अजूनकाही
सध्या प्रत्येक बातमीसत्राच्या अग्रभागी व केंद्रस्थानी असणाऱ्या विषयावर आपण आणखी एक लेख लिहिणं खरंतर निरर्थक आहे, असे मला वाटते. कारण मी असे काय सांगू शकणार आहे, जे यापूर्वी सांगितले किंवा लिहिले गेलेले नाही? मात्र एका बाबीकडे सध्याच्या गदारोळात आणि निराकरणाच्या लढाईत दुर्लक्ष होते आहे. ती बाब म्हणजे, किंग करोनामुळे अमेरिकन जनतेच्या मानसिकतेत व दृष्टिकोनात होत असलेला बदल. अमेरिकी जीवनशैलीतही यामुळे दीर्घकालीन म्हणावेत असे बदल होणार आहेत; आणि आर्थिक, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रांत त्याचे प्रचंड मोठे परिणाम दिसणार आहेत.
सदासर्वकाळ आशावादी असणाऱ्या पाश्चिमात्य जगाला या विषाणूचे निदान करून, त्याच्याशी सामना करून, त्याच्यावर जय मिळवणे कठीण जाते आहे. पण मला खात्री आहे अपेक्षेपेक्षा लवकरच ते यशस्वी होतील आणि येत्या सहा महिन्यांतच आताचे सर्व काही दूरच्या स्मृतींमध्ये जमा होईल. तेव्हा कदाचित लोक असेही म्हणतील की, दरवर्षी येणाऱ्या फ्लूपेक्षा वेगळं काहीही नसणाऱ्या या आजाराचा पुष्कळ गाजावाजा केला गेला आणि त्यावर अवाजवी प्रतिक्रिया दिल्या गेल्या.
‘लढू आणि जिंकू’ असा पवित्रा घेण्यामध्ये अमेरिकन जनता नेहमीच आघाडीवर असते. अर्थात बहुतेकदा ते खरेही ठरते. त्यामुळे आताही त्यांना असा आत्मविश्वास आहे की, आपण करोनाशी टक्कर देऊ आणि आयुष्य पुन्हा पहिल्यासारखं सुरळीत होईल. म्हणजे ‘खा, प्या, मजा करा’ ही जीवनशैली पुन्हा सुरू होईल.
कारण 9/11, स्वाईन फ्लू, देशात आणि बाहेरही झालेले दहशतवादी हल्ले, पूर, चक्रीवादळे, सामूहिक खून, आणि अशाच प्रकारचे अनेक संकटे, प्रसंग अमेरिकेने पचवले आहेत. पण अमेरिकेचे चैतन्य आणि जीवनाकडे पाहण्याचा आशावादी दृष्टिकोन कशानेही डागाळला गेलेला नाही. काहीच महिन्यांपूर्वी स्टॉक मार्केट नेहमीप्रमाणे तेजीत होते, उपहारगृहे खचाखच भरलेली होती, लोक शक्य तितक्या मेजवान्या झोडत होते, प्रवास करत होते, आणि जगाची पर्वा न करता मजा करत होते. आता हे सगळेच दूरवरच्या स्मृतीत जमा झालेले आहे.
आपल्या आजूबाजूला सर्वत्र दिसणारे, स्तब्ध व काळजीत पडलेले चेहरे आणि संशयाने पाहणाऱ्या नजरा हे सर्व काही सांगून जाते. यावेळी काहीतरी अगदीच निराळे आहे. स्टॉक मार्केटची झालेली पडझड आणि आता रोजगारांमध्ये झालेली लाखोंची घट हे मोठ्या हिमनगाचे केवळ टोक आहे. आतमध्ये मूलभूत असे काहीतरी तुटले आहे. हा विषाणू चीनपासून युरोपपर्यंत प्रवास करत आला आणि आता त्याने अमेरिकेला लक्ष्य केले आहे. सतर्क राहण्याची पूर्वसूचना मिळालेली असूनही, बेसावध असलेली अमेरिका त्याच्या तावडीत सापडली आहे.
ट्रम्प यांनी केलेला अतिप्रचार व ‘हे फारसं गांभीर्याने घेण्याची गरज नाही’ असं दाखवण्याचा प्रयत्न अंगलट आला आहे. ‘जगात काहीच काळजी करण्याजोगं नाही’ अशा आशावादीपणापासून, ‘काहीही करून जिवंत राहिले पाहिजे’ अशा वृत्तीपर्यंत अमेरिकी मन आले आहे, म्हणजे एका रात्रीत १८० अंशाने फिरलेले आहे. ‘विपुलतेची भूमी’ अशा ओळखीपासून , अन्न व टॉयलेट पेपरची टंचाई निर्माण होण्यापर्यंतचा - अगदी सुस्थितीत असणाऱ्या व्यक्तींचाही - प्रवास थक्क करणारा आहे. अशा वेळी काहीही करून टिकून राहण्याच्या माणसाच्या मूलभूत प्रेरणा जाग्या होतात आणि त्याच्यातील हिणकस असेल ते बाहेर येते. दुधाच्या किंवा क्लोरोक्स या साबणाच्या शेवटच्या बाटलीसाठी दुकानात झालेली मारामारी अलीकडेच टीव्हीवर दाखवली गेली, आणि त्यातून ‘अंतिमतः प्रत्येक जण स्वतःसाठी असतो’ या दृष्टिकोनावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले.
मला खात्री आहे की, लवकरच हे ओसरेल आणि पुन्हा नव्याने सुरुवात होईल. तेव्हा काही महिन्यांसाठी तरी, मर्यादित उपभोग, प्रवास न करणे, मौजमजेची जीवनशैली टाळणे इथपासून ते सुव्यवस्थित व स्वयंशिस्तीचे वर्तन होऊ लागेल. मात्र आतापर्यंतच्या भपक्याचे अर्थव्यवस्थेवर मोठे परिणाम होतील. अर्थव्यवस्था नक्कीच मंदीच्या दिशेने जाईल. स्टॉक मार्केटमध्ये अधोगामी वक्ररेषा दिसू लागतील आणि आर्थिक घडामोडींचा वेगही मंदावेल.
या सगळ्यावर मात करण्यासाठी काही वर्षं लागतील. पण अंतिमतः चक्र उलटे फिरू लागेल. यातून असा काही पक्का धडा मिळेल की, स्टॉक मार्केटबाबत तरुण वर्ग कदाचित अधिक जागरूक होईल. अमेरिकी मानसिकतेत आणि सांस्कृतिक वर्तणुकीतही काही गंभीर बदल होतील आणि ते दीर्घकालीन असतील. अमेरिकी मन हे आता दुभंगलेले आहे, सुरक्षिततेची आणि अजिंक्य असण्याची त्याची जाणीव निघून गेली आहे. त्याच्या मनातील असुरक्षिततेची भावना, त्याच्यातील संशयी वृत्ती वाढीला व आत्मविश्वास गमावायला कारणीभूत होते आहे आणि लोक तग धरून जिवंत राहण्याच्या मानसिकतेत जात आहेत.
हा विषाणू देशाबाहेरून आलेला आहे, या तथ्याचा ट्रम्प यांनी त्यांच्या प्रचारात पुरेसा वापर करून घेतला आहे. त्यामुळे अशीही शक्यता आहे की, अमेरिकी लोक परदेशी वस्तूंविषयी संशयी होतील आणि त्याचा लक्षणीय परिणाम त्यांच्या वर्तनावर होईल. परदेश प्रवास आणि परदेशी माल - विशेषतः आशियातील - याच्याकडे ते संशयास्पदरित्या पाहू लागतील.
चार हजार रिझोल्युशनच्या टीव्हीवर घरबसल्या जगभरातील सर्व ठिकाणे पाहायची सोय असताना, कंबोडिया किंवा कझाकिस्तानमध्ये जाऊन कुठल्यातरी अनोळखी विषाणूचे लक्ष्य होण्याचा धोका का पत्करायचा असा विचार ते करू लागतील. काही लोक समुद्रपर्यटनासाठी व सहलींसाठी दूरच्या ठिकाणी जातील. पण घरामध्येच निर्धोक आणि सुरक्षित वाटणे साहजिक वाटू लागेल, किमान तितकेसे कंटाळवाणे वाटणार नाही.
मोकळे असणे आणि जगभरातील नागरिकांना स्वीकारणे हा अमेरिकेचा ध्येयवाद होता, तो न्यूयॉर्कमधील स्वातंत्र्यदेवतेच्या पुतळ्यावरही कोरलेला आहे. अर्थात, ट्रम्प यांनी त्याला काही प्रमाणात हानी पोहोचवली होतीच. पण आता रोगप्रसाराच्या संशयापोटी लोकांशी संबंध व संपर्क टाळणे हाच कदाचित इष्टमार्ग ठरणार आहे. त्यामुळे जागतिकीकरण, राष्ट्रांतर्गत सहकार्य आणि सामंजस्य यांच्यावर दीर्घकालीन व मूलगामी परिणाम होणार आहेत. दशकभराचे सांस्कृतिक आणि आर्थिक करारही कदाचित मागे घेतले जातील. ‘आपण विरुद्ध ते’ ही जगभरच्या उच्चकुलीनांमध्ये असणारी प्रेरणा कपटाने चेतवली जाण्याची आणि प्रत्यक्षात टोकाची तीव्र होण्याची शक्यताही आहेच. अर्थातच हे सगळ्या जगासाठी अपायकारक आहे आणि तसा कपटी विचार करणाऱ्यांसाठीही!
कौटुंबिक आघाडीवर याविषयी काय सुरू आहे? तिथेसुद्धा मानसिकतेत बदल होत आहेत. अमेरिकी अर्थव्यवस्था ही मुळात अतिरेक व अपव्यय यांवर आधारलेली आहे. आता मात्र अगदी अटीतटीच्या - टिकाव धरून जिवंत राहण्याच्या अवस्थेला पहिल्यांदाच आल्यामुळे, लोक नियंत्रित जीवनाचा विचार करत आहेत. घरीच खाद्यपदार्थ बनवणे, निरुपयोगी वस्तूंवर फुंकून टाकण्यासाठी पुढचे सहा मानधनाचे चेक आधीच मागून न घेणे, सुट्ट्यांचे भपकेबाज नियोजन करण्याऐवजी घरीच निवांत राहणे, अशी नवी सुरुवात असेल. त्याचीही लोकांना सवय होईल. आणि टीव्ही व इतर मनोरंजनाची साधने रिकामेपणातून येणारी पोकळी भरून काढतील.
वाईटातील चांगली गोष्ट अशी की, कदाचित कौटुंबिक संवाद व शेजाऱ्यांशी चर्चा वाढतील. याशिवाय एकमेव सकारात्मक बाब म्हणजे मनोरंजनासाठी इंटरनेट असणार आहे. त्यामुळे दूर राहून काम करण्याचे नवे मार्ग आणि संवाद साधण्याचे पर्यायी मार्ग लोक शोधून काढतील.
त्यानंतर पुढे काय? त्याची स्पष्टता येण्यासाठी आणखी किमान सहा महिने लागतील, कदाचित लोकांच्या अपेक्षेहून फारच अधिक. एकूण परिस्थिती पूर्वपदावर येण्याची गती संथ असेल, त्यासाठी कदाचित दोन वर्षं लागतील. परंतु अमेरिकेचे सत्व पूर्णतः बदललेले असेल. अमेरिकी लोक अधिक अंतर्मुख होऊ लागतील. परदेशी व्यक्तीविषयी आणि एकमेकांविषयी ही अधिक सावध होऊ लागतील आणि प्रत्येक वळणावर काळजीपूर्वक अंदाज घेत पुढे जातील. अज्ञाताची भीती प्रत्येक कोपऱ्यावर दडून राहिली आहे आणि गमावण्यासारखे बरेच काही आहे, या भावनांचे जालीम मिश्रण लोकांमधील चांगल्याला नाही, तर वाईटातील वाईटाला बाहेर काढील. म्हणजे अमेरिकी लोक मोकळेढाकळे, सगळ्याचा स्वीकार करणारे, चिकित्सक, भटकंती करणारे, आणि धोके पत्करणारे असतात या धारणेला तडा गेलेला असेल.
सारांश, अमेरिकी व्यक्तिमत्त्वाचे जे खरे सत्त्व आहे, त्याला दिलेला तडा हे किंग करोनाने केलेले खरे नुकसान असेल!
.............................................................................................................................................
‘साप्ताहिक साधना’च्या ४ एप्रिल २०२०च्या अंकातून
अनुवाद : सुहास पाटील
.............................................................................................................................................
लेखक सुनील देशमुख गेली ४५ वर्षे अमेरिकेत वास्तव्य करत असलेले उद्योजक असून ते सामाजिक कार्यातही सक्रिय आहेत. ‘महाराष्ट्र फाउंडेशन’, अमेरिका यांच्या वतीने मागील २५ वर्षे मराठी साहित्य व महाराष्ट्रातील समाजकार्य या दोन क्षेत्रांतील व्यक्तींना व संस्थांना पुरस्कार देऊन गौरवले जाते, या पुरस्कारांचे प्रवर्तक अशी त्यांची ओळख विशेषत्वाने आहे.
sunild@aol.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment