प्रसारमाध्यमांतून कोविड-१९विषयी येणाऱ्या सनसनाटी बातम्यांवर विश्वास न ठेवण्यास अनेक कारणं आहेत.
पडघम - माध्यमनामा
सागर वाघमारे
  • प्रातिनिधिक चित्र
  • Thu , 02 April 2020
  • पडघम माध्यमनामा करोना विषाणू Corona virus कोविड-१९ Covid-19 करोना Corona करोना व्हायरस Coronavirus

डिसेंबर २०१९मध्ये नवीन करोना रोगाची म्हणजेच कोविड-१९ची माहितीतील पहिली अधिकृत केस चीनमध्ये सापडली. तेव्हापासून या नवीन करोनाचा विषाणूने (SARS-CoV-2) जगाला आपला विळखा घातला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने या जीवघेण्या करोना व्हायरसला ‘आंतरराष्ट्रीय आणीबाणी’ म्हणून घोषित केलं आहे. या संघटनेचे प्रमुख Tedros Adhanom Ghebreyesus यांनी जिनेव्हामध्ये म्हटले आहे की, कोविड-१९ ला आता ‘महामारी’ म्हटले जाऊ शकते. सध्या प्रसारमाध्यमांत कोविड-१९विषयी येणाऱ्या बातम्यांवर विश्वास ठेवला, तर त्यातून दोन निष्कर्ष निघतात-

१) कोविड-१९चा मृत्यूदर इतर कुठल्याही विषाणूपेक्षा खूप जास्त आहे.

२) कोविड-१९चा विषाणू खूप जास्त गतीने आपला संसर्ग पसरवत आहे आणि करोनाग्रस्त लोकांची संख्या खूप झपाट्यानं वाढत आहे.

पण या दोन्हीही निष्कर्षांवर आपण फारसा विश्वास ठेवू शकत नाही, ठेवू नये.

का?

त्याची काही कारणं बघूया.

त्यासाठी आधी करोनाचा मृत्यूदर ज्या दोन पद्धतीनं काढतात ते समजून घेऊ.

१) केस मृत्यूदर (case fatality rate) - फक्त रोगाची लक्षणं दाखवणाऱ्यांची तपासणी केल्यानंतर जे रुग्ण सापडले आणि त्यापैकी किती मरण पावले याची संख्या

२) संसर्ग मृत्यूदर (infection fatality rate) - रोगाची लक्षणं दाखवणारे आणि रोगाची लक्षणं न दाखवणारे, पण करोना विषाणूचा संसर्ग झालेले लोक, यांची एकूण संख्या आणि त्यापैकी किती मरण पावले याची संख्या

सध्या फक्त प्रसारमाध्यमांतून करोनाच्या फसव्या ‘केस मृत्युदरा’बद्दलच आपल्याला माहिती मिळत आहे. भारताप्रमाणेच बहुसंख्य देशांत कोविड-१९च्या विषाणूसाठीची तपासणी फक्त त्याच लोकांची केली जात आहे, ज्यांनी करोनाची काही लक्षणं दाखवण्यास सुरुवात केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार ८० टक्क्यांपेक्षा जास्त लोक करोनाचा संसर्ग होऊनही त्याची लक्षणं दाखवतच नाहीत. म्हणजे जर सर्व देशांनी सरसकट सर्व नागरिकांची तपासणी करण्यास सुरुवात केली, तर कोविड-१९च्या विषाणूची लागण झालेल्यांची संख्या प्रचंड वाढलेली दिसेल. कारण जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार कोविड-१९चा ‘रिप्रॉडक्शन नंबर’ २-२.५ इतका आहे. म्हणजे एक करोनाबाधित व्यक्ती कमीत कमी दोन लोकांना संसर्ग घडवून आणू शकते. म्हणजे करोनाची वाढ घातांकीय पद्धतीनं होत आहे

प्रसारमाध्यमांमध्ये जेव्हा बातमी येते की, एका दिवसात करोनाबाधित लोकांची संख्या अमुकतमुक आकड्यानं वाढली, तेव्हा त्याचा अर्थ काय होतो? तर कोविड-१९चा विषाणू शोधण्यासाठीच्या तपासण्यांची संख्या व गती वाढल्यानं त्याची लागण झालेल्यांची संख्या वाढली.

याचा दुसरा अर्थ काय तर कोविड-१९चा विषाणू SARS-CoV-2 लोकांच्या शरीरात आधीपासूनच राहतो आहे आणि त्यातले बहुसंख्य लोक रोगाची लक्षणं दाखवतच नसल्यानं करोनाचा विषाणू त्यांच्या शरीरात घर करून आहे, याची कल्पनादेखील त्यांना नाही. ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या एका शोधअभ्यासानुसार ब्रिटनमधील अर्ध्या लोकसंख्येला करोनाची लागण आधीच झालेली असेल!

म्हणजे कोविड-१९च्या तपासण्यांची संख्या व गती जितकी जास्त असेल, तितकीच जास्त त्याची लागण झालेली लोकसंख्या तुमच्यासमोर येईल व तितकाच त्याचा मृत्युदर कमी असेल.

तो, का व कसा? हे समजून घेण्यासाठी काही उदाहरणं पाहू.

अमेरिकेत ३० मार्चपर्यंत कोविड-१९च्या ६ लाखांपेक्षा जास्त तपासण्या झाल्या आहेत. सरकारी अधिकृत माहितीनुसार १,४०,००० पेक्षा जास्त करोना पॉझिटिव्ह केस सापडल्या, तर २४०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. याचा अर्थ अमेरिकेत करोनाचा केस मृत्यूदर १.७ ते १.८ टक्क्यांच्या दरम्यान आहे. म्हणजे अमेरिकेत मरण पावलेल्यांची संख्या (२४००) भागिले एकुण तपासण्या करून सापडलेल्या करोना पॉझिटिव्ह केस (१,४०,०००) गुणिले १०० ही बेसिक गणिती आकडेमोड केली की, जे १.७ टक्के हे उत्तर मिळते, ते म्हणजे ‘केस मृत्यूदर’.

पण आपण करत असलेल्या तपासण्यांपेक्षा कोविड-१९च्या प्रसाराचा वेग जास्त असेल तर त्याची लागण झालेल्या लोकांची संख्यादेखील जास्तच असेल. भारतासारख्या लोकसंख्येची जास्त घनता असलेल्या देशात तर कोविड-१९ सामाजिक प्रादुर्भावाच्या तिसऱ्या टप्प्यात कधीच येऊन पोहचला असेल. चीनमध्ये डिसेंबर महिन्यात करोनाची पहिली पॉझिटिव्ह केस सापडली, तेव्हापासून आजपर्यंतचा विचार केला तर करोनाबाधितांची अंदाजित संख्या (रोगाची लक्षणं दाखवणारे आणि न दाखवणारे) एकट्या अमेरिकेतच ३०-४० लाखांपेक्षा जास्त असेल. अमेरिकेतील ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ या वर्तमानपत्रात लिहिलेल्या एका लेखात औषधसंशोधक Eran Bendavid आणि जय भट्टाचार्य यांनी या अंदाजित आकड्यांबद्दल माहिती दिली आहे.

अमेरिकेतील एकूण करोनाबाधित लोकांची संख्या ३० लाख जरी मानली आणि मरण पावलेल्या लोकांची संख्या २४०० मानली, तर जो खरा मृत्यूदर म्हणजे ‘संसर्ग मृत्यूदर’ मिळेल, तो ०.०८ टक्के असेल. हा संसर्ग मृत्यूदर अमेरिकेच्या आजच्या केस मृत्यूदरा (१.७ टक्के) पेक्षाही फारच कमी आहे. हा अंदाजित ‘संसर्ग मृत्यूदर’ अमेरिकेतील ऋतूमानाप्रमाणे येणाऱ्या हंगामी फ्लूच्या ‘संसर्ग मृत्यूदरा’पेक्षाही कमी आहे. ‘द न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसीन’मध्ये लिहिलेल्या आपल्या लेखात Anthony S. Fauci, H. Clifford Lane आणि Robert R. Redfield यांनी अमेरिकेत हंगामी फ्लूचा मृत्यूदर ०.१ टक्के आहे असं म्हटलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसारदेखील हंगामी फ्लूचा मृत्यूदर तितकाच आहे.

भारताचा विचार केला तर सध्या करोना पॉझिटिव्ह लोकांची संख्या १२,०० पेक्षा जास्त, तर मरण पावलेल्यांची संख्या ४० आहे. भारताचा सध्याचा ‘केस मृत्यूदर’ ३ टक्के इतका आहे. पण एक गोष्ट इथं लक्षात घेण्यासारखी आहे. ती म्हणजे भारत फक्त करोनाची लक्षणं दाखवणाऱ्यांचीच तपासणी करत आहे. इतर बहुसंख्य म्हणजे ८० टक्क्यांपेक्षा जास्त करोनाबाधित लोक या रोगाची लक्षणं कधी दाखवतच नाहीत आणि ज्यांना कधी दवाखान्यात जाण्याची गरजही पडत नाही, अशा करोनाबाधितांचाही त्यात समावेश केला गेला, तर भारतातील कोविड-१९ मृत्यूदर आजच्या ३ टक्क्यांपेक्षा फारच कमी झालेला दिसेल.

याचाच दुसरा अर्थ असा होतो की, करोनाची लक्षणं दाखवणारे आणि न दाखवणारे यांच्या जितक्या जास्त तपासण्या केल्या जातील, तितक्याच जास्त पॉझिटिव्ह केस सापडतील आणि तितकाच कमी मृत्यूदर असेल. म्हणजे निष्कर्ष क्रमांक एकवर प्रश्नचिन्ह उभे राहते.

कोविड-१९च्या प्रसाराबद्दलचे शोधअभ्यास या रोगाचा संसर्ग ‘अनियंत्रित घातांकीय’ पद्धतीने होतो आहे, या तर्कावर आधारलेले आहेत. पण कोविड-१९बद्दलचा जागतिक आकडा पाहिला तर त्याची लागण अनियंत्रित घातांकीय पद्धतीने होताना दिसत नाही. कधी ना कधी ब्रेकिंग पॉइंट येतोच आहे. हे समजून घेण्यासाठी काही उदाहरणं बघू.

नोबेल विजेते इस्त्रायलचे जैवभौतिक शास्त्रज्ञ मायकेल लेविट्ट यांच्या अभ्यासानुसार करोनाची वाढ अनियंत्रित घातांकीय पद्धतीने होत असेल, तर चीनच्या ज्या वुहान प्रांतात सर्वप्रथम करोनाचा उद्रेक झाला, तिथे सगळ्यांना त्याची लागण व्हायला हवी होती. पण तसं झालं नाही. वुहानमध्ये फक्त ३ टक्के जनतेलाच करोनाची लागण झाली होती.

मायकेल लेविट्ट यांच्या मते करोनाशी लढण्याची रोगप्रतिकारक शक्ती माणसात आधीपासूनच आहे. कोविड-१९चा SARS-CoV-2 हा विषाणूदेखील जुन्याच करोना विषाणूंच्या गटातील एक नविन विषाणू आहे. जुन्या करोना विषाणूंची जनुकीय रचना व कोविड-१९च्या विषाणूची जनुकीय रचना ९६ टक्के सारखीच आहे.

जुन्या करोना विषाणूंच्या विरोधात आपली रोगप्रतिकारक शक्ती फार पूर्वीच निर्माण झालेली आहे. मायकेल लेविट्ट यांनी आधीच भाकित केलं होतं की, चीनमध्ये करोनाची लागण ८०,०००च्या आसपास होईल, २-३ हजार लोक मृत्यु पावतील आणि फेब्रुवारी- मार्चपर्यंत चीन त्यावर नियंत्रण मिळवेल. चीनमधील करोनाबाधित लोकांची संख्या एकुण लोकसंख्येच्या फक्त ०.००६ टक्के आहे.

दुसरं उदाहरण आहे ‘डायमंड प्रिन्सेस’ नावाच्या जहाजेच. या जहाजावर २७०० प्रवाशी आणि ११०० कर्मचारी होते. त्यापैकी ७०० करोनाग्रस्त निघाले. त्यातील बहुसंख्य वयोवृद्ध होते. या जहाजावरील लोकसंख्येची घनता इस्त्रायलची संपूर्ण लोकसंख्या ३० चौ.किमी.च्या परिसरात एकवटल्यानंतर जितकी होईल, तितकीच होती. जहाजावर केंद्रीय वातानुकूलनाची व्यवस्था, एकत्र जेवणाची सोयदेखील होती. ही सर्व परिस्थिती विषाणूच्या संसर्गासाठी पूर्णपणे अनुकूल असतानाही जहाजावरील सगळ्यांना संसर्ग झाला नाही. डॉ. लेविट्ट यांच्या मते फक्त १८ टक्के प्रवाशांनाच कोविड-१९चा संसर्ग झाला. हा संसर्गाचा आकडा जास्त आहे, पण हंगामी फ्लूच्या संसर्गाइतकाच त्याचा प्रादुर्भाव आहे.

कविड-१९चा रोग पृथ्वीवर गेली पाच महिने अस्तित्वात असूनही जगभरात सध्या फक्त ७ लाख करोनाचे संसर्ग झालेले लोक सापडले आहेत. ही संख्या एकुण जागतिक लोकसंख्येचा फक्त ०.००८ टक्के आहे.

या सगळ्याचा अर्थ असा होतो की, करोनाची वाढ अनियंत्रित घातांकीय पद्धतीने होत नाही. कारण त्याबद्दल करण्यात येणाऱ्या भाकितांपेक्षा ती फारच कमी दिसून येत आहे. म्हणून निष्कर्ष क्रमांक दोनवरही प्रश्नचिन्ह निर्माण होते.

प्रसारमाध्यमांतून कोविड-१९विषयी येणाऱ्या सनसनाटी बातम्यांवर विश्वास न ठेवण्यास अनेक कारणं आहेत.

उपलब्ध आकड्यांवरून कोविड-१९चा संसर्ग आणि त्याचा मृत्यूदर प्रत्येक देशात आणि देशातील प्रत्येक प्रांतामध्ये भिन्न भिन्न दिसत आहे. संशोधकांनाही आपल्या आधीच्या शोधअभ्यासांमध्ये बदल करावे लागत आहेत. अमेरिका व ब्रिटनने ज्या शोधअभ्यासावर आपल्या कोविड-१९ विरोधी लढण्यासाठीची नीती ठरवली, त्या ब्रिटनच्या इम्पीरिअल कॉलेजच्या संशोधकांनाही त्यात बदल करावे लागले आहेत.

कोविड-१९चा खरा मृत्यूदर व त्याच्या संसर्गाचं प्रमाण त्याच वेळी समजू शकेल, जेव्हा जास्तीत जास्त लोकांच्या जास्त गतीनं तपासण्या केल्या जातील.

.............................................................................................................................................

लेखक सागर वाघमारे कृषि पदवीधर असून समाजकारण, अर्थकारण आणि राजकारण हे त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत.

saggy555@rediffmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

Yogesh Phadtare

Thu , 02 April 2020

अनेक चांगले मुद्दे मांडलेत अश्या एखाद्या अभ्यासपूर्ण लेखाची वाट पाहत होतो। तुम्ही ती पूर्ण केलीत.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......