अजूनकाही
‘अध्यात्मज्ञान हा भारतीय संस्कृतीचा गाभा आहे’, हे श्रीविवेकानंदकृत विधान जसे त्यांचे स्वत:चे तसेच महाराष्ट्रातील संतांचेही शिक्षणविषयक विचार समजून घेण्यासाठीचे मार्गदर्शक सूत्र आहे.
आत्मसाक्षात्कार हेच मानवी जीवनाचे ध्येय आहे, हा उपनिषदांचा विचार श्रीविवेकानंदांनी सदैव उद्घोषिला आहे. (पृष्ठ क्र. २६६, शैक्षणिक तत्त्वज्ञानाची रूपरेषा) ते म्हणतात, “शिक्षणाचे ध्येय माणूस निर्माण करणे असले पाहिजे... माणूस घडवणारा धर्म आपणाला हवा आहे, माणूस निर्माण करणारे सिद्धान्त आपल्याला हवे आहेत. सर्व तऱ्हांनी माणूस निर्माण करणारे शिक्षण आपल्याला हवे आहे”. (पूर्वोक्त ग्रंथ व पृष्ठ) माणूस म्हणजे शरीर, मन व आत्मा होय, असेही माणसाचे स्वरूप सांगताना त्यांनी म्हटले आहे. निरोगी शरीर, सुसंस्कृत मन व आत्मज्ञानप्राप्ती या तिन्ही गोष्टींचा सुरेख समन्वय साधणे म्हणजे माणूस होणे होय, असा निष्कर्षही त्यांच्या साहित्यातून व्यक्त झाल्याचे जाणवते.
श्रीज्ञानेश्वरादी संतांचाही शिक्षणविषयक हाच विचार असल्याचे जाणवत राहते. तो स्पष्ट होण्यासाठी सभ्यता व संस्कृती या दोन बाबींचे स्वरूप समजून घेणे आवश्यक होय.
सभ्यता व संस्कृती
‘Civilization is what we have, culture is what we are’. या विधानातून सभ्यता व संस्कृती या दोन्हीतील फरक सांगितला गेला आहे. आपल्याकडे इतर समाजांपेक्षा वेगळे असे आपल्या समाजाचे म्हणून जे काही असते, ते म्हणजे आपली सभ्यता होय. याउलट आपण खरे तर जसे आहोत व असावयासही पाहिजे, असेच आपल्याला प्रामाणिकपणे वाटत असते. ती अंतिम मूल्यांवर आधारित वा सर्वोच्च ध्येयोन्मुख वा ध्येयनिष्ठ अशी आपली आचारविचारप्रणाली म्हणजे संस्कृती होय. संस्कृती व सभ्यता यांच्यातील हा फरक मॅथ्यु अॅरनॉल्ड व मार्क ट्वेन यांच्या अनुक्रमे पुढील दोन विधानांतूनही अभिव्यक्त झाला आहे-
१) “कल्चर, देन इज स्टडी ऑफ परफेक्शन,.... विच इन्सिस्ट्स ऑन बिकमिंग रादर दॅन हॅविंग समथिंग, ऑन दि इनवर्ड कन्डिशन ऑफ दि माइंड अँड स्पिरिट, नॉट ऑन दि आऊटवर्ड सेट ऑफ सर्कमस्टन्सेस.”
२) “सिव्हिलायझेशन इज दि लिमिटलेस मल्टिप्लिकेशन ऑफ अननेसेसरी नेसेसिटिज्.” (पूर्वोक्त ग्रंथ व पृष्ठ)
सभ्यता
अन्न, वस्त्र, निवारा मिळवण्यासाठी व मिळवून फक्त अनेक सुखसुविधांनी युक्त असे समाजमान्य जीवन जगणे म्हणजे सभ्य असणे होय. सोप्या शब्दांत, चारचौघांसारखे वागणे म्हणजे सभ्य असणे होय. आपल्या समाजात मान्य व उपलब्ध असलेली एखादी नोकरी, व्यवसाय, धंदा वा काम करून जीवनोपयोगी वस्तूंचा पुरेसा संग्रह असणारा किंवा त्याबाबत सोय करून ठेवलेला माणूस या अर्थाने ‘सभ्य’ ठरतो. असा माणूस रूढी, चालीरीती, परंपरा, धार्मिक व राष्ट्रीय सण व उत्सव यांचाही इतर लोकांप्रमाणे स्वीकार करून वागत असतो; लोकांनी नावे ठेवू नये, निंदा करू नये किंवा ‘नको उगीच डोक्याला ताप’ म्हणून कोणत्याही गोष्टीचा सर्वंकष विचार न करता तो लोकांप्रमाणे वागत राहतो.
संतांना अभिप्रेत असलेला (यानंतर स्पष्ट केलेला) संस्कृती या शब्दाचा अर्थ पाहता घरदार, पैसाअडका, दागदागिने, जमीन जुमला, शेतीवाडी, कपडेलत्ता वगैरे बाबतीत सर्वसाधारण स्थिती वा सुबत्ता असलेले, चंगळ करू शकणारे तसेच खेळाडू, साहित्यिक, शिक्षक, प्राध्यापक, कुलगुरू, विविध खात्यातील कर्मचारी, पदाधिकारी, कलाकार, कलावंत, डॉक्टर्स, इंजीनिअर्स, वकील, बिल्डर्स, आमदार, खासदार, मंत्री, समाजकारण व राजकारण करणारे वगैरे लोक जर समाजमान्य मार्गाने म्हणजे नीतीनेच वागत व कारभार करत असतील तर व तरच सभ्य होत आणि त्यांच्याकडे व पर्यायाने समाजात असलेल्या उपरोक्त साऱ्या गोष्टी म्हणजे त्यांची सभ्यता होय.
संस्कृती
‘culture is what we are’ या विधानाचा सकलार्थ ‘माणूस होणे’ या वर उल्लेखिलेल्या संकल्पनेत स्पष्ट होतो. सभ्यता म्हणून उल्लेखिलेल्या सर्व गोष्टी मिळवण्यासाठीच (इतर प्राण्यांच्या ठिकाणी नसलेली व माणसाच्या ठिकाणी विशेषत्वाने असलेली) आपली बुद्धी वापरणे, केवळ त्या दृष्टीनेच ‘बौद्धिक वाढ करणे हा, स्वामी विवेकानंदांच्या मते, पाश्चात्य सभ्यतेचा मोठा दोष होय’. (पूर्वोक्त ग्रंथ, पृष्ठ क्र. २६८)
आपल्या भारतीय संस्कृतीला आधारभूत असलेल्या उपनिषदांमध्ये ‘प्रेयस’ व ‘श्रेयस’ यांतील फरक दाखवून देण्यात आला आहे. त्यानुसार केवळ भौतिक समृद्धीसाठी म्हणजे इंद्रिये, मन, बुद्धी यांना प्रिय वाटणाऱ्या गोष्टी मिळवत राहणे व त्यांतच कृतार्थता मानून रममाण होऊन राहणे, हा केवळ ‘प्रेयस’चा वा अभ्युदयाचा (म्हणजे भौतिक वा ऐहिक विकासाचा) भाग ठरतो; नि:श्रेयसचा म्हणजे आत्मज्ञानजन्य मोक्षाचा नव्हे! अर्थात धर्म, अर्थ व काम या तीन पुरुषार्थांसाठीचेच ते सभ्य जीवन ठरते. असे जीवन जगणारा माणूस मोक्षरूपी चतुर्थ पुरुषार्थप्राप्तीसाठी आवश्यक असलेल्या आत्मज्ञानप्राप्तीसाठीचा प्रयत्न करत नसतो. लहानपणी शाळेत दररोज घेतलेली प्रतिज्ञा विसरून जाऊन भारतीय संस्कृतीचा पाईक होण्याचा प्रयत्नही तो करत नसतो. अर्थात, आत्मज्ञानप्राप्तीसाठी अखंड प्रयत्नशीलता हा जो भारतीय संस्कृतीचा (सुसंस्कृत असण्याचा) गाभा आहे, त्या गाभ्यापासून तो दूर जात असतो.
संत श्रीज्ञानेश्वर व स्वामी विवेकानंद यांचे शिक्षणविषयक मार्गदर्शक मत
केवळ बौद्धिक वाढ करणे हा पाश्चात्य सभ्यतेचा मोठा दोष आपल्या सभ्यतेला व जिचा आपल्याला रास्त अभिमान आहे, त्या आपल्या संस्कृतीला लागू नये म्हणूनच जणू ‘बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे । एका केशीराजें सकलसिद्धी ॥’ असे सन्मार्गदर्शक विधान श्रीज्ञानेश्वरांनी करून ठेवले आहे. आत्मज्ञानप्राप्ती किंवा देवप्राप्ती हेच मानवाने आपल्या बुद्धीने प्राप्त करून घ्यावयाचे खरे वैभव आहे. केवळ सुखसुविधा निर्माण करणाऱ्या नाशिवंत गोष्टींच्या वैभवासाठी माणसाने आपल्या बुद्धीचा उपयोग करणे, हे श्रीज्ञानदेवांच्या मते स्वहितावह नाही.
हाच विचार त्यांनी आपल्या ‘हरिपाठा’तीलच ‘सायासें करिशी प्रपंच दिननिशीं । हरिसी न भजसी कोण्यागुणें ॥’ या दुसऱ्या एका अभंगचरणातूनही मांडला आहे. अर्थात प्रपंचासाठी राबणाऱ्या माणसाने देवाची भक्तीही केली पाहिजे, असे त्यांनी उपदेशिले आहे. हा उपदेशात्मक विचार श्रीविवेकानंदकृत आदर्श शिक्षणाच्या स्वरूपाबाबतच्या पुढील निरुपणातही अनुस्यूत आहे -
‘पाश्चिमात्यांनी भौतिक शास्त्रांत प्रगती करून उन्नती करून घेतली; तर पौर्वात्य देशांत व भारतात धर्माचे आणि अध्यात्माचे चिंतन झाले. मानवाच्या विकासाला या दोहोंची गरज आहे. प्रवृत्ती व निवृत्ती यांचा समन्वय हवा. अभ्युदय व नि:श्रेयस ही दोन्ही मानवी जीवनाची ध्येये आहेत; नव्हे दोन्ही मिळून एकच ध्येय, चरमलक्ष्य आहे आणि म्हणून पाश्चात्यांचे विज्ञान व पौर्वात्यांची आध्यात्मिकता यांचा संगम झाला पाहिजे.” (पूर्वोक्त ग्रंथ, पृष्ठ २७०)
प्राकृत व सुसंस्कृत रातील फरक : संत श्रीएकनाथांचे मत
प्रत्येक माणसाच्या ठिकाणी (प्रकृतीच्या ठिकाणी) सत्त्व, रज व तम हे तीन गुण असतात. या गुणांमुळेच आपल्या ‘भूमा’ म्हणजे सर्वव्यापक आत्म्यास ‘देहबुद्धी’ म्हणजे संकुचितता प्राप्त होते. देहबुद्धी असलेल्या माणसास सत्त्वगुण हा ‘मी ज्ञानी’, ‘मी सुखी’ या भावनेने बद्ध करतो, रजोगुण तृष्णा व कर्मासक्तीने छळतो व तमोगुण अज्ञानजन्य प्रमाद, आळस व निद्रेने जडमूढ करून टाकतो. (गीता, १४.५-८) अशा प्रकारे, सत्त्वादी तीन गुणांमुळे होणारे आचरण जर फलाभिलाषायुक्त म्हणजे सकाम असेल तर ते प्रकृतीशी निगडित म्हणून प्राकृत किंवा प्रकृतिमंत असते. (श्रीएकनाथी भागवत, ६.२८४,२९२; १०.७७-६७ आणि १.५८४) या तीन गुणांच्या आधीन झाल्याने घडणारे आचरण आत्मज्ञानप्राप्तीच्या, परमेश्वरप्राप्तीच्या आड येते. म्हणूनच अर्जुनास ‘नि:स्त्रैगुण्य म्हणजे त्रिगुणातीत हो, असा हितोपदेश श्रीकृष्णाने केला आहे. (गीता, २.४५) आपल्या देहात असलेल्या आत्मारूपी देवाच्या प्राप्तीच्या आड येणारे (केवळ शरीर, मन व बुद्धी यांच्याच सुखाचा विचार असणारे) आचरण जरी वर पूर्वोक्त सभ्य प्रकाराचे असले तरी ते ‘प्राकृत’ ठरते; अध्यात्मशास्त्रानुसार ते ‘सुसंस्कृत’ ठरत नाही. आत्मानुभव नसल्याने देहाभिमानी/वर्णाभिमानी असलेले म्हणजे प्रकृतिमंत/प्राकृत असलेले वेदविक्रय करणारे लोक संत श्रीएकनाथांच्या मते, ‘व्यापारी’ वा ‘पोटभरू’ असतात. (श्रीएकनाथी भागवत, ११.५४८) अर्थात, शाळा, कॉलेजमधून जर विद्यार्थ्यांना म्हणजे भावी नागरिकांना आत्मज्ञानप्राप्तीसाठीचे शिक्षण वा प्रशिक्षण दिले जात नसेल तर ते श्रीरामदासकृत ‘दासबोधा’तील पुढील ओव्यांत म्हटल्याप्रमाणे ‘पोटविद्या’ ठरते -
जाणिजे परमात्मा निर्गुण । त्यासीच म्हणावे ज्ञान ।
त्यावेगळे अज्ञान । सर्व काही ॥
पोट भरायाकारणें । नानाविद्या अभ्यास करणे ।
त्यास ज्ञान म्हणती परि तेणें । सार्थक नव्हे ॥
देव ओळखावा एक । तेंचि ज्ञान तेंचि सार्थक ।
येर अवघेचि निरर्थक । पोटविद्या ॥
जन्मभरी पोट भरिले । देहाचे संरक्षण केले ।
पुढे अवघेचि व्यर्थ गेले । अंतकाळीं ॥ (दासबोध, ६.१.१९-२२)
आत्मज्ञानावाचून सारेच व्यर्थ होय
अंतीं व्यर्थ होऊन जाणाऱ्या व पोटविद्या म्हणून संबोधिल्या जाऊ शकणाऱ्या सर्व ज्ञानप्रकारांचा उल्लेख करून आत्मज्ञानाची थोरवी गाताना संत श्रीज्ञानेश्वरांनीदेखील हाच विचार अधोरेखित केला आहे. ज्ञानेश्वरीत ते म्हणतात, “ज्या विद्येपासून आत्म्याचा यथार्थ साक्षात्कार होतो, त्या ब्रह्मविद्येची जो उपहासाने निंदा करतो, उपनिषदांकडे जो प्रवृत्तच होत नाही, योगशास्त्र ज्याला आवडत नाही व अध्यात्मज्ञानाकडे ज्याचे लक्षच लागत नाही, आत्मानात्मनिरुपण-नामक परम हितकर साधनाकडे दुर्लक्ष करून ज्याची बुद्धी सर्व शास्त्रांकडे ओढ घेते व स्वैरपणे भटकते; जो कर्मकांड पूर्णपणे जाणतो, ज्याला पुराणे मुखोद्गत आहेत आणि जो ज्योतिषांत निपुण आहे; कलाकौशल्यशास्त्रात निष्णात, पाकक्रियाशास्त्रात प्रवीण; जारण, मारण, उच्चाटन, वशीकरणही ज्याला हस्तगत आहे, कामशास्त्रही पुरेपूर जाणतो; महाभारत पाठ आहे, शास्त्रेही अवगत आहेत; सर्व नीतिशास्त्रे उत्तम जाणतो, काव्यशास्त्रात चतुर आहे, वेदातील शब्द ज्याचे जणू सेवकच असतात; व्याकरणात निपुण आहे, न्यायशास्त्रात ज्याला अप्रतिहत गती असते; परंतु इतके असले तरी एक आत्मज्ञानाविषयी आंधळा असेल तर जळो ते त्याचे ज्ञान! ज्याप्रमाणे मोराच्या सर्वांगावरील पिसाऱ्यावर डोळे असतात पण एक दृष्टी नसते. त्यामुळे ज्याप्रमाणे त्या डोळ्यांचा काहीच उपयोग नसतो, त्याप्रमाणे त्याची ती सर्व विद्यासंपन्नता निरुपयोगी होय.” (ज्ञानेश्वरी, १३.८२६ ते ८८३) हा विचार ‘दासबोधा’तील पुढील ओव्यातूनही जणू पुनरुक्त केला आहे -
करूनि नाना सायास । केला चौदा विद्यांचा अभ्यास ।
ऋद्धिसिद्धि सावकाश । वोळल्या जरी ॥
तरी सद्गुरुकृपेविरहित । सर्वथा न घडे स्वहित ।
यमपुरीचा अनर्थ । चुकेना येणें ॥ (दासबोध, ५.१.३३-३४)
सारांश : शाळा, महाविद्यालय व विद्यापीठे खऱ्या अर्थाने सरस्वतीची मंदिरे व्हावयास हवीत -
स्वामी विवेकानंद व श्रीज्ञानेश्वरादी संतांच्या विचारांचे समालोचन करून या लेखाचा सन्मार्गदर्शक सारांश पुढीलप्रमाणे व्यक्त करता येईल : जर ‘माणूस म्हणजे शरीर, मन व आत्मा’ असेल, तर केवळ शरीर व मन यांच्याच विकासाकडे लक्ष केंद्रित करून दिले जाणारे शिक्षण हे जसे परिपूर्ण ठरत नाही, तसेच ते देणाऱ्या शिक्षण संस्थादेखील संतांना म्हणजे देवाला अपेक्षित असलेली सुसंस्कृत नागरिक घडवणारी केंद्रेही ठरत नाहीत. कारण अशा प्रकारच्या शिक्षणातून, श्रीरामदासस्वामी ज्याला ‘देहाभिमान, कर्माभिमान, जात्याभिमान, कुळाभिमान वा ज्ञानाभिमान’ वगैरे प्रकारचा भ्रम’ म्हणतात, तोच वाढवला जात असतो. (दासबोध, १०.६.२९)
‘ज्ञानासारखी पवित्र वस्तू दुसरी कोणतीही नाही’, असे ज्याबद्दल अर्जुनाचे निमित्ताने देवाने आपल्यालाही सांगितले आहे, ते ज्ञान म्हणजे आत्मज्ञानच होय. (गीता, ४.३८) ‘प्रांजळ आत्मज्ञानावांचून बाकी सारे निष्फळ आहे व त्यावाचून तळमळ जात नाही. यास्तव आधी आत्मज्ञान साधिले पाहिजे’ (दासबोध, ५.४.३२ व ५.५.१) असे श्रीरामदासांनी उपदेशिले वा पटवून दिले आहे. ‘दासबोधा’च्या दशक पाचमधील समास पाचमध्ये त्यांनी जे ‘हे ज्ञान नव्हे’ असा शेवट असलेल्या ओव्यांमधून विवेचन केले आहे, ते लक्षात घेतले की शाळा, महाविद्यालये व विद्यापीठे ही सरस्वतीची मंदिरे राहिलेली नसून ती केवळ लक्ष्मी मिळवण्यासाठीचे प्रशिक्षण देणारी केंद्रेच झाली आहेत, असे जाणवत राहते.
जर आत्मज्ञानप्राप्ती हे आपल्या संस्कृतीने निश्चित करून दिलेले ध्येय असेल तर ते गाठता यावे म्हणून त्याप्रकारचे संस्कार सर्व शिक्षकांनी आधी स्वत:वर व नंतर विद्यार्थ्यांवर नियमितपणे केले पाहिजेत. अर्थात, शाळा, महाविद्यालये व विद्यापीठे खऱ्या अर्थाने सरस्वतीची मंदिरे व्हावयास हवीत. थोडक्यात, आत्मज्ञानसंपन्न होण्याचा प्रयत्न करणे म्हणजे खऱ्या अर्थाने सुसंस्कृत होण्याचा प्रयत्न करणे होय. असा प्रयत्न करणाऱ्या सभ्य शिक्षकांनी चरितार्थासाठी उपयुक्त असणाऱ्या ज्ञानांबरोबर आत्मज्ञानप्राप्तीसाठीचेही संस्कार विद्यार्थ्यांवर करणे, असा स्वामी विवेकानंद यांचा दिशादर्शक विचार ‘शिक्षण’ नामक पुस्तकातील ‘साध्य आणि साधन’ या प्रकरणातून पूर्वीच व्यक्त करून ठेवला गेला आहे.
.............................................................................................................................................
संदर्भ
१. शैक्षणिक तत्त्वज्ञानाची रूपरेषा, ग. वि. अकोलकर, श्रीविद्या प्रकाशन, पुणे, (द्वितीय आवृत्ती, १९९०);
२. शिक्षण, स्वामी विवेकानंद, रामकृष्ण मठ, नागपूर, (सातवी आवृत्ती, १९८९)
.............................................................................................................................................
लेखक विजय बाणकर अकोले महाविद्यालयाचे निवृत्त प्राध्यापक आहेत.
vijaymaher@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Gamma Pailvan
Fri , 27 March 2020
नमस्कार विजय बाणकर!
लेख पूर्णपणे पटला. शिक्षण हे जिवातील ईश्वरी अंश प्रकट करायचं माध्यम असलं पाहिजे, असं विवेकानंद म्हणून गेलेत. मात्र हल्लीचं शिक्षण केवळ पोटभरू विद्या संक्रमित करायचं साधन बनलं आहे. ईश्वरी गुणांची व आत्मज्ञानाची वृद्धी करायला वेळ आहे कोणाकडे! हे शिक्षण नसून प्रशिक्षण आहे हेही आपल्या तथाकथित शिक्षणतत्ज्ञांच्या लक्षांत येत नाही. तिथं सामान्य माणसाला विचारतोय कोण!
नामजप करून भगवंतांची ओढ निर्माण करणे हाच मलातरी एकमेव उपाय दिसतो.
आपला नम्र,
-गामा पैलवान