आपली मेरील स्ट्रीप कुठं आहे?
सदर - इनसाइडर
अमोल उदगीरकर
  • मेरील स्ट्रीप
  • Sat , 14 January 2017
  • इनसायडर Insider अमोल उदगीरकर Amol Udgirkar मेरील स्ट्रीप Meryl Streep आमीर खान Aamir Khan अनुराग कश्यप Anurag Kashyapशाहरुख खान Shahrukh khan

मेरील स्ट्रीपने गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यात राजकीय संदर्भ असणारं भाषण केलं आणि त्यावर बऱ्या-वाईट प्रतिक्रियांचे मोहोळ उठलं. खरं तर यापूर्वीही ऑस्कर आणि ऑलिम्पिकसारख्या 'ग्रँड स्टेज'चा वापर सामाजिक आणि राजकीय भाष्य करण्यासाठी अनेक कलाकारांनी आणि खेळाडूंनी केला आहे. लोकांनी त्याला दादही दिलेली आहे. मात्र मला आपल्या भारतीय परिप्रेक्ष्यातून काही प्रश्न पडले. डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर शेलक्या भाषेत टीका केल्यामुळे त्यांच्या समर्थकांनी मेरीलच्या चित्रपटांवर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली का? रिपब्लिकन पक्षाच्या आयटी सेलने मेरीलच्या चारित्र्यहननाची मोहीम राबवली का? किती अमेरिकन नागरिकांनी मेरीलला खालच्या पातळीवर जाऊन शिवीगाळ केली? किती लोकांनी तिला ‘तू कॅनडात निघून जा’ असा देशनिकाला दिला? नॅशनल टीव्हीवर चर्चेला बोलावून एखाद्या प्रखर राष्ट्रवादी विचाराच्या संपादकाने तिचा पाणउतारा केला का? या बहुतेक प्रश्नांची उत्तरं नकारार्थी आहेत. हाच फरक आहे ‘जगातल्या सगळ्यात जुन्या लोकशाही’मध्ये आणि ‘जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाही’मध्ये. एक देश आणि एक महासत्ता म्हणून अमेरिकेमध्ये असंख्य दोष असतील, पण एखाद्याला त्याची राजकीय मतं असणं हे नैसर्गिक आहे, ही भावना त्या देशाच्या संस्कृतीमध्ये रुजली आहे, जिचा पूर्णपणे अभाव आहे आपल्याकडे.

म्हणजे फिल्मफेअर पुरस्कार स्वीकारताना दीपिका पदुकोण मणिपूरच्या प्रश्नावर भाष्य करताना दिसत आहे किंवा राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारताना शाहरूख खान देशात पाकिस्तानप्रणीत दहशतवादावर भाष्य करताना दिसत आहे, हे चित्र आपल्याकडे दिसतच नाही. याला आपल्याकडच्या कलाकारांचा 'डिप्लोमॅटिक' स्वभाव कारणीभूत आहेच. पण मुख्य कारण म्हणजे  राजकीय मत निर्भीडपणे व्यक्त करण्यासाठी जे निरोगी सामाजिक वातावरण लागतं, ते निर्माण करण्यात एक समाज म्हणून अपयशी ठरलो आहोत. आमीर खानने देशातल्या असहिष्णू वातावरणावर भाष्य करताच उठलेला गदारोळ लवकर विसरणं शक्य नाही. त्याच्यावर अपवाद वगळता तर्कसंगत टीका झाली नाही. पण आमीरने आमच्या आवडत्या नेत्यावर निशाणा साधला असा दावा करून त्याच्यावर अक्षरशः कंबरेखाली वार करणारी टीका झाली. तो जाहिरात करत असणाऱ्या उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याची भाषा सुरू झाली. श्रुती सेठ या अभिनेत्रीने मोदींच्या 'आपल्या मुलींसोबत सेल्फी घ्या' अभियानाविरुद्ध भाष्य करताच तिच्या विरुद्ध अश्लील कॉमेंट्सचा पूर सोशल मीडियावर आला. नेहा धुपिया, शाहरुख खान, अनुराग कश्यप यांनाही आपली मतं निर्भीडपणे व्यक्त केली म्हणून अतिशय किळसवाण्या टीकेला सामोरं जावं लागलं. हाच अनुभव अनुपम खेरला तो मोदींच्या बाजूने आहे म्हणून येतो. सेलिब्रिटींनी किंवा कलाकारांनी राजकीय मत मांडणं आपल्याला पचनी का पडत नसावं? याची कारणं आपल्या समाजव्यवस्थेत आणि आपल्या विचार करण्याच्या पद्धतीत आहेत.

सिनेमाक्षेत्राकडे आणि तिथं काम करणाऱ्या लोकांकडे बघण्याचा आपल्या समाजाचा पूर्वापार एक विशिष्ट दृष्टिकोन आहे. सिनेमात किंवा एकूणच मनोरंजन क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांबद्दल बरेचसे गैरसमज आहेत. सिनेमात काम करणारे लोक हे फारसे शिकलेले नसतात किंवा ज्याला काही जमत नाही तो सिनेमात जातो असं एक निरीक्षण असतं. त्यामुळे या असल्या अर्धशिक्षित लोकांनी केलेल्या राजकीय विधानांना काय किंमत द्यायची असं खूपजणांना वाटतं. सिनेमा किंवा मनोरंजन क्षेत्रात काम करणारी माणसं व्यसनी असतात किंवा ‘कास्टिंग काऊच’ करतात, असा एक सार्वत्रिक गैरसमज आहे. वास्तविक पाहता या गैरसमजांना काहीही आधार नाही. रात्री बारा वाजता सरदारजींचं डोकं फिरतं किंवा सगळेच मुस्लीम क्रूर असतात, या समजांमध्ये आणि या समजांमध्ये काहीच गुणात्मक फरक नाही.  ज्याप्रमाणे कुठलंही सरसकटीकरण आकडेवारीने स्पष्ट करता येत नाही, तसंच याचंही आहे. सिनेमात काम करणारे अनेक लोक उच्चशिक्षित आणि राजकीयदृष्ट्या अतिशय जागरूक असतात. आपण जनता म्हणून त्यांच्या ग्लॅमरच्या कितीही प्रेमात असलो तरी, जेव्हा ते राजकीय मतं व्यक्त करतात तेव्हा लोक त्यांना कडाडून विरोध करतात. 

जेव्हा राजकीय निष्ठा आणि आवडता कलाकार यांच्यात निवडीचा प्रश्न येतो, तेव्हा बहुसंख्य भारतीय आपल्या आवडत्या पक्षाला किंवा नेत्याला झुकतं माप देतात असं एक निरीक्षण आहे. त्यातून बऱ्याच मजेशीर गोष्टी होतात. उदाहरणार्थ, चिंकारा प्रकरणात सलमान खान दोषी आहे असं समजून त्याच्या चित्रपटांवर बहिष्कार टाकणारे लोक, त्याच्यापेक्षा गंभीर आरोप असणाऱ्या नेत्याला आवर्जून मत देतात आणि नाजूक प्रकरणात त्याची तळीही उचलतात. नेत्यांना किंवा पक्षाला शंभर टक्के निष्ठा अर्पण करणारे लोक त्यांच्याविरुद्ध उठणारा 'ब्र'ही सहन करू शकत नाहीत. त्यातून असं करणारा कलाकार किंवा कुणीही त्यांच्या शत्रुपक्षात जातो. मग अशा शत्रुपक्षातल्या माणसांवर कंबरेखालची टीका कर किंवा त्यांच्या कलाकृतीवर बहिष्कार टाक, असे केविलवाणे प्रकार सुरू होतात.

हल्ली 'तेव्हा तुम्ही कुठं होतात?' असा एक विनोदी प्रकार सुरू झाला आहे. समजा एखाद्या अभिनेत्याने गुजरात दंगलीवर टीका केली की, १९८४ च्या दंग्याच्या वेळेस तुम्ही कुठं होतात, असा प्रश्न विचारला जातो, किंवा एखाद्याने याकूब मेमनच्या फाशीचं समर्थन केलं की, नथुरामच्या फाशीच्या वेळेस तुम्ही कुठं होतात, असा प्रश्न विचारला जातो. प्रत्येक घटना आणि तिच्यामागची कारणमीमांसा ही दुसऱ्या वरकरणी तशाच वाटणाऱ्या घटनेपेक्षा वेगळी असते हे समजून घेण्याची तयारी कुणीच दाखवताना नाही.

राजकीय नेत्याला किंवा पक्षाला तर्कशास्त्र खुंटीला टांगून समर्पित होणारे अनुयायी आणि धनगराच्या मागं जाणारी मेंढरं यांच्यात फरक तरी कसा करायचा? हे अनुयायीच सेलिब्रिटींवर राजकीय विधान केलं म्हणून घाणेरडी टीका करण्यात आघाडीवर असतात. 

खरं तर साहित्यिक आणि कलावंत यांनी सतत व्यवस्थेला आणि सरकारला अवघड प्रश्न विचारत राहणं आवश्यक आहे. पण प्रश्न म्हटले की व्यवस्था, पक्ष, त्यांचे अनुयायी सगळेच बचावात्मक पवित्र्यामध्ये जातात. प्रश्न विचारलेले त्यांना आवडत नाहीत. आणीबाणीच्या काळात अनेक कलावंतांनी आणि साहित्यिकांनी तिच्याविरुद्ध भूमिका घेतली होती. पण आता घड्याळाचे काटे बहुदा उलटे फिरत चालले आहेत. अनेक कलाकार राजकारण्यांकडून उपकृत झाल्यामुळे त्यांच्या ताटाखालची मांजरं बनली आहेत, ही वेदनादायक परिस्थिती नजरेआड करता येत नाही. सगळेच कलाकार जनक्षोभाला किंवा सरकारला घाबरून असतात असं नाही. शबाना आझमी, स्वरा भास्कर, रिचा चढ्ढासारखे लोक आपल्याला पाहिजे, तशा राजकीय भूमिका घेतात आणि त्यावर कायम राहतात. हे सगळं काही संपलं नाहीये याचं सकारात्मक उदाहरण. 

‘पॅन्डोरा बॉक्स’ नावाची एक ग्रीक दंतकथा माझी फार आवडती आहे. त्यामध्ये म्हणे, जगातल्या सगळ्या वेदना आणि दु:खं भरलेली होती. पॅन्डोरा नावाच्या म्हातारीने हा बॉक्स उघडला आणि सगळी दु:खं डब्ब्याच्या बाहेर, प्रत्यक्ष जगात आली. आपल्या चुकीची जाणीव होऊन म्हातारीने धडपडून तो बॉक्स बंद केला. पण त्यामुळे चांगलं काही घडण्याची आशा (होप) मात्र बॉक्समध्येच राहून गेली. त्या अर्थाने, ही दंतकथा माणसांच्या वेदनांची आणि निराशावादाचीही आहे. अभिव्यक्तीस्वातंत्र्य हा पॅन्डोरा बॉक्सच आहे. फक्त त्यामध्ये अभिव्यक्तीच्या अमर्याद शक्यता भरल्या आहेत. आपण एक समाज म्हणून जेव्हा हा बॉक्स उघडतो, तेव्हा त्यातून फक्त अनावश्यक गोष्टीच बाहेर काढतो आणि त्या अमर्याद शक्यता डब्यातच राहून जातात. ही कलाकारांची किंवा साहित्यिकांची मर्यादा नाहीये, तर नागरिक म्हणून आपली शोकांतिका आहे...

लेखक फँटम फिल्म्ससोबत पटकथा लेखक म्हणून काम करतात.

amoludgirkar@gmail.com

Post Comment

Ashutosh

Sat , 21 January 2017

लिहिलेल्या सर्व बाबी अगदी योग्य आहेत. पण... इनसायडर या सदरच्या नावाला हा लेख अनुसरून वाटत नाही, असं माझं मत. पहिल्या लेखाने उंचावलेल्या अपेक्षाना हा लेख हातच घालत नाही.


Kumar Thoke

Sun , 15 January 2017

आपली लोकशाही परिपक्व नसल्याचे हे लक्षण आहे.


Siddharth Gamare

Sat , 14 January 2017

कुठलीही संघटना उठते आणि सिनेमाला विरोध करते तेव्हा त्या सिनेमाचे दिग्दर्शक, नट,निर्माते त्या संघटनेच्या नेत्यांकडे जातात. त्यांच्यासाठी सिनेमाचा स्पेशल शो लावतात व त्यांच्याशी "मांडवली" करतात व त्यांची परवानगी मिळवतात. मग भक्त व सैनिक सिनेमाला रांगा लावतात. गेल्या दोन-तीन वर्षात हे सर्रास चालू आहे. आपल्या देशात जोपर्यंत असे पुळचट, पोचू, शेपूट घालणारे कलाकार व दिग्दर्शक आहेत तोपर्यंत हे असेच चालणार.


Jitendra

Sat , 14 January 2017


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......