अजूनकाही
‘करण अर्जुन’ या चित्रपटातल्या एका दृश्यात अमरीश पुरी विचारतो की, ‘गावातले सगळे लोक कुठे गेले?’ सर्व लोक छतांवर लपून बसलेले असतात. या अमरीश पुरीला ‘करोना’ हे नाव देऊन कालच्या ‘जनता कर्फ्यू’वर भाष्य व मीम तयार केले गेले. लोकांचे जीव घेणाऱ्या अशा आजारावर असे हसावे की नाही, हा मुद्दा अलहिदा; परंतु या आणि अशा प्रकारच्या अनेक सामाजिक प्रतिक्रियांमधून एक मानवशास्त्रीय सत्य पुन्हा अधोरेखित होते. ते म्हणजे कुठल्याही आजाराची जीवशास्त्रीय कारणं असली तरी मुळात आजार हा सामाजिक-सांस्कृतिकसुद्धा असतात. आजाराची कारणं, त्याचा फैलाव, त्याचे परिणाम, आजार टाळण्यासाठी केलेली उपाययोजना – या सर्वच बाबतीत एक दुवा महत्त्वाचा आहे - त्याकडे बघण्याचा लोकांचा दृष्टीकोन.
करोनाचं कारण
एका विषाणूच्या संसर्गाने होणाऱ्या आजाराकडे फक्त जैविक परिभाषेत समाज बघत नाही. त्याविषयीचे समज-गैरसमज दूर करण्यात यंत्रणेला आपला बराच वेळ खर्ची घालावा लागतो. मांसाहार केल्याने करोना फैलावतो, ही अफवा अशीच पसरली. त्याचा परिणाम कुक्कुटपालन उद्योगावर झाला. अशा प्रकारे लोक कुठल्या आजाराचे कारण काय समजतात, यावर आर्थिक-राजकीय गणितं अवलंबून असतात. बऱ्याचदा वरवरची माहिती असते. करोनाचा विषाणू १२-१४ तासांत मरतो आणि एका दिवशीच्या ‘जनता कर्फ्यू’ने सर्व विषाणू नाहीसे होणार, ही अशीच एक समाजमाध्यमांतून पसरलेली अफवा. वस्तुतः हा विषाणू प्लॅस्टिक किंवा स्टीलसारख्या ठिकाणी ७२ ताससुद्धा राहू शकतो, हे तथ्य समजावण्याचा खूप प्रयत्न करावा लागला, अजूनही होतो आहे. अन्यथा ‘सर्व विषाणू मारले गेले’ या भ्रामक समजापोटी अनेक लोक काळजी घेणं सोडून देतील. शास्त्रीय तथ्य काय आहे आणि भ्रामक समजूत काय आहे, याची शहानिशा सामाजिक मानसिकतेमध्ये करणं हे एखादं शिवधनुष्य पेलण्यासारखंच काम आहे.
करोनाचा फैलाव
समाज एका रोगाच्या पसरण्याला किती महत्त्व देतो, यावर बरंच काही अवलंबून असतं. कुठली एक गायिका करोनाची लागण झालेली असताना दोन-चारशे लोकांबरोबर पार्टी करते, कुणी एकजण लग्न समारंभात हजेरी लावतो, तर विलगीकरणाची सूचना असूनही कुणी एकजण रेल्वेनं प्रवास करताना पकडला जातो.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
तसंच समाज म्हणजे फक्त लोक नव्हे, तर व्यवस्थासुद्धा. कारण ती समाजाचंच एक उत्पादन असतं. त्यामुळे जेव्हा हा आजार चीनमध्ये पसरत होता, तेव्हा आपल्या व्यवस्थेनं किती गांभीर्यानं उपाययोजना केल्या, हेसुद्धा महत्त्वाचं ठरतं.
करोनाचे परिणाम
गेल्या काही दिवसांत परीक्षा रद्द झाल्या आणि ‘करोनाची सुट्टी’ मिळाली म्हणून खुश झालेला विद्यार्थीवर्ग पाहिला. त्याच वेळी शाळेला सुट्टी मिळाल्यानं वडापावच्या गाडीवर आई-वडिलांना मदत करणारी मुलंही पाहिली. ‘वर्क फ्रॉम होम’वर आलेले असंख्य विनोदही ऐकले. त्याचबरोबर आता रोजच्या जेवणाची सोय कशी करायची या विवंचनेत असलेली कुटुंबंही पाहिली. करोनाचे पर्यावरण बदलावर कसे सकारात्मक परिणाम होत आहेत आणि शुद्ध हवेत, पाण्यात जैव विविधता कशी परतत आहे, याचे दाखलेसुद्धा पाहिले. कर्फ्यु जाहीर होताच आपल्या गावी परतण्यासाठी रेल्वे स्थानकावर जमलेले स्थलांतरितांचे जत्थे पाहिले आणि अनेकांना प्रलय आल्यासारखी दैनंदिन सामानाची साठेबाजी करतानासुद्धा पाहिले.
समाजाच्या आरोग्यावर अशा साथीचे परिणाम होतातच. पण अनेक दूरगामी परिणाम सामाजिक, आर्थिकदेखील असतात. आधीच बेरोजगारीचं, गरिबीचं संकट सोसणाऱ्या आपल्या देशाला करोनापायी अनेक उद्योगधंदे बंद राहणं, रोज हातावर पोट घेऊन जगणाऱ्या मोठ्या लोकसंख्येचं अनेक दिवसांचं उत्पन्न बुडणं, परवडणारं नाही.
कुठल्याही आजाराला अटकाव करणं किंवा त्याचा फैलाव थांबवणं, यासोबतच वरील सर्व बऱ्या-वाईट परिणामांवर आपण कशा प्रकारे उपाययोजना करतो, यावर एक समाज म्हणून आपलं भवितव्य ठरणार आहे.
प्रतिबंध आणि उपचार
एका कट्ट्यावर चार आज्या तोंडाला मास्क बांधून ‘आम्ही आमच्या घरात कसं गोमूत्र शिंपडलं’, याची चर्चा करत होत्या. सामाजिक विलगीकरण करण्याची ही त्यांची संकल्पना! मोठ्या संख्येनं एकत्र येऊन गोमूत्र पार्टी करणं हीदेखील तशीच एक व्यापक संकल्पना!! आकाशातून करोनाचा खात्मा करणारी जीवनाशक फवारणी, नादशक्तीचा सोहळा या अशाच काही संकल्पना!!!
काल ‘जनता कर्फ्यू’च्या निमित्तानं आरोग्य कर्मचाऱ्यांना टाळ्या वाजवून अभिवादन करण्याची मुळात चांगली असलेली संकल्पना एका इव्हेंट स्वरूपात संपन्न झाली. अनेक ठिकाणी जल्लोषात लोकांनी गर्दी करून विलगीकरणाच्या मूळ संकल्पनेला छेद दिला.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
जोपर्यंत वैद्यकशास्त्र विकसित झालं नव्हतं, तोपर्यंत देवीचा प्रकोप, महामारीला घरी येण्यापासून रोखण्यासाठी घराच्या दरवाजावर काही लिहून ठेवणं, असे किंवा यासारखे उपाय समाज करत होता. आजसुद्धा आपण शास्त्रीय दृष्टीकोन पूर्णपणे न अवलंबता आपल्या सामाजिक कल्पनांच्या चष्म्यातूनच कुठल्याही आजाराकडे बघत असतो.
आपला दृष्टीकोन विस्तारू या…
या सर्व मीमांसेचा निष्कर्ष हाच की, कुठलाही आजार काही प्रमाणात जैविक, तर काही प्रमाणात सामाजिक-सांस्कृतिक असतो. त्यामुळे आजार बरे करणारे आरोग्यसेवक कितीही प्रामाणिकपणे त्यांची भूमिका बजावत असले आणि सरकारने कितीही वैद्यकीय सुविधा उपलब्ध केल्या असल्या तरी समस्या तिथे संपत नाही. (अर्थात आरोग्य सेवा आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्था यांतही अनेक बदल आवश्यक आहेतच.)
परंतु लोक काय विचार करतात, त्यातसुद्धा समाजाचे वेगवेगळे गट (म्हणजे धर्म, जात, वर्ग, लिंग, वय, शिक्षण यावर आधारित) काय विचार करतात, कशा प्रकारे आजाराकडे बघतात, हेही महत्त्वाचे ठरते. योग्य संदेश योग्य प्रमाणात लोकांच्या भाषेत समजावणं, वर्तनात बदल होईल असे प्रयत्न, फक्त आपत्तीच्या काळातच नव्हे तर नियमित करणं हेही गरजेचं असतं, आहे.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
दक्षिण कोरियामध्ये करोना खूप मोठ्या प्रमाणावर आटोक्यात आला, हे आपण जाणतोच. त्यासाठी तिथं लोकसहभागावरसुद्धा मदार ठेवली गेली, लोकांनी आपण होऊन पुढे यावं यासाठी प्रयत्न केले गेले.
ज्यांनी चांगल्या प्रकारे करोनाला अटकाव केला आहे, अशा देशांकडून आपल्याला शिकणं क्रमप्राप्त आहे. कुठल्याही आजाराकडे फक्त वैद्यकीय किंवा जैविक प्रक्रिया म्हणून बघण्याची आपली दृष्टी बदलून त्याकडे सामाजिक प्रक्रिया म्हणून बघणं गरजेचं आहे.
...............................................................................................................................................................
हेही पाहा, वाचा
करोना व्हायरस : अफवा, गावगप्पा आणि व्हॉटसअॅप युनिव्हर्सिटीवरील ‘फॉरवर्ड’ नावाची फेकमफाक यांच्यापासून सावध रहा
https://www.aksharnama.com/client/article_detail/4108
करोना व्हायरस : तज्ज्ञ डॉक्टर काय सांगतात, ते आणि तेवढंच ऐका; अफवांवर विश्वास ठेवू नका, घाबरून जाऊ नका
https://www.aksharnama.com/client/article_detail/4106
साथीचे आजार आणि जागतिकीकरण यांचा संबंध आता अधिक गुंतागुंतीचा बनला आहे!
https://www.aksharnama.com/client/article_detail/4103
करोना विषाणूमागे षडयंत्र असणार आणि या संकटाला कोणीतरी जबाबदार असणार, ही जनभावना आहे!
https://www.aksharnama.com/client/article_detail/4099
फक्त ‘साथीच्या रोगाने येणारे मरण’ आपल्याला एकत्रित आणू शकते?
https://www.aksharnama.com/client/article_detail/4107
करोनाचा तात्पुरता ‘साईड इफेक्ट’ : पर्यावरणपूरक जीवनशैली
https://www.aksharnama.com/client/article_detail/4100
.............................................................................................................................................
लेखक अनुज घाणेकर मानववंशशास्त्रज्ञ व समुपदेशक आहेत.
anujghanekar2@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment