कुंभमेळा हा केवळ धार्मिक सोहळा नाही, तर देशाच्या सामाजिक–आर्थिक–राजकीय आणि ऐतिहासिक धाग्यादोऱ्यांशी त्याची घट्ट वीण आहे.
ग्रंथनामा - झलक
दीप्ती राऊत
  • ‘कुंभमेळा : एक दृष्टिक्षेप’चे मुखपृष्ठ
  • Sat , 28 March 2020
  • ग्रंथनामा Granthnama झलक कुंभमेळा : एक दृष्टिक्षेप दीप्ती राऊत

पत्रकार दीप्ती राऊत यांनी नाशिकच्या २०१५सालच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने लिहिलेले ‘कुंभमेळा : एक दृष्टिक्षेप’ हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. शब्द पब्लिकेन्सने प्रकाशित केलेल्या या पुस्तकाला लेखिकेने लिहिलेले हे मनोगत...

.............................................................................................................................................

धर्म आणि प्रशासन स्वतंत्र ठेवणाऱ्या लोकशाहीवादी देशांची संख्या जगाच्या पाठीवर निर्णायक असली तरी जगातील प्रत्येक व्यक्तीच्या वैयक्तिक जगण्यापासून देशाच्या अर्थ-राजकीय निर्णयांपर्यंत धर्माचा घनिष्ट संबंध दिसतो. देशातल्या उत्तरेतील राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रासारख्या राज्यात याची दृश्य रूपे क्वचित दिसतात. त्यातील एक सोहळा म्हणजे अर्थात कुंभमेळा. हिंदू धर्मातील सर्वांत मोठे संमेलन मानल्या गेलेल्या कुंभमेळ्याचा अनुभव महाराष्ट्रासाठी १२ वर्षांतून एकदा म्हणजे नाशिकच्या कुंभमेळ्याच्या निमित्ताने येतो. उत्तरेतील राज्यांमध्ये मात्र कुठे पूर्ण कुंभ, तर कुठे अर्ध कुंभ या चक्राने दर सहा महिन्यांनी हा सोहळा होत असतो. तो कव्हर करताना त्या भोवती गुंफलेल्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय पैलूंना सखोल भिडणे शक्य होत नव्हते. २०१४ सालच्या देशातील सत्ताबदलाच्या पार्श्वभूमीवर २०१५ साली नाशिकमध्ये भरणारा कुंभमेळा वेगळ्या भूमिकेतून अभ्यासण्याची संधी केशव गोरे ट्रस्टच्या य. दि. फडके संशोधनवृत्तीच्या निमित्ताने मिळाली. देशातील सर्वांत मोठा हिंदू धर्मियांचा सोहळा समजल्या जाणाऱ्या कुंभमेळ्यांचा नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या प्रत्यक्ष अनुभवाच्या आधारे विविध अंगांनी सविस्तर अभ्यास यात करण्यात आला आहे.

नाशिकच्या कुंभमेळ्यात त्र्यंबकेश्वरातील गोरखनाथाच्या मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी भाजपचे तत्कालीन अध्यक्ष अमित शहा आले होते. गोरखपूरचे खासदार योगी आदित्यनाथांच्या नेतृत्वाखाली हा सोहळा झाला. भाजपच्या नेतृत्वाच्या फळीतील आदित्यनाथांच्या स्थानाची त्या वेळी प्रचिती आली आणि नंतर झालेल्या उत्तर प्रदेशातील निवडणुकीत ते मुख्यमंत्रीपदीही विराजमान झाले. मालेगाव बॉम्बस्फोटाच्या प्रमुख आरोपी असलेल्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरला भाजपने भोपाळहून उमेदवारी दिली आणि त्या निवडूनही आल्या. ही झाली फक्त उदाहरणे. त्याची मुळे भारतीय भूमीवर पुरातन काळापासून अस्तित्वात असलेला साधू समाज, त्यांची व्यवस्था, वेळोवेळच्या प्रचलित राजकीय, आर्थिक सत्तांसोबतचे त्यांचे नातेसंबंध, सर्वसामान्य भाविकांचा सहभाग, त्यांची भूमिका, त्यांचे दृष्टीकोन या साऱ्याचा यात मागोवा घेण्याचा प्रयत्न केला आहे.

शेकडो वर्षांपासून चालत आलेली कुंभमेळ्याची परंपरा, त्यात सहभागी होणारे लाखो भाविक, हजारो साधू, त्यासाठी उभारली जाणारी यंत्रणा, कार्यरत व्यवस्था, त्यातून होणारी कोट्यवधींची उलाढाल, त्याचे राजकीय परिणाम आणि सामाजिक चलनवलन हा अत्यंत सखोल अशा समाजशास्त्रीय अभ्यासाचा विषय आहे. एका पत्रकाराने पेलण्याचे ते काम नव्हे. तरीही कुंभमेळा कव्हर करत असताना, बातमीपलीकडे दिसणारी अनंत निरीक्षणे, असंख्य नोंदी एकत्र मांडणे, कुंभमेळ्यातील घटनांपलीकडे जाऊन त्या सोहळ्याचा एक समग्र सारीपाट लेखी दस्ताच्या रूपाने तयार करणे गरजेचे वाटत होते.

कुंभमेळ्याबाबत मराठी भाषेत अत्यंत कमी साहित्य उपलब्ध आहे. जे आहे ते धार्मिक आणि पौराणिक आधारावर बेतलेले. त्यापलीकडे जाऊन व्यापक पटलावर कुंभमेळ्याचे समाजकारण, अर्थकारण आणि राजकारण याची मांडणी होणे गरजेचे वाटत होते. त्या उद्देशाने केलेला हा अभ्यास पत्रकार, विद्यार्थी, अभ्यासक, कार्यकर्ते आणि सुजाण नागरिक यांच्यासाठी उपयुक्त ठरेल अशी आशा आहे. विषयाची व्याप्ती पाहता हे एका व्यक्तीच्या आवाक्यातील काम नव्हे. त्यामुळे प्रातिनिधिक स्वरूपात नाशिकच्या २०१६च्या कुंभमेळ्यात सहभागी झालेले १०० साधू, १०० भाविक, १०० व्यापारी यांच्या प्रश्नावलींच्या माध्यमातून थेट मुलाखती आणि फिल्डवरील निरीक्षण यांच्या संयुक्त विद्यमाने या पुस्तकाची रचना करण्यात आली आहे.

वरवर धार्मिक वाटणाऱ्या कुंभमेळ्याच्या सोहळ्यामागे अत्यंत गहिरे सामाजिक-आर्थिक आणि राजकीय पदर असल्याचे यातून स्पष्ट झाले. भारतीय जनमानसावर प्रभाव असणारा साधू समाज, त्यांची व्यवस्था, त्यांचा इतिहास, कुंभमेळ्यातील आणि कुंभमेळ्यापलीकडील नियमित सामाजिक – आर्थिक – राजकीय व्यवहारांवरील त्यांचा प्रभाव हा महत्त्वाचा पैलू सदर संशोधनातून पुढे आला आहे.

जगभरात फोफावणाऱ्या मुस्लीम कट्टरतावादाला प्रतिवाद म्हणून पुढे येत असलेल्या हिंदू राष्ट्रवादाच्या परिप्रेक्ष्यात कुंभमेळ्यांचा होणारा राजकीय वापर हा अत्यंत महत्त्वाचा घटक ठरत आहे. भूमिका अत्यंत निर्णायक ठरत आहे. दर बारा वर्षांनी एका तीर्थस्थळी असे मानले जात असले तरी वर्षातून किमान दोन ठिकाणी कोणत्या ना कोणत्या प्रकारे कुंभमेळा भरतो. त्यात महत्त्वाची राजकीय – आर्थिक घुसळण होते. सामाजिक बदलाच्या प्रक्रियेत ही घुसळण उजेडात आणणे, पत्रकार म्हणून ती नोंदवून ठेवणे अगत्याचे आहे. त्यासाठीच या पुस्तकाचे प्रयोजन.

केशव गोरे ट्रस्टतर्फे देण्यात आलेल्या य. दि. फडके अभ्यासवृत्ती अंतर्गत निवड झाल्यानेच हे संशोधन आणि लेखन शक्य झाले. विशेष म्हणजे नाशिकच्या प्रत्येक पत्रकारास कुंभमेळा कव्हर करणे ही आगळी पर्वणी असते. मात्र, मला या अभ्यासवृत्ती निमित्ताने देशातील संपूर्ण साधू समाजाचे वैशिष्यपूर्ण जग, भाविकांच्या निमित्ताने सामान्य जगाशी त्यांचे असलेले नाते, अध्यात्मिक-आर्थिक व्यवहार आणि एकूणच कुंभमेळ्याचा देशाच्या सामाजिक-राजकीय परिस्थितीवर होणारा परिणाम या साऱ्यात अनोख्या व तेवढ्याच अज्ञात गंगेत डुबकी मारता आली.

यात विशेषत: इंडियन हिस्ट्री काँग्रेसचे अभ्यासक आनंद भट्टाचार्य यांनी १८व्या आणि १९व्या शतकातील कुंभमेळ्यांचा, साधू समाजाचा केलेला अभ्यास, शबाना काझमी यांचा नवाबाच्या सैन्यात असलेल्या नागा व गोसावी साधूंच्या लष्करी फलटणी, ज्येष्ठ समाजशास्त्रज्ञ डॉ. जी. एस. घुर्ये यांचा ‘इंडियन साधूज’ हा ग्रंथ, अरुंधती खंडकर, प्रतिभा रानडे, उत्तम कांबळे, बिंदू महाराज, नाशिक जिल्हा प्रशासनाचे अहवाल या संदर्भांची मोलाची मदत झाली.

कुंभमेळा हा बारा वर्षांतून भरणारा एखादा धार्मिक सोहळा नाही, तर देशाच्या सामाजिक – आर्थिक – राजकीय आणि ऐतिहासिक धाग्यादोऱ्यांशी त्याची किती घट्ट वीण आहे, याची प्रचिती यातून आली. पत्रकार म्हणून माझे काम होते हे नोंदवून ठेवणे. कुंभमेळ्यातल्या एका डुबकीसाठी शेकडो मैलांची पायपीट करून भारताच्या खेड्यापाड्यातून येणाऱ्या लाखो भाविकांच्या श्रद्धेमुळे ते शक्य झाले.

कुंभमेळ्याची पहिली लेखी नोंद ठेवणाऱ्या भारतात आलेले चिनी यात्रेकरू ह्युआन त्सांग आणि काशी प्रवासाला गेलेले गोडसे भटजी यांनी लिहून ठेवले म्हणून आपल्यापर्यंत पोहोचले. त्यांच्याकडूनच प्रेरणा घेऊन आपल्याला जे दिसले, जे कळले ते लिहून ठेवणे या कर्तव्यातून साकारलेला हा ग्रंथ.

.............................................................................................................................................

‘कुंभमेळा : एक दृष्टिक्षेप’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5178/Kumbh-Mela

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......