अजूनकाही
करोना व्हायरसने जगाचीच आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय टिकटिक थांबवलीय. भारतातही आता सक्तीची स्थानबद्धता अनुभवावी लागतेय. गंमत म्हणजे गेले ६ महिने स्थानबद्धतेत असलेले अब्दुल्ला पिता-पुत्र मुक्त केले गेले आणि देश २१ दिवसांसाठी लॉकडाऊन केला गेला. हे म्हणजे एक शिक्षा संपवून जेल बाहेर पडणाऱ्या कैद्यावर लगेच दुसरे पकड वॉरंट जारी केल्यासारखेच! असो.
तर आता अनेक भाकडकथांप्रमाणे लॉकडाऊनमुळे घरोघरी नातेसंबंध घट्ट होऊ लागलेत वगैरे बातम्या पसरू लागल्यात. यंदा पाडव्याच्या शोभा यात्रा, संचलने रद्द करावी लागल्याने घरबसल्या आपला अजेंडा राबवत बसवायला ही तर आयतीच संधी. त्यामुळे गोमूत्र पिऊन किंवा थाळी घंटा नादातून बॅक्टेरिया फ्री भक्तांना पुढचे २१ दिवस हे नवनव्या भाकडकथा रचून व्हायरल करायला वेळच वेळ आहे.
जनता कर्फ्यू संपवताना जो काही अडाणीपणा भक्त व सामान्यजनांनी दाखवला आणि दुसऱ्या दिवशी घराबाहेर पडून जी काही अलोट फजिती केली ‘राष्ट्र के नाम संदेश’ची, त्यातून केंद्र सरकार काही शिकलेय असं दिसत नाही. उलट अनेक राज्यांनी ३१ मार्चपर्यंत लॉकडाऊन केलेले असताना प्रधानसेवकांनी पाडव्यापासून २१ दिवस देश लॉकडाऊन करत असल्याची घोषणा केली. दिल्लीसह अर्धा देश संयमाने लॉकडाऊन अंमलात आणत असताना राज्यांवर कुरघोडी करण्याच्या बालीश राजकारणाने उलट काही काळ गोंधळच उडाला. कुशल प्रशासक नसला की, भावनिक उमाळे काढावे लागतात. त्यात अंधभक्तांच्या टोळ्या आणि आश्रितमाध्यमे सोबत असली की, वातावरण निर्मितीत भर पडते.
मोदी सरकार सत्तेत आल्यापासून प्रसिद्धी माध्यमांचा कणा जसा ‘इलॅस्टिक’चा झाला, तसाच सिनेसृष्टीतही एक दरबारी भाटांचा वर्ग ‘पुढे आला’!
‘पुढे आला’ हा शब्द जाणीवपूर्वक वापरलाय. कारण यातले अनेक आधीच्या राजवटींचे लाभार्थी होते किंवा आपल्या मूळ विचारांवर पांघरूण घालून सोयीस्कर माना डावी-उजवीकडे वळवत होते वा तटस्थतेचे सोंग करत होते.
मोदी सरकार आले आणि या सर्वांचे मुखवटे गळून पडले. यात अनुपम खेर, अशोक पंडित, मधुर भांडारकर, परेश रावल, कंगना रणौट, नीरज पाडे, अक्षय कुमार वगैरे फ्रंटलायनर झाले. त्यांच्या मागे लपत शाहरूख खानसह एकेकाळी देश सोडण्याच्या मानसिकतेत असलेले आमिर खान-किरण राव हे पती-पत्नी तर थेट जलयुक्त शिवारात सूर्यकांत व जयश्री गडकरसारखे राबू लागले!
यातून मग ‘टॉयलेट - एक प्रेमकथा’, ‘सुईधागा’, ‘पॅडमॅन’, ‘अय्यारी’, ‘परमाणू’, ‘ताश्कंद’, ‘३१ ऑक्टोबर’, ‘इंदू सरकार’ आणि या सर्वांवर कडी करणारा ‘उरी’ नावाचा अत्यंत सामान्य दर्जाचा चित्रपट अशी कृतक देशभक्ती, राष्ट्रप्रेम दाखवण्याची अहमिकेची लाईनच लागली. त्यात ‘अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’मधून अनुपम खेर यांनी आपल्या विरोधी राजकीय विचाराला एका विकृतीने सादर केले, तर विवेक ओबेराय नामक ब दर्जाच्या कलाकाराने थेट प्रधानसेवकांचे चरित्रच रजत पटावर आणताना स्वत: चरित्रनायकाची भूमिका करून हसं करून घेतलं. यातल्या अनेकांना पद्मश्रीची खिरापत मिळणं अपेक्षितच होतं. पण या राजापेक्षा राजनिष्ठ लोकांनी अंदाधुंदमधल्या भूमिकेसाठी आयुषमान खुरानाचं सर्वोकृष्ट अभिनयाचं राष्ट्रीय पारितोषिक ‘उरी’मधल्या भूमिकेसाठी विकी कौशलबरोबर विभागलं, हे म्हणजे ‘जोश’मध्ये ‘होश’ गमावण्यासारखंच होतं!
उरी म्हणजे आजवरच्या हिंदी युद्धपटांचा अपमानच आहे. ‘हकिकत’, ‘शहिद’, ‘हम दोनो’ ते मनोज कुमारचा ‘उपकार’ असो, कथा, पटकथा, संगीत, दिग्दर्शन, अभिनय या सर्वच बाबतीत हे चित्रपट ६२चे चीन युद्ध व ६५ च्या पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर आले. पण यातला एकही चित्रपट दिल्लीला खुश करण्यासाठी बनवला नव्हता. ‘उपकार’ हा लालबहादूर शास्त्रींच्या ‘जय जवान, जय किसान’ या घोषणेचा आधार घेऊन बनवला होता, पण कुठेही आजच्यासारखी प्रायोजित देशभक्ती नव्हती. पाकिस्तान वा मुस्लीम विरोधाचा विखार नव्हता.
यापेक्षाही मोठे उदाहरण चीनबरोबरच्या युद्धात हरल्यानंतर झालेल्या कार्यक्रमात सी. रामचंद्र यांनी ‘ऐ मेरे वतन के लोंगो’ हे गीत शहिदांना मानवंदना म्हणून तयार केले. लता मंगेशकर यांनी गायले. या गाण्याने जी वातावरण निर्मिती केली, त्यात नेहरूंनाही अश्रू आवरले नाही. आजही ते गाणं ऐकताना शहिदांविषयीच्या भावनेने कातर व्हायला होतं. युद्धात पराभूत होऊनही देशप्रेम प्रज्वलित करणाऱ्या त्या संयमित गाण्यातली ताकद कुठे नि प्रायोजित टुकार सिनेमातला ‘हाऊज द जोश?’नामक विखारी उन्माद कुठे! नेहरूंना शिव्या घालणं सोपं आहे, पण आजही देशभक्तीपर गाण्यात ‘ऐ मेरे वतन के लोगो’चाच क्रम व दर्जा अतिवरचा आहे.
मोदी सरकार आल्यावर जी सुमारांची सद्दी सुरू झालीय, त्यात वरील सर्वांसह अनेक जण आता सहभागी झालेत आणि ही टोळकी आता सिनेमाकडून वेबसिरिजकडे वळलीत!
मालकाचे जोडे डोक्यावर घेऊन फिरायचे ठरवल्यावर लोक कलेच्या नावाखाली कसा लाळघोटेपणा करतात, याची दोनच ताजी उदाहरणे बघूया.
हॉटस्टारवर एक नवी वेबमालिका सुरू झालीय ‘स्पेशल ओपीएस’ नामक. के. के. मेनन प्रमुख भूमिकेत. हा भारताच्या गुप्तहेर खात्यात काम करतो. तो अनेक अंडर कव्हर एजंट हॅण्डल करत असतो. यासाठी कोट्यवधीचा निधी सरकार देत असते आणि बऱ्याचदा या पैशांचा हिशेब ठेवला वा विचारला जात नाही. काम तसे जोखमीचे, ज्या सरकारसाठी तुम्ही काम करता, तेही तुम्हाला नाकारू शकते व ‘कुत्ते की मौत’ येऊ शकते. ही मालिका संसदेवर झालेला हल्ला व त्याच्या सूत्रधाराच्या शोधाची मालिका आहे. साहजिकच पाकिस्तान, मुसलमान व देशभक्ती हे त्रिफळाचूर्ण प्रेक्षकांना नीट चाटण म्हणून ही मालिका देते. आता संसदेवर हल्ला झाला तेव्हा वाजपेयींचेच सरकार होते, पण तेव्हापासून १९ वर्षे हा अधिकारी त्या हल्ल्याच्या सूत्रधाराचा शोध घेतोय. त्यात मधल्या युपीए सरकारचा कालखंड गायब. थेट २०१९ मध्ये येतो आपण. नीरज पांडे या वेबसिरिजचे सर्वेसर्वा. त्यांना भाटगिरीची तीव्र उबळ येते व ते जे प्रसंग रचतात, ते पाहून हसून हसून मुरकुंडी वळते.
प्रसंग असा. मास्टर माईंडच्या जवळ सब एजंट पोहचलाय. त्याने त्याचा विश्वास संपादन केलाय. आता परीक्षेची घडी. मास्टरमाईंडला भारतात काश्मीर खोऱ्यात १ कोटी कॅश पाठवायची असते. मास्टर माईंड जैशचा. त्याची खाती सील केलीत. तो या सबएजंटला ही कामगिरी सोपवतो. तो हो म्हणतो. सर्व निर्धास्त आणि रात्री बातमी येते भारतात नोटबंदी! जागतिक दहशतवादी हवालदिल! ते सबएजंटला विचारतात आता काय?
सबएजंट मनातल्या मनात मोदींची तारिफ करत परत शत्रूच्या गोटात शिरतो. भारतात फोन करतो के.के.ला काश्मिरात १ कोटी कॅश पोचती कर! के.के. किंचाळतो, म्हणतो वेड लागलंय. नोटबंदी झालीय, मीच तासभर रांगेत थांबून अडीच हजार काढलेत. सब एजंट म्हणतो, काहीही कर नाहीतर आपण उघडे पडू. के. के. नव्या चलनातले १ कोटी त्याच दिवशी काश्मिरात अतिरेक्यांना पोहचवतो!
आता इथे पेच असा भारतीय गुप्तहेरच नव्या नोटा अतिरेक्यांना देतो. मग नोटबंदीचा फायदा?
आपल्याला पडलेला प्रश्न नीरज पांडे नामक भाटालाही पडणारच. मग पांडे काही काळानंतर कथेत ती गंमत करणार. के. के.ची चौकशी चालू असते. अचानक एका भागात चौकशी अधिकारी विचारतो, तुझ्या कागदपत्रात कोट्यवधीचा खर्चच दाखवलाय, पण एके ठिकाणी ८५ लाख जमा दाखवलेत. हे कुणी जमा केले?
त्यावर के. के. म्हणतो, ते मी १ कोटी कॅश नव्हते का दिले अतिरेक्यांना. तर त्यांच्यावर आपल्या सैन्याने छापा मारला आणि त्या एक कोटीतले ८५ लाख परत मिळवले!
नोटबंदीचा असर व त्याचे इतके तर्कशुद्ध उत्तर सरकार व प्रधानसेवकच काय रिझर्व्ह बॅंकही देऊ शकलेली नाही, ते नीरज पांडे नामक दरबारी भाट या वेबमालिकेतून हास्यास्पदरित्या करतो, तेव्हा आपण फक्त पोट दुखेपर्यंत हसू शकतो!
आता दुसरे उदाहरण झी-५ वर ‘ऑपरेशन परिंदे’ नामक नवी वेबमालिका वा मिनी सिनेमा. यात पंजाबातील तुरुंगातून कैदी पळतात असा कथाभाग. तशी सामान्य क्राईम पेट्रोलसारख्या मालिकेत खपून जाईल अशी कथा. सत्यघटनेवर आधारित वगैरे. कैदी पळतात मग लोकल पोलिसांना बाजूला करत एसआयटी टाईप टीम येते. पुढे ती छडा लावते. आरोपी पकडते वगैरे. पण यातही एका टप्प्यावर या पलायन नाट्यात मदत करणाऱ्यांच्या रकमा ठरवण्यात येतात.
सर्व ठरते. उद्या निघायचं. आज पैसे मिळणार तर आदल्या रात्री नोटबंदी होते! आली का पंचाईत. पण पाचच मिनिटे. पुढे ते पलायन घडवतातच. पण दरबारी भाट नोटबंदीने गुन्हेगारांची कशी गोची झाल्याचे दाखवायचा केविलवाणा प्रयत्न करतात. सत्यघटनेवर आधारित व २०१६ला पंजाब प्रांतातल्या तुरुंगातून पळणारे तसे जन्मठेपेचे वगैरे कैदी. त्यातला एक बाबासदृश्य इसम याचा मास्टरमाईंड. तोही शीख. तरी तो इस्लामाबादेत बोलत असतो. तिथून हाँगकाँगमध्ये ८०च्या दशकात खलिस्तान चळवळ जोरात असताना आयएसआयची मदत होती. ती चळवळ संपून २५-३० वर्षे झाली. मग २०१६ साली पंजाब तुरुंगातून पळण्यासाठी एक कैदी इस्लामाबादेत का फोन करतो? पळणारे साधेच कैदी असतात. एकही लिस्टेड दहशतवादी नसतो!
मोदी सरकार नोटबंदीचे फायदे संसदेत नाही सांगू शकत, म्हणून दरबारी भाटांकरवी अशा कॉमिक स्ट्रिप्स बनवून प्रसारित करतेय? का भाटांनी ही जबाबदारी स्वत:च शिरावर घेतलीय?
या दरबारी भाटांचे शिरोमणी अनुपम खेर यांनी एका सिनेमात काम केलेय. वेबसिनेमा. नाव - ‘वन डे : जस्टीस डिलिव्हर्ड’.
यात खेरसाहेब रिटायर्ड जज्ज दाखवलेत. त्यांच्या मुलीचे लग्न. पुढे त्या शहरातले काही नामांकित व काही सुपारीबाज अचानक नाहीसे होतात. स्थानिक पोलीस शोध घेतात. कारण पहिली तक्रार येते ती या लग्नाला गेलेल्या पण तिथून न परतलेल्या दाम्पत्याची मिसिंग तक्रार त्यांचा मुलगा करतो. पुढे हे मिसिंग प्रकरण वाढत जाते व तपास स्थानिक पोलिसांकडून काढून तो खास स्पेशल ऑफिसरवर - लेडी ऑफिसर - सोपवतात. त्यात ती हरयानवी डॅशिंग व कॅबरेही करू शकेल अशी कमनीय.
मधला रटाळ भाग सोडून शेवट सांगायचा तर या सर्व लोकांना या निवॄत्त न्यायमूर्तींनीच गायब केलेलं असतं, स्थानिक पोलिसाच्या मदतीने व डांबून ठेवलेलं असतं. कारण काय? तर हे सर्व याच महाशयांच्या न्यायालयातून विविध केसमधून पुराव्याअभावी निर्दोष सुटलेले असतात. त्यातल्याच एका पीडिताची आई या न्यायमूर्तींना ‘तू विकला गेलास’ म्हणून कोर्टाच्या आवारातच मुस्काटात देते! तो या महाशयांच्या साक्षात्काराचा क्षण. मग ते ठरवून एकेकाला गाठून, त्याला टॉर्चर करून त्यांचा जबाब रेकॉर्ड करतात. स्पेशल लेडी ऑफिसर हे शोधून काढते. न्यायाधीश व पोलिसाला रंगेहाथ पकडते, शेवटच्या मिसिंग माणसासह. न्यायाधीश कबुली देतो. कोर्टात न्याय देता आला नाही, पण मुस्काटात खाल्ली व जाग आली. ती विचारते त्यांच्या डेड बॉडीज कुठे आहेत? तो म्हणतो, मी मारले नाही. फक्त छळ केला व जबाब नोंदवले. ती पोलिसाला म्हणते, ‘ठीक. यांना घेऊन जा.’ ते निघतात. मागून गोळ्यांचा आवाज येतो. शेवटी समुद्रावर न्यायमूर्ती, पोलीस व लेडी ऑफिसर एकत्र! द एंड
हे पाहून हैद्राबाद का बंगळुरू येथील रेप केसमध्ये पकडलेले चार आरोपी आठवले आणि स्पेशल ऑफिसरही. गुन्हेगारांना गुन्हा स्थळी नेलं जातं तसं या चौघांना नेलं होतं. आणि तिथे त्यांचे एनकाऊंटर करण्यात आले. कारण दिले त्यांनी पोलिसांवर हल्ला केला! संबंधित ऑफिसर अनेक एनकाऊंटर स्पेशालिस्टसारखाच फेमस. या चौघांना मारल्याबद्दल नागरिकांनी प्रत्यक्ष व सोशल मीडियातून महाशयांचे अभिनंदन केले.
गुन्हेगारांना स्वत:च न्याय देणारे पोलीस अधिकारी लष्करी अधिकारी जनतेचे हिरो होतात. तेव्हा लोकांतही एक झुंड तयार होत असते. अलिकडेच निर्भयाच्या आरोपींना फाशी दिली. त्याच्या आधी मनसे चित्रपट सेना प्रमुख खोपकर म्हणाले, ‘ही फाशी लाईव्ह दाखवा!’
नीरज पांडे, अनुपम खेर, खोपकर, परेश रावळ वगैरे मंडळी ध्रुवीकरणाला, मॉब लिंचिंगला प्रोत्साहन देत असतात कला माध्यमातून. मागे परेश रावळ म्हणाले होते, ‘काश्मिरमध्ये त्या तरुणाला जीपला बांधले होते, तसे अरुंधती रॉयला बांधायला हवे!’
कन्हैयाकुमार, मेधा पाटकर, स्वरा भास्कर, प्रकाश राज, रवीश कुमार या किंवा अशांना ट्रोल करण्यात ही नवी दरबारी भाटांची टोळी आहे. यांचे हिंदुत्व व मुस्लीम विखार आजवर यांनी दाबून ठेवला होता. हे कलावंत या संज्ञेला पात्रच नाहीत. कारण कलावंत सर्व विषमतांच्या वर मानवतत्वाला पोहचलेला असतो.
असे जे कलाकार असतात ते ‘सत्त्या’, ‘डोंबिवली फास्ट’, ‘मुंबई मेरी जान’, ‘ब्लॅक फ्रायडे’, ‘गॅंग्ज ऑफ वासेपूर’, ‘फिराक’, ‘मंटो’, ‘मद्रास कॅफे’, ‘शांघाय’, ‘आरक्षण’, ‘हल्लाबोल’, ‘अपहरण’, ‘बॅंडिट क्वीन’सारख्या कलाकृती बनवतात. अशा कलाकारांच्या कलाकृतींची धारच कुठल्याही राज्यकर्त्याला त्यांच्या स्वयंभू असण्याची ताकद दर्शवते.
जे बिनधारेचे, विध्वंसक, एकारलेले व धर्मांधतेने बरबटलेले असतात, ते आपल्या मानेचा पट्टा कुरवाळत मालकाला विचारतात, ‘तुम्हाला आंबा आवडतो? तो कापून खायला आवडतो की चोखून?’
कलाक्षेत्रातील ही नवी भ्याड चोखेदाणी सुमार असून बेसुमार वाढतेय, ही चिंतेची गोष्ट.
...............................................................................................................................................................
लेखक संजय पवार प्रसिद्ध नाटककार व पटकथाकार आहेत.
writingwala@gmail.com
............................................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment