पत्नीत्याग : श्रीरामाचा आदर्श राजधर्म आहे?
पडघम - सांस्कृतिक
विजय बाणकर
  • सीतास्वयंवराचे चित्र www.dollsofindia.com वरून साभार
  • Wed , 25 March 2020
  • पडघम सांस्कृतिक रामायण Ramayan वाल्मीकी रामायण Valmiki Ramayan श्रीराम Shreerama राम Rama सीता Sita रावण Ravan

आज गुढी पाडवा. आजपासून श्रीराम जन्मोत्सवाला प्रारंभ होतो. आजच्याच दिवशी श्रीराम चौदा वर्षे वनवास भोगून आणि लंकाधिपती रावणाचा पराभव करून अयोध्येत परत आले. त्यानिमित्ताने हा विशेष लेख...

.............................................................................................................................................

स्वामी विवेकानंद म्हणतात, ‘अजून मानवजातीला जी आदर्श संस्कृती प्राप्त करून घ्यावयाची आहे, तिचे चित्रण करणारा व प्राचीन आर्य जीवनाचे दर्शन घडवणारा ज्ञानकोश म्हणजे रामायण!’ ‘वाल्मीकी रामायणा’त वर्णिलेल्या सद्गुणांमुळे श्रीराम सर्वसामान्यांचा व असामान्यांचाही आदर्श ठरला आहे. तथापि, रामाच्या पुढील तीन कृती विवाद्य आहेत - रामाने झाडाआडून बाण मारून वालीचा वध केला, लोकापवाद दुस्तर आहे म्हणून पत्नीचा त्याग केला आणि तपश्चर्या करणाऱ्या शूद्र शंबुकाचा वध केला.

यापैकी श्रीरामाची पत्नीत्याग करण्यामागील भूमिका स्पष्ट करणे, हा या लेखाचा विषय आहे. 

श्रीरामकृत पत्नीत्याग समजण्यास कठीण होतो, याची पुढील चार कारणे आहेत –

१) रावणाने सीतेला जबरदस्तीने पळवून नेले होते

२) सीता पूर्णतया शुद्ध आहे, अशी अग्निदिव्यामुळे व ऋषिमुनींच्या साक्षीने रामाची खात्री झाली होती

३) सीता-स्वीकाराच्या औचित्याबाबत लोक साशंक आहेत म्हणून किंवा लोकापवादाच्या भीतीने रामाने पत्नीत्याग केला आणि

४) त्या वेळी सीता गरोदर होती.

या पार्श्वभूमीवर रामकृतीचे सम्यक आकलन करून घेण्यासाठी पती राम, राजा राम व द्रष्टा राम या श्रीरामाच्या तीन भूमिकांचा साक्षेपी विचार करणे आवश्यक होय.

पती राम

रामाने आपल्या पत्नीवर मनापासून प्रेम केले. राजपुत्र व राजकन्या (राजस्नुषा) आणि राजा-राणी म्हणून त्यांनी अनेक राजविलास उपभोगले. वनवासात रामाने सीतेवर विलक्षण प्रेम केल्याचे वर्णन ‘वाल्मीकी रामायणा’त आहे. पत्नीत्यागाबद्दल रामाने स्वत:ला दोष दिला आहे. ‘लोकापवाद दुस्तर आहे, असे समजून मी मैथिलीचा त्याग केला, या अपराधाबद्दल आपण मला क्षमा करावी’, असे तो वाल्मिक ऋषींना म्हणतो. (उत्तरकांड, ९७.११६२) पत्नीवियोगाने तो व्याकूळ होतो. नंतर स्वत:ला सावरतो. स्थितप्रज्ञतेने राज्यकारभार सुरू करतो. जलसमाधी घेईपर्यंत रामाने जसे दुसरे लग्न केले नाही, तसेच इतर स्त्रियांशीही शरीरसंबंध ठेवले नाहीत. बहुपत्नीत्वाची चाल त्या काळी रूढ होती. (रामपिता दशरथ राजाला तीन बायका होत्या.) राजा असूनही राम शेवटपर्यंत विधुराचे जीवन जगला. म्हणूनच श्रीरामाचे एकपत्नीत्व आजही उठून दिसते.

आपल्या गरोदर पत्नीचे ऋषिमुनींचे आश्रम पाहण्याचे डोहाळे अशा अनपेक्षित रीतीने पूर्ण होत असल्याचे त्याला जाणवते, त्याचे डोळे भरून येतात, दु:खातिशयाने तो सुस्कारे टाकतो. (उत्तरकांड, ४५.१०९९)

वाल्मिक ऋषींच्या आश्रमात सीता प्रसूत होते. पुढे सीतापुत्र लव व कुश स्व-पराक्रमाने रामापुढे येतात. रामाला त्या मुलांचे अनामिक कौतुक वाटते. चौकशीनंतर तो म्हणतो, ‘जुळे झालेले हे पुत्र लव व कुश माझे आहेत. जगतामध्ये शुद्ध ठरलेल्या स्त्रीच्या ठिकाणी माझे प्रेम असो.’ (उत्तरकांड, ९७.११६२) हे सर्व लक्षात घेऊनच महात्मा गांधी म्हणतात की, रामाने केलेला पत्नीत्याग हा त्याच्या निष्ठुरपणाचा निदर्शक नाही. (इन सर्च ऑफ सुप्रीम, पृष्ठ १२०, आवृत्ती १९६१)

रावणाचा वध करून पराक्रमी, शूर व लौकिकाची चाड बाळगणाऱ्या स्वाभिमानी रामाने आपल्या पत्नीला परत आणले होते. अर्थात स्त्रीहरणरूप अपमानाचे परिमार्जन करण्याच्या कर्तव्यात त्याने कसूर केली नव्हती.

पतीने त्यागले म्हणून सीतेला दु:ख होते, पण त्याबद्दल ती त्याला दोष देत नाही. पतीच्या प्रेमाला अशा प्रकारे मुकलेली व नियतीपुढे अगतिक झालेली ती शोकाकुल होते. गरोदर सीतेबद्दल कुणालाही सहानुभूतीच वाटेल. तरीदेखील भावनेपेक्षा कर्तव्य, पतीकर्तव्यापेक्षा राजकर्तव्य, स्वसुखापेक्षा समाजहित व भोगापेक्षा त्याग श्रेष्ठ, हे प्रस्तुत रामकृतीचे सूत्र महात्मा गांधींप्रमाणे आपणही समजून घेतले पाहिजे.

राजा राम

लंकाधिपती रावणाने चोरून नेलेल्या सीतेला लंकेत चार महिन्यांपेक्षा जास्त काळ राहणे भाग पडले. त्यामुळे तिच्याविषयी सामान्य माणसांना संदेह निर्माण होणे साहजिक आहे. दशरथपुत्र राम सीतेला म्हणतो, ‘तू माझ्या दृष्टीला अतिशय प्रतिकूल झाली आहेस. पुष्कळ दिवसांपासून ही आपणावर प्रेम करणारी आहे असा लोभ मनामध्ये धरून कोण बरे कुलीन आणि तेजस्वी पुरुष परगृही राहिलेल्या स्त्रीचा पुनरपि स्वीकार करणार आहे?’ (युद्धकांड, ११५.९६९)

पतीच्या मुखातून प्रथमच असे उपेक्षायुक्त भाषण ऐकून सीता दु:खाकुल होते. ती रामास म्हणते, ‘आपण जशी मला समजत आहात तशी मी नाही, याचा आपणाला प्रत्यय येईल. हे मी आपल्या पातिव्रत्यरूप सदाचरणाच्या शपथेवर सांगत आहे.’ (युद्धकांड, ११६.९७०) रामाचा निश्चय पाहून ती लक्ष्मणास चिता तयार करण्यास सांगते. अग्निसमीप जाऊन म्हणते, ‘माझे चित्त जर रामापासून दूर जात नसेल तर जगत्साक्षी अग्नी माझे सर्वप्रकारे रक्षण करील.’ (युद्धकांड, ११६.९७१) राम खिन्न होतो. सीतेच्या अग्निदिव्यानंतर कुबेर, यम, महादेव, ब्रह्मदेव तिथे येतात. ते रामाला सीता स्वीकारण्याबाबत आज्ञा करतात. सीतेबाबत संशय उपस्थित करण्याचे कारण राम त्यांना सांगतो, ‘लोकांसमक्ष सीतेची शुद्धी होणे आवश्यक होते. ही सीता रावणाच्या अंत:पुरामध्ये पुष्कळ दिवसपर्यंत राहिलेली आहे.’ (युद्धकांड, ११८.९७३)

रामाच्या या म्हणण्याचा अर्थ अधिक स्पष्ट व्हावा म्हणून ‘महाभारता’त वर्णिलेला दुष्यंत व शकुंतला यांच्या जीवनातील असाच एक प्रसंग लक्षात घेणे उचित वाटते. राजा दुष्यंत व मुनिकन्या शकुंतला यांचा गांधर्व विवाह झालेला असतो. शकुंतलेला घेऊन जाण्याचे वचन देऊन दुष्यंत स्व-राज्यात परततो. शकुंतला दुष्यंतसंबंधाने कण्वमुनींना सांगते. नंतर ती एका पुत्रास जन्म देते. ‘स्त्रियांनी फार दिवस माहेरी राहणे ठीक नाही’ असे कण्वमुनी तिला सांगतात. तिला दुष्यंताकडे पोहोचवण्याची शिष्यांना आज्ञा देतात. शकुंतला दुष्यंताकडे येते. दुष्यंत तिला ओळखत नाही, असे हेतुपुरस्सर म्हणतो. तिचा स्वीकार करण्यास तयार नसल्याचे दाखवतो. शकुंतला त्याला सर्वप्रकारे विनवणीयुक्त समजून सांगते. दुष्यंताचा विचार बदलत नाही, असे पाहून शकुंतला त्याच्याकडे पाठ फिरवते व चालती होणार तेवढ्यात दरबारातील आचार्य, मंत्री, पुरोहित इत्यादींच्या समक्ष आकाशवाणी होते. नंतर शकुंतला व पुत्र सर्वदमन यांचा स्वीकार करताना दुष्यंत म्हणतो, ‘सर्वांनी ही आकाशवाणी ऐकलीच असेल. अमात्यहो, या शकुंतलादेवीने सांगितल्याप्रमाणे हा माझाच मुलगा आहे, असे मला विदितच होते. पण या सुंदरीच्या बोलण्याच्या आधारावरच जर या मुलाचे मी ग्रहण केले असते तर आपण सर्वांनाच साहजिक शंका उत्पन्न झाली असती की, हा मुलगा शुद्ध नाही. म्हणून मी इतका वेळ कपटनाटक केले होते. आता आपणांपैकी कोणासही शंका येण्याचे कारण नाही.’ (महाभारत, संभव पर्व, अध्याय ७४)

रामाचे सीतेकडे दोषदृष्टीने पाहणे, नंतर अग्निदिव्यातून यशस्वीपणे बाहेर पडलेल्या सीतेचा स्वीकार करणे, हे सर्व दुष्यंत-शकुंतला यांच्या उपरोक्त प्रसंगातून अधिक सार्थ होते. तत्कालीन परिस्थितीनुसार रामाने ऋषिमुनी व सैन्यासमोर सीतेच्या शुद्धतेची खात्री करून देणे आवश्यक होते. रामाने सामान्य माणसांप्रमाणे सीतेविषयी संशय घेणे म्हणजे इतर माणसांच्या प्रतिक्रियांचा अंदाज व्यक्त करून वागणे होय. एरवी सीतेबाबत रामाची व शकुंतलेबाबत दुष्यंताची खात्री जनतेला कितपत मान्य होणारी होती, हा प्रश्नच आहे.

नंतर राम सीतेसह अयोध्येला येतो. पतीपत्नी राजविलासात राहतात. एके दिवशी गुप्तहेर रामाने केलेला सीतास्वीकार प्रजेला अद्यापही नापसंत असल्याचे सांगतात. सीतेच्या संबंधाने निर्माण झालेला लोकापवाद दुस्तर आहे म्हणजे लोकांची त्याबाबत नि:संशय खात्री करून देणे अतिशय कठीण आाहे, अशी भीती रामाच्या मनात निर्माण होते. या एकमेव कारणास्तव राम गरोदर पत्नीचा - सीतेचा - त्याग करतो.

राजनीतीचे एक सूत्र म्हणून प्रजेला अमान्य असलेल्या वर्तनाचा त्याग करणे हे राजाचे कर्तव्य असते. अयोध्येतील प्रजेला सीता राणी म्हणून अमान्य असताना तिचा त्याग करणे म्हणजे आदर्श राजा-राणी कसे असावेत, याचे उदाहरण घालून देणे होय. ‘इतिहासाचे तत्त्वज्ञान’ या ग्रंथात प्रा. सदाशिव आठवले म्हणतात, ‘अयोध्येमध्ये सीतेच्या चारित्र्याविषयी अफवा उठल्या म्हणून रामाला  सीतेचा त्याग करावा लागला. यात राम व्यक्तिश: कितीसा न्यायाने वागला, हा प्रश्न या ठिकाणी महत्त्वाचा नाही. राजा म्हणून मला असे वागावे लागत आहे, हे रामाचे आपल्या कृतीचे समर्थन निश्चित समजण्यासारखे आहे. भारतीय जनतेस आवडणार नाही म्हणून भारताच्या दिवंगत महामंत्री श्रीमती इंदिरा गांधी अमेरिकेत नृत्य करू धजल्या नाहीत. रामाला वाटणारी अयोध्यावासियांची धास्ती आणि श्रीमती इंदिरा गांधींना वाटणारा भारतीय जनतेचा धाक, हे दोनही प्रकार एकच आहेत. आपली वैयक्तिक मते, आपल्या आवडी-निवडी आणि आपली तत्त्वे व आपल्या पद्धती या सर्वांनाच लोकनेता मुरड घालीत असतो.’ (पृष्ठ १३०-३१)

राम राजा नसता तर रामाने सीतेवर अन्याय केल्यासारखे झाले असते. परंतु रामाने राजकर्तव्याला श्रेष्ठतर मानले आणि तसेच ते कोणत्याही राजाने मानायला हवे. छत्रपती शिवाजीमहाराज स्वत: एकपत्नी राहू इच्छित होते. पण, माता जिजाऊंनी राजनीती समजावून सांगून शिवाजीराजांना अनेक विवाह करायला प्रवृत्त केले. श्रीरामकृत पत्नीत्यागाबद्दल महात्मा गांधी म्हणतात, ‘राजकर्तव्य आणि पत्नीप्रेम या दोहोतील द्वंद्वाचा एक पुरावा (उदाहरण) म्हणजे श्रीरामकृत सीतात्याग होय.’ (इन सर्च ऑफ सुप्रीम, पान १२०, आवृत्ती १९६१) अयोध्येतील प्रजेच्या मताची कदर करून रामाने तिच्या म्हणण्याप्रमाणे कृती केली. अयोध्यावासी म्हणत होते, ‘राम सीतेला दूषण कसे देत नाही? आता स्त्रियासंबंधाने असला प्रकार आम्हालाही सहन होऊ शकेल. कारण, जसे राजा करू लागतो, तसे लोकही त्याला अनुसरून वागू लागतात.’ (उत्तरकांड, ४३.१०९७) राजा रामास जिचा धाक वाटत होता, ती प्रजा विषयलंपट, दुष्ट, अविद्वान अथवा नास्तिक नव्हती. सर्व स्त्री-पुरुष सत्शील व सदाचरणी होते. (बालकांड, ६.१४) अशा प्रजेचा राजा आदर्श म्हणजे सदाचरणीच हवा. अन्यथा राजाला दोष देण्याचा, त्याच्या चुका दाखवण्याचा नैतिक अधिकार प्रजेला प्राप्त होतो. रामराज्यातील जागरूक व कर्तव्यतत्पर सदाचरणी लोकांनी रामाला नीतिमत्तेचा धाक दाखवला व त्याच्या सदसद्विवेकबुद्धीला आवाहन केले. रामही जनसत्तेपुढे नतमस्तक झाला. एडमंड बर्क यांच्या ‘दि पीपल आर दि मास्टर्स’ व समर्थ श्रीरामदास यांच्या ‘जनीं वंद्य ते सर्व भावें करावे । जनीं निंद्य ते सर्व सोडोनि द्यावे ।’ या उक्तींची अशा वेळी आठवण होते.

रामाचा निर्णय सीतेला पटला होता. रामाच्या आज्ञेवरून लक्ष्मण वाल्मिकींच्या आश्रमाजवळ सीतेला सोडतो. त्याच्याजवळ निरोप देताना सीता रामाला उद्देशून म्हणते, ‘लोकांत होणाऱ्या अपकीर्तिला भिऊन तू माझा त्याग केला आहेस. माझ्या संबंधाने लोकांमध्ये तुझी निंदा होऊ लागली आहे. तिचा परिहार मला केलाच पाहिजे. तू लोकापवाद टळेल, अशाच रीतीने वाग.’ (उत्तरकांड, ४८.११०२-०३)

स्वत: सीतेला रामाप्रमाणे लोकनिंदेची भीती वाटत होती. रावण तिला वश करण्याचा प्रयत्न करत होता, तेव्हाच तिने त्याला सुनावले होते, ‘तू या शरीराला बांध अथवा मारून टाक, या जड शरीराचे रक्षण मला कर्तव्य नाही. याचे काहीही झाले तरी पृथ्वीवर सीता गैरचालीची निघाली अशा प्रकारची निंदा होऊ देणे मला योग्य नाही.’ (अरण्यकांड, ५६.४१८) ‘जोपर्यंत अपकीर्ती झाली नाही तोपर्यंतच शहाण्याने जगावे’, हे संत श्रीज्ञानेश्वरकृत उपदेशवजा विधान सीतेबद्दलचा आदर द्विगुणित करते. (ज्ञानेश्वरी, २.२०२)

राजा रामाने सीता त्यागिली नसती तर पुढे अनेक अफवा उठत राहिल्या असत्या आणि रामाला या ना त्या प्रकारे लोकांची तोंडे बंद करण्यासाठी त्यांना शासन करावे लागले असते, न्यायसंस्था स्वत:च्या पत्नीवरील संशयाचे खंडण करण्याकरिता राबवावी लागली असती आणि परिणामत: राम प्रजेचा एक नम्र व सच्चा सेवक किंवा लोकहितदक्ष राजा म्हणून मान्यता पावला नसता.

द्रष्टा राम

रामकृतीचे संपूर्ण आकलन करून घेण्यासाठी श्रीरामाचा एक द्रष्टा म्हणून विचार करणे क्रमप्राप्त आहे. रामाची अमुक एक कृती पती म्हणून किंवा राजा म्हणून वेगळी दाखवणे अत्यंत कठीण आहे. कारण, रामाची प्रत्येक कृती मर्यादशीलतेचे उदाहरण आहे. विश्वनायक (शास्ता) व लोकनेता म्हणूनच रामाने आचरण केले आहे. रामाचरणाचे आकलन श्रीज्ञानेश्वरांच्या पुढील ओवीद्वारें सुस्पष्ट होते -

‘मार्गाधारें वर्तावे । विश्व हे मोहरें लावावे ।

अलौकिका नोहावे । लोकांप्रति ॥’

भावार्थ - स्वत: सन्मार्गाने आचरण करून लोकांनाही सन्मार्गास लावावे व आपण कोणी एक अलौकिक पुरुष आहोत, असे त्यांना भासू देऊ नये. (ज्ञानेश्वरी, ३.१७१) आपल्यानंतर येणाऱ्या राजांना, साधुसंतांना व सामान्यांना मार्गदर्शन करण्याची भूमिका रामाने वठवली आहे. प्रजेचा एक घटक (दशरथपुत्र) समजून व मर्यादा घालून घेऊन त्याने पत्नीत्याग केला आहे. चिरंतन व तत्कालीन जीवनमूल्यांना धरूनच त्याचे वर्तन झाले आहे.

अध्यात्मज्ञानप्रधान भारतीय संस्कृती (‘काठकोपनिषदा’त म्हटल्याप्रमाणे) प्रेयसपेक्षा (विषयजन्य सुखांपेक्षा) श्रेयस (आत्मसुख) श्रेष्ठ म्हणजे स्वीकार्य व कल्याणकारक असल्याचे सांगते. रामाचा पत्नीत्याग ही श्रेयसची बाजू आहे. एक व्यक्ती म्हणून रामाचे व समाजाचे हित त्यात अनुस्यूत आहे. या संदर्भाने भगवान बुद्धाची आठवण येते. जीवनातील सर्व दु:खांचा निरास करण्याचा मार्ग शोधण्यासाठी पत्नी, मुलगा व राजवैभव सोडून गेलेला गौतम बुद्ध झाल्यानंतर एकदा घरी येतो. पत्नीला आशीर्वाद देऊन पुन्हा निघून जातो. प्रा. नरहर कुरुंदकर म्हणतात, ‘रामचंद्राचा राज्यत्याग हा जितका भारतीय मनात घर करून बसलेला आहे, तितकाच तथागतांचा गृहत्यागही लोकमानसात आदरणीय ठरलेला आहे.’ (भजन, पृष्ठ ३३) श्रीरामाची राज्यत्यागामागील भूमिका समजून घेण्यास बराच विचार करावा लागतो. दूरदृष्टीचा, स्खलनशील मानवी स्वभावविषयक व मूल्यश्रेणीविषयक ज्ञानाचा अभाव असल्यास रामाचा पत्नीत्याग पटेनासा होतो.

श्रीरामाचा दूरदर्शीपणा किंवा आपल्या कृतीच्या इतरांवरील परिणामांबाबतचा अंदाज त्याच्या पुढील भाषणात व्यक्त होतो, ‘तुमच्या सांगण्याप्रमाणे वागू लागलो असता मी स्वेच्छाचारी होईन आणि मला पाहून हे संपूर्ण जगत् स्वेच्छाचारी होईल! कारण, जसे राजाचे आचरण असते, तसेच त्याच्या प्रजाजनांचे आचरण होते.’ (अयोध्याकांड, १०९.३१०) पितृवचनपालनार्थ स्वीकारलेला वनवास हा रामावर अन्यायच आहे, असे नास्तिक मत जाबाली मांडतो. तेव्हा ते खोडताना रामाने हे विचार व्यक्त केले आहेत.

जटायुच्या भाषेतही आत्मज्ञानी व द्रष्टा रामाच्या पत्नीत्यागाचे समर्थन देता येते. सीतेला चोरून नेणाऱ्या लंकाधिपती रावणास जटायु म्हणतो, ‘शास्त्रामध्ये ज्याचा नीट बोध होत नाही, असा धर्म, काम आणि उत्तम वस्तुंचे (गुणांचे ) भांडार हे सर्व राजाच आहे. कारण, धर्म, पुण्य अथवा पातक हे सर्व राजमूलकच प्रवृत्त होत असते.’ (अरण्यकांड, ५०.४०६) रावणाप्रमाणे स्वत: राजेच जर सदोष वर्तन करू लागले, तर जनतेने केलेल्या तशा प्रकारच्या म्हणजे समाजविरोधी वा अनैतिक वर्तनाला शिक्षा करण्याचा अधिकार त्यांना राहणार नाही. एक राजा म्हणूनच राम बोलला वा वागला नाही तर धर्मसंस्थापक, मार्गदर्शक व सांभाळकर्ता म्हणून त्याने आचरण केले आहे. आजही समाजमानसात एकपत्नीत्वाविषयी व पातिव्रत्याविषयी आदरभावना जिवंत आहे. ‘जयाचेनि बोलें धर्मु जिये’ म्हणजे ‘ज्याचे बोलणे हे धर्माचे जीवन असते’ (ज्ञानेश्वरी, ६.१०३) अशा धर्मप्रवृत्तिनियामक आत्मज्ञानी रामाचा हा मार्गदर्शक पुण्यप्रभावच होय.

‘राजे वनामध्ये असोत अथवा राज्यावर असोत, लोक त्यांना काही ना काही नावे ठेवीतच असतात’. (उत्तरकांड, ४३.१०९६) हे म्हणणारा व समजू शकणारा राम वैयक्तिक सुखाच्या बाजूने निर्णय न घेता पत्नीत्याग करतो. श्रीवसिष्ठ रामास म्हणतात, ‘जिथे संदिग्धता असते तिथे आमच्यासारख्यांची बुद्धी व्हावयाचीच नाही’. (श्रीयोगवासिष्ठ) अर्थात, त्यांचाच सत्शिष्य असलेल्या श्रीरामाने केलेला पत्नीत्याग हा संबंधित संदिग्धतेचा समूळ नाश करणारा आहे.

भगवान श्रीकृष्णाने ‘गीते’त तीन प्रकारचे सुख सांगितले आहे - सात्त्विक, राजस व तामस. (अध्याय १८.७-९) श्रीरामकृत पत्नीत्याग हा सात्त्विक सुखाकडे नेणारा आहे. पत्नीसंबंधरूप विषयजन्य राजस सुखाला ‘मर्यादा’ घालून आत्मज्ञानाची अभिवृद्धी करणारा श्रेयस्कर सात्त्विक सुखरूप ‘पुरुषार्थ’ साधून रामाने स्वत:चे ‘उत्तमत्व’ सिद्ध केले आहे. म्हणूनच ‘सातवा अवतार आठवा वेळोवेळा’ असे संत श्रीज्ञानदेवांनीही उपदेशिले आहे.

(टीप : सर्व आधार श्री. रा. चिं. ढेरे प्रकाशित (१९७०) ‘वाल्मिकी रामायणा’तील आहेत.)

.............................................................................................................................................

लेखक विजय बाणकर अकोले महाविद्यालयाचे निवृत्त प्राध्यापक आहेत.

vijaymaher@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

ADITYA KORDE

Sun , 29 March 2020

श्री गामा पैलवान ह्यांनी लिहिलेली दीर्घ प्रतिक्रिया जास्त सयुक्तिक वाटते, रामायण किंवा महाभारत हे इतके जुने ग्रंथ आहेत कि त्यातले प्रक्षेप शोधून काढणे मोठे जिकीरीचे काम असते पण राजकारणाचे अंत:प्रवाह साधारण अपरिवर्तनीय असतात. त्यामुळे गामा पैलवान ह्यांचे निष्कर्ष वास्तवाच्या अधिक जवळ जाणारे वाटतात , तसेच लेखात दुष्यंत शकुंतला आख्यान संदर्भाने जे उल्लेख आले आहे त्या बाबत कुरुन्दाकारानी केलेलं विवेचन असेच हटके पण विचार करायला लावणारे आहे . श्री.गामा पैलवान ह्याचे आभार


Gamma Pailvan

Fri , 27 March 2020

नमस्कार विजय बाणकर!
लेख माहितीपूर्ण आहे. धन्यवाद! मर्यादापुरुषोत्तम श्रीरामाच्या वर्तनाचं केलेलं विवेचन मनापासून पटलं. थोडं माझं मत सांगतो.
त्या काळी व नंतरही राजकारणासाठी अनेक विवाह करावे लागायचे. श्रीरामाची मात्र बहुपत्नीत्वातनं सुटका झाली. याचं कारण म्हणजे त्याच्या विवाहमंडपात बाकीच्या तीन भावांचीही लग्ने लागली. अयोध्या व विदेह यांच्यात चौमार्गी विवाहसंबंध प्रस्थापित झाले. हा म्हंटलं तर योगायोग आहे. तसंच यामागे वसिष्ठ यांचं डोकंही असावं, अशी शंका येते. कारण की रावणाचा उपद्रव वाढू लागला होता. त्याने थेट चढाई केली नसली तरी त्याचे चमचे धुमाकूळ घालंत होते.
दशरथाच्या पश्चात त्याच्या तीन राण्यांच्या माहेरच्यांनी अयोध्येवर वचक बसवायला राजकारणे करू नयेत म्हणून चारही राजपुत्रांचं सासर एकंच बनवलं. ही खटपट रावणाला शह देण्यासाठीच केली असावी. रामलक्ष्मणांना विश्वामित्र ऋषींसोबत पाठवण्यामागे त्यांना राक्षसांविरुद्ध लढायचं प्रशिक्षण व अनुभव मिळावा हेच होतं. एकंदरीत रावणाविरुद्ध दीर्घ पल्ल्याचं धोरण आकारास येत होतं. अपेक्षेप्रमाणे रामलक्ष्मणांनी लोकल राक्षसांचा बंदोबस्त केला.
पुढे राम जर अयोध्येच्या सिंहासनावर बसला असता तर रावणाशी थेट युद्ध करता आलं नसतं. याला कारण म्हणजे वानरराज वाली. त्याचा रावणाशी तह झाला होता. त्यानुसार लंकेवर हल्ला झाल्यास वालीने रावणाला मदत करायची व त्याबदल्यात राक्षसांची खडी फौज किष्किंधेच्या सेवेसाठी हजर राहणार होती. त्यामुळे लंकेसंबंधी दीर्घकालीन धोरण विकसित करण्यासाठी राजनीतीचा मार्ग अपरिहार्य होता.
त्यामुळे कैकेयीने रामलक्ष्मणास घराबाहेर काढून १४ वर्षांच्या प्रदीर्घ राजनैतिक कामगिरीवर पाठवलं. बाहेरून मात्र गृहकलहाचा देखावा केला. अन्यथा रावण सावध झाला असता.
रामलक्ष्मणांच्या सोबत सीताही वनवासास जाईल याची कल्पना कोणालाच आली नाही. सीतेने स्वत:हून वनवास पत्करला. पुढे शूर्पणखेने सीतेवर विनाकारण हल्ला केला. तो रावणाच्या आज्ञेनेच केला असावा. रामाचं खच्चीकरण करायचा रावणाचा हेतू होता. मात्र घडलं भलतंच. उलट लक्ष्मणाने तिचे नाक व कान कापले. तिने खर व दूषण या लोकल चमच्यांकडे तक्रार केली. पण रामलक्ष्मणांनी या दोघांचाही कायमचा बंदोबस्त केला. तेव्हा तिने रावणाकडे परत येऊन कार्यभाग नासल्याची कबुली दिली.
त्यानंतर लगेचंच कांचनमृगाची घटना घडली. हरणाच्या मागे राम गेल्यावर 'धाव लक्ष्मणा' अशी आरोळी दुरून ऐकू आली. तेव्हा सीतेने लक्ष्मणास रामामागे बळेच पाठवलं. आणि रावणाने घात केला. आता त्रयस्थ नजरेतनं पाहिलं तर काय दिसतं? सीतेने आपणहून वनात जायचा हट्ट धरला. नंतर रामाज्ञा मोडून लक्ष्मणास त्याच्यामागे आग्रह करून पाठवलं. सीता रावणास फितूर तर नव्हती? हे किल्मिष धुण्यासाठी अनिवार्य पण अपुरा मार्ग एकंच होता. तो म्हणजे रामाने रावणाचा वध करणे.
सीताहरणानंतर श्रीरामाच्या प्रत्येक खेळ्या सीतेस परत आणण्यासाठी झालेल्या आहेत. यांतच वालीवधही येतो. रावणाने रामपत्नी सीतेस पळवून नेली आहे, हे वालीस ज्ञात झालं असतं तर त्याने रावणाकडे सरळ तिच्या परतवणीची मागणी केली असती व रावणाला ती पुरी करावीच लागली असती. कारण की वाली रावणापेक्षा जास्त शक्तिशाली होता. सीता जर अशा प्रकारे परत आली असती तर रावणाचा बंदोबस्त दूरच राहो, सीतासुद्धा कलंकित राहिली असती.
रामाला हे माहीत होतं. म्हणून त्याने वालीचा वध करायचा निर्णय घेतला. पुढे रावणाला ठार मारून सीता स्वगृही आली. तिला अयोध्येच्या जनतेने सुरुवातीस स्वीकारलं. मात्र स्वत:च्या सुरक्षेविषयी निष्काळजी असलेल्या सीतेने रामाची निकटवर्तीय म्हणून वावरणं कितपत योग्य, असा प्रश्न उभा राहिला. म्हणून रामाला सीतेस दूर ठेवावं लागलं.
तत्कालीन राजकारणाचा वेध घेऊन सीतात्यागाचा अन्वयार्थ लावायचा प्रयत्न केला आहे. कृपया गोड मानून घेणे व चुकलंमाकलं तर सांभाळून घेणे.
आपला नम्र,
-गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......