अजूनकाही
लाखो वर्षांपूर्वीचा कुठला तरी रखरखीत प्रदेश. पूर्ण माणूस नाही आणि माकडही नाही, अशा अर्धवट अवस्थेतील एप जातीच्या माकडांचा एक समूह काटेरी झाडांचा पाला खात आणि जवळच्याच एका डबक्यातील पाणी पित गुजराण करतोय. त्याच जातीच्या माकडांचा दुसरा समूह तिथे येतो आणि पहिल्या समूहाला हुसकावून लावतो. पहिल्या समूहातली माकडं बिचारी हिरमुसली होऊन निघून जातात, त्यांची उपासमार होऊ लागते. तहानभुकेने ते व्याकूळ होतात. त्याचवेळी तिथेच पडलेल्या कुठल्या तरी प्राण्याच्या अवशेषांमध्ये या समूहाच्या प्रमुखाला एक भलं मोठं हाड सापडतं. खरं म्हणजे ते अवशेष बराच काळ त्या ठिकाणी पडलेत, पण आजवर कधी त्यांच्याकडे नीट निरखून बघण्याची गरज या प्रमुखाला भासली नव्हती. हळूहळू तो ते हाड हातात घेतो आणि त्या हाडाशी खेळ करता करता आजूबाजूच्या अवशेषांवर त्याचे घाव घालू लागतो. हळूहळू त्याच्या प्रहारांचा वेग आणि त्या घावांमागील ताकद वाढत जाते. ते अवशेष तुटून पडतात. त्या माकडाला त्या हाडाची ताकद समजते, त्यासरशी त्याचा घाव घालण्यामागचा त्वेष आणि चेहऱ्यावरचे हिंस्त्र भाव वाढत जातात. मग तो आपल्या समूहातल्या इतर माकडांच्या हातात एक एक हाड देतो आणि पाण्याचं डबकं ताब्यात घेऊन बसलेल्या त्या दुसऱ्या समूहावर चाल करून जातो. विजय अर्थातच ज्याच्या हाती हाड आहे, त्या समूहाचा होतो.
स्टॅनली क्युब्रिकच्या ‘२००१ : अ स्पेस ओडिसी’ या अद्भुत चित्रपटातील हा सुरुवातीचा प्रसंग मानव जातीची उत्क्रांती आणि तिच्या आजच्या स्थितीपर्यंत झालेल्या वाटचालीचीच सुरुवात आहे आणि दिग्दर्शक डॉमिनिक सेनाच्या ‘कॅलिफोर्निया’ या चित्रपटातील अर्ली ग्रेस (ब्रॅड पिट) या व्यक्तिरेखेचा तोच नेमका गाभा आहे. टिकून राहणं (सर्व्हायवल) ही केवळ माणसाचीच नव्हे, तर कुठल्याही सजीवाची आदिम प्रेरणा आहे आणि हिंसा या धडपडीचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळेच जगण्याच्या धडपडीप्रमाणेच हिंसा ही देखील आदिम प्रेरणा आहे. ‘२००१ : अ स्पेस ओडिसी’च्या या भागाचं नावच मुळी ‘द डॉन ऑफ मॅन’ (मनुष्याची पहाट) असं आहे. म्हणजेच मनुष्यजन्माच्या उत्क्रांतीच्या उगमाशीच हिंसेचं परिमाण जोडलं गेलेलं आहे. अर्ली ग्रेसमध्ये ती ठासून भरलीये. तो काहीही कामधंदा करत नाही. पैसे हवे असले की, तो सरळ हाणामारी करतो, एखाद्याला मरेस्तोवर मारतो. त्या माणसाचं मरणं हे नैमित्तिक असतं, अर्लीचा तसा काही उद्देश असतोच असं नाही. या कृत्याचा त्याला ना आनंद आहे ना पश्चात्ताप. जगण्यासाठी आवश्यक असलेल्या अविभाज्य कृत्यांपैकीच हे एक कृत्य आहे, एवढंच त्याच्या लेखी त्याचं महत्त्व आहे.
ब्रायन केसलर हा उदयोन्मुख लेखक. सिरियल किलर्सच्या मानसिकतेचा वेध घेण्याचा त्याचा प्रयत्न आहे. हे सिरियल किलर्स गुन्हेगार नसून ते आजारी आहेत. त्यामुळे त्यांना इलेक्ट्रिक चेअर ऐवजी हॉस्पिटल आणि काउन्सिलरची अधिक गरज आहे, असं त्याचं म्हणणं असतं. अमेरिकेतील गाजलेल्या खुनांच्या ठिकाणी जाऊन, त्या जागांचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन पुस्तक लिहिण्याचं तो ठरवतो. कॅरी या आपल्या फोटोग्राफर प्रेयसीलाही तो तयार करतो. तिला कॅलिफोर्नियात स्थायिक व्हायचंय. कॅलिफोर्नियापर्यंतचा प्रवास या खुनांच्या जागांच्या मार्गे करण्याची योजना तो आखतो. अखेरीस कॅलिफोर्नियाला जायला मिळणार म्हणून कॅरीही तयार होते. पण दोघांचीही आर्थिक परिस्थिती साधारणच असल्यामुळे प्रवासातला खर्च भागवण्यासाठी म्हणून ब्रायन आणखी एका जोडप्याला सोबत घेण्याचं ठरवतो. युनिव्हर्सिटीच्या नोटीस बोर्डावर तशी नोटिस लावतो. ती नोटीस वाचून त्यांच्या या प्रवासात सामील होतं अर्ली आणि अडेल हे जोडपं. इथून चित्रपटाला खऱ्या अर्थाने सुरुवात होते.
अर्ली हा गुन्हेगार आहे, खुनी आहे, हे या व्यक्तिरेखेचं आगमन होतं त्याचवेळी स्पष्ट होतं. सध्या तो पॅरोलवर बाहेर आहे. कॅरव्हॅनसारख्या एका गाडीतच तो राहतो. ती देखील भाड्याची आहे. त्याची प्रेयसी अडेल कमालीची भोळसट आहे. अर्ली जे जे सांगतो, त्या सगळ्यावर ती डोळे झाकून विश्वास ठेवते. तिच्या बोलण्याच्या पद्धतीवरून ती अद्यापही बालबुद्धीच्या सीमारेषेवरच घुटमळत असल्याचं स्पष्ट होतं. अर्लीचं खरं रूप तिला अर्थातच माहिती नाही. अर्ली हा सिरियल किलर असला, वरवर पाहता खुनी असला तरी त्याच्या व्यक्तिरेखेला अनेक पदर आहेत. आपल्या भोळसट, बालबुद्धीच्या प्रेयसीविषयी त्याला आत्मीयता आहे, तो तिला कमालीचा जपतो. बायकांनी दारू-सिगरेट प्यायलेलं त्याला आवडत नाही. बायकांच्या तोंडी शिवराळ भाषाही शोभत नाही, असं तो मानतो. ब्रायनशी त्याची चांगली दोस्ती होते. एका पबमध्ये ब्रायनला तो मार खाण्यापासून तर वाचवतोच, पण ब्रायनला जो नडत असतो, त्यालाही अर्धमेला करून सोडतो. ब्रायनला त्याच्याविषयी सुप्त आकर्षण वाटू लागतं. आपल्या सुरक्षित, मध्यमवर्गीय वातावरणापेक्षा हे काहीतरी वेगळंच पाणी आहे, हे त्याला कळतं.
कॅरीला मात्र हे सगळं घातक असल्याचं जाणवू लागतं. अर्ली तिला पहिल्या भेटीतच आवडलेला नाही. त्याचं रासवट, पारोसं दिसणं, त्याची नजर तिला अस्वस्थ करते. अडेलच्या बोलण्यातून अर्लीचं व्यक्तिमत्व तिला कळत जातं. अर्लीने बेकायदा पिस्तुल बाळगल्याबद्दल तुरुंगवास भोगलाय, अडेलला तो क्वचित प्रसंगी मारहाणही करतो, हे तिला अडेलकडूनच कळतं. ‘बट ओन्ली व्हेन आय डिझर्व्ह,’ अडेल तिला सांगते. या सगळ्याने कॅरी अस्वस्थ होते, ब्रायनला सावध करू बघते, पण ब्रायन फार मनावर घेत नाही. पण जेव्हा अर्लीचं खरं रूप ब्रायनसमोर येतं, तेव्हा खूप उशीर झालेला असतो.
आपल्या सुरक्षित वातावरणात सुखेनैव जगणाऱ्या मध्यमवर्गाला हिंसेचं सुप्त आकर्षण असतं. ब्रायन हा या वर्गाचा प्रतिनिधी आहे. पण प्रत्यक्ष हिंसाचाराला सामोरं जाण्याची वेळ येते, हिंसेला बळी पडण्याची लक्षणं दिसू लागतात आणि तो राहील किंवा मी राहीन, असा टोकाचा निर्णय घेण्याची वेळ येते, तेव्हा या मध्यमवर्गीय माणसाची प्रतिक्रिया काय असते? तू कशासाठी आजवरचे सगळे खून केलेस? आनंदासाठी, काहीतरी मिळवण्यासाठी? खून करताना तू खूप सामर्थ्यवान असल्याची तुझी भावना होते, त्या भावनेसाठी? की तुझं बालपण ठीक नव्हतं? तुझ्या वडलांनी तुला खूप त्रास दिला का? असे एक ना अनेक प्रश्न ब्रायन अर्लीला विचारतो. अर्ली काहीच उत्तर देत नाही.
एका प्रसंगात अचानक पोलिस समोर उभे ठाकतात. झटापटीत अर्ली पोलिसाच्या पायावर गोळी मारतो. ब्रायनच्या हाताला त्या पोलिसाची बंदूक लागते. तिचा वापर अर्लीवर करायचा, हा त्याचा विचार पूर्ण होण्याआधीच अर्ली त्याच्या डोक्यावर त्याच्याकडील बंदुकीची नळी टेकवतो आणि पोलिसाला मारायला सांगतो. स्वत:च्या जिवावर बेतलेलं असतानाही ब्रायन पोलिसाला मारू शकत नाही. ‘तुला मारेकऱ्यांविषयी लिहायचंय ना, खुनांविषयी लिहायचंय. हिंसेविषयी तुला काय माहिती आहे? आणि आलायस मोठा पुस्तक लिहायला,’ अर्ली त्याची खिल्ली उडवतो. हाच ब्रायन चित्रपटाच्या अखेरीस तो किंवा मी अशा अटीतटीच्या प्रसंगात मनात कुठलीही पश्चात्तापाची भावना येऊ न देता अर्लीच्या डोळ्यात डोळे घालून त्याच्यावर गोळी झाडतो, त्यावेळी अर्ली आणि ब्रायन यांच्यातला फरक संपलेला असतो.
दिग्दर्शक डॉमिनिक सेना याचा हा पहिलाच चित्रपट. सेनाने त्यानंतर ‘सोर्डफिश’, ‘गॉन इन सिक्स्टी सेकंड्स’ यांसारखे तद्दन व्यावसायिक हॉलिवुडी अॅक्शनपट केले, पण त्याला ‘कॅलिफोर्निया’ची उंची पुन्हा गाठता आली नाही. अर्थात ‘कॅलिफोर्निया’च्या कलात्मक यशात पटकथा लेखक टिम मेटकाफ आणि अर्ली रंगवणारा ब्रॅड पिट यांचा सिंहाचा वाटा होता. मेटकाफच्याच शब्दांत सांगायचं तर अमेरिकन समाजाला वास्तवात घडलेल्या गुन्ह्यांचं जे आकर्षण आहे, ते मांडण्यासाठी त्याला हा चित्रपट लिहायचा होता. चित्रपटाचं लिखाण सुरू असतानाच दिग्दर्शक सेना आणि मेटकाफमध्ये मतभेद होऊ लागले आणि पटकथेचे दोन ड्राफ्ट लिहिल्यानंतर मेटकाफला नारळ देण्यात आला. त्यानंतर स्वतः सेना आणि त्याच्या दोन निर्मात्यांनी मिळून चित्रपटाचं पुनर्लेखन केलं. मेटकाफच्या म्हणण्याप्रमाणे त्याला ब्लॅक कॉमेडी करायची होती, पण सेनाने हिंसेच्या पैलूवर अधिक भर दिला. रायटर्स गिल्डच्या नियमांप्रमाणे सेना आणि त्याच्या दोघा निर्मात्यांनी पुनर्लेखन करताना नव्याने फारशी भर घातली नव्हती, त्यामुळे लेखक म्हणून अंतिमतः मेटकाफचंच नाव लागलं. पण स्वतः मेटकाफ ‘कॅलिफोर्निया’च्या अंतिम परिणामाबद्दल फारसा खुष नव्हता. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काहीच दिवसांनी लॉस एंजेलिस टाइम्समध्ये लिहिलेल्या लेखात त्याने चित्रपटाचं कौतुक केलं, पण हा तो चित्रपट नव्हे, जो मला लिहायचा होता, असंही सांगून टाकलं.
ब्रॅड पिटच्या कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळातला हा चित्रपट. स्वतःला सिद्ध करण्यासाठी अद्याप तो धडपडत होता. १९८७ सालापासून त्याचं स्ट्रगल सुरू होतं. १९९१ साली प्रदर्शित झालेल्या रिडली स्कॉट दिग्दर्शित ‘थेल्मा अँड लुईज’मधल्या सहायक अभिनेत्याच्या भूमिकेत तो पहिल्यांदा नजरेत भरला. पुढल्याच वर्षी, १९९२ मध्ये रॉबर्ट रेडफोर्डने दिग्दर्शित केलेल्या ‘अ रिव्हर रन्स थ्रू इट’ या चित्रपटातील त्याच्या भूमिकेचंही कौतुक झालं. पण या दोन्ही चित्रपटांचे दिग्दर्शक नामवंत होते, प्रतिभावान होते. त्यामुळे नाही म्हटलं तरी ब्रॅड पिट दबावाखाली होता. १९९३च्या ‘कॅलिफोर्निया’च्या वेळी मात्र असा कुठलाही दबाव त्याच्यावर नव्हता. एक तर बरीचशी कलाकार मंडळी त्याच्यासारखीच धडपडी होती आणि दिग्दर्शकाचाही पहिलाच चित्रपट होता. ब्रॅड पिटने या संधीचा भरपूर फायदा घेतला आणि अर्ली ग्रेसला नखशिखांत आपलासा केला. त्याचं बेफिकिरीने जगणं, रोखून बघणं, तुटक बोलणं, रासवट, पारोसं बाह्यरूप, घशातून विचित्र आवाज काढून ढेकर देणं, खून करताना त्याच्यातला जागा होणारा पशू, खून केल्यानंतर त्याविषयी चेहऱ्यावर बारिकसा देखील पश्चात्ताप नसणं या सर्व गोष्टी ब्रॅड पटने झोकात रंगवल्या. कुठल्याच क्षणी ब्रॅड पिटचा अर्ली ग्रेस अमानवी, अविश्वसनीय होत नाही. तो कायम माणूसपणाच्याच पातळीवर राहातो.
त्याच्या प्रेयसीची भूमिका ज्युलिएट लुईसने अफलातून साकारली होती. बालबुद्धीतून आलेला लाडिक भोळसटपणा तिने अफलातून दाखवला होता. मंदबुद्धीपणाच्या सीमारेषेवर घुटमळणारी ही व्यक्तिरेखा ज्युलिएटच्या संतुलित अभिनयामुळे ही सीमारेषा कधीच ओलांडत नाही. मेटकाफच्या म्हणण्याप्रमाणे ज्युलिएटने पडद्यावर जे काही केलंय, त्यापैकी जेमतेम ३० टक्के लिखाणातून आलं होतं, उरलेलं ७० टक्के श्रेय ज्युलिएटचं होतं.
अर्ली आणि ब्रायन यांच्यातलं नातं हा या चित्रपटातला सर्वात महत्त्वाचा भाग. दोघेही भिन्न वर्गातले, वातावरणातले. केवळ अपघाताने एकमेकांसोबत आलेले. ब्रायन हा अतिशय सोफेस्टिकेटेड, उच्चशिक्षित, मध्यमवर्गीय तरुण. पण अर्लीची गुन्हेगारी पार्श्वभूमी समजल्यानंतरही तो त्याच्यापासून फारकत घेत नाही, उलट त्याला अर्लीविषयी आकर्षण वाटू लागतं. त्यापायी तो आपल्या प्रेयसीची, कॅरीची नाराजीही पत्करतो. ब्रायनचं हे वागणं पाहताना जगातल्या थोडक्या प्रामाणिक लोकांपैकी ९९ टक्के लोक केवळ भ्रष्टाचाराची संधी न मिळाल्यामुळे प्रामाणिक राहतात, या विधानाची आठवण होत राहते.
केवळ हिंसा दाखवणं एवढाच ‘कॅलिफोर्निया’चा हेतू नाही. संस्कृतीची पुटंच्या पुटं चढल्यामुळे आपल्या मूळ प्रेरणांपासून दुरावलेला आजचा सोफेस्टिकेटेड मनुष्य आणि आजही या आदिम प्रेरणेला चिकटून असलेल्या त्या आदिमानवाचा प्रतिनिधी यांच्यातला हा सामना आहे. थ्रिलर, सस्पेन्स, अॅक्शन, रोड मूव्ही अशा विविध ज्यॉनरमध्ये हा चित्रपट फिरतो, पण त्याचा गाभा हा फारच उच्च दर्जाचा, मानवी वर्तणुकीच्या गुंत्याचा आहे. वर्ष सरताहेत तशी हा गडबडगुंता अधिकच वाढत चाललाय आणि म्हणूनच आज तब्बल २३ वर्षांनंतरही हा चित्रपट तितकाच भावणारा आहे.
लेखक मुक्त पत्रकार आहेत.
chintamani.bhide@gmail.com
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment