अजूनकाही
बंधू आणि भगिनींनो!
ही आलिशान इमारत
आता तयार झाली आहे
तुम्ही आता इथून जाऊ शकता.
सगळी ताकद पणाला लावून
तुम्ही खडी फोडलीत, खोल पाया घातलात,
मातीखाली गाडलेही गेले
तुमचे कैक साथीदार.
पण तुम्ही थकला नाहीत,
फत्तर आणि निश्चय,
संकल्प आणि पोलाद,
वाळू, कल्पना आणि सिमेंट,
यांनी एकेक वीट सांधून
तुम्ही चिरेबंद बुलंदीच्या भिंती उभ्या केल्यात.
छप्पर असं सांधलंत की, हात बाहेर काढले,
तर आभाळाला टेकतील
आणि खिडक्या-
त्या तर क्षितिजाचा ठाव घेणाऱ्या डोळ्यांसारख्या,
दरवाजे – जंगी स्वागत करणारे!
आपले गुडघे, बाहू आणि
पापण्यांच्या जोरावर तुम्ही
शेकडो वर्षं टिकून राहील अशी
जिवंत इमारत उभी केलीत.
त्यानंतर तुम्ही हिरवंगार लॉन,
फुलांचा बाग,
झरा आणि तलावही तयार केले.
आणि पावलापावलावर
रंगीबेरंगी रोषणाई अंथरलीत.
उन्हाळ्यात थंडावा आणि थंडीत
गुलगुलीत उबेची तजवीज केलीत.
संगीत आणि नृत्याचं साजसामान
जिथल्या तिथं ठेवलंत.
पेले, ग्लास आणि बाटल्या
सजवल्यात.
थोडक्यात
सुखसुविधा आणि स्वातंत्र्याचा एक सुरक्षित प्रदेश
एक झगमगता स्वर्ग तुम्ही निर्माण केलात.
या कष्टासाठी आणि या निष्ठेसाठी
तुमचे खूप खूप आभार,
तुम्ही आता इथून जाऊन शकता.
हे विचारू नका की, ‘कुठे जावं?’
हवं तिथं जा
तूर्तास, काळोख्या
कोपऱ्यातल्या जमिनीच्या तुकड्यावर
ज्या झोपड्या तुम्ही घातल्यात
त्याही खाली करा.
मग हवं तिथं जा
तुम्ही स्वतंत्र आहात
आमची जबाबदारी संपली
आता एक मिनिटसुद्धा
तुम्ही इथं थांबणं योग्य नाही,
सन्माननीय महोदय
येणार आहेत परदेशी पाहुण्यांसह
अवतरणार आहेत अप्सरा,
आणि अधिकारी
पाश्चिमात्य सुरावटींवर सुरू होणार आहे
उन्मादक नृत्य.
पेले उसळणार आहेत
इथे तुमची आता काय गरज?
आणि तुम्हाला इथं बघून त्यांना काय वाटेल?
कळकट कपडे आणि धुळकट शरीर
बोलाचालीचीही रीत नाही.
अशाने, त्यांच्या अभिरुचीला आणि अपेक्षेला
किती धक्का पोहोचेल
आणि आमच्यावर किती लांच्छन लागेल!
मान्य आहे, इमारतीला
ही दिमाखदार उंची लाभावी म्हणून
तुम्ही हाडाची काडं केलीत
रक्त आटवलंत, घाम गाळलात
पण याच्या बदल्यात
मजुरी दिली गेलीय
तोंड गोड केलं गेलंय
आभारही मानले गेलेत
तुम्हाला आता आणखी काय हवंय?
तुम्ही इथून चालू पडत नाही आहात
तुमच्या चेहऱ्यावरचे भावही बदलताहेत.
कदाचित स्वत:च्या या भव्य आणि सुंदर रचनेचा,
तुम्हाला मोह पडलाय
सोडून जाताना दु:ख होतंय.
असं होऊ शकतं!
पण याचा अर्थ असा नाही
की तुम्ही तुमच्या हातांनी जे काही उभं कराल,
ते सगळं तुमच्या मालकीचं होईल.
या न्यायानं तर हे सगळं जगच तुमच्या मालकीचं झालं असतं,
मग आम्ही मालकलोक कुठे गेलो असतो!
लक्षात असू द्या,
मालक, मालक असतो
मजूर, मजूर!
तुम्ही काम करायचं
आम्ही उपभोग घ्यायचा
तुम्ही स्वर्ग बनवायचा
आम्ही त्यात विहार करायचा.
जर तुम्हाला असं वाटत असेल
की, आपल्याला आपल्या कामाचा
संपूर्ण मोबदला मिळायला हवा,
तर शक्य आहे की,
तुमची मागच्या जन्मातली कर्मं
तुम्हाला अभावाच्या नरकात ढकलताहेत.
विश्वास ठेवा
धर्म पालनाशिवाय पर्याय नाही,
तुम्ही आता इथून जाऊ शकता.
तुम्हाला इथून जायचं नाहीये?
इथेच राहायचंय?
याच आलिशान इमारतीत?
याच गालिच्यांवर पाऊल ठेवायचंय?
अरे! हा तर लालचीपणाचा कळस आहे,
सरळसरळ अन्याय आहे.
कायदा आणि सुव्यवस्थेवर थेट हल्ला आहे.
दुसऱ्यांच्या मालकी हक्कावर कबजा करण्याचा
आणि जग उलटं करण्याचा
सगळ्यात मूलगामी अपराध आहे.
आम्ही असं मुळीच होऊ देणार नाही
लक्षात घ्या, हा सलोख्याचा प्रश्न नाही.
माणुसकीचाही नाही,
हा तर संघर्षाचा
जीवन-मरणाचा प्रश्न आहे.
खरं तर आम्हाला खूनखराबा नकोय
आम्ही शांतताप्रिय, सुखसुविधा प्रिय आहोत.
पण तुम्ही भाग पाडलंत
तर आम्हाला कायद्याचा आधार घ्यावा लागेल
पोलीस, आणि गरज पडली, तर
सैन्यालाही पाचारण करावं लागेल
आम्ही चिरडून टाकू,
आपल्या हातांनी घडवलेल्या,
या स्वर्गात राहण्याची
तुमची इच्छादेखील आम्ही चिरडून टाकू,
नाहीतर चालते व्हा,
निखळते सांधे, भकास डोळे,
वादळं, अंधार आणि उमाळे-उसासे,
मृत्यु, गुलामी आणि अभाव यांच्या
बिनभिंती-दारांच्या दुनियेत
गपगुमान चालते व्हा!
मूळ हिंदीतून अनुवाद – भाग्यश्री भागवत
.............................................................................................................................................
लॉकडाऊनमुळे मोठमोठ्या शहरांतून आपल्या घरी निघालेल्या स्थलांतरित मजुरांना ‘स्वर्ग से विदाई’ (स्वर्गातून पाठवणी) ही गोरख पांडेय यांची कविता लागू पडत असली, तरी ती २०१५ साली लिहिली गेलेली आहे. तेव्हा ना करोना व्हायरस होता, ना लॉकडाऊन. पण तेव्हाही स्थलांतरित मजूर होते, त्यांनी निर्माण केलेल्या स्वर्गासारख्या दिमाखदार इमारती होत्या; मालकलोक होते, त्यांची मौजमजा होती. तेव्हाही मालक, मालकच होते आणि मजूर, मजूरच. आजही ते तसेच आहेत आणि उद्याही कदाचित, तसेच असतील.
.............................................................................................................................................
मूळ हिंदी कविता वाचण्यासाठी क्लिक करा -
https://www.haribhoomi.com/gorakh%20pandey%20poem
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment