अजूनकाही
एक विषाणूने साऱ्या जगात थैमान घालायला सुरुवात केली त्याची ही गोष्ट. हे प्रकरण सुरू कुठेतरी होतेय, आपला त्याचा संबंध बातमीपुरता, असे वाटेपर्यंत तो वाऱ्याच्या वेगाने माझ्या उंबरठ्यापर्यंत येऊन पोचला. एरवी जगात अनेक ठिकाणी संघर्ष चालू असतो, युद्ध चालू असते, त्याच्या बातम्यादेखील आपण पाहत नाही. चेर्नोबिल येथे अणुस्फोट झाला, केरळात महापूर आला, सिरिया बॉम्बस्फोटाने उदध्वस्त झाला, आमच्या ‘डोक्याइतुक्या’ विस्तारातील विश्वात काही फरक पडत नाही. ते नित्य निवांत सुरू असते.
मात्र या विषाणूने एका भीषण अर्थाने जग जवळ आणून ठेवले आहे.
एखाद्या भयाकारी हॉलिवुडपटातील सिनेमात शोभावी अशी परिस्थिती आमच्यावर प्रत्यक्षात आली आहे.
पाच दिवसांपासून मी स्वतःला बंदिस्त करून घेतले आहे. तसा पाच दिवसांपूर्वीचा माझा प्रवास मी काटेकोर काळजी घेतच पार पाडला होता. सगळ्या सूचना, सगळे नियम पाळले. संपूर्ण २१ दिवस पाळणार आहे. या विषाणूचा संपर्क घडू नये यासाठी जे जे आवश्यक ते चालू आहे.
मात्र या बंदिस्त अवस्थेत एका वेगळ्याच मनःस्थितीला आता मला सामोरे जावे लागते आहे.
याची मला अजिबात कल्पना नव्हती.
वास्तविक लेखन-वाचन हाच नित्यक्रम स्वीकारलेल्या माणसाला आवश्यक, आवडणारा एकांत मिळाला, अजून काय हवे?
एकांत आहे खरा, पण त्याला एका अशुभ वास्तवाची चौकट बसली आहे.
जन्मठेपेची शिक्षा झालेल्या माणसाला एकांत मिळतो. स्मशानभूमीत रखवाली करणारा एकांतातच असतो. किर्र जंगलात वाट हरवलेल्या माणसाला तर महामूर एकांत.
असा एकांत काय कामाचा?
तरीही निर्धार करून, माझे सारे संकल्प घेऊन मी कागद-पेन सरसावून बसतो. पण मन सैरभैर. सतत विषाणूच्या संकटाचा, भवितव्याचा विचार. नीट न मळलेल्या मातीची मूर्ती ढासळत राहावी, तसे माझे शब्दांचे डोलारे ढासळत राहातात. शब्दाआड विषाणूच्या गुंफणीने माळ तुटत राहाते.
त्यात माहितीचा महापूर. त्या लोंढ्यात माझ्या नाकातोंडात पाणी. कुणी काळंकुट्ट चित्र रंगवतं, कुणी तथ्यविहीन आशादायी. कुणी रुक्ष वैज्ञानिक. कुणी बाष्कळ विनोद. ते विनोद मला एखाद्या अंत्ययात्रेत कुणी विदुषकी चाळे करावेत तसे वाटतात.
शेवटी सगळ्या सूचनांचा माझ्यापुरता एक लसावि काढून मी सतत हात धुण्याचे तंत्र अंगीकारले आहे.
आता हा नवा मंत्रचळ माझ्या मागे.
सकाळी उठून खाली गेलो. संगणक चालू करून मेल चेक केले. कोऱ्या कागदाची फाईल उचलली. त्यावर ठेवलेले हेल्मेट बाजूला ठेवले. टेबलावरची पुस्तकं नीट लावली. वर आलो.
आता विचार येतोय, तेथे अनेक जण येतात-जातात. त्या पुस्तकांना आधी कुणी हात लावला असेल का? हेल्मेट तिथेच ठेवले होते, ते कुण्या विषाणूबाधित माणसाने हाताळले असेल का?
विषाणू अशा वस्तूंवर अनेक तास जिवंत राहतात.
मग मी वर येऊन हात धुतले खरे, पण ते चेहऱ्यावर हात लावण्याआधी की नंतर?
तसा मी माझा प्रदीर्घ प्रवास चेहऱ्यावर बोटाचा स्पर्शही न करता पूर्ण केला होता. पण त्या वेळी इतर व्यवधाने होती. भोवताली त्या उडत्या दुनियेत जणू एक छोटं विश्व एकवटलं होतं.
आता मी एकांतवासात. सोबत माझा चेहरा आणि हात. ते लावायचे नाहीत ठरवल्यापासून चेहऱ्याचा प्रत्येक भाग खाजवण्यासाठी हुळहुळतो आहे.
जणू ते दुसऱ्या कुणाचे हात आहेत, मी त्यांना आवरण्याचा आटोकाट प्रयत्न करतो आहे.
मी उठून चांगला मिनिटभर हात धुतो, मग चेहरा ठीकठाक करतो.
मग विचार येतो, मी हात धुतले खरे, पण नळ बंद करताना नळाची तोटी कुठे धुतली?
आता या विषाणूने नाही, एका ‘भयाणू’ने माझ्या मनात प्रवेश केला आहे.
हा भयाणू शिंकण्याने, स्पर्शाने नव्हे, नुसत्या विचाराने संक्रमित होतो.
या भयाणूने माझे सारे अंतरंग विषसंकुल झाले आहे. सारे संकल्प संक्रमित झाले आहेत. काय करायचं वाचून, काय करायचं लिहून? काय होणार उद्याचं, या जगाचं?
आता या सक्तीच्या भयाण एकांतात, विषाणूपासून बचाव करता येईल, पण भयाणू कसा दूर ठेवता येईल? सर्पयज्ञ करणाऱ्या, तक्षकापासून बचाव करू पाहाणाऱ्या जन्मेजयासारखी माझी अवस्था झाली आहे.
मग लक्षात येतं, भय संकटाचे एवढे नसते, जेवढे भयाचे असते. संकट निर्माण करणाऱ्या प्रत्येक घटनेत पहिले संक्रमित होतो भयाणू. आमच्या जन्मापासूनच संक्रमित झालाय तो आमच्या मेंदूत, आणि आता फक्त सक्रिय होतो अशा प्रत्येक संकटात.
तो विषाणूपेक्षा जास्त भयावह आहे. त्रासदायक आहे.
तो आम्हाला वस्तूंचे संचय करायला लावतो. स्वार्थी करतो. रात्रीची झोप उडवतो. दिवसा बेचैन करतो. संभाव्य संकटाचे मृगजलद जमा करतो भोवताली. मनावर मळभ धरतो.
विषाणू येतील, जातील. आता ते आमचे सोबती आहेत. त्यांच्यापासून मुक्ती नाही. कधी नव्हती आणि नसतेही.
मुक्ती हवी भयापासून.
मी शांतपणे पुलंचं एक पुस्तक उचलतो. हजार वेळा वाचलेलं. हास्याचा एक मास्क तयार करतो. चेहऱ्यावर चढवतो. भयाणूचे हात धुवून टाकतो. मन स्वच्छ करतो, आणि आल्या दिवसाला सामोरा जातो.
आता एवढंच माझ्या हातात आहे.
............................................................................................................................................................
लेखक डॉ. नंदू मुलमुले मानसरोगतज्ज्ञ आहेत.
nandu1957@yahoo.co.in
............................................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment