करोना व्हायरसच्या काळातील सात पापीलोक आणि त्यांची सात पापकर्मे
संकीर्ण - व्यंगनामा
टीम अक्षरनामा
  • प्रातिनिधिक चित्र
  • Wed , 01 April 2020
  • संकीर्ण व्यंगनामा करोना विषाणू Corona virus कोविड-१९ Covid-19 करोना Corona करोना व्हायरस Coronavirus

१) ज्यांना करोनाविषयी धड माहिती नव्हती किंवा ज्यांनी करोनाविषयीची माहिती धड समजून घेतली नाही, आणि तरीही विशेष म्हणजे त्यांच्यापैकी कुणीही इतरांना ‘करोना प्रवचन’ दिलं नाही किंवा ‘करोना माहात्म्य’ सांगितलं नाही, अशी माणसं ही खरी पापी जमात आहे. त्यांच्या या दुर्गुणांमुळेच ‘करोना’ने सगळ्यांची अवस्था ‘डरो ना…’ अशी करून टाकलीय. त्येंका रवळनाथ सोडणार नाय, घट्ट धरून ठेवणार हाय!

२) ज्यांनी व्हॉटसअ‍ॅपवर बदाबदा येऊन पडणारा कचरा, करोना व्हायरसच्या काळात, त्यातही लॉकडाऊनच्या काळात नेहमीप्रमाणे इतरांच्या अंगणात ढकलून (‘फॉरवर्ड’) दिला नाही; सोप्या किंवा प्रचलित भाषेत सांगायचं तर ज्यांनी करोनाविषयीच्या फेक न्यूज नेहमीच्याच सवयीनं, आंधळेपणानं, गंमत म्हणून आपल्या मित्र-मैत्रिणींच्या, नातेवाईकांच्या, सोसायटीच्या, ऑफिसच्या व्हॉटसअ‍ॅप ग्रूपवर पाठवल्या नाहीत, असे लोक खरोखरच धन्य आहेत! लॉकडाऊन संपताच त्यांचा शाल, श्रीफळ देऊन जाहीर सत्कार केला जाणार आहे. असं कुठं असतं का राव? कुठं फेडाल ही पापं तुम्ही?

३) ज्या प्रतिभावान कवींनी शक्य असून, पुन्हा पुन्हा सुचून, कोऱ्या कागदांनी हाका घालून, करोनाशी संबंधित सगळ्या शब्दांनी हात जोडून विनंती करून, प्रतिभेच्या हाकांकडे दुर्लक्ष करून, रोजच्या रोज टीव्हीवरील दृश्यं पाहून, वर्तमानपत्रांतील बातम्या वाचून, व्हॉटसअ‍ॅप ग्रूपवरील खोट्यानाट्या ‘करोना ष्टोऱ्या’ वाचून, सकाळ-दुपार-संध्याकाळ-रात्रभर करोनासोबत राहून आणि मरणाच्या केवळ कल्पनेनंच कापरं भरूनही, आतापर्यंत करोनाविषयी एकही कविता लिहिली नाही, ते खरे कपाळकरंटे लोक म्हटले पाहिजेत. या कवीलोकांना एकत्र जमवून रायगडावर नेलं जाणार आहे. आणि तेथील टकमक टोकावरून त्यांचा कडेलोट केला जाणार आहे. अशा दळभद्री लोकांच्या कर्मदरिद्रीपणामुळेच आजवर मराठी साहित्याचं अतोनात, अपरिमित नुकसान झालेलं आहे! यांसारख्या लोकांच्या आळशीपणामुळेच आजवर मराठी साहित्य नोबेल पुरस्काराच्या तोडीचं होऊ शकलेलं नाही.

४) जे स्वत: बाहेर बोंबलत फिरले नाहीत, ज्यांनी मित्राला बाईकवर मागे बसवून पोलिसांचे रट्टे त्यालाच पडण्याची सोय केली नाही, जुगाड करून सिगारेटची पाकिटं व दारूच्या बाटल्या मिळवल्या नाहीत आणि आपलं नेहमीचं वेळापत्रक काटेकोरपणे, विनासायास पार पाडलं नाही, अशा अभागी, दुर्दैवी लोकांना लॉकडाऊन संपताच समाजातून बहिष्कृत केलं जाणार आहे, नाहीतर वाळीत टाकलं जाणार आहे. यांच्या अशा या पापकर्मांमुळेच तुमच्या-आमच्या जगण्यातली सगळी ‘एक्साईटमेंट’ निघून गेलेली आहे!

५) ज्यांनी ‘जनता कर्फ्यु’च्या दिवशी संध्याकाळी पाच वाजता बेंबीच्या देठापासून आरोळ्या ठोकल्या नाहीत, जिवाच्या आकांताने थाळ्या बडवल्या नाहीत, जोर देऊन देऊन टाळ्या वाजवल्या नाहीत, अध्यक्ष महोदय त्यांचं लॉकडाऊन पुढचे सहा महिने चालूच ठेवलं जाणार आहे. त्यांना अशीच अद्दल घडवण्याची गरज आहे.

६) ज्यांनी लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून स्वत:ला कुटुंबासह अक्षरक्ष: आणि शब्दश: घरात कोंडून घेतलं नाही, नजरकैदेत असल्यासारखं स्वत:ला आणि स्वत:च्याच कुटुंबाला वागवलं नाही, ‘मी आणि माझं कुटुंब जगलं पाहिजे, बाकीचे मरोत नाहीतर जगोत’ असं मानलं नाही, स्वत: योग्य ती काळजी घेत इतरांनाही त्यासाठी उद्युक्त केलं, अशा ‘देशद्रोही’ लोकांची रवानगी थेट पाकिस्तानात केली जाणार आहे. विमानसेवा पूर्ववत सुरू होताच त्यांच्या तिकिटांची सोय केली जाणार आहे.

७) जे लॉकडाऊनमुळे मिळालेल्या सुट्टीचा वापर नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन प्राईमवर वेगवेगळे तथाकथित दर्जेदार सिनेमे वा बेवसीरिज पाहण्यासाठी, आजवर या ना त्या कारणांनी वाचायची राहून गेलेली पण वाचलीच पाहिजेत अशी पुस्तकं वाचण्यासाठी न करता, घरातली जाळी-जळमटं काढण्यासाठी, कपाटांची-भिंतींची सापसफाई करण्यासाठी, बायकोला स्वयंपाकात मदत करण्यासाठी, मुलांसोबत खेळण्यासाठी करतात, त्यांना लॉकडाऊन संपताच भरचौकात उभं करून चाबकाचे १०० फटके लगावले जाणार आहेत.

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......