अजूनकाही
करोना व्हायरसशी दोन हात करताना सध्या जगभरातील अनेक देशांची क्षमता वेगवेगळ्या पातळ्यांवर तपासली जात आहे. त्यात दोन गोष्टी महत्त्वाच्या ठरत आहेत – १) लोक एकमेकांना किती आधार देत आहेत आणि २) प्रशासनाविषयी त्यांना किती सुरक्षित वाटतं?
त्यात भर म्हणून नुकताच ‘World Happiness Report 2020’ जाहीर झाला आहे. त्यात भारताचा क्रमांक गेल्या वर्षाच्या तुलनेत घसरला आहे. भारत आनंदी देशांच्या तुलनेत भारताचा क्रमांक बराच खाली आहे. हे कटु असलं तरी सत्य आहे.
या अहवालानुसार जगातल्या १५६ आनंदी देशांच्या यादीत भारताचा क्रमांक १४३वा आहे. २०१५ मध्ये ११७वा होता, २०१९मध्ये १४० होता. म्हणजे आनंदाच्या बाबतीत भारताची दरवर्षी घसरणच होत चालली आहे.
जागतिक पातळीवर वेगवेगळे निर्देशांक विचारात घेऊन अनेक अहवाल बनवले जातात आणि त्यानुसार विविध देशांची वर्गवारी केली जाते. यामध्ये तेथील जनतेची प्रगती, आर्थिक-सामाजिक स्तर, लैंगिक समानता असे अनेक निर्देशांक विचारात घेतले जातात. संयुक्त राष्ट्राने २०११ मध्ये असे जाहीर केले होते की, लोक किती समाधानी आहेत, आनंदी आहेत, यावरून त्या देशाच्या कामगिरीचे मूल्यमापन व्हायला हवे आणि २०१२ पासून जागतिक आनंदी देशाच्या अहवाल निर्मितीचे काम सुरू झाले.
कशी असते अहवाल निर्मितीची प्रक्रिया?
दरवर्षी ‘World Happiness Report’ तयार केला जातो. त्यासाठी मागील तीन वर्षांच्या काळातील, प्रत्येक देशातील साधारण १००० लोकांच्या मतचाचण्या घेतल्या जातात. हा अहवाल ‘लोकांना काय वाटतं’ हे विचारात घेतो, हे त्याचं एक मुख्य वैशिष्ट्य आहे. इतर अहवाल सामान्यतः काही तज्ज्ञांना योग्य वाटतील असे ठराविक निर्देशांक लक्षात घेतात.
काही वेळा या अहवालाच्या माहिती मिळवण्याच्या प्रक्रियेवर ‘व्यक्तीसापेक्ष’ असल्याची टीका केली जाते खरी, परंतु या अहवालात असलेली देशांची वर्गवारी आणि आर्थिक, पर्यावरण सुरक्षा, गुन्हेगारी अशा निकषांवर आधारित अहवालांची वर्गवारी यात फारसा फरक दिसून येत नाही. उदाहरणार्थ, २०१९ मध्ये संयुक्त राष्ट्राने प्रकाशित केलेल्या मानव विकास निर्देशांक अहवालातील देशांची वर्गवारी कमी-अधिक प्रमाणात काहीशी अशीच राहते.
२०२० सालच्या अहवालात कोणते घटक विचारात घेतले गेले?
हा अहवाल शहरी, सामाजिक आणि नैसर्गिक पर्यावरण अशा तिन्ही घटकांचा विचार करून बनवला गेला आहे. तो तयार करणाऱ्या समूहाचे तज्ज्ञ प्रोफेसर जैफरी सैक म्हणतात की, “पुन्हा पुन्हा हेच लक्षात येते की, सामाजिक आधार देणारे बंध, सामाजिक विश्वास, प्रामाणिक सरकार, सुरक्षित पर्यावरण आणि आरोग्यदायी आयुष्य हेच घटक लोकांच्या आनंदासाठी कारणीभूत ठरतात.”
जे निकष या अहवालासाठी विचारात घेतले गेले, त्यामध्ये प्रति व्यक्ती सकल राष्ट्रीय उत्पन्न, सामाजिक आधार, निरामय जीवनमान, आयुष्यातले निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य, दानशूरपणा, भ्रष्टाचाराबद्दल मत यांचा समावेश होता. या वर्षी प्रथमच काही शहरांचीसुद्धा वर्गवारी करण्यात आली. ती २०१४-२०१८ या काळात लोक स्वतः स्वतःचं मूल्यांकन कसं करतात, यावर आधारित होती. यामध्ये १८६ शहरे विचारात घेतली गेली.
कोण पुढे? कोण मागे?
फिनलंड हा देश गेली काही वर्षे आनंदी देशांच्या मूल्यमापनात प्रथम क्रमांकाची बाजी मारत आहे. यावर्षीदेखील तोच पहिला आहे. डेन्मार्क, स्वित्झर्लंड, आयर्लंड आणि नॉर्वे हे देशसुद्धा पहिल्या पाचांमध्येच येतात. विशेष म्हणजे या अहवालानुसार भारताचे शेजारी पाकिस्तान आणि बांगलादेशसुद्धा भारतापेक्षा जास्त आनंदी आहेत, जे मानव विकास निर्देशांकानुसार भारताच्या मागे असतात!
भारतात गेल्या काही वर्षांमध्ये बेरोजगारी वाढली आहे. असमानता, सांप्रदायिक तेढ वाढत आहे. विचार व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य कमी होत आहे, हे देशात घडणाऱ्या विविध घटनांमुळे सतत समोर येत आहे. स्त्रियांवरील अन्यायाचे प्रमाण, गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. झुंडबळीच्या वाढणाऱ्या घटना हादरवून सोडणाऱ्या आहेत. या पार्श्वभूमीवर लोक आनंदी आहेत का, सुरक्षित आहेत का, हे सांगणाऱ्या किंवा तपासून पाहणाऱ्या अशा निर्देशांकाचे महत्त्व अजूनच अधोरेखित होते.
आनंदी देशांच्या संकल्पनेत बाजी मारण्यासाठी काय करायला हवे? तज्ज्ञ काय सुचवतात?
१. गरीब देश अर्थातच श्रीमंत देशांच्या तुलनेत मागे आहेत. कारण गरिबीचा आणि आनंदी असण्याच्या प्रत्यक्ष संबंध आहे. त्यामुळे दारिद्र्य निर्मूलनाच्या योजनांना देशांनी प्राधान्य द्यायला हवे.
२. उपासमार, बेरोजगारी, स्थलांतरितांचे प्रश्न, असमानता, समाजमाध्यमांमुळे निर्माण झालेले नवे प्रश्न यांकडे लक्ष द्यायला हवे.
३. लोकांचा प्रशासनावरील विश्वास महत्त्वाचा आहे, जो देशांच्या सरकारांनी जाणीवपूर्वक आणि आपल्या कामातून निर्माण करायला हवा. फिनलंडमधील ९१ टक्के लोक आपले राष्ट्रप्रमुख आणि ८६ टक्के लोक पोलीस व्यवस्थेवर विश्वास ठेवतात.
४. लोकांना सुरक्षित वाटते का, याचा विचार व्हायला हवा. गुन्हे रोखणारी सक्षम व्यवस्था हवी.
५. एकमेकांना आधार देणारी सामाजिक घडी महत्त्वाची आहे, जी नियमितपणे आणि आपत्ती काळात समाजाला बांधून ठेवेल.
आनंद ही जरी व्यक्तीसापेक्ष बाब असली तरी एक समाज म्हणून आपण आनंदी आहोत का, हा मुद्दा येणाऱ्या काळात कळीचा ठरणार आहे. कारण आपण अनेक नवनवीन जैविक, पर्यावरणीय, मानवनिर्मित संकटांना सामोरे जात आहोत. तेव्हा लोकांचा आनंद आणि समाधान विचारात घेऊन प्रशासन चालवणे, हे भारतासारख्या देशासाठी गरजेचं ठरणार आहे.
.............................................................................................................................................
‘World Happiness Report 2020’ डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा -
https://happiness-report.s3.amazonaws.com/2020/WHR20.pdf
.............................................................................................................................................
‘World Happiness Report 2020’ वाचण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
लेखक अनुज घाणेकर मानववंशशास्त्रज्ञ व समुपदेशक आहेत.
anujghanekar2@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment