अजूनकाही
“Public health is inherently a somewhat fascist discipline. It accepts that we must sometimes violate the rights of a few to protect the health of the many.”
हे भयंकर वाक्य एका पुस्तकात वाचले. भारतावर सध्या राज्य करणारी हिंदुत्ववादी विचारधारा तसं वागणारच नाही, याची शाश्वती नाही. एलिझाबेथ पिसानी यांनी ‘The Wisdom Of Whores : Bureaucrats, Brothels And The Business Of Aids’ या नावाचे एक पुस्तक (२००८) लिहिले आहे. त्यात त्यांनी एके ठिकाणी सार्वजनिक आरोग्यात आपापत: कशी एक फॅसिस्ट किनार असते ते सांगून पुढे सार्सनामक साथीच्या रोगाला अटकाव करताना कसे लोकांचे मानवी हक्क सत्तेने ताब्यात घेतले याचे उदाहरण दिले आहे. एड्सचा फैलाव झाल्यावरही त्यावर मात करताना मानवी हक्कांची जागा शाबूत ठेवून सार्वजनिक आरोग्य कसे टिकवले गेले तेही त्या या पुस्तकात समजावून सांगतात.
एड्सला रेसिझम अर्थात वर्णवादाचीही एक ठळक बाजू होती. तीही हळूहळू नाहीशी झाली. जनता निर्जंतुक करण्यासाठी तीवर जबरदस्ती करावी लागली. निर्जंतुकीकरण आणि शरणागती यांचे नाते अभिन्न असते, असा एक निष्कर्ष अॅलेन कॉर्विन या लेखकाने फ्रान्सच्या सामाजिक अभ्यासातून काढला आहे. स्वच्छतेचा आग्रह एक प्रकारची शिस्त आणि व्यवस्था उत्पन्न करत असते, हेही तो बजावतो.
श्रमिकांच्या अंगातून जे दुर्गंध येत, त्यावर फ्रेंच अभिजनवर्गाने उपाय म्हणून स्वच्छतेची सक्ती केली आणि सुगंधाचाही शोध लावला. थोडक्यात मानवी शरीरामधून स्रवणारी द्रव्ये जशी विषमता उत्पादक, तशी या शरीरातून बाहेर पडणारे सूक्ष्म जीवाणू व विषाणूही धोकादायक, अपायकारक अशी मांडणी रोगराईसंदर्भात केली जाते. पण जे दुर्गंध श्रमिकांच्या अंगांमधून बाहेर पडतात, तेच श्रीमंतांच्याही पडत. मात्र त्यांना श्रमिकांवर ताबा मिळवायला काही निमित्ते हवी होती. ती त्यांना घाणेरड्या वासात सापडली. भारतात अस्पृश्यांना याच कारणांनी गावकुसाबाहेर ठेवले गेले. अस्पृश्यताही नेमकी अंगमेहनत करणाऱ्यांना आणि त्यामुळे अनेक कौशल्ये अंगी बाणवऱ्यांना चिकटवली गेली.
करोना व्हायरस आणला कोणी? तो परदेशात गेलेल्या अभिजनांनीच आणला आणि पसरवला, असा एक व्हॉटसअॅप संदेश मला एकाने वाचायला दिला. तसे सर्वेक्षण कोणी केलेले नाही. मात्र जातीय वा वर्गीय उगम शोधण्याऐवजी या रोगराईचा उपयोग विद्यमान सत्ताधारी त्यांच्या जातीय, धर्मीय, लोकशाहीविरोधी आणि राष्ट्रवादी विचारांचा फैलाव करायला टपलेले आहेत का, याचा छडा लावणे उचित होईल. वाट्टेल ते करून नियंत्रण मिळवायचे ही त्यांची शैली गेली सहा वर्षे देशाने अनुभवली आहे. नीतीमत्ता अथवा संकेत पूर्णपणे धुडकावत हा परिवार अनिर्बंध कारभार करू लागला आहे. तो आजाच्या दुर्घटनेचा वापर करू शकेल का?
१८९५-९६ साली महाराष्ट्रात आधी दुष्काळ आला, मग प्लेग. साथीचा रोग असल्याने प्लेग संपवण्यासाठी औषधोपचारापेक्षा ‘क्वारंटाईन’ अर्थात विलगीकरण इंग्रजांनी सक्तीचे केले. रुग्ण शोधायला घरात शिरून पाहणी करणे, घरदार जाळून टाकणे, सक्तीने गावाबाहेर माणसे हलवणे असे बचावात्मक उपाय इंग्रजांनी रँडनामक अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली पुण्यात योजले. त्याने अत्याचार केले, असा आरोप करून त्याची हत्याही करण्यात आली. या हत्येचा आरोप टिळकांवर करण्यात आला होता. तेव्हा ब्राह्मणांनी प्लेगविरोधाचे नेतृत्व केले होते. कारण धर्म भ्रष्ट होत होता.
आताचा भारताचा करोनाविरोधातील संघर्ष पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली सुरू झाल्याचा व्यवस्थित प्रचार सर्वत्र आरंभला आहे. त्या वेळी मोदींनी जाणीवपूर्वक महाभारताचा दाखला दिला. महाभारतातील युद्ध १८ दिवसांत संपले, आपण करोना विरोधातील लढाई २१ दिवसांत संपवू असे ते म्हणाले. १८ दिवस सारथी कृष्ण होता, २१ दिवसांचा सारथी १३० करोड देशवासी असतील असेही ते म्हणाले. कृष्णाचे पात्र लोकांना देऊन आपण अर्जुन असल्याचे मोदींनी सुचवले आहे. हा अर्जुन स्वकियांवर हल्ला करणारा असल्याने मोदींनी बरोबर ही उपमा योजून आपणही तसेच करणार आहोत हेही स्पष्ट केले.
रोगराई हटवण्याच्या उपायांना युद्ध संबोधणे, उपाय देशसेवा-राष्ट्रधर्म ठरवणे, नवरात्रीचा उपास करताना रोज नऊ जणांना जेवायला घाला असे आवाहन करणे, मात्र रात्रीच्या दोन्ही भाषणांत गोरगरिबांचा मुळीच उल्लेख न करणे, असे मोदी आपण पाहत आहोत. ते व त्यांचा परिवार भारतीय जनता आणखी कोणकोणत्या निमित्तांनी आवळून धरता येईल असे प्रयोग करण्यात यशस्वी होत चालली आहे.
पुलवामा, बालाकोट यांनी मोदींना पुन्हा सत्ता मिळवून दिली. आता एका विषाणूने त्यांना सत्ता अजून कशी व्यापक व सखोल करायची याची संधी देऊन टाकली आहे. म्हणून सार्वजनिक आरोग्याची व फॅसिझमची सांगड घालूनच आपण आताचा काळ निरखला पाहिजे.
(फॅसिझम जिथे जन्मला त्या इटलीत करोनाचे चार हजारावर बळी गेले. मरणाऱ्यांत ८५ टक्के लोक ७० वर्षांवरील वृद्ध होते. इटलीत लोकशाही नांदते. मात्र उजव्या पक्षांचे सरकार तिथे सध्या आहे. या आधीही बरीच वर्षे उजवी सरकारे तिथे नांदली. पर्यटनामुळे हा देश एवढा करोनाग्रस्त झाला. आताचे इटालियन राज्यकर्ते जागतिकीकरणविरोधी, देशांतरविरोधी आहेत.)
करोनामुळे या उजव्या पक्षांना नक्कीच बळ मिळेल. कारण बाहेरून आलेले हे संकट अतिऔदार्यामुळे ओढवले; सबब उदारता, सहिष्णुता आणि सर्वसमावेशकता स्वीकारायची नाही, हा त्यांचा उजवा विचार त्यांना ते पटवून देणारच! उजवे पक्ष जहाल राष्ट्रवादी असून धर्म, वर्ण, वंश, भाषा, जीवनशैली याबाबतीत अत्याग्रही असतात. इस्लाम सध्याचा त्यांचा शत्रू आहे. मुस्लीम घाणेरडे, असंस्कृत, असभ्य आणि मागासलेले आणि हट्टी, अडाणी असतात, असाही त्यांचा समज आहे. त्यामुळे जसे दहशतवाद, मूलतत्त्ववाद, धर्मनिष्ठा, परंपरा इ. गोष्टी त्यांनी पसरवल्या, तसा हा करोनासुद्धा फैलावायला तेच जबाबदार असल्याचा कांगावा हे उजवे करू शकतात.
वांशिक शत्रू आणि शुद्ध रक्ताचा आग्रह यांनीच नाझींनी लाखो ज्यूंची कत्तल केली होती. क्वारंटाईन आणि नागरिकत्व सिद्ध न करता आलेले (मुस्लीम) नागरिक यांच्यासाठी उभ्या करण्यात आलेल्या छावण्या यात साम्य शोधायला आता सुरुवात झाली आहे. मुसलमान समुदाय त्यांच्या वस्त्यांत कसे करोनाचे नियम धुडकावत आहेत, याच्या बातम्या पसरत चालल्या आहेतच. शाहीनबागेतील सत्याग्रह जबरी करून उठवण्यात आल्याचे स्वागत हिंदुत्ववाद्यांनी ज्या उत्साहाने केले, त्याने हळूहळू एक प्रयोग साध्य होत चालल्याचे दिसलेच आहे.
निमित्त करोना विषाणूचे आहे. त्याचा धोका सर्वांनाच सारखा आहे. मात्र राज्यकर्ते या निमित्ताने आपली सत्ता, राजकीय तत्त्वज्ञान आणि संस्कृती लादण्याचा प्रयत्न करणार. संधीचा उपयोग न करणारे ते यशस्वी राजकारणी कसचे? पाकिस्तानात तब्लीगी जमातने कसे हजारो मुस्लीम एकत्र आणून करोना विषाणूला निमंत्रणच दिले, अशी एक बातमी एका हिंदी वाहिनीने प्रसृत केली.
मुसलमानांची अतिरेकी धर्मश्रद्धा, एकजूट, बेफिकीर वृत्ती आणि धार्मिक नेत्यांकडून वापरले जाण्याची शक्यता, या बाबी गृहित धरल्या तरी त्यांचे दारिद्रय, बेकारी, रिकामपण, अज्ञान याही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत.
येमेन, सिरिया, लिबिया, पॅलेस्टाईन या देशांत कायम युद्धसदृश्य परिस्थिती का? गेली सहा वर्षे येमेनवर सौदी अरेबिया व तिचे मित्र देश कोणाच्या सांगण्यावरून हल्ले करत आहेत? इसिसला निधी कोण पुरवत राहते? मुस्लीम राष्ट्रे एकमेकांवर का हल्ले करत आहेत? हे प्रश्न कोणती वाहिनी का चर्चेत आणत नाही?
एकूण काय, भारतीय नमुन्याचा फॅसिझम डावे, मुस्लीम, ख्रिस्ती यांच्यासह लोकशाही, धर्मनिरपेक्षता, समाजवाद आणि सामाजिक न्याय यांवर हल्ले चढवत स्थापन होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. एका भयंकर साथीच्या रोगाचीही साथ त्याला मिळणार… सोशल डिस्टन्सिंग अर्थात सामाजिक दुरावा, सामाजिक अंतर ठेवल्यास करोना अटोक्यात येईल, असे सांगता सांगता जुनी सामाजिक ‘जातीय अंतर’ ठेवून वागण्या-बोलण्याची परंपरा बळकट करण्याचे प्रयत्न या निमित्ताने उगवले तर…
.............................................................................................................................................
लेखक जयदेव डोळे माध्यम विश्लेषक आहेत.
djaidev1957@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment