करोना व्हायरसची साथ आटोक्यात कशी येईल?
पडघम - राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
प्रकाश बुरटे
  • प्रातिनिधिक चित्र
  • Tue , 31 March 2020
  • पडघम राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय करोना विषाणू Corona virus कोविड-१९ Covid-19 करोना Corona करोना व्हायरस Coronavirus

कझागिस्तानचे अति पूर्वेचे टोक मंगोलियाच्या पश्चिम टोकाला चिकटलं आहे. या दोन्ही राष्ट्रांच्या दक्षिण सीमांच्या दक्षिणेस आणि हिमालयाच्या उत्तरेस चीनचा विस्तार आहे. प्रशांत महासागर चीनची पूर्व सीमा निश्चित करतो. चीनच्या या विस्तीर्ण भूप्रदेशातील दक्षिण वूहान (Wuhan) हे हुबेई (Hubei province) परगण्यातील प्रमुख शहर आहे. त्या शहरात करोना व्हायरस-१९ या आजाराची प्रथम लागण २०१९च्या डिसेंबर महिन्याच्या शेवटात झाली असे मानले जाते. परंतु ‘साउथ चायना मॉर्निंग पोस्ट’ या इंग्रजी नियतकालिकाच्या १३ मार्च २०२०च्या अंकातील बातमीप्रमाणे १७ नोव्हेंबर रोजी हुबेई परगण्यातील ५५ वर्षांची इस्पितळात दाखल झालेली व्यक्ती करोना व्हायरस-१९ची रुग्ण असावी असे दिसते. परंतु ही व्यक्ती मानवेतर प्राण्याच्या संसर्गामुळे बाधित झाली होती काय, याची खात्री पटलेली नाही. अशा व्यक्तीनंतर मात्र या आजाराचा प्रसार माणसाच्या संसर्गामुळेच झाला आहे, असे मानण्यास जागा आहे.

जोडीला हा माणसाला झालेला पहिला संसर्ग कोणत्या प्राण्यामुळे झाला, हे निश्चित कळणे सोपे होते. त्यामुळे हा शोध महत्त्वाचा मानला जातो. अशा व्यक्तीचा शोध अजूनही चालू असल्याचे या नियतकालिकाच्या बातमीदार जोसेफिन मा सांगतात. चीनी (वैद्यकीय?) अधिकाऱ्यांना आजपर्यंत २०१९ या वर्षात या आजाराने बाधित झालेले २६६ रुग्ण आढळले आहेत. (https://www.scmp.com/n).

हा आजार माणसात प्रथमच दिसत असल्याने या रुग्णांच्या आजाराची खात्री देता येणे किती अवघड झाले असेल ते समजण्यासारखे आहे. (ते काहीही असो) या आजाराची नेमकी माहिती संपूर्ण चीनमध्ये किंवा इतर देशांतही लगेच पसरली नाही, हे बाकी खरे. परिणामी या आजाराची जगभरातील लागण होण्याचा तपशील जमा होण्यास आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू करण्यास महिन्याभराचा विलंब झाला. या आजाराचे रुग्ण चीनमध्ये आणि इतर देशांतही वाढतच राहिले.

हा आलेख करोना  व्हायरस-१९ या आजाराची २२ जानेवारी २०२० ते २० मार्च २०२० या काळातील जगातील वाढती रुग्णसंख्या शून्य ते आठ लाख या दरम्यान दाखवतो.

सोबत दोन आलेख दिले आहेत. त्यांच्या आडव्या ‘क्ष’ अक्षावर २२ जानेवारी २०२० पासून ते २९ मार्चपर्यंतचा काळ नोंदवलेला आहे. आलेख १ अ) या आलेखाच्या उभ्या ‘य’ अक्षावर करोना व्हायरास-१९ या आजाराची लागण झालेल्या जगातील एकूण रुग्णांची संख्या दिसते. जगातील वाढती रुग्णसंख्या शून्य ते आठ लाख या दरम्यान आहे.

दुसरा आलेख १ ब) या आलेखाच्या उभ्या ‘य’ अक्षावर या आजाराची लागण झाल्याने दगावलेल्या रुग्णांची संख्या दिसते. जगातील वाढत्या रुग्णसंख्येतील मृत रुग्णांची संख्या शून्य ते चाळीस हजार या दरम्यान आहे.

हा आलेख करोना व्हायरस-१९ या आजाराची २२ जानेवारी २०२० ते २९ मार्च २०२० या काळातील जगातील वाढती मृत्यूसंख्या शून्य ते ४० हजार या दरम्यान दाखवतो.

या दोन्ही आलेखांचे समान संदर्भ आहेत :

Coronavirus Update (Live) : 308,463 Cases and 13,069 Deaths from COVID-19 Virus Outbreak – Worldometer, COVID-19 Coronavirus Pandemic, This updated: March 29, 2020, 16:14 GMT (21:44 Indian time) https://www.worldometers.info/coronavirus/.

या आलेखांचे वैशिष्ट्य म्हणजे २२ जानेवारी ते फेब्रुवारीच्या शेवटापर्यंत बाधित रुग्णसंख्या आणि मृत रुग्णसंख्या यांच्या वाढीचा वेग फार जास्त नाही. परंतु ६ मार्चनंतर मात्र हे दोन्ही वेग अत्यंत चढे आहेत. त्याचे कारण प्रत्येक बाधित रुग्ण सर्वसाधारणपणे दोन ते तीन व्यक्तींना संसर्ग करताना आढळला आहे. संसर्ग करू शकणाऱ्या व्यक्तींची संख्या जशी वाढेल, तशी संसर्ग होणाऱ्या व्यक्तींची संख्या वाढण्याचा वेगच वाढत गेल्यासारखा आलेख बदलतो. जणू काही एखाद्या वाहनाचा अॅक्सिरेटर दाबून धरला आहे. याला ‘रामायणा’तील एक उपमादेखील चपखल बसते. रावणाच्या बाजूने रामाशी अहिरावण आणि महिरावण लढत असतात. त्यांच्या रक्ताचा थेंब जरी पृथ्वीवर ठिबकला तरी त्यातून पुन्हा अहिरावण-महिरावण तयार होतील, असा वर अहिरावण-महिरावण यांना मिळालेला असतो. त्यामुळे त्यांनी रामाच्या नाकी नऊ आणले होते. म्हणूनच रुग्णसंख्येशी नाते असणाऱ्या या संसर्ग वेगाची भीती जगभर पसरली आहे.

भविष्यात हा वेग आणखीन जास्त चढा होईल, का काही जादू होऊन कमी होईल? केव्हा आणि काय केल्याने लागण वेग आणि मृत्यू वेग कमी होईल? येत्या काही महिन्यांत आणखी किती जणांना बाधा होईल आणि त्यात किती बळी पडतील, याचे अंदाज करणे सध्या कठीण होऊन बसले आहे. या आजाराला अटकाव करायचा तर माणसा-माणसांतील संपर्क टाळून संसर्ग येणार नाही, हे पाहिले पाहिजे. वाक्य म्हणून हे समजायला सोपे आहे. परंतु हे जमवायला महाकठीण!

याचे साधे कारण म्हणजे ही माणसे आहेत. ती घरं करून कुटुंबाकुटुंबाने एकमेकांची काळजी घेत परस्परांवर प्रेम करत जगतात. कुटुंबातील लहान मुले, वयस्क माणसे यांना सहसा कुणी वाऱ्यावर सोडत नाही. आजारपणात ती एकमेकांची सेवासुश्रुषा करतात. आपल्या ताटातील एक घास प्रसंगी दुसऱ्याला देतात. अशा या घरांनी एखादी वस्ती, पाडा, खेडे, गाव, शहर, महानगर, देश आपला मानलेला असतो. त्यांना आपली वस्ती ते देश याबद्दल आपुलकी असते. इथेच त्यांनी रोजी-रोटीची सोय पाहिलेली असते. त्यांनी साहित्य, कला यांना साद घातलेली असते. जग जास्त मानवी करण्यासाठी ज्यांनी पूर्वी खस्ता खाल्ल्या त्यांच्याप्रती मनात खूप जिव्हाळा असतो. कधी माणसे भांडतात, स्वार्थापायी लढतात, सावकारी करून एकमेकांना लुबाडतात ते थेट अणुबॉम्ब टाकून एखाद्या महानगराची राखरांगोळी करायलादेखील मागे-पुढे पाहत नाहीत. एखादे संकट त्यांना एकत्र आणते. सहचार्याने कामे करायला लावते. २१व्या शतकात तर अगदी भारतासारख्या देशांतील किती तरी तरुण मुलं-मुली दूरदेशी राहतात. थोडक्यात काय तर माणसांचा जागतिक समूह एखाद्या वृक्षासारखा आहे. त्याची मुळं खोलवर दशदिशांनी रुजलेली आहेत आणि पर्णसंभार आकाश व्यापतो आहे. असा माणूस फक्त श्वास, अन्न-पाणी, पुनुरुत्पादन एवढ्याच जाणिवांनिशी जगत नाही. त्याला उन्नत भाव-भावना आहेत. अशा या जागतिक मानवी समूहात करोना व्हायरसचा प्रसार चालू झाला आहे.

त्याला अटकाव करण्याचे दोन मार्ग प्रथम थोडक्यात पाहूया. अर्थातच या दोन्ही मार्गांत काही अडचणी आहेत. त्यातील सर्वांत महत्त्वाची अडचण म्हणजे कोणत्याही रोगाची लक्षणे अनेकदा गोंधळात टाकतात. हा नव्या करोनाचा आजार आणि नेहमीचा साधा फ्ल्यू, सर्दी, ताप यांच्या लक्षणांत खूप साम्ये आहेत. दुसरी महत्त्वाची अडचण आहे, ती व्यक्तीला संसर्ग झाल्यानंतर काही काळाने आजाराची लक्षणे दिसू लागतात. मधल्या काळात असे रुग्ण चाचणी केली तरी तज्ज्ञांच्याही लक्षात येत नाहीत. हे छुपे रुग्ण इतरांना संसर्ग करू शकतात. किमान या दोन महत्त्वाच्या अडचणी लक्षात घेऊन पुढील दोन मार्गांपैकी कोणता मार्ग वापरणे सोपे, कमी खर्चिक, कमी मनुष्यबळ लागणारे आहे, हे पाहूया. अर्थात शंभर टक्के यशाची खात्री देणारा मार्ग फक्त कल्पनेच असू शकतो, हेही लक्षात ठेवलेच पाहिजे.

मार्ग एक

जगातील सर्व देशांतील सर्व लोकांच्या (बापरे! म्हणजे सुमारे ८०० कोटी लोक) या आजारासाठी चाचण्या करणे. ते जमले तर आणि तरच त्यातील बाधित लोक समजतील. एवढ्या चाचण्या करणे अशक्य गोष्ट आहे. त्यामुळे या आजाराची लक्षणे दिसणाऱ्या व्यक्तींच्याच तेवढ्या चाचण्या करणे, हे त्यातल्या त्यात सोपे आहे. लक्षणांची यादी जाहीर करून ती असणाऱ्या व्यक्तींच्या चाचण्या करण्याची सोय जमेल तेवढी सर्वत्र उपलब्ध करणे. हे काम खर्चिक असणार आहेच. यासाठी नागरिकांचे सहकार्य मागावे लागेल. हा आजार झालेल्या व्यक्तीचा इतरांना संसर्ग होणार नाही अशा ठिकाणी त्यांची सर्वोतोपरी काळजी घेण्याची व्यवस्था करावी लागेल.

संसर्गानंतर काही काळाने लक्षणे समजत असल्याने हे काम एकदा करून भागणार नाही. ते मध्ये विसावा घेत दोन-तीन वेळा तरी करावे लागेल. परंतु हे काम करण्यास प्रत्येक देशाचे शासन बांधील असले पाहिजे. परंतु अमेरिकेसारखा देशदेखील हलगर्जीपणे काम करू शकतो. याचे उदाहरण १ मार्चच्या ‘लॉस एंजेलिस टाईम्स’ने दिले आहे. मार्च महिन्याचा पहिला दिवस. देशातील ३३ कोटी नागरिकांपैकी ८० नागरिक या आजाराने अधिकृतपणे बाधित आहेत. त्यांना बाकी समाजापासून अलग ठेवलेही आहे. परंतु बाधित व्यक्तींची संख्या एक ते दहा हजार या दरम्यान आहे\असावी, असा काही संशोधकांचा अंदाज आहे. यातील प्रत्येक रुग्णाकडून २ ते २.५ व्यक्तींना संसर्ग पोहोचला तर हा आजार महिना अखेरीस खूप भयानक होऊ शकतो, असे वर्तवले होते. आज ते सत्य म्हणून सामोरे आले आहे.

अमेरिकेचा जगात या आजाराच्या लागणीबाबत पहिला नंबर आहे. कदाचित अमेरिकेला जगात बिलिनिअर्स किती, कोणत्या देशाकडे किती अण्वस्त्रे आहेत, याचे अंदाज व्यवस्थित करता येत असतील, परंतु देशातील बाधित रुग्णांचा अंदाज सपशेल चुकू शकतो.

चीन आज फक्त हुकूमशाहीपुरता समाजवादी उरला आहे, बाकी त्याला भांडवलशाही देशच म्हटले पाहिजे.

अशा चीनने २३ जानेवारी रोजी वूहान शहरात लॉकडाऊन घोषित केला. त्यापूर्वी या शहरातील या आजाराच्या बाधित इसमांपैकी ८६ टक्के लोकांना अगदी थोडा त्रास त्रास होता, त्यांची चाचणी झालीच नाही. म्हणजे दर सहा रुग्णांतील फक्त एकच रुग्ण अधिकृत रुग्ण ठरला. परंतु लॉकडाऊननंतर मोठ्या प्रमाणावर वूहानमधील ६५ टक्के बाधित रुग्ण शोधता आले आणि या आजारावर चीनने नियंत्रण मिळवले (संदर्भ : “COVID-19 spread is fueled by 'stealth transmission'; by Rachael Rettner; https://www.livescience.com

मार्ग दोन

कोणत्याही देशातील माणसे सध्या शहरे, गावे आणि वस्त्या यांमध्ये राहतात. त्यातील काही जण या आजाराने बाधित आहेत. आजार पसरू नये म्हणून कायद्याने शहरे, गावे आणि वस्त्या लॉकडाऊन करणे हा दुसरा मार्ग आहे. त्यासाठी अनेकदा पोलीस अथवा सैन्य यांच्या मदतीने माणसे घरांबाहेर पडणार नाहीत, याची हमी तयार करत लॉकडाऊन यशस्वी केला जातो. टेबलाचे सर्व ड्रॉवर कुलुपबंद केले तरी, आतील निर्जीव कागदपत्रे काही काळाने शांतपणे खराब होतात. येथे तर एकमेकांना जीव लावलेली माणसे आहेत, ती कागदाचे चिटोरे नाहीत. ‘घर सोडू नका’, असे सांगताना ती स्वतःच्या घरात अन्न, पाणी, प्रेम, आस्था यांपासून वंचित राहणार नाहीत, याची बेगमी कुणाला तरी करावी लागेल. हे काम खर्चिक तसेच मोठ्या कौशल्याची मागणी करणारे आहे.

आजार वा व्हायरस नवा असल्याने झालेल्या विलंबाची मानवी किंमत चीन, इटली, अमेरिका, स्पेन, जर्मनी आणि इराण या सहा देशांनी मिळून मोठ्या प्रमाणात मोजली आहे. या सहा देशांत मिळून जगातील एकूण रुग्णांच्या ६९.३८ टक्के रुग्ण आहेत आणि जगातील या आजाराने झालेल्या एकूण मृत्यूंपैकी ७८ टक्के मृत्यू घडले आहेत.

या आजाराचा जगभरात आणि भारतात फैलाव कसकसा झाला हे समजण्यासाठी सोबत एक तक्ता दिला आहे.

(२२ डिसेंबर २०१९ ते २९ मार्च २०२० या दरम्यान करोना-व्हायरस आजार जगात आणि भारतात कसा फैलावला याची तुलनात्मक सांख्यिकी माहिती.)

संदर्भ : Coronavirus Update (Live) : COVID-19 Virus Outbreak – Worldometer, COVID-19 Coronavirus Pandemic, March 29, 2020, 16:14 GMT, https://www.worldometers.info/coronavirus/

या रोगाने बाधित लोकांचे भारतातील प्रमाणदेखील खूप कमी आहे. याची दोन कारणे संभवतात. १) वरील सहापैकी इराण सोडून बाकी चार देशांचा चीनशी भारतापेक्षा जास्त संपर्क आहे. २) त्या मानाने भारताचा त्यातल्या त्यात अमेरिकेशीच काय तो संपर्क जास्त आहे. वरील सहा देशांच्या तुलनेत भारताचा या आजारापासून जास्त बचाव होण्यास भारत-चीन राजकीय संबंध फार काही चांगले नसणे हा घटकदेखील आहे. तरीही अनेक प्रकारचे चिनी बनावटीचे साहित्य खरेदी करण्यासाठी बरेच भारतीय व्यापारी आणि विविध प्रकारचे कन्सल्टंटस चीनच्या वाऱ्या करू लागले आहेत.

या तक्त्यातील लक्षात घेण्याजोगी पहिली बाब आहे- दर दहा लाख लोकसंख्येतील या आजाराचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या (क्रमांक २). जगात दर दशलक्ष लोकसंख्येत बाधित रुग्णांची संख्या आहे ८८.९५, या तुलनेत भारतातील हे प्रमाण आहे ०.७४. संसर्ग झाल्यानंतर बऱ्या झालेल्या रुग्णांची टक्केवारी (क्रमांक ७), ही भारताच्या संदर्भात दुसरी महत्त्वाची बाब आहे. भारतात एकूण बाधित रुग्णांपैकी ८८.९ टक्के रुग्ण अजूनही बरे होऊ शकलेले नाहीत. हे प्रमाण जागतिक पातळीवर कमी म्हणजे ७४ टक्के आहे. बाधित रुग्ण बाधितावस्थेत दुसऱ्या व्यक्तीला करोनाचा संसर्ग पोहोचवू शकतात. भविष्यकाळात अशा साथींचे आजार येऊ शकतात. त्या साथी किंवा कदाचित सध्याची साथदेखील सांगेल की, उत्साहाने विविध इव्हेंट साजरे करणे हा विषाणू मारण्यासाठी रामबाण मार्ग मुळीच नाही. त्याने विषाणू मरत नाहीत. उलट असले इव्हेंट विषाणू मारण्याऐवजी आपण राष्ट्रासाठी खूप काही केल्याचे पोकळ समाधान देतात. २२ मार्चच्या कर्फ्यूसारखे इव्हेंट तर विषाणूंच्या संदर्भात ‘आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी’सारखेच ठरतात.

एक वेळ करोना व्हायरसचे संकट निसर्गाप्रक्रियांतून उद्भवले आहे, असे म्हणता येईल. परंतु लॉकडाऊनचे संकट शासन निर्मितच असू शकते. लॉकडाऊन घोषित करण्यापूर्वी देशातील माणसे अनेक वयाची, अनेक भाषांची, गरिबी-श्रीमंतीच्या अगणित पायऱ्यावरील आहेत. परिणामी त्यांच्या जगण्याची साधने आणि रस्ते वेगळे आहेत. अशा अनेक प्रकारच्या माणसांना फक्त संसर्गाच्या शक्यतेपासून अलग करायचे आहे. लॉकडाऊनमुळे जुने आधार तुटणार असतील तर त्यांना त्यापेक्षा चांगले आधार दिले पाहिजेत. काही गरिबांच्या पोटाला हॉटेलातील उरलेल्या अन्नाचा आधार असतो. हॉटेलं बंद पडल्यावर उपासमार होते. जोडीला शहराची, देशाची अर्थव्यवस्था बंद पडून चालणार नाही. गाय तर हवी आहे, पण ती आखूड शिंगी, बहुदुधी हवी. भारतातील मोठ्या शहरांत लॉकडाऊनमुळे रोजगाराची कामं, शिक्षण संस्था, हॉटेलं, खाऊगल्ल्या, चित्रपटगृहं ठप्प झाले. शहरात आलेली मंडळी पुन्हा आपापल्या गावी स्थलांतरं करू लागली आहेत. अशी स्थलांतरं अजूनही होत आहेत. वाहने नसल्याने लोक पायी प्रवास करत आहेत. अन्न, पाणी यावाचून काहींचे हाल होत आहेत. त्यातून गावी पोहोचल्यावर त्यांच्याकडे संशयाने पाहिले जात आहे. मूळ गावाचा आधार कमकुवत झाला आहे. ही गरीब माणसं पुरती नागवली जात आहेत.

लॉकडाऊनने गरिबांना हृदयद्रावक परिस्थितीत ढकलले आहे. सरणारा दिवस या आजाराची जगातील आणि भारतातील तीव्रता वाढवतो आहे. अजूनही शासनाने गरिबांना आधार देऊन आपले कर्तव्य पार पाडावे. अभ्यासपूर्ण योग्य प्रतिबंधात्मक उपाय अमंलात आणले, तर या आजाराचा चढा वेग काही आठवड्यांत बराच कमी होऊन भारतातील साथ संपेल देखील. जगातील साथ संपेपर्यंत परदेशांतून ही साथ घेऊन माणसे येण्याची शक्यता मात्र लॉकडाऊनने थोपवली पाहिजे. हाच मार्ग इतर देशांनी वापरून जगातील साथदेखील लवकर आटोक्यात आणता येईल.

दरम्यानच्या काळात जोडीला देशातील अनेक प्रकारच्या अंधश्रद्धा नाहीशा करणे, आर्थिक समानतेकडे वेगाने वाटचाल करणे, अनारोग्य वाढवणारे गरिबांचे निवारे सुधारणे, पाठ्यपुस्तकातील चौरस आहार लोकांच्या ताटात आणण्यासाठी बेरोजगारी नाहीशी करणे आणि मासिक उत्पानातील तफावत वेगाने कमी करणे, शहराशहरांतून कार्यक्षम, विना दगदग, कार्यक्षम आणि दर्जेदार सार्वजनिक प्रवासी वाहतूक व्यवस्था आणि आरोग्य सेवेची उपलब्धता वाढवणे अशी भरीव कामे या आजाराविरुद्ध देशवासीयांची प्रतिकारशक्ती वाढवतील. तेवढे केले तरी सर्वसाधारण आरोग्य सुधारण्यास मदत होईल. परिणामी भविष्यात येऊ शकणाऱ्या अशा संकटांना तोंड देण्याची तयारी होऊ शकेल.

.............................................................................................................................................

लेखक प्रकाश बुरटे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घटना-घडामोडींचे अभ्यासक आहेत.

prakashburte123@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......