येणाऱ्या काळात जर धर्मांना कालसुसंगत ठरवायचे असेल तर धर्मगुरूंना विज्ञानवादी दृष्टीकोन अवलंबण्याचा व धर्माची चिकित्सा करण्याचा विवेक दाखवावाच लागेल!
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
अजिंक्य कुलकर्णी 
  • ‘मंच’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Fri , 20 March 2020
  • ग्रंथनामा शिफारस मंच डॅनिअल मस्करणीस

वैदिक साहित्यात धर्माच्या दोन व्याख्या पाहायला मिळतात. त्यातील एक व्याख्या आहे, ‘धारणात धर्म इत्याहू, धर्म धारयते प्रजा’. जो लोकांना एकमेकांसोबत जोडून ठेवतो, तो धर्म. जी गोष्ट प्रजेची धारणा उभी करते, ती म्हणजे धर्म होय. दुसरी व्याख्या, ‘यतो अभ्युदय नि:श्रेयस सिद्धी सह धर्म’.  इहलोक आणि परलोक त्या दोघांमध्ये समन्वय घडवतो तो धर्म. मानवाला जोडणाऱ्या ज्या मूलभूत प्रेरणा आहेत, त्यात धर्माचा नंबर सर्वांत वरचा आहे.

पण याच धर्माचा उपयोग जर मानवाला तोडण्यासाठी, द्वेष उत्पन्न करण्यासाठी किंवा शोषण करण्यासाठी होत असेल तर? तर धर्माच्या मूळ शिकवणीलाच सोडचिठ्ठी दिल्यासारखं होईल. धर्माचे सो कॉल्ड ठेकेदार - मग ते पाद्री असोत, भगवी वस्त्र धारण केलेला बाबा-बुवा असोत की, मौलवी - धर्माचा मूळ अर्थ सांगण्यास असमर्थ असतील तर? अशा वेळी योग्य मार्गदर्शन न केल्यास धर्माच्या तत्त्वज्ञानाला एक साचलेपणा येतो. धर्म हा सतत प्रवाही असायला हवा.

असाच ख्रिस्ती धर्माचा आणि बायबलच्या मूळ शिकवणीचा ऊहापोह वसईतील एका तरुणाने आपल्या परीने करण्याचा प्रयत्न केला आहे. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असलेल्या या तरुणाचे नाव आहे- डॅनिअल मस्करणीस आणि त्याच्या पुस्तकाचे नाव आहे – ‘मंच’.

या पुस्तकात एकूण बावीस लेख आहेत. या लेखांचे आधी पुस्तक करावे असे डॅनिअलच्या मनात होते, परंतु ‘साप्ताहिक साधना’चे संपादक विनोद शिरसाठ यांनी हे लेख आधी ‘साधना’त छापले आणि मग ते पुस्तकरूपाने प्रकाशित केले.

या पुस्तकात डॅनिअलची ‘विवेक मंचा’सोबत ओळख कशी झाली? डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या विचारांशी त्याचा कसा संबंध आला? डॅनिअलची मंचातल्या विविध व्यक्तींसोबत ओळख झाल्यावर त्यांच्यासोबत विविध विषयांवर झालेल्या चर्चा या पुस्तकात वाचायला मिळतात. डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या विचारांनी डॅनिअलला विवेकवादी विचारांची कास धरायला लावली.

कर्मकांड कमी-अधिक प्रमाणात प्रत्येक धर्मात आहेत. कर्मकांडामागचा अर्थ समजून-उमजून करत असाल तर कुणाची काही हरकत नसावी, पण त्याचं स्तोम माजवलं जात असेल तर? कर्मकांडामुळे जर आर्थिक, मानसिक शोषण होत असेल, तर मग मात्र मोठी समस्या निर्माण होते. डॅनियलच्या या पुस्तकात जरी ख्रिस्ती धर्माची (वसईपुरती) चिकित्सा करण्याचा प्रयत्न असला तरी, तो जो चिकित्सेचा मार्ग सुचवू इच्छितो आहे, तो प्रत्येक धर्माला - मग तो हिंदू, मुस्लीम, बौद्ध, शीख सर्वांनाच - लागू होतो.

विवेकवादी चिकित्सा धर्माला पुढे घेऊन जाणारी ठरते. इतिहासात डोकावल्यावर आपल्याला हे वेळोवेळी निदर्शनास येईल. धार्मिक गोष्टींच्या नावाखाली घुसलेला कचरा, रूढी-परंपरा या अनावश्यक असतील तर त्या त्यागण्यास मदत होते किंवा किमान त्याविषयीच्या चर्चेची द्वारे खुले होतात. ‘विज्ञान आणि धर्म’ हे एकमेकांस पूरक असू शकतात. परंतु त्यासाठी धर्माचे आचरण विवेकानेच करायला हवे.

डॉ. नरेंद्र दाभोलकर अंधश्रद्धेची व्याख्या करताना म्हणतात की, ‘जी श्रद्धा माणसाचे शारीरिक, आर्थिक, भावनिक असे कोणत्याही प्रकारचे शोषण करत असेल तर ती अंधश्रद्धाच आहे.’ ‘धर्म नकोच’ असे म्हणणारे लोक धर्माला काउंटर करताना म्हणतात की, विज्ञान धर्माला पर्याय होऊ शकतं. पण धर्माला सोडून आपण वैज्ञानिक दृष्टीकोन स्वीकारला तर काय होईल? अधार्मिकता हा काही उपाय होऊ शकत नाही! मग सुवर्णमध्य तो कोणता? तर उच्च धर्म स्वीकारण्याबरोबर वैज्ञानिक दृष्टिकोनही स्वीकारणे, असं डॉ. राधाकृष्णन म्हणतात.

डॅनियल अशी विवेकवादी मांडणी पुस्तकात जागोजागी करतो. तो आणि वसईतले इतर लोक (तरुणांपासून ते ज्येष्ठांपर्यंत, महिला असे विविध क्षेत्रांतील) एक पण करतात, ‘विवेक मंच!’ स्थापन करतात.  या मंचात करायचं काय? तर धर्म, राजकारण, अर्थकारण, अशा विविध विषयांवर चर्चा करायची आणि नि:शंक होण्याचा प्रयत्न करायचा. वसईत या ‘विवेक मंचा’ने काही कार्यक्रमही केले. विवेकवादाच्या कसोटीवर, विज्ञानाच्या कसोटीवर खऱ्या न उतरणाऱ्या गोष्टी मानायच्या नाहीत, असे या मंचातील १५-२० लोकांनी ठरवले.

एकदा वसईतील एका चर्चने एका महिलेने अपंगांसाठी स्थापन केलेल्या संस्थेला चक्क आपली संस्था म्हणून घोषित करण्याचा प्रयत्न केला. त्या महिलेला आपल्या बाजूने वळवून त्याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला. ती महिला मात्र यासाठी तयार नव्हती. तिला अपंगांसाठी सुरू केलेल्या या संस्थेचा संबंध धर्माशी जोडायचा नव्हता. म्हणून मग तिची संस्था बंद पडावी म्हणून चर्चने केलेले कपट, स्त्रियांना दिली जाणारी दुय्यम वागणूक, चर्चचा ढोंगीपणा, चर्चचे आर्थिक घोटाळे, हे अगदी आपल्या विवेकाला साद घालत डॅनियल आपल्यासमोर प्रस्तुत करतो.

‘गुप्तदान’ या गोष्टीबद्दल बोलताना डॅनिअल म्हणतो की, प्रत्येक धर्माच्या मूळ शिकवणुकीला आपण कसे पायदळी तुडवत असतो, त्याचा विचारही आपण करत नाही. प्रत्येक धर्मात धार्मिक स्थळी गुप्तदान करण्याची पद्धत आहे. असं का? तर मोठा दानधर्म करणे ही माझ्या आवाक्याबाहेरची असेल तर माझ्यात न्यूनगंड वाढू शकतो आणि ज्याच्या जवळ जास्त आहे त्याचा अहंगंड पोसला जाण्याची शक्यता असते. हे दोन्ही गंड निर्माण होऊ नयेत म्हणून गुप्तदान पद्धत आहे. मूळ विचाराला प्रत्येक धर्मात तिलांजली देण्यात येते. त्याउलट मंदिरात, चर्चमध्ये पाट्या लावल्या जातात की, कोणी किती पैसे दिले!

या पुस्तकात केवळ ख्रिस्ती धर्माची नकारात्मक बाजू दाखवलेली नाही, तर काही चांगल्या बाजूही दाखवल्या आहेत. काही पुरोगामी विचारांच्या फादरच्या कार्याची दखलही डॅनिअल आपल्या पुस्तकात घेतो. त्यात प्रामुख्याने येतात ते फादर रेमंड. कुटुंब नियोजन, गर्भपात या विषयावर जिथे चर्च एक चकार शब्द काढायला तयार नसते, तिथे फादर रेमंड आधुनिक व कालसुसंगत विचार मांडत असत. मग अशा मंचाला व फादर रेमंड यांना विरोध झाला नाही तरच नवल! लोकांनी विवेक मंचच्या सभेत धुडगूस घातला. ‘मंच’वाले धर्माविरुद्ध काम करतात म्हणून तो बंद पाडण्याचा प्रयत्नही केला.

धर्म, अर्थ, श्रद्धा, अंधश्रद्धा या विविध विषयांकडे आपण कसे पाहावे यावर डॅनिअलने आपले मत या पुस्तकात मांडले आहे. हे विषय आपल्या जीवनावर फार परिणाम करणारे असतात. म्हणूनच आपणही आपल्या परीने या विषयांची चिकित्सा करायला हवी असे त्याला वाटले. कारण धर्म ही माणसाच्या जीवनावर दूरगामी परिणाम परिणाम घडून आणणारी एक वस्तुस्थिती आहे. धर्माचं अस्तित्व आणि त्याचा प्रभाव नाकारता येत नाही. आजच्या विज्ञान युगात वावरणाऱ्या माणसाला समजेल अशा भाषेत धर्माची ओळख करून देणं निकडीचं आहे. येणाऱ्या काळात जर धर्मांना कालसुसंगत ठरवायचे असेल तर धर्मगुरूंना विज्ञानवादी दृष्टीकोन अवलंबण्याचा व धर्माची चिकित्सा करण्याचा विवेक दाखवावाच लागेल. नाहीतर धर्माचाच नाश होईल आणि त्यात असलेल्या सर्वांगसुंदर मूल्यांचाही.

.............................................................................................................................................

‘मंच’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5198/Manch

.............................................................................................................................................

अजिंक्य कुलकर्णी

ajjukul007@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

Gamma Pailvan

Sun , 22 March 2020

दानियाल मस्करणीस यांच्या कार्यास शुभेच्छा! फक्त एक सावधगिरीची सूचना द्यावीशी वाटते.

विज्ञानाच्या कसोटीवर खऱ्या न उतरणाऱ्या गोष्टी मानायच्या नाहीत, असे या मंचातील १५-२० लोकांनी ठरवले.

मला विचारवंसं वाटतं की, या मंचाच्या सदस्यांचा विज्ञानाचा तात्विक अभ्यास आहे का? हा प्रश्न विचारायचं कारण असं की, विज्ञानात गेल्या २००० वर्षांपासून demarcation problem नावाची समस्या अस्तित्वात आहे. विज्ञान व अविज्ञान यांच्यात नेमकी सीमारेषा कुठे आखायची हे आजही स्पष्ट नाही. मंचाच्या सदस्यांनी विवेकाच्या आधारे ही सीमारेखा आखायचं ठरवलं आहे. ठीक आहे. पण मग विवेक आणि अविवेक यांच्यात सीमा कोणी व कशी आखायची? आणि ही सीमा वस्तुनिष्ठ नसून व्यक्तिनिष्ठ असणार आहे ना?
तर, सावधगिरीची सूचना अशी की 'वैज्ञानिक दृष्टीकोन' नावाचा कुठलाही पदार्थ अस्तित्वात नाही. दृष्टीकोन निश्चितच अस्तित्वात असतो, पण तो त्या त्या माणसाचा वैयक्तिक दृष्टीकोन असतो. उपरोक्त मंचाचे सदस्य ही वैयक्तिक जबाबदारी घेणार आहेत का? ही ती सावधगिरीची सूचना आहे.
गामा पैलवान


Ganesh Gorde

Sat , 21 March 2020

सामान्य विज्ञान या विषयाप्रमाणेच प्राथमीक शाळेतुन धर्मविज्ञान शिकवण्याची गरज आहे, History Geography या प्रमाणे एखादा विषय जो सर्व धर्मातील वैज्ञानिक मानसिक धार्मिक पैलूंचे योग्य शिकवण देईल. दहावी, बारावी व प्रत्येक Graduate , professional unprofessional course मध्ये तो सक्तिचा असावा.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......

म. फुले-आंबेडकरी साहित्याकडे मी ‘समाज-संस्कृतीचे प्रबोधन’ म्हणून पाहतो. ते समजून घेण्यासाठी ‘फुले-आंबेडकरी वाङ्मयकोश’ उपयुक्त ठरणार आहे, यात शंका नाही

‘आंबेडकरवादी साहित्य’ हे तळागाळातील समाजाचे साहित्य आहे. तळागाळातील समाजाचे साहित्य हे अस्मितेचे साहित्य असते. अस्मिता ही प्रथमतः व्यक्त होत असते ती नावातून. प्रथमतः नावातून त्या समाजाचा ‘स्वाभिमान’ व्यक्त झाला पाहिजे. पण तळागाळातील दलित, शोषित व वंचित समाजाला स्वाभिमान व्यक्त करणारे नावदेखील धारण करता येत नाही. नव्हे, ते करू दिले जात नाही. जगभरातील सामाजिक गुलामगिरीत खितपत पडलेल्या समाजघटकांचा हाच अनुभव आहे.......

माझ्या हृदयात कायमस्वरूपी स्थान मिळवलेला हा सीमारेषाविहिन कवी तुमच्याही हृदयात घरोबा करो. माझ्याइतकंच तुमचंही भावविश्व तो समृद्ध करो

आताचा काळ भारत-पाकिस्तानातल्या अधिकारशाही वृत्तीच्या राज्यकर्त्यांनी डोकं वर काढण्याचा आहे. अशा या काळात, देशोदेशींच्या सीमारेषा पुसून टाकण्याची क्षमता असलेल्या वैश्विक कवितांचा धनी ठरलेल्या फ़ैज़चं चरित्र प्रकाशित व्हावं, ही घटना अनेक अर्थांनी प्रतीकात्मकही आहे. कधी नव्हे ती फ़ैज़सारख्या कवींची या घटकेला खरी गरज आहे, असं भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतल्या विवेकवादी मंडळींना वाटणंही स्वाभाविक आहे.......