अजूनकाही
१. सत्ताधारी पक्ष जेव्हा निवडणुकांत उतरतात तेव्हा संपूर्ण यंत्रणा, प्रशासन, पैसा अशा गुटगुटीत गोळ्या खाऊन आलेली सूज त्यांच्या वागण्या-बोलण्यातून दिसत असते. परंतु अशा सगळ्यांना शिवसेना पुरून उरली. मुंबईवरील संकटांच्या वेळी ज्यांनी शेपट्याच घातल्या, त्यांनी मुंबई वाचवण्यासाठी छातीवर घाव झेलणाऱ्या शिवसेनेच्या वाटेला जाऊ नये असा इशाराही दिला. शिवसेना म्हणजे सत्तेतून निर्माण झालेला बुडबुडा नाही. शिवसैनिकांच्या रक्तामध्ये स्वार्थाचा नाही, तर राष्ट्रीयत्वाचा आणि महाराष्ट्र धर्माचा जबरदस्त ‘जर्म’ शिवसेनेने निर्माण केला आहे. : उद्धव ठाकरे
काही प्रश्न : मुंबईत सत्ताधारी कोण आहे? तीही सूज इथं इन्क्लूड केली आहे का? मुंबईवर कसलं संकट आलं होतं? एलियन्स आले होते का? अनेक संकटं तर आपणच निर्माण केली होती. हा बुडबुडा तोंडच्या वाफेतून निर्माण झाला आहे, ये तो बच्चा बच्चा जानता है. ‘जर्म’चं भाषांतर मराठीत काय होतं? बादवे, ते छातीचा कोट-बिट करून लढण्याच्या भानगडीत चांगले रस्ते, सोयीसुविधा देण्याचं राहून गेलं काय मुंबईकरांना?
…………………………………..…………………………………..
२. शिवसेनेशी युती केली तर ती आमच्या अटींवरच होईल, केवळ सत्तेसाठी नाही. सर्वसामान्य जनतेच्या जीवनात परिवर्तन होणार असेल, तरच युती होईल. लढण्याचा आदेश आल्यावर समोर कोण आहे ते न पाहता शिवरायांच्या मावळ्यांप्रमाणे तुटून पडा. : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
चला, म्हणजे हिंदुत्वाचं भगवं घोंगडं सेनेच्या गळ्यात अडकवून आता शिवरायांचे मावळेही आपणच असं म्हणतायत हे. इकडे दंडुकेधारी मावळे गड ताब्यात घेण्यासाठी घात करायला उतरलेत आणि दादूराजे काय तिकडे मुदपाकखान्यात भात झाला का, म्हणून विचारणा करतायत?
…………………………………..…………………………………..
३. रशियाने धूम्रपानावर नियंत्रण आणण्यासाठी महत्त्वपूर्ण नियंत्रण घेतला आहे. २०१५ नंतर जन्मलेल्या व्यक्तींना सिगारेटची विक्री करण्यात येणार नाही. त्यामुळे तंबाखूवर पूर्णपणे बंदी आणणारा रशिया हा जगातील पहिला देश ठरला आहे.
एक फुटकळ शंका : २०१५ नंतर जन्मलेली व्यक्ती सिगारेटची मागणी करण्याइतकी मोठी व्हायला किमान २०३० साल उजाडावं लागेल ना? तेव्हाही हेच सरकार असेल? पुतिनच राष्ट्राध्यक्ष असतील? रशिया हाच आणि असाच असेल?
…………………………………..…………………………………..
४. केंद्र सरकारने सरकारी कार्यालयांमध्ये आठवड्यातील एक दिवस ‘खादी’ अनिवार्य केल्यामुळे मागील तीन ते चार महिन्यांत राज्यातील खादीचा खप तीन पट वाढला आहे. मात्र खादीचे दर अधिक असल्याने सरकारी कर्मचाऱ्यांनी चरख्याऐवजी यंत्रनिर्मित खादीला अधिक पसंती दिली आहे.
डोक्यात फारच गोंधळ उडवणारी बातमी आहे ही. सरकारी कर्मचाऱ्यांना 'खादी'साठी अधिकृतपणे प्रोत्साहन दिलं जातंय? भ्रष्टाचारमुक्तता कधी होणार मग? शिवाय, त्यांना 'चर-खा'वाली 'खादी' परवडत नाही? हे तर जगातलं आठवं आश्चर्य झालं!!!
…………………………………..…………………………………..
५. संरक्षणमंत्री आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनाच निवडणुकीनंतर गोव्यात मुख्यमंत्री म्हणून परत पाठवलं जाऊ शकतं, असं केंद्रीय मंत्री आणि गोवा निवडणुकीचे भाजपचे प्रचारप्रमुख नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. पक्षाच्या आमदारांची संमती दिल्यास दिल्लीतील एका नेत्याला गोव्याचे मुख्यमंत्रीपद सोपवण्यात येऊ शकतं, असं ते पत्रकार परिषदेत म्हणाले.
संघाच्या केंद्रातल्या 'टीम बी'मधला एक मोहरा अज्जात टिपला काय नितीनभौंनी? आता पाकिस्तानला ठणकावणार कोण, अतिरेक्यांना हसवून हसवून मारणारी विधानं करणार कोण आणि देशभरातले 'टपल्यां'चे कॉलम चालवायचे कसे?
editor@aksharnama.com
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment