अजूनकाही
‘भगवे’पणाचा निकष आड न आणला जाता ज्येष्ठ साहित्यिक, व्रतस्थ ‘वनसंत’ मारुती चितमपल्ली यांना राज्य सरकारचा विंदा करंदीकर सन्मान जाहीर झाला आणि त्यांची पहिली भेट आठवली! विशेषत: ‘महाराष्ट्र टाइम्स’ या दैनिकात चितमपल्ली यांचं लेखन वाचनात येत असल्याचे ते दिवस होते. ते लेखन वेगळं होतं. त्याला अनवट असा रानगंध होता, तो आजही आहे. तसं तर, व्यंकटेश माडगूळकर, ना. धों. महानोर, र. वा. दिघे यांच्या लेखनातून रान, तेथले पशू-पक्षी, किडे, झाडं-फुलं, फळं, माती... असं बरंच काही कळलेलं होतं. ग्रामीण मातीतच जडणघडण झालेली असल्यानं माडगूळकर, आनंद यादव यांचं लेखन. महानोरांच्या कविता बेहद्द आवडायच्या. त्या लेखनाची नाळ आपल्या चिरपरिचित मातीशी आहे, असं वाटायचं, म्हणून ते ‘आपलं लेखन’ असल्याचं फिलिंग यायचं.
चितमपल्ली यांच्या लेखनाचा पोत मात्र वेगळा होता. ते माडगूळकर आणि तत्सम यांच्या पुढच्या लेखन होतं. लेखनात ललित बहर फारसा नव्हता, अलंकारिक भाषा नव्हती, काही तरी नवीन सांगत असल्याचा अभिनिवेशी थाट नव्हता आणि ज्ञानी असण्याचा आव नव्हता; तर कृतज्ञता होती. जंगलाच्या गाभ्याला थेट भिडणारा त्यातला आशय महत्त्वाचा होता. जंगल प्रदेशाचं अपरिचित जगणं व्यक्त करणारं ते लेखन, वाचणाऱ्यानं अचंबित व्हावं अशा विलक्षण साध्या शैलीत होतं. कधी त्या लेखनानं जणू निर्सगाला कवेत घेतलंय असं वाटायचं, तर कधी रानवाटांच्या कुशीत हे लेखन छानपैकी पहुडलेलं आहे असं वाटायचं, तर कधी श्रावणसरीत त्या रानवाटा तुडवत आपणही चितमपल्ली यांच्यासोबत चालतोय असं वाटायचं, तर कधी जंगलाच्या श्वास-नि:श्वासाबद्दल अतीव आत्मीयतेनं कोणी तरी बोलतंय आणि त्याचा अनाहत नाद आपल्या मनात गुंजारव करतोय असं वाटायचं. इतकी आत्मीयता, त्या जगण्याविषयी ओतप्रोत ममत्व त्या लेखनात तेव्हा होतं आणि ते नंतर अधिकाधिक घनगर्द होत गेलं.
तेव्हा माझा पत्रकारीतेचा पडाव नुकताच नागपूरला पडलेला होता. पत्रकारितेत असल्यानं कोणालाही थेट भिडण्याइतका कोडगेपणा (हल्ली या गुणाला ‘कॉन्फिडन्स’ असं म्हणतात!) तोपर्यंत अंगी बाणला होता. आधी फोन करून मारुती चितमपल्ली यांच्याशी भेटीची वेळ ठरवून घेतली. त्यांच्याशी फोनवर बोलताना ‘मला भेटणं हा तुमचाही सन्मान आहे’ असा राजकीय वृत्तसंकलन करणाऱ्या पत्रकाराला शोभणारा साहजिक अविर्भाव माझ्यात असणार! मध्यम पण, बळकटपणा प्रभावित करणारा बांधा, विस्तीर्ण भाल प्रदेश, डोईवर अर्धकुरळे व काळे दाट केस, डोळ्यावर काळ्या मोठ्या फ्रेमचा चष्मा, पूर्ण बाह्यांचा पांढरा लायनिंगचा धुवट शर्ट इन केलेले आणि पायात साध्याशा वाहणा असलेले चितमपल्ली भेटले. आधी त्यांच्या या साध्या दर्शनानं आणि नंतर त्यांचा ऋजू शब्दही जरा वरच्या पट्टीतीलच वाटावा अशा बोलण्या आणि लाघवी वागण्यानं तेव्हा जे गारुड केलं ते आजवर कायम आहे. त्यानंतर म्हणजे आजवर आम्ही अनेक वेळा भेटलो; कधी नागपूरच्या लक्ष्मी नगरातील त्यांच्या अनेक किमान नवश्रीमंत मध्यमवर्गीयांच्या तुलनेतही साध्याशा फ्लॅटमध्ये (या फ्लॅटमध्ये वर्षांनुवर्ष एकच बदल होत गेला. तो म्हणजे घरातील माणसांपेक्षा पुस्तकांची संख्या अशा मोठ्या गतीनं वाढत गेली की, आता त्या गर्दीत माणसंही परकी वाटतात!), तर कधी कार्यक्रमात तर कधी साहित्य प्रसार केंद्र या राजाभाऊ कुळकर्णी यांच्या बर्डीवरील पुस्तकाच्या दुकानात, तर कधी आम्ही व्यासपीठावर सोबत असू. चितमपल्ली तसेच साधे राहिले आणि त्याच मृदुपणे बोलत राहिले.
पहिल्या भेटीनंतर अलीकडे म्हणजे, सुमारे साडेतीन दशकानंतर दोस्तयार डॉ. अनिल पिंपळापुरेच्या ‘खगायन’ या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी त्यांच्यासोबत नागपुरात व्यासपीठावर होतो. चितमपल्ली यांच्यातला तो साधेपणा तस्साच नाही तर बराचसा वाढलेला आणि त्या साधेपणाला खुलवणारं साधनेचं वलय आलेलं जाणवलं. ते निवृत्त होऊन वीस वर्षं उलटलेली होती. अंगकाठी किंचित वाकलेली, खांदे काहीसे ओघळलेले, दाढी छातीपर्यंत वाढलेली आणि व्यासंगाचं शीतल तेज चेहऱ्यावर मंदपणे विलसत असलेले चितमपल्ली एखाद्या संत किंवा आत्ममग्न ऋषीप्रमाणे वाटले. ते त्यांचं रूपडं इतकं भावलं की, ‘आयुष्यभर वनसाधना करणारे चितमपल्ली आणि एखादा संत-ऋषी यात साधर्म्य आहे’ हे बोलून दाखवण्याला मी आवरच घालू शकलो नाही!
एक खंत नोंदवायला हवी. चितमपल्ली यांनी वनातील झाडं, त्यांची पानं, बहर, फळं, फुलं, पशू-पक्षी एवढंच नाही तर किडे, अळ्या, मुंग्या यांविषयी मूलभूत असं लेखन केलं. त्यावर संशोधन केलं. त्याच व्यासंगात आयुष्य झोकून दिलं. पक्षी आणि उतारवयात महा तन्मयतेनं मग्न होऊन मत्स्य या विषयांवर महाअचाट कोश तयार केले! हे असं काम यापूर्वी मराठीत झालेलं नाही. ना ती कविता होता, ना ललित, ना कथा की कादंबरी. बरं, जे काही चितमपल्ली यांनी सिद्ध केलेलं आहे, ते संशोधकीय थाटाचं बोजड नाही. मराठी साहित्याला विलोभनीय चकवा देणारी ती एक अभिव्यक्ती आहे, असंही म्हणता येईल. एक म्हणजे, हे अतुलनीय असं काम आहे आणि त्यातही दोन्ही कोश तर विलक्षण संन्यस्त वृत्तीनं निर्माण झालेले आहेत, पण या लेखनाची गंभीर समीक्षा झाली नाही. कदाचित तो क्रूस पेलणं अशक्य आहे म्हणून कोणी समीक्षक त्याचं अनमोलत्व पटवून देण्याच्या फंदात पडला नसावा.
‘चकवा चांदण’ हे निसर्गसाधनेच्या वेगळ्या वाटेवरचं चितमपल्ली यांचं आत्मपर लेखनही त्यांच्यातल्या साधेपणा आणि आजवर अज्ञात राहिलेल्या व्यासंगाचा ऐवज आहे, पण त्याचीही म्हणावी तशी गंभीर दखल मराठी समीक्षक आणि अभिजनांनी घेतली नाही. चितमपल्ली मार्केटिंगच्या मॉलमध्ये कधी वावरले नाहीत. स्वत:चा मठ म्हणा की, पंथ निर्माण करून भक्तांचा गोतावळा करण्याच्या वाटेवर ते कधी चालले नाहीत. तसं चालणं मुळी त्यांच्या रक्तातच नाही. कोणत्या कंपूत, गटात सहभागी व्हावं आणि स्वत:चे ढोल स्वत:च बडवावे किंवा इतरांच्या किरट्या कर्तृत्वाचे ढोल आपण बडवून त्यांच्याकडून स्वत:च्या कर्तृत्वाचे ढोल बडवून घेताना चितमपल्ली यांची घुसमटच होईल.
अशात भगवा घेऊन चालणाऱ्या किंवा भगव्या वाटेवर चालणाऱ्या किंवा भगव्याची ‘कवनं’ गाणाऱ्या सुमारांनाही सरकारकडून ‘रमणा’ प्राप्त होतोय. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं केवळ वनरंगी तल्लीन राहणाऱ्या चितमपल्ली यांना करंदीकरांच्या स्मृतीदाखल सुरू केलेला सन्मान देण्याचा घेतलेला निर्णय अभिनंदनीय आहे आणि त्यांची निवड करण्याचा सुज्ञपणा दाखवणाऱ्या निवडकर्त्यांचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे!
चितमपल्ली हे एक हाडामांसाचे माणूस आहेत आणि त्यांनाही भावना, राग आणि लोभ आहेतच. मानवी जगण्यात उन्मळून पडावे असे प्रसंग अपरिहार्यपणे येतात, तसे त्यांच्या आयुष्यात काही कमी आले असंही नाही. मात्र त्याही प्रसंगात चितमपल्ली यांनी दाखवलेली शांत चित्तवृत्ती थक्क करणारी आहे. उन्मळून पडावं अशा प्रसंगातही वन आणि प्राणी व्यासंगाचं अग्निहोत्र कायम तेवत ठेवण्याची त्यांची वृत्ती आपल्याला नतमस्तक करायला लावणारी आहे. हा माणूस खरंच संत किंवा ऋषी आहे याची जितीजागती प्रचीती आहे. कोणतंही संकट आलं तरी शीतल छाया देण्याचं, फळण्याचं-फुलण्याचं असीमधारा व्रत वृक्ष पाळतोच; तो व्रतस्थ बाणा रानावनात राहून त्या वृक्षांकडूनच बहुदा चितमपल्ली शिकले असावेत.
सोलापूर हे चितमपल्ली याचं जन्मगाव. त्याच सोलापूरला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी चितमपल्ली यांची निवड झाली. तेव्हा ‘कोण हे चितमपल्ली’ असा प्रश्न पडण्यासारखी स्थिती अर्थातच नव्हती तरी, त्यांच्या निवडीवरून काही अभिजन दुखावले गेले. ‘सोलापूरकर’ आणि ‘सोलापूरच्या बाहेरचे’ असा वाद रंगवला गेला. विदर्भ साहित्य संघातला वावर; त्यातही विशेषत: अनेक वर्ष मनोहर म्हैसाळकर यांच्याशी असणारी सलगी आणि एक पत्रकार म्हणून साहित्य संमेलनाच्या निवडणुका कशा लढवल्या जातात हे अनुभवल्यामुळे; सोलापूर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी चितमपल्ली विजयी होणं ही एक औपचारिकता उरलेली होती, याची खात्री पटलेली होती. तरी एक कडवटपणा वातावरणात पसरवला गेला आणि चितमपल्ली यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न झाला. चितमपल्ली यांचं मोठेपण असं की, प्रतिस्पर्ध्यांविषयी त्यांनी प्रचारात आणि निवडणुकीत विजय मिळाल्यावरसुद्धा किंचितही कटुता व्यक्त केली नाही. विनाकारण टीकेचे जहरी आसूड ओढले जातात, तेव्हा राजकारणात वावरणाऱ्यांचे सभ्यपणाचे मुखवटे कसे गळून पडतात आणि त्याचा अकारण तोल कसा सुटतो, हे एक पत्रकार म्हणून जवळून बघितल्यानं तर, चितमपल्ली यांची त्या काळातील अनुभवलेली ऋजुता आणि सुसंस्कृतपणा मनाच्या कुपीत महादुर्मिळ कस्तुरी गंधासारखा जपून ठेवावा असाच आहे. अशी जी माणसं जगताना भेटली, त्यामुळेच जगण्याचा अर्थ कळला आणि त्यामुळेच जगण्याचं सार्थक झालं, अशी माझी ज्यांच्याविषयी भावना आहे, त्यात एक चितमपल्ली आहेत.
(पूरक संदर्भ सहकार्य : राखी चव्हाण, नागपूर)
लेखक दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.
praveen.bardapurkar@gmail.com
भेट द्या - www.praveenbardapurkar.com
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment