अजूनकाही
कालचा ‘जनता कर्फ्यू’ यशस्वी झाला. करोनाविषाणूपासून आपलं संरक्षण करणारे, डॉक्टर्स, आरोग्यसेवक, सफाई कर्मचारी इत्यादींबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी लोकांनी आपआपल्या घरात थाळी नाद करावा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं. सायंकाळी पाच वाजता लोकांनी टाळ्या वाजवल्या, थाळ्या, झांजा, शिंग वाजवली, शंख फुंकले, ढोल पिटले. हातात थाळ्या घेऊन बायकांनी रस्त्यावर गरबा केला, हातात तिरंगा घेऊन तरुणांनी बाईक यात्रा काढल्या. राष्ट्रवादाचा उत्सव साजरा झाला.
करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जगाच्या अर्थव्यवस्थेला फटका बसला आहे. संघ-भाजपचे नेते व समर्थक गोमूत्र, शेण यांसारखे भंकस उपाय त्यावर जाहीरपणे सांगत आहेत. रघुनाथ माशेलकर यांच्यासारखे शास्त्रज्ञ गोमूत्रातील औषधी गुणांचं संशोधन करणार्या प्रकल्पावर काम करताना तोंडाला पट्टी लावून बसले आहेत.
मी अलीकडे फेसबुक हेच पुस्तक रोज चाळत असतो. माझे बहुसंख्य मित्र पुरोगामी या कोटीतले आहेत. मार्क्सवादी, गांधीवादी, समाजवादी, आंबेडकरवादी, शिवधर्मवादी, विज्ञानवादी, आध्यात्मिक, ब्राह्मणी, अब्राह्मणी, इत्यादी. त्यामुळे त्यांच्याच पोस्ट सर्वाधिक वाचतो. या सर्व मित्र-मैत्रिणींना कालच्या सेलिब्रेशनची चिंता वाटली. माझ्या पोस्टवरील पुढील प्रतिक्रिया प्रातिनिधीक आहेत.
- लोकभावनांचं, राष्ट्रीयतेचं कॅथार्सिस करवून देणारे इव्हेंट सध्या खूप यशस्वी होतात; करवले जातात. नाकर्त्यांना अशा कल्ह्या स्वतःवर चढवाव्याच लागतात..
- लोकांना 'मूर्ख' बनवणे सोप्पं आहे ...अन "शहाणं" बनवणे अवघड ...हेच तात्पर्य ..
- नेहरू पंतप्रधान असताना विरोधक असेच हतबल झाले होते
- देशात अक्षर ओळख असलेल्या बेअक्कल लोकांची कमी नाही
- फक्त अर्थव्यवस्थाच नाही तर लोकांचा शहानपणा पण कमी होत चाललाय
- मोदी आणि खाजपा भक्तांचा इगो इश्यू बनला आहे. चामडी गेली तरी इगो सोडणार नाहीत. आयटी सेल ह्याचाच फायदा घेत आहे. आयटी सेलने मोदीला भक्तांच्या इगोच्या पेशींमध्ये व्हायरस सारखं सोडलेलं आहे. मोदीभक्तांचा इगो तोडणे हाच ह्यावर उपाय आहे.
- अक्कलशुन्य शिक्षित प्राणी आहेत. वाईट वाटते हे सगळं बघून
- बहुसंख्य लोकांना वाटतंय की त्यामुळे कोरोना जाणार
माझी आणि माझ्या फेसबुक मित्रांची समाजाकडे पाहण्याची दृष्टी अणुवादी आहे. निसर्गाचे नियम असतात. ते नियम समजून घेतले तर तंत्रज्ञान रचता येतं. निसर्गनियमांचं ज्ञान जेवढं सूक्ष्म तेवढं प्रगत तंत्रज्ञान रचता येतं. निसर्गातील घटितांना कारणीभूत असणारे घटकांच्या सूक्ष्मरूपाचं ज्ञान करून घेणं ही विज्ञान-तंत्रज्ञानाची दिशा आहे. इलेक्ट्रॉनिक्स त्यातूनच विकसित झालं. रोगाला सूक्ष्मजंतू, विषाणू जबाबदार असतात हा शोध या अणुवादी दृष्टीतूनच आपल्याला लागला. या वैज्ञानिक ज्ञानाचं उपयोजन समाजाबाबतही केलं जातं. समाज व्यक्तींचा बनलेला असतो. निसर्गाच्या नियमाप्रमाणेच समाजाचेही नियम असतात. ते सामान्यतः व्यक्तीच्या मानसशास्त्राशी संबंधित असतात. समाजाकडे पाहण्याच्या या अणुवादी दृष्टीवरच आधुनिक, उदारमतवादी वा पुरोगामी कायदे-कानून, लोकशाही संस्था उभ्या आहेत.
युरोपामध्ये आधुनिक विज्ञानाची पायाभरणी शासनाकडून नाही तर एन्लाटन्मेंट वा ज्ञानोदय या युरोपव्यापी सांस्कृतिक आंदोलनाने हे कार्य केलं. त्यातून राजेशाहीला, चर्चच्या निरंकुश सत्तेला आव्हान मिळालं. त्यातून फ्रेंच राज्यक्रांती झाली. पहिल्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियन राज्यक्रांती झाली तर दुसर्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर चीनमध्ये क्रांती झाली. या तिन्ही क्रांत्यांमध्ये राष्ट्रवाद हा कळीचा घटक होता. प्रत्येक राष्ट्रातील भौगोलिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक घटकांनुसार त्या त्या राष्ट्रातील क्रांतीचा, समाजवादाचा विचार आविष्कृत झाला.
मी अलीकडे केवळ फेसबुक हेच पुस्तक वाचतो. माझे बहुसंख्य मित्र पुरोगामी या कोटीतले आहेत. मार्क्सवादी, गांधीवादी, समाजवादी, आंबेडकरवादी, ब्राह्मणी, अब्राह्मणी, शिवधर्मवादी, विज्ञानवादी, आध्यात्मिक इत्यादी. त्यामुळे त्यांच्याच पोस्ट माझ्या भिंतीवर येतात. या समाजातील बहुसंख्य लोक धार्मिक आहेत- हिंदू (यातील पंथांची आणि दर्शनांची यादी खूप मोठी आहे), जैन, बौद्ध (हीनयान, महायान, नवयान), जैन (श्वेतांबर, दिगंबर इत्यादी), मुसलमान (शिया, सुन्नी इत्यादी), ख्रिश्चन (कॅथॉलिक, प्रोटेस्टंट इत्यादी), ज्यू, बहाई, पारसी, इत्यादी. जगातील बहुतेक सर्व धर्म या देशात असावेत. त्याशिवाय भाषा आणि प्रादेशिक संस्कृतींचे ताण-तणावही आहेत. या सर्वांना कवेत घेण्याएवढी मनाची आणि विचारांची विशालता माझ्या फेसबुकमित्रांमध्ये नाही. क्रांतीनंतरही त्या देशांच्या भू-राजकीय राजकारणात फारसे बदल झाले नाहीत.
या साध्या बाबी माझ्यासहित पुरोगामी कोटीतील मित्रांनी ध्यानी घेतलेल्या नाहीत. कारण आम्ही सर्वांनी नास्तिकता, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार, निधार्मिकता या मूल्यांचा स्वीकार केला आहे. मात्र या मूल्यांशी या देशातील विविध समाजघटकांनी कसं जोडून घ्यायचं या संबंधात पुरोगाम्यांनी फारसा विचार केलेला नाही. चातुर्मासात या देशामध्ये हजारो प्रवचनं, कीर्तनं, मेळावे होतात, त्यातून विषमतामूलक विचारांची पेरणी आणि मशागत केली जाते. मात्र यामध्ये हस्तक्षेप कसा करावा यासंबंधात पुरोगाम्यांकडे काहीही कार्यक्रम नाही वा विचारही नाही. कारण आपल्याकडील सेक्युलॅरिझमचा विचार नास्तिकता, धर्माचा विच्छेद, धर्माची टिंगल या अंगानेच रुजला आहे. ‘पाटीपूजनासारखे कार्यक्रम सेक्युलरवाद्यांपासून वाचवा’ या आशयाचा लेख दि. के. बेडेकर यांनी लिहिल्याचं स्मरतं. या कार्यक्रम वा विधींमधील भावना सेक्युलरवाद्यांना कळत नाही, अशी तक्रार बेडेकरांनी केली होती. पुरोगाम्यांच्या या वृत्तीला अनुलक्षून भा. ल. भोळे यांनी ‘सांस्कृतिक उदासीनता’ ही संज्ञा वापरल्याचं स्मरतं.
भारतीय राष्ट्र-राज्याची कल्पना स्वातंत्र्य आंदोलनात विकसित झाली. बंकीमचंद्रांच्या ‘आनंदमठ’ या कादंबरीत ‘भारतमाता’ हे मिथक सर्वप्रथम दिसतं. त्यानंतर १९०५ साली झालेल्या बंगालच्या फाळणीच्या विरोधात जे जनआंदोलन उभं राहिलं, त्यातून ‘भारतमाता’ नावाच्या संकल्पनेचं मूर्तरूप अवनींद्रनाथ ठाकूर यांनी उभं केलं. बंगालातील कालीपूजेचा सांस्कृतिक संबंध त्यामागे होता. या भारतमातेचं रूप साध्वी, काली, लक्ष्मी अशा नाना रूपात लोकप्रिय झालं. अरविंद घोष सशस्त्र क्रांतिकारक होते. पुढे त्यांनी संन्यास घेतला आणि ते योगी झाले. मात्र त्यांनी राष्ट्रभक्ती हा शब्द प्रचलित केला. ‘राष्ट्रवाद’ हा शब्द त्यांनी वापरला नाही. ‘राष्ट्रभक्ती’ ही संज्ञा वापरल्याने चिकित्सेला वावच उरला नाही. बंगालच्या प्रबोधनासोबत ‘भारतमाता’ आणि ‘राष्ट्रभक्ती’ या दोन संज्ञांमुळे भारतीय राष्ट्रवादाला धार्मिकता प्राप्त झाली, हे ध्यानी घेण्याची गरज आहे. भारतीय राष्ट्र-राज्य संकल्पना संपूर्ण भारतीय उपखंडात रुजवण्यात भारतमाता या मिथकाची भूमिका महत्त्वाची होती. गांधी, नेहरू, सुभाषबाबू, भगतसिंग इत्यादींमध्ये मतभेद होते, मतभिन्नता होती, परंतु हे सर्व देशभक्त होते ही बाब जनमानसात रुजवण्यात भारतमाता या मिथकाने आणि अर्थातच स्वातंत्र्य आंदोलनाने महत्त्वाची भूमिका निभावली. पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनाही या प्रभावळीत स्थान मिळालं.
मात्र अणुवादी दृष्टीमुळे बहुतेक सर्व स्वातंत्र्योत्तर काळातील पुरोगामी भारतीय समाजातील विविध अंतर्विरोधांवर— ब्राह्मण-अब्राह्मण, सवर्ण-दलित, दिक्कू (शहरी) आणि आदिवासी, इत्यादींवर भर देतात. त्या संदर्भात अतिशय सूक्ष्म चिकित्सा करतात. मात्र त्यातून भारत नावाच्या राष्ट्र-राज्याच्या आकांक्षांना आपण साद घालत नाही, ही साधी बाब त्यांच्या ध्यानी येत नाही. कारण समाज व्यक्तींनी बनलेला आहे, अशी त्यांची धारणा आहे. पुरोगामी ज्या समाजघटकांच्या आकांक्षांना साद घालतात, ते समाजघटक छोट्या प्रदेशातले असतात. उदाहरणार्थ- शिव धर्माचं आवाहन महाराष्ट्राबाहेर पोचणं अशक्य आहे. लोकमान्य टिळकांनी शिवजयंती उत्सव सुरू केला. त्या वेळी चापेकर बंधूंचं म्हणणं होतं की, शिवाजीमहाराज हे देव नाहीत, त्यांचा जयंती उत्सव का साजरा करावा? चापेकर बंधूंचा मूर्खपणा सोडून द्या, परंतु शिवजयंती संपूर्ण देशात राष्ट्रवादाचा उद्गार ठरेल ही टिळकांची धारणाही फोलच ठरली (बंगालात मात्र शिवजयंती उत्सव पोचला. या प्रसंगी कोलकत्यात केलेल्या एका भाषणात टिळक म्हणाले, शिवाजीमहाराज हिंदूंचे नेते होते अशी आमची धारणा नाही, तर अन्यायाच्या विरोधातील लढ्याचं प्रतीक म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहातो. बंगालातील शिवाजी कदाचित मुसलमान धर्माचाही असू शकेल).
तीच गत पेरीयार रामस्वामी नायकर यांची झाली. त्यांच्या द्रविड अस्मितेला केवळ तमिळनाडूतच प्रतिसाद मिळाला. केरळ, कर्नाटक, किनारपट्टीचा आंध्र प्रदेश या सर्वांचा समाज द्रविडनाडूत पेरीयार यांनी केला होता, परंतु तमिळनाडू आणि श्रीलंका वगळता द्रविड अस्मितेला दक्षिण भारतातील लोकांचाही पाठिंबा मिळाला नाही.
भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील अंतर्विरोध ठळक करणं हा स्वातंत्र्योत्तर काळातील पुरोगाम्यांच्या विविध विचारच्छटांचा कार्यक्रम राहिला. कारण भारतीय राष्ट्र-राज्याची निर्मिती झाली आहे असं त्यांनी गृहित धरलं. भारतीय राष्ट्र-राज्य बनण्याची प्रक्रिया स्वातंत्र्य आंदोलनात सुरू झाली. स्वातंत्र्य आंदोलन, घटना परिषदेची निर्मिती, राज्यघटना स्वीकारणं हे त्यातले महत्त्वाचे टप्पे होते परंतु भारतीय राष्ट्र आपल्याला आधी मिळालं. राज्य म्हणजे शासन तर वासाहतिक होतं. त्याचं राष्ट्र-राज्यात रूपांतर करण्यासाठी राज्यघटना बनवावी लागली. आजही या राष्ट्र-राज्याची जडण-घडण पूर्ण झालेली नाही. याकडेही पुरोगाम्यांनी दुर्लक्ष केलं. कम्युनिस्टांनी तर देश स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर असतानाच क्रांतीची घोषणा केली होती. भारत हे एक राष्ट्र नाही अशीच भूमिका मांडली होती. परिणामी त्यांना बंगाल, त्रिपुरा आणि केरळ या राज्यांमध्येच यश मिळालं. त्यामध्येही भाषिक-सांस्कृतिक घटक अधिक महत्त्वाचे ठरले. पुरोगाम्यांनी राष्ट्रवादाच्या आकांक्षेकडे दुर्लक्ष केलं. त्यातून नरेंद्र मोदी नावाचा भस्मासूर निर्माण झाला. नोटाबंदी असो की जीएसटी वा शेतकर्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याची फसवी घोषणा, नरेंद्र मोदींना दुसर्या खेपेलाही या देशातील जनतेने भरभरून मतं दिली. आम्ही उपाशी राहू, आत्महत्या करू, परंतु पाकिस्तानला (मुसलमान) धडा शिकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, या प्रकारची भावना हिंदूंमध्ये रुजवण्यात मोदी-संघ-भाजप परिवाराला यश मिळालं.
लोकांच्या राष्ट्रवादी आकांक्षांकडे पुरोगाम्यांनी दुर्लक्ष केल्यानं हा देश रसातळाला जाण्याची वेळ आली आहे, एवढा धडा करोना विषाणूपासून आपण शिकायला हवा.
.............................................................................................................................................
हेही पाहा, वाचा
जगातील दोन अब्ज लोकांचे वास्तव्य असलेला दक्षिण आशिया करोनाचे पुढचे केंद्र ठरू शकतो? - जोआना स्लेटर आणि निहा मासी
https://www.aksharnama.com/client/article_detail/4116
लोकांच्या राष्ट्रवादी आकांक्षांकडे पुरोगाम्यांनी दुर्लक्ष केल्यानं हा देश रसातळाला जाण्याची वेळ आली आहे, एवढा धडा करोनापासून आपण शिकायला हवा! - सुनील तांबे
https://www.aksharnama.com/client/article_detail/4115
करोना व्हायरस : कुठलाही आजार काही प्रमाणात जैविक, तर काही प्रमाणात सामाजिक-सांस्कृतिक असतो. - अनुज घाणेकर
https://www.aksharnama.com/client/article_detail/4114
करोना व्हायरस : अफवा, गावगप्पा आणि व्हॉटसअॅप युनिव्हर्सिटीवरील ‘फॉरवर्ड’ नावाची फेकमफाक यांच्यापासून सावध रहा - टीम अक्षरनामा
https://www.aksharnama.com/client/article_detail/4108
करोना व्हायरस : तज्ज्ञ डॉक्टर काय सांगतात, ते आणि तेवढंच ऐका; अफवांवर विश्वास ठेवू नका, घाबरून जाऊ नका
https://www.aksharnama.com/client/article_detail/4106
साथीचे आजार आणि जागतिकीकरण यांचा संबंध आता अधिक गुंतागुंतीचा बनला आहे!
https://www.aksharnama.com/client/article_detail/4103
करोना विषाणूमागे षडयंत्र असणार आणि या संकटाला कोणीतरी जबाबदार असणार, ही जनभावना आहे!
https://www.aksharnama.com/client/article_detail/4099
फक्त ‘साथीच्या रोगाने येणारे मरण’ आपल्याला एकत्रित आणू शकते?
https://www.aksharnama.com/client/article_detail/4107
करोनाचा तात्पुरता ‘साईड इफेक्ट’ : पर्यावरणपूरक जीवनशैली
https://www.aksharnama.com/client/article_detail/4100
.............................................................................................................................................
लेखक सुनील तांबे मुक्त पत्रकार आहेत.
suniltambe07@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment