कपूर अँड सन्स  : हिरव्यागार पानावरून ओघळणारा दवबिंदू
सदर - इनसाइडर
अमोल उदगीरकर
  • ‘कपूर अँड सन्स’ची पोस्टर्स
  • Sat , 21 March 2020
  • इनसायडर Insider अमोल उदगीरकर Amol Udgirkar कपूर अँड सन्स Kapoor And Sons Shakun Batra फवाद खान Fawad Khan सिद्धार्थ मल्होत्रा Sidharth Malhotra आलिया भट Alia Bhatt ऋषी कपूर Rishi Kapoor रत्ना पाठक Ratna Pathak रजत कपूर Rajat Kapoor रजत कपूर

गेल्या काही दशकांमध्ये समाज म्हणून आपला प्रवास संयुक्त परिवारापासून ‘न्यूक्लियस’ परिवाराकडे झालाय. एका अणूचं जसं विभाजन होतं आणि त्यातून प्रचंड ऊर्जा तयार होते, तसं या सामाजिक ट्रान्सफॉर्मेशनमुळे पण बरीच उलथापालथ झाली. मी आणि माझ्या पिढीतले बहुतेक जण या ‘न्यूक्लियस’ फॅमिलीमध्ये जन्मलेल्या आणि वाढलेल्या पहिल्या पिढीचे प्रतिनिधी. या फॅमिलीमध्ये जन्म झाल्याचे अर्थातच अनेक फायदे होते. जसे की मिळणारं व्यक्तिस्वातंत्र्य, घरातल्या मुलांना मिळणारं जास्त अटेन्शन, एकूणच संयुक्त कुटुंबात होणारी महिलांची ओढाताण इथं बऱ्यापैकी कमी असणं...

पण नाण्याची दुसरी बाजूही आहे. एकूणच वाढता व्यक्तिवाद छोट्या परिवारातही अंतर निर्माण करतोय. काहीशी अलिप्तता पण आढळते तरुणांमध्ये. पण याचा अर्थ, परस्परांविषयीचा अंतरीचा जिव्हाळा आटलाय का? तर नाही. तो आहेच. फक्त तो शाबूत आहे, हे कळण्यासाठी एखादा समरप्रसंग यावा लागतो. भारतातल्या या अस्सल अनेक छिद्रांची गोधडी असणाऱ्या न्यूक्लियस परिवाराचं जिवंत आणि संवेदनशील चित्रण करणारा सिनेमा म्हणजे ‘कपूर अँड सन्स’. अनेक अर्थांनी यामधली फॅमिली आपल्याला आपल्या परिवाराची एक वेगळी प्रतिमा दाखवते, जी इतकी वर्षं त्या परिवारात राहूनही दिसलेली नसते. त्यामुळे या सुंदर सिनेमावर लिहिणं आवश्यक.

‘कपूर अँड सन्स’ बघायला जाण्यापूर्वी डोक्यात अनेक पूर्वग्रह होते, हे मान्य करायला हवं. निर्माता करण जोहर, सिद्धार्थ मल्होत्रा, ट्रेलरमधलं ते पंजाबी ठेक्याचं गाणं, धर्मा प्रॉडक्शन्सचा एकूणच सिनेमानिर्मितीचा इतिहास, या सगळ्या घटकांमुळे सिनेमाकडून शून्य अपेक्षा होत्या. पण सिनेमा संपल्यावर चांगल्या अर्थानं अपेक्षाभंग झाला. सिनेमा मनोरंजक तर होताच, पण अंतर्मुख करून जाणारा होता. हिंदीमध्ये म्हणतात तसं, ‘खुद के गिरेबान मे झांक के देखने को मजबूर करने वाला’. एक अतिशय सुंदर अनुभव.

दिग्दर्शक शकुन बात्राचा दिग्दर्शक म्हणून हा दुसरा चित्रपट. त्याचा पहिला चित्रपट ‘एक मैं और एक तू’ ठीकठाक होता. बराचसा ‘What happens in Vegas’वर आधारित. पण शकुनने त्याचा शेवट एकदम अपारंपरिक, वेगळा आणि थोडा धक्कादायक केला होता.

‘कपूर अँड सन्स’मध्ये शकुनने दिग्दर्शक म्हणून अनेक पावलं पुढं टाकली आहेत. ‘Dysfunctional Family’ या विषयावर काही दिवसांपूर्वीच येऊन गेलेल्या झोया अख्तरसारख्या ताकदीच्या दिग्दर्शकाने पण ‘दिल धडकने दो’सारखा चित्रपट करून चांगलाच अपेक्षाभंग केला होता. त्याचं दुःख ताजं असतानाच शकुनसारख्या तुलनेने नवीन दिग्दर्शकाने प्रचंड तरलतेने हा विषय पडद्यावर मांडला आहे.

खरं तर सिनेमाचा प्लॉट काही फारसा मोठा नाहीये. कथानकातले कॉन्फ्लिक्टस पण फार अंगावर येणारे नाहीयेत. सिनेमाचं सगळ्यात मोठं बलस्थान आहे - मुख्य पात्रांमधले परस्परसंबंध, त्यांच्यात होणारे संवाद आणि काही फारच अप्रतिम परफॉर्मन्सेस. अर्जुन (सिद्धार्थ मल्होत्रा) आणि राहुल (फवाद खान) हे दोघेही पाच वर्षानंतर आपल्या आजारी आजोबांना भेटायला आपल्या घरी येतात. दोघेही लेखक आहेत. पण राहुल यशस्वी, नाव असणारा लेखक आहे, तर याउलट अर्जुन छोटे-मोठे जॉब करून अजून लेखनाच्या क्षेत्रात हातपाय मारत आहे. त्यांचे आई वडील (रत्ना पाठक आणि रजित कपूर) यांच्यात अनेक कारणावरून विसंवाद आहे. राहुल आणि अर्जुन यांच्यात पण सुप्त स्पर्धा आणि त्यातून एकमेकांबद्दल आलेली अढी आहे.

कुठल्याही भारतीय परिवाराप्रमाणे इथे पण नातेसंबंध अतिशय गुंतागुंतीचे आहेत. म्हणजे आईला राहुल जास्त प्रिय असतो (‘मेरा परफेक्ट बेटा’ असं ती म्हणत असते), पण राहुलला आपल्या व्यावसायिकदृष्ट्या अपयशी वडिलांबद्दल जास्त सहानुभूती असते. आई-वडिलांच्या झगड्यात त्याचा कल वडिलांकडे असतो. अर्जुनला आईबद्दल प्रेम आहे, पण आईला राहुल जास्त प्रिय आहे. अर्जुनच्या व्यावसायिक धरसोड वृत्तीमुळे वडीलही त्याला बोलत असतात. या सगळ्यांना धरून ठेवणारा धागा म्हणजे जिंदादिल नव्वदीला पोहोचलेले आजोबा. हे कमी म्हणून की काय दोन लेखक भावांमध्ये संघर्ष गुंतागुंतीचा करायला एण्ट्री होते, ती टियाची (आलिया भट).

कथासूत्र अतिशय जगावेगळं नसलं तरी दिग्दर्शक शकुन बात्राने कथेला दिलेली ट्रीटमेंट खूप छान आहे. इथे ना melodramatic संवाद आहेत, ना ठासून बळजबरी भरलेलं नाट्य (शेवटचा थोडा वेळ वगळता). कथानक अगदी सहज पुढं सरकतं. सिनेमातली पात्रं आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या लोकांसारखी आहेत.

घरातला कर्ता पुरुष हर्ष (रजत कपूर) ही सगळ्यात जमून आलेली व्यक्तिरेखा आहे. बॅंकेतली सुरक्षित नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय करण्याचा अयशस्वी प्रयत्न करणारा हा कर्ता पुरुष सगळ्यांच्या काहीसा हिणवण्याचा विषय असतो. त्यातून हर्षने घराबाहेर स्वतःला मोकळं करणाऱ्या जागा शोधल्या आहेत. कर्ता पुरुष असूनही त्याची कुचंबणा होत आहे. त्यातून तो चिडचिडा, कटकट्या बनलाय. तो बायकोपाशी कटकट करतोय. मुलांना टोमणे मारतोय. पण या चिडक्या, कटकट्या माणसात पण एक जिव्हाळा आहे. हा सिनेमा फक्त रजत कपूरच्या अभिनयासाठी बघितला तरी चालेल असं म्हणता येईल. रणबीर कपूरने एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की, रजत कपूरचा हा परफॉर्मन्स २०१६ सालातला सर्वोत्कृष्ट परफॉर्मन्स होता.

दुसरी सगळ्यात जमून आलेली व्यक्तिरेखा म्हणजे राहुलची. लादल्या गेलेल्या परफेक्टपणाचं ओझं घेऊन जगणारा मोठा मुलगा फवाद खानने फार अप्रतिम केलाय. अतिशय देखणा, व्यावहारिक आयुष्यात यशस्वी असणारा, समजूतदार असणारा, समंजस, आज्ञाकारी कुठल्याही आई-वडिलांचं स्वप्न असणारा हा मुलगा आहे, असं वरकरणी दिसतं खरं, पण या परफेक्ट माणसाचं आयुष्यच खोटेपणाच्या पायावर आधारलेलं आहे. राहुलने पण हा परफेक्टपणाचा मुखवटा खुबीनं मिरवला आहे. पण आपण आई-बाबांच्या व्याख्येत बसणारे परफेक्ट नाही आहोत, ही जाणीव त्याला आतून पोखरतीये. जेव्हा त्याचा परफेक्टपणाचा मुखवटा त्याच्या आईसमोर गळून पडतो, तेव्हा तो उन्मळून पडतो.

रत्ना पाठकची आई घरातल्या आपल्या आयांसारखीच हुबेहूब. आईला सगळी मुलं सारखीच असतात असं म्हटलं जातं. पण खरंच तसं असतं का? इथली सुनीता उघडच मोठ्या मुलावर जास्त प्रेम करते. मोठ्या मुलावर भरभरून प्रेम करताना लहान मुलावर आपल्याकडून मोठा अन्याय होतोय, याची जाणीव तिला आहे, पण मोठ्या मुलाच्या प्रेमात ती हतबल आहे. नवऱ्याच्या अपयशामुळे आणि ढासळत्या आर्थिक परिस्थितीमुळे तिने आपली स्वप्नं गुंडाळून ठेवली आहेत. त्यातून ती आतून सतत धुसफुसत असते आणि नवऱ्यावर राग काढत असते. आपला नवरा आपल्याशी एकनिष्ठ नाही, या संशयाने सैरभैर झालेली आई रत्ना पाठकने सुंदर साकारली आहे. लहान मुलाने, राहुलने आपण आपल्या घरात ‘सेकंड बेस्ट’ किंवा ‘रनर अप’ आहोत, हे मनाशी मान्य केलंय.

घराघरात आढळणारी ‘सिबलिंग रायव्हलरी’ हा विषय चित्रपटात फार हळुवारपणे हाताळला आहे. दोन्ही भावांमध्ये व्यावसायिक आणि वैयक्तिक कारणांमुळे ‘लव्ह-हेट रिलेशनशिप’ आहे. परिस्थिती अशी आहे की, दोन्ही भाऊ नेहमी एकमेकांसमोर उभे ठाकत असतात. पण इतकी कटुता असूनही दोघेही नाकारत नाहीत. परिवारातल्या प्रत्येक सदस्याचं स्वतःचं असं एक रहस्य आहे. जेव्हा हा परिवार एकत्र येतो, तेव्हा हळूहळू ही रहस्यं उलगडायला लागतात आणि पडद्यावर पात्रांना याचा जितका धक्का बसतो, तितकाच प्रेक्षकांनाही.

सिनेमाच्या पटकथेने खरी मजा केली आहे. मुख्य पात्र असणारे दोन्ही भाऊ लेखक आहेत. त्यांचं लेखक असणं पटकथेत काही कारणांमुळे खूप महत्त्वाचं आहे. चांगलं बनण्याची क्षमता असणाऱ्या अनेक सिनेमांना ‘सेकंड हाफ कर्स’चा शाप असतो. ‘कपूर अँड सन्स’चा उत्तरार्ध हा सिनेमाला अजून एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतो. पटकथेत काही जागा कथानकात ‘तणाव निर्मिती’ कशी करावी याचा वस्तूपाठ आहेत.

चित्रपटामध्ये दोन प्रसंग अतिशय लक्षवेधी. पहिला म्हणजे घरात गळका नळ दुरुस्त करायला आलेल्या प्लंबरच्या साक्षीनेच सदस्यांमध्ये तुफान भांडणं सुरू होतात. तो प्रसंग एकाच वेळेस मार्मिक आणि तुफान विनोदी आहे. दुसरा म्हणजे फॅमिली फोटोग्राफ काढण्याच्या प्रसंगात तोवर साचत आलेल्या अस्वस्थतेचा स्फोट होतो तो प्रसंग. हे दोन प्रसंग चित्रपटाचा हायलाईट म्हणता येतील असे आहेत.

‘धर्मा’च्या सिनेमात तांत्रिक बाजू नेहमीच भक्कम असतात. तशा त्या इथं पण आहेत. संवाद एकदम चटपटीत आणि गरजेप्रमाणे. सिनेमाचं संगीत आणि पार्श्वसंगीत या मोठ्या जमेच्या बाजू आहेत. ‘ओ साथी रे’ हे गाणं म्हणजे कडकडत्या थंडीतला उन्हाचा कवडसाचं जणू. सिनेमात बॅकग्राऊंडला सतत संथ गिटार वाजत असते. तिला मोठा आवाज करून आपल्या उपस्थितीची जाणीव करून द्यावी लागत नाही. ती बस झंकारत असते. सिनेमा बघताना हे पार्श्वसंगीत आवर्जून लक्ष देऊन ऐकण्यासारखं.

सिनेमाचं कथानक कुन्नूर या हिलस्टेशनच्या नयनरम्य जागी घडतं. कुन्नूर अफाट सुंदर असलं, तरी त्याच्या सुंदरपणाला एका अनाम उदासीची झालर आहे. सिनेमाच्या फ्रेममध्येही ते सौंदर्य आणि उदासीची झालर दिसते हे विशेष. कुन्नुरची ती हिरवळ, सतत कानावर पडणारा वेगवेगळ्या पक्ष्यांचा गुंजारव, गूढरम्य चहाचे मळे सिनेमाच्या दृश्यभाषेला मनोरम बनवतात. सिनेमातली इतर सौंदर्यस्थळं बाजूला ठेवली तरी सुंदर कॅमेरा वर्कमुळे सिनेमा नयनरम्य आहे.

कुटुंब\परिवार\फॅमिली. नेमकं काय असतं हे प्रकरणं? समाजशास्त्रात काही रुक्ष शब्दांनी भरलेल्या व्याख्या असतीलच. पण हे कुटुंब प्रकरणं असं शब्दांच्या कैचीत सापडणं फार अवघड. पारा जसा हातातून सटकून जातो, तसं ते सटकून जाण्याची शक्यताच जास्त. त्यामुळे उगी त्याच्या व्याख्या करण्याच्या फंदात पडू नाही. एक मात्र नक्की आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात एक ‘कॉन्स्टन्ट’ समान आहे. आपली फॅमिली परफेक्ट नाही हे आपल्याला माहीत असतं. आपण सोशल मीडियाच्या भिंतीवर कितीही परफेक्ट असण्याचं प्रदर्शन करत असलो, तरी खरी गोष्ट आपल्यालाच आतून माहीत असते. आपल्यापैकी बहुतेकांची फॅमिली व्हॉट्सअॅप ग्रुपमधून बाहेर निघण्याची, पळवाट काढण्याची धडपड चालू असते. आपण घरच्या लोकांसोबत बसून कधी अंतरीच्या गोष्टी करतोय अशातलाही प्रकार नाही. आमची पिढी मित्रांसोबत जास्त रमणारी. मित्रांसोबत जास्त शेअरिंग करणारी. पण अवघड संकटाच्या प्रसंगी सगळं घर मतभेद बाजूला ठेवून एकत्र येतं. अशा वेळेस भावाबहिणींमधली स्पर्धा, वडिलांशी असलेलं तणावाचं नातं, आईसोबत असलेलं अवघडलेपण अशा वेळेस कुठं तरी गळून पडतं. कुठला तरी एकमेकांना बांधून ठेवणारा अनामिक बंध, नाजूक वाटत असला तरी तो तितका कमजोर नाहीये. आपल्या कल्पनेपेक्षा कितीतरी मजबूत. पिढ्यांपिढ्यांचं संचितच जणू. परिवारातल्या सदस्यांना त्यांच्या अवगुणासकट आणि त्यांच्या भूतकाळासकट स्वीकारल्याशिवाय पर्याय नाही, कारण आपण सगळेच अपरिपूर्ण आहोत, असा संदेश फार सुंदरपणे हा चित्रपट देतो. आपल्या सगळ्यांनाच आपापल्या अपरिपूर्ण फॅमिलीची आठवण ‘कपूर अँड सन्स’ करून देतो हे सगळ्यात महत्त्वाचं.

.............................................................................................................................................

लेखक अमोल उदगीरकर फँटम फिल्म्ससोबत पटकथा लेखक म्हणून काम करतात.

amoludgirkar@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.      

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......