करोना व्हायरसच्या काळातले प्रश्नोपनिषद, अर्थात स्वत:ला विचारण्यासारखे काही प्रश्न
पडघम - देशकारण
टीम अक्षरनामा
  • प्रातिनिधिक चित्र
  • Fri , 27 March 2020
  • पडघम देशकारण जनता कर्फ्यु Janta curfew नरेंद्र मोदी Narendra Modi विषाणू Corona virus करोना Corona करोना व्हायरस Coronavirus

करोना व्हायरसच्या निमित्ताने आपल्या देशासह जगभरच हलकल्लोळ माजला आहे. अनेक देशांमध्ये ‘लॉक डाऊन’ जाहीर झालेला आहे. आपल्या देशातही २५ मार्चपासून २१ दिवसांचा ‘लॉक डाऊन’ जाहीर झालेला आहे. त्याआधी २२ मार्च रोजी ‘जनता कर्फ्यु’ पाळला गेला. सर्वांना घरीच थांबावे लागत आहे. एक प्रकारची सक्तीची नजरकैद असावी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यानिमित्ताने सोशल मीडिया (फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, व्हॉटसअ‍ॅप इ.) वर जे विनोद, मीम्स, भाष्य, निरीक्षणे, अनुभव लोक मांडत आहेत आणि जे या गंभीर संकटाच्या काळातही फेक न्यूज, द्वेष, घबराट, भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यातून गंभीर संकटाच्या काळात आपल्या जीवनशैलीविषयी, विचार करण्याच्या पद्धतीविषयी, व्यवस्थेविषयी, सरकारकडून असलेल्या अपेक्षांविषयी, नैतिक आणि सामाजिक जबाबदारीविषयी, किमान शिस्त व स्वावलंबनाविषयी अनेक प्रश्न निर्माण होताना दिसत आहेत. या प्रश्नांची मुळं आपल्या एकंदर जीवनशैलीत दिसतात. अतिआत्मविश्वास, नैराश्यमय मानसिकता, संकटांचे गांभीर्य आणि संकटांचा सामना करण्याचे आपले नीतीधैर्य, यांबाबतीत आपण एरवी बऱ्यापैकी गाफील असल्याचे दिसून येत आहे.

दिवंगत ज्येष्ठ संपादक अरुण टिकेकर यांचं ‘सारांश’ या नावाचं एक छोटंसं पण अतिशय उत्तम पुस्तक आहे. २००१ साली प्रकाशित झालेल्या या पुस्तकात ‘समकालीन समाजाच्या संस्कृतीविषयी सात निबंधां’चा समावेश आहे. ‘नेतृत्वाचे प्रशिक्षण’, ‘इतिहासाचे ओझे’, ‘साहित्याचे समाजशास्त्र’, ‘अभिव्यक्ती-स्वातंत्र्याचे राजकारण’, ‘संस्कृतीचा अपकर्ष’, ‘जीवनशैलीचा अभाव’ आणि ‘समाजमनाचे अस्वास्थ्य’ असे हे सात निबंध आहेत. त्यातील ‘जीवनशैलीचा अभाव’ आणि ‘समाजमनाचे अस्वास्थ्य’ हे शेवटचे दोन निबंध सध्याच्या वातावरणात प्रत्येकाने आवर्जून वाचावेत असे आहेत.

पण सध्याच्या काळात सर्वांनाच हे पुस्तक मिळेल याची शाश्वती नाही. त्यामुळे ज्यांना ते मिळेल वा ज्यांच्याकडे ते असेल, त्यांनी ते वाचायला हवे. त्यातील हे दोन निबंध आपले मित्र-नातेवाईक-स्नेही यांनी पाठवायला हवेत.

त्याचबरोबर अजून एक गोष्ट करायला हवी. ती म्हणजे ‘आपण असे का आहोत? किंवा नेमके कसे आहोत?’ याविषयी आत्मपरीक्षण\ आत्मचिकित्सा\ आत्मटीका करून पाहण्याचीही नितांत निकडीची गरज आहे. त्यासाठी पुढे काही प्रातिनिधिक प्रश्न दिले आहेत. ते प्रत्येकाने स्वत:ला विचारून त्यांची उत्तराने शोधण्याचा प्रयत्न करून पाहायला हरकत नाही.

१) वाचलेल्या प्रत्येक गोष्टीवर आपण विश्वास ठेवावा का? तो आंधळा विश्वास ठरू शकेल का?

२) आपण इतरांना शिस्त पाळायला, नियम पाळायला सांगतो की, त्या गोष्टी स्वत: आधी करतो?

३) आपण कुठल्याही गंभीर घटनेचं गांभीर्य मीम्स, विनोद यांनी घालवून तर टाकत नाही ना? किंवा त्याची ‘स्ट्रेस बस्टर’ म्हणून भलावण तर करत नाही ना?

४) आपण, आपलं कुटुंब आणि समाजाच्या व्यापक भल्यासाठी काही मर्यादित काळासाठी घातलेले निर्बंध स्वीकारायला आपण इतके का नाखूश असतो?

५) आपण कुणाच्याही भूलथापांना बळी का पडतो? सत्य जाणून घेण्याबाबत आपण उदासीन का असतो?

६) व्हॉटसअ‍ॅपवर येणारी ९० टक्के फॉरवर्ड ही फेक आणि तद्दन फालतू असतात, आपण ती तशीच इतरांना फॉरवर्ड का करतो? इतरांचा आनंद, सुख, खुशी याबांबत आपण इतके बेफिकीर आणि बेलगाम का असतो?

७) ज्या गोष्टीचा आपल्याला खुलासा करता येत नाही, ज्याची आपल्याला खातरजमा करता येत नाही, त्या गोष्टी आपण इतरांना फॉरवर्ड का करतो? चुकून एखाद वेळी समोरच्यानं कान उपटले की, हे खरं आहे की नाही हे पाहण्यासाठीच तुम्हाला पाठवलं होतं, अशी मखलाशी का करतो?

८) देशाचे पंतप्रधान जाहीरपणे भारतीय जनतेला संबोधित करत असतील, तर त्यांचं म्हणणं शेवटपर्यंत नीट ऐकून घेऊन, शंका असलेल्या विधानांबाबत, संकल्पनांबाबत इतर माध्यमांद्वारे खुलासा करून घेण्याइतपत धीर आपल्याला का धरवत नाही?

९) ‘वर्क फ्रॉम होम’ या संकल्पनेवरून बायकांची आणि प्रसंगी स्वत:ची खिल्ली उडवणारे विनोद, मीम्सच आपल्याला का सुचतात?

१०) करोना व्हायरसच्या भीतीपोटी ऑफिस\कंपनीने सुट्टी दिल्यानं वेळ कसा घालवावा, हा खरोखरच प्रश्न पडावा इतकं ‘कारकुनीछाप’ आयुष्य आपण जगतो का?

११) ऑफिस, बायको-मुलं, नातेवाईक यांव्यतिरिक्त स्वत:ची म्हणून जोपासलेली एकही आवड\छंद आपल्यापैकी बहुतेकांना का नसतो?

१२) आपल्याला मिळालेल्या रिकाम्या वेळाचं काय करावं, याचा सेन्स डेव्हलप न केल्यामुळे आपण सोशल मीडियावर फालतूपणा करत राहतो? की कळतं पण वळत नाही, या प्रकारातलं हे वागणं आहे?

१३) आयुष्यभर कुठलीही एकच गोष्ट करणं ही समाज-विकृती आणि वैयक्तिक-विकृती आहे, हे एरवी पाश्चात्यांचं अनुकरण करणाऱ्या आपल्या कधी लक्षात येणार?

१४) माणूसपणाच्या, माणुसकीच्या, नैतिकेच्या, शिस्तीच्या, प्रभावी उपाययोजनेच्या, नीतीमूल्यांच्या, लोकशाहीच्या, स्वातंत्र्य-समता-बंधुतेच्या ज्या गप्पा आपण एरवी मारत असतो, त्या आणीबाणीच्या\संकटाच्या काळात आचरणात का आणत नाही?

१५) कुठल्याही गंभीर प्रश्नाबाबत स्वत:ला नीट माहिती नसताना इतरांना सल्ले देण्याची दुर्बुद्धी आपल्याला कशी काय सुचते?

१६) जीवनावश्यक वस्तूंसाठी आपण ‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग’ निर्माण केला आणि त्यांचा अनावश्यक साठा केला, तर इतरांना त्या मिळणार नाहीत, त्यांना त्यांपासून वंचित करणं हा सामाजिक गुन्हा, नैतिक अपराध, कायदेशीर गाढवपणा आहे, हे आपण कधी समजावून घेणार?

१७) थोडीशी मागणी वाढली की, भाज्यांपासून किराणा मालापर्यंत अनेक गोष्टींचे भाव कसे काय वाढतात? हा भ्रष्टाचार नाही का? अशा वस्तूंची विक्री करणारे आणि त्या विकत घेणारे इतर वेळी इतरांच्या भ्रष्टाचारावर तोंडसुख घेत असतात, तेव्हा त्यांचा ‘कॉमनसेन्स’ कुठे गेलेला असतो?

१८) आपली जीवनशैली दोषपूर्ण नाही ना, याचा आपण आयुष्यात किती वेळा विचार करतो?

१९) आपण सोडून इतर सगळे सुमार बुद्धीचे किंवा आपण सोडून इतर सगळे रोगी, संशयित, हा दुटप्पीपणा आपल्या संस्कृतीचा भाग आहे की, आपल्या मध्यमवर्गीय जीवनशैलीचा? की आपल्या मतलबी वृत्तीचा?

२०) आपला कॉमनसेन्स कॉमनली अब्सेंटच का असतो?

२१) स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे, हे आपण कधी नीटपणे समजून घेणार?

२२) मर्यादित निर्बंध म्हणजे जुलूम-जबरदस्ती नव्हे, हेही आपण कधी नीटपणे समजून घेणार?

२३) व्यापक समाजहितासाठी काही कटु निर्णय घेतले जातात, तेव्हा ते फारसे न्याय्य नसले तरी प्राप्त परिस्थितीत समर्थनीय असतात, हे समजावून घेणं आपल्याला का जमत नाही?

२४) आपला सरकारविरोध जळीस्थळीकाष्ठीपाषाणी अग्निहोत्रासारखा सुरूच का राहतो? मतभेदांना आणि मतस्वातंत्र्यालाही स्थळ-काळ-वेळ यांच्या मर्यादा असतात, हे स्वत:ला विद्वान, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते म्हणवणारेही समजून घेत नाहीत, तेव्हा त्यांची कीव करावी की त्यांच्याबद्दल दया दाखवावी?

२५) नीट वाचणं, नीट समजून घेणं, नीट ऐकणं, नीट ऐकवणं, नीट बोलणं आणि नीट बोलायला देणं, याबाबतीत आपण फारसे दक्ष का नसतो?

२६) बोलणं, ऐकणं, वाचणं आणि लिहिणं ही चार प्राथमिक भाषिक कौशल्यं मानली जातात. या भाषिक कौशल्यांचं पर्यवसान अनुक्रमे उत्तम श्रोता, चांगला वाचक, बरा वक्ता आणि जेमतेम लेखक असं व्हायला हवं. पण तसं बहुतेकांच्या बाबतीत होताना दिसत नाही? हा आपल्या जीवनशैलीचा परिणाम आहे? आपल्या शिक्षणपद्धतीचा आहे की, आपल्या ‘जुगाडू’ कौशल्याचा आहे?

२७) कर्फ्यु, जमावबंदी, संचारबंदी आणि लॉक डाऊन या शब्दांचा अर्थ आपल्यापैकी कितीजणांनी व्यवस्थितपणे समजावून घेतले? त्यासाठी शब्दकोशाचा वापर केला?

२८) प्रत्येक नियमामधून पळवाट काढण्याचा आणि प्रत्येक समस्येवर ‘जुगाड’ करण्याचा आपल्याला इतका सोस का असतो?

२९) आपल्या रोजच्या आयुष्यातला जेवढा वेळ आपण मनोरंजनासाठी देतो, त्याच्या दशांश वेळ तरी वाचनासाठी देतो का?

३०) ज्या सेवा-सवलतींची मागणी आपण आपल्या ऑफिसकडून\कंपनीकडून करतो, तशा प्रकारच्या सेवा-सवलतींची मागणी आपल्या घरी काम किंवा आपल्यासाठी काम करणाऱ्यांनी केली तर आपण कसे वागतो?

३१) व्हॉटसअ‍ॅपने आपले कान हलके केले आहेत की, मुळात आपले कान हलके आहेत?

३२) तारतम्यपूर्ण विचार आणि विवेकशील कृती, या गोष्टींशी सुशिक्षित, बुद्धिजीवी, बुद्धिवादी म्हणवणाऱ्या आपल्यातील अनेकांचा सुतराम संबंध का नसतो?

३३) कृतीमागचा विचार आणि विचारामागची कृती, या दरम्यान आपण आपलं काहीतरी, कधीतरी पणाला लावतो का? मुळात या दोन्हीपैकी एखादी तरी गोष्ट आपण पुरेशा गांभीर्यानं आणि सातत्यानं करतो का?

३४) आपल्याला जी बातमी समजली आहे, ती आपल्यासोबत किंवा आपल्या आधी इतरांनाही समजलेली असू शकते, असा विचार आपण आपल्याला आलेला कुठलाही व्हॉटसअ‍ॅप फॉरवर्ड पुढे फॉरवर्ड करताना किती वेळा करतो?

३५) आपण इतके हळहळे-हुळहुळे असल्यासारखे का वागतो? उतावळेपणा, भांडखोरपणा, चढाईखोरपणा आणि बढाईखोरपणा करण्यात आपण कायम आघाडीवरच का असतो?

३६) आपला नक्की कुणावर विश्वास नसतो –स्वत:वर, समाजव्यवस्थेवर, सरकारच्या आश्वासनांवर की, इतर लोक आपल्या वाट्याला काही येऊ देतील यावर?

३७) आपण संसदीय लोकशाही ही शासनपद्धती स्वीकारलेली असलेली तरी आपल्या दैनंदिन जगण्यात आपण कितीसे लोकशाहीवादी आहोत? ‘लोकशाही ही केवळ शासनप्रणाली नसून ती जीवनप्रणालीसुद्धा आहे’ हे वाक्य आपल्यापैकी अनेकांनी वाचलेलं असतं, पण आपल्यापैकी कितीजण या वाक्याचा प्रत्यक्ष जगण्यात वापर करण्याचा प्रयत्न करतात?

३८) घटना (Fact), वास्तव (Reality) आणि Truth (सत्य) यांतील फरक समजावून देणारं एखादं वर्तमानपत्र (मराठी\हिंदी\इंग्रजी), नियतकालिक किंवा पोर्टल आपण बारकाईनं, गंभीरपणे वाचतो का? त्यासाठी दिवसभरातला किती वेळ देतो?

३९) शहाणा समाज (Sane Society), संपन्न समाज (Affluent Society), नागरी समाज (Civil Society), लोकशाहीवादी समाज (Democratic Society) यांपैकी आपण कुठल्या संकल्पनेत बसू शकतो?

४०) रिकामा वेळ किंवा फावल्या वेळात आपण एरवी काय करतो? घरीच लोळत पडतो, कुटुंबासोबत बाहेर फिरायला किंवा बागेत जातो? रात्री हॉटेलात जेवायला जातो? किंवा नातेवाईकांकडे फिरायला जातो? या यादीत अजून किती गोष्टींचा समावेश करता येईल?

४१) दिवसातल्या २४ तासांचं नियोजन आपण कधीतरी शांतपणे बसून करायचा प्रयत्न केला आहे का?

४२) कंटाळा, दुर्गुण आणि दारिद्रय या तीन अरिष्टांवर एकाच गोष्टीनं मात करता येते, ती म्हणजे सतत कुठल्या ना कुठल्या कामात असणं. पैशासाठी नोकरी करण्याव्यतिरिक्त आपण घरातली, घराबाहेरची किती कामं करतो? समाजसेवा, देशसेवा करण्यासाठी आठवड्यातला, महिन्यातला, वर्षातला किती वेळ किंवा किती तास देतो?

४३) जॉर्ज ऑर्वेल या प्रसिद्ध ब्रिटिश कादंबरीकार-पत्रकारानं असं म्हटलं आहे की – ‘माणूस काही परिपूर्ण नाही. त्याला अधिक स्वातंत्र्य, पौष्टिक अन्न आणि चांगलं काम दिलं तर त्याच्यामध्ये पुष्कळच सुधारणा होईल.’ आपण या विधानाला किती टक्के खरे उतरू?

४४) एक टक्का लोक विचार करतात, नऊ टक्के आपण विचार करू शकतो असा विचार करतात आणि उरलेले नव्वद टक्के एकवेळ जीव देतील पण विचार करणार नाहीत, असं म्हणतात. आपण नेमके कुठल्या गटात मोडतो?

४५) Work ethic (कामाचे नीतीशास्त्र) आणि Work culture (कार्यसंस्कृती) या दोन्ही संकल्पना आपण नीट समजावून घेतो का? या दोन्ही संकल्पना आपण सक्ती आहे म्हणून स्वीकारतो की, तो आपल्या जीवनशैलीचा भाग असावा म्हणून?

४६) श्रेष्ठत्वापेक्षा समता अधिक महत्त्वाची असते आणि स्वातंत्र्यापेक्षा न्याय अधिक महत्त्वाचा असतो, याविषयी आपण कधी विचार केला आहे का?

४७) आपले विचार आणि आपला आचार यात नेमकी किती विसंगती आहे, याची कधीतरी आपण मनातल्या मनात तरी उजळणी करतो का?

४८) माणसांनी माणसांशी माणसांसारखे वागावं ही अगदी साधी अपेक्षा आहे, असं म्हणतात. याबाबतीत आपण कुठल्या श्रेणीत पासू होऊ?

४९) ‘भूक लागल्यावर खाणं ही प्रकृती, आपल्या ताटातली अर्धी भाकर भुकेल्याला देणं ही संस्कृती आणि भूक नसतानाही खाणं ही विकृती’ असं विनोबा भावे यांनी म्हटलं आहे. प्रकृतीचं ठीक आहे, पण संस्कृती व विकृती यांबाबतीत आपण नेमके कुठे आहोत?

५०) आपण राजकारणी, सिने अभिनेते-अभिनेत्री, सामाजिक कार्यकर्ते, विरोधक अशा अनेकांना फुकटचे सल्ले देत असतो, त्यांना वेळोवेळी सेन्सॉर करत असतो, पण आपण कधी स्वत:ला सल्ला देतो का? स्वत:च स्वत:ला सेन्सॉर करतो का?

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

Prashant

Fri , 27 March 2020

sir, very very good article.प्रत्येकाने आपापले आत्मपरीक्षण करावे असे उत्तम विवेचन आपण केले,धन्यवाद.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......