ रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आयझेनहॉवर यांनी व्हाईट हाऊसमध्ये केलेल्या भाषणांत केला होता. हा दिवस त्यांचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा शेवटचा दिवस होता.
आयझेनहॉवर स्वतः अमेरिकन सैन्याचे माजी सेनापती. ते या सुप्रसिद्ध भाषणात म्हणाले होते- “आज लष्करी सामग्री निर्माण करणारे कारखाने आणि उद्योगपती यांची अभद्र युती (military-industry complex) झालेली असून ही युती केवळ नफा कमावण्यासाठी देशादेशांत युद्ध घडवून आणतात. ही युती म्हणजे लोकशाही शासनव्यवस्थेला असलेले सर्वांत मोठे आव्हान होय.”
अपेक्षेप्रमाणे या भाषणानं जगभर खळबळ माजली.
असाच महत्त्वाचा उल्लेख विश्राम बेडेकरांच्या ‘रणांगण’ या कादंबरीत दिसून येतो. पृष्ठ क्रमांक २१ वर बेडेकरांनी सर बेसिल झाराफ या माणसाचा उल्लेख केला. तो त्या काळचा शस्त्रास्त्रांचा मोठा दलाल. एखाद्या देशाच्या राजधानीत त्याची उठबस सुरू झाली की, समजायचं लवकरच युद्ध सुरू होर्इल.
या संदर्भातील दुसरं उदाहरण म्हणजे दीनानाथ मनोहरांची ‘रोबो’ ही कादंबरी. ही गडद, शोकात्म पार्श्वभूमी समजून घेतली की, तेव्हाचे युरोप-अमेरिकेतील लेखक-कलाकार कोणत्या वास्तवाला भिडण्याचा प्रयत्न करत होते, याचा अंदाज येतो.
याच काळात म्हणजे १९५१ साली जे. डी. सालिंजरची ‘कॅचर इन द राय’ ही कादंबरी आली. पुढे १९६१ साली जोसेफ हेलरची ‘कॅच 22’ (catch twenty two) ही कादंबरी प्रसिद्ध झाली.
तो काळ कसा होता हे समजून घेण्यासाठी अशा कलाकृती फार महत्त्वाच्या ठरतात आणि तेव्हाचे लेखक-कलाकार जीवनाकडे तिरकस नजरेनं का बघत होते, त्यांचा जीवनातील मांगल्यावर विश्वास का उडाला होता, याचा अंदाज येतो. मराठीतील संदर्भ द्यायचा म्हणजे १९६३ साली प्रकाशित झालेली पांडुरंग सांगवीकरची कहाणी सांगणारी उदाहरणार्थ ‘कोसला’!
जोसेफ हेलरने (१९२३-१९९९) ‘कॅच 22’मध्ये सैनिक जीवनातील वैफल्य, अनेक प्रकारचा मूर्खपणा वगैरेंचं धारदार आणि तिरकस चित्रण केलं आहे. १९४२ साली म्हणजे वयाच्या १९व्या वर्षी हेलर अमेरिकन वायुदलात भरती झाला. दुसरं महायुद्ध १९४५मध्ये संपल्यानंतर तो नागरी जीवनात परतला व लेखन करू लागला. त्याची ‘कॅच 22’ रातोरात लोकप्रिय झाली. नंतर या कादंबरीवर सिनेमा व नाटक आलं.
नंतर ‘कॅच 22’ हा एक परवलीचा शब्द बनला. एखादी अनाकलीय किंवा अतार्किक स्थिती म्हणजे ‘कॅच 22’ असा अर्थ रूढ झाला. उदा. एखाद्या व्यक्तीचा वाचायचा चष्मा घरात हरवला असेल तर तो शोधायचा कसा? अशा स्थितीला ‘कॅच 22’ म्हणतात. असंच दुसरं व सतत वापरात असलेलं उदाहरण म्हणजे ‘अनुभव नाही म्हणून नोकरी नाही व नोकरी नाही म्हणून अनुभव नाही’. असो. ‘कॅच 22’ला शब्दकोषात स्वतंत्र अर्थ नाही. याला अर्थ प्राप्त होतो, ज्या परिस्थितीत हा शब्द वापरला त्यावरून.
या कादंबरीत वायुद़लातील तरुण अधिकारी जॉन योझारीनची कथा सांगितली आहे. हा तरुण या ना त्या प्रकारे लष्करी जबाबदाऱ्या टाळण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो. यात तो कधी यशस्वी होतो, तर कधी अयशस्वी. त्यातून पदोपदी ‘ब्लॅक कॉमेडी’ निर्माण होते.
हेलरने १९७१ साली या कादंबरीचं नाट्यरूपांतर तयार केलं. त्यानेच १९९४ साली या कादंबरीचा उत्तरार्ध ‘क्लोजिंग टार्इम’ लिहिला.
या अफलातून कादंबरीचा रंगमंचीय आविष्कार सादर केला होता, तो मुंबईस्थित नाट्यसंस्था टी पॉट प्रॉडक्शन्सनने. ही नाट्यसंस्था त्रिश्ला पटेल व तिचे पती विशाल कपूर यांनी २०१० मध्ये स्थापन केली. आगळीवेगळी नाटकं सादर करणारी संस्था असा तिचा लौकिक आहे
‘कॅच 22’ मंचित करणं हे जबरदस्त आव्हान होतं, जे त्रिश्ला पटेल यांनी पेललं. हा प्रयोग जुहूच्या पृथ्वी थिएटरमध्ये बघायला मिळाला. ही जरी कॅप्टन जॉन योसारियनची कथा (त्याला प्रेमानं ‘यो यो’ म्हणतात) असली तरी ती कथा तशी प्रातिनिधक ठरते. कारण तो ज्याच्या मानसिकतेतून आजुबाजूच्या स्थितीकडे बघतो, त्याबद्दल सहानुभूती असणारे अनेक तरुण लष्करी अधिकारी त्याच्या आजुबाजूला वावरत असतात. जॉन वायुदलात भरती होतो, तो प्रशिक्षणार्थी वैमानिक म्हणून. त्याच्या प्रशिक्षणाचा भाग म्हणून त्याला विमान अमुक एक मैल उडवायचं असतं. त्याचा प्रशिक्षक करड्या शिस्तीचा असतो, तर जॉनचे दिवसभर डोकं चालतं ते या दिशेनं की, विमान उडवणं कसं टाळता येईल. हा ताण नाटकाचा महत्त्वाचा भाग आहे. जॉन मनातल्या मनात हिशेब करतो की, त्याचं प्रशिक्षण पूर्ण होईपर्यंत जर युद्ध संपलं तर काय बहार होईल! सैन्यात शूर शिपाई असतात, ते देशासाठी बलिदान करायला सदैव तयार असतात, अशा प्रस्थापित मूल्यांना ‘कॅच 22’सारख्या कलाकृती सुरूंग लावतात. कहर म्हणजे कॅप्टन जॉनसारख्या भित्र्या वैमानिकाला शौर्यासाठी पदक प्रदान केलं जातं!
कादंबरीतल्या सुमारे पन्नास पात्रांपैकी फक्त नऊ पात्रं नाटकात आहेत. त्यामुळे ज्यांनी कादंबरी वाचली आहे, त्यांना हा नाट्यानुभव असमाधानकारक वाटणं स्वाभाविक आहे.
या प्रयोगाचं दिग्दर्शन त्रिश्ला पटेल यांनीच केलं होतं. कविन दवे, शंशाक दत्त, रूमाना मोल्ला, रोहन खुराना वगैरे तरुण रंगकर्मींनी लष्करी तळावर आढळणारं वातावरण सहजतेनं निर्माण केलं आहे. हे एक प्रकारचं समूह नाटक आहे. म्हणूनच कॅप्टन जॉन जरी नायक असला तरी वस्तूतः तो न-नायक आहे. (कै. प्रा. ल. ग. जोगांनी नेमाडेसरांच्या ‘बिढार’चा नायक, चांगदेव पाटील ‘न-नायक’ असल्याची मांडणी केली होती). या न-नायकाद्वारे कादंबरीकार हेलर जो परिणाम साधतो, तो परिणाम नाटककार हेलरला साधता आला नाही. कारण ‘नाटक’ हा कलाप्रकार तसा बहिर्मुख आहे. एका टप्प्यानंतर ‘नाटक’ या कलाप्रकारात पात्रांच्या अंतरंगात डोकावता येत नाही.
असं असलं तरी एक कलाकृती म्हणून त्रिश्ला पटेल यांनी दिग्दर्शित केलेला प्रयोग चांगला आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांना मिळालेली साथ! रोहित दास (संगीत), हरी जांगिड (नेपथ्य), अमोघ फडके (प्रकाश योजना) वगैरेंनी यथोचित साथ दिली आहे.
हे नाटक शेकडो वर्षं अस्तित्वात असलेल्या ‘लष्करा’सारख्या सामाजिक संस्थांच्या भूमिकेबद्दल प्रश्न उपस्थित करतं. असे प्रश्न ‘कोसला’तील पांडुरंग सांगवीकरसुद्धा उपस्थित करतो. मुख्य म्हणजे यात एक प्रकारची शोकांतिका आहे. असे सर्व प्रश्न उपस्थित करूनही या पारंपरिक व्यवस्था आजही अस्तित्वात आहेत व तशाच वागत आहेत.
१९६१ साली आयझेनहॉवर यांनी इशारा दिलेली असला तरी आजही अमेरिकेत ‘लष्करशाही व उद्योगपतींची अभद्र युती’ आहेच. एवढंच नव्हे तर ही युती आधी होती, त्यापेक्षा जास्त बळकट झाली, असं अनेक अभ्यासक नमूद करतात.
.............................................................................................................................................
लेखक प्रा. अविनाश कोल्हे समीक्षक व कादंबरीकार आहेत.
nashkohl@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment