अजूनकाही
‘बगळा’ या कादंबरीच्या द्वितीय आवृत्तीच्या निमित्ताने ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक अतुल देऊळगावकर यांनी केलेलं भाषण...
.............................................................................................................................................
आपण पर्यावरण, प्रदूषण या सर्व संज्ञांच्या सुळसुळाट झालेल्या काळात आहोत. आता तर नुकतीच हवामानाची आणीबाणी जाहीर करण्यात आलेली आहे. अशा काळामध्ये Unconditioned Local Wisdom म्हणजे संसर्गरहित स्थानिक बुद्धिमत्ता व त्यासोबत कुशाग्रता, कौशल्य असं काही साहित्यात बघायला मिळाल्यानंतर विलक्षण आनंद मिळतो. तो यासाठी की निसर्गाकडे सहजगत्या बघून आनंद व्हावा तसं प्रदूषणरहित आणि संसर्गरहित काही पाहिलं की आपलं मन भरून येतं. आपल्याला झाडं तुटताना दिसतात, तळं पूर्ण आटलेलं दिसतं, हे जेव्हा होतं त्या वेळेला लहान मुलांचं त्या तळ्याशी, त्या पक्ष्यांशी हे नातं नेमकं काय होतं? हे ‘बगळा’ या कादंबरीत प्रसाद कुमठेकरांनी सांगितलंय. आणि प्रसादचं वैशिष्ट्य असं आहे की, त्याच्या ‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’ आणि ‘बगळा’ या पुस्तकांत त्याची भाषा ही अतिशय स्थानिक उदगिरी भाषा आहे. आणि ती उत्तम भाषा आहे. त्या भाषेला डौल आहे, कस आहे. त्यामुळे त्या भाषेतला ओलावा तुकोबांनी म्हटलंय त्या प्रमाणे ‘परि जिव्हाळ्याची ओल । आवडे रसाळ।’ आणि ती ओल या या बोलीतून, कादंबरीतून पदोपदी जाणवते.
या ‘बगळा’मध्ये एक साधी घटना होते की, खेळताना क्रिकेटचा बॉल चिंत्याकडून हरवतो. आणि हरवल्यानंतर चिंत्याला भीती वाटायला लागते की, तो अकरा रुपयाचा टेनिसचा बॉल जो झाडीत ‘झुर्रकन’ निघून गेलेला आहे, त्याला आता त्याचा दंड भरावा लागणार. अन तो भरायचा कसा? एवढे पैसे तर कोणाकडे नसतात. त्याच्याच चिंतेत बगळ्याचा हा नायक ‘चिंत्या’ उदगीरच्या गल्लोगल्लीतून निघतो आणि त्याला अचानक सायकलला उलटे लटकवलेले बगळे दिसतात.
त्या वेळेला सर्व गल्ल्यांतून मोकळेपणाने फिरता येत होतं, कोणाची भीती वाटत नव्हती, सर्व गल्ल्यांतल्या सर्व जातींशी नातं होतं, जातीद्वेषाचा विखार तेव्हा जडलेला नव्हता. जातीचा उल्लेख जरी झाला तरीदेखील त्या पलीकडे एक आत्मीयता एक जिव्हाळा होता. हा जिव्हाळा चिंत्या आणि त्याच्या सभोवताली सतत जाणवतो. त्यामुळे अगदी अर्पणपत्रिकेमध्येसुद्धा प्रसाद लिहून जातो की, त्याच्या डोक्यामध्ये एक रहेमानी किडा आहे. भाषेचा हा जो ओघ आहे, इकडं आलेली निजामी मोगलाईतली भाषा, स्थानिक भाषा, त्यामध्ये आलेले इंग्रजी शब्द या सगळ्यातून आपलं बोट धरून तो थेट प्रक्षेपण करत त्या काळातलं उदगीर, त्या काळातील समाजरचना, त्या काळातील बालकाचं मन, त्या काळातील शिक्षणव्यवस्था हे सगळं दाखवत नेतो, हे या हरवलेल्या क्रिकेटच्या चेंडूच्या निमित्ताने.
चिंत्याला दिसतो तो ‘तलाव’. त्या तलावावर येणारे बगळे आणि ते बगळेसुद्धा तो मोजतो. पंच्याण्णव बगळे आहेत, दोन कमी आहेत. ते गेले कुठे? आणि तो असं ठरवतो की, बगळे पकडायला पाहिजेत. त्या बगळ्यांना विकून मला चेंडू घेता येईल आणि माझ्या काकाच्या पाठीचं कुबड काढण्याचं मला ऑपरेशन करता येईल. असा विचार करणाऱ्या चिंत्याच्या त्या उदगीरमधला तो तलाव, ते तळं नष्ट झालंय, त्यावर अतिक्रमण होऊन मैदान झालेलं आहे. त्यामुळे तिथून बगळेसुद्धा गायब झालेले आहेत. परंतु चिंत्याच्या मनातला जो बगळा आहे... खरंतर बगळा म्हटल्यानंतर आपल्यासमोर येतं ते ‘बकध्यान’. म्हणजे तरीपण त्यात लिहिलेलं आहे, ‘बगळ्याचं अटेन्शन म्हनजे अर्जुनापेक्षा लय डेंजराय. तो बगतो बगतो अन गपकन माशे गिळतो.’ पण त्याच्या मनातला जो पांढराशुभ्र बगळा आहे, ती जी बगळ्याची माळ आहे, ती काहीतरी वेगळी आहे.
म्हणजे एवढ पक्ष्याबद्दलचं आकर्षण लहान मुलांच्या मनात का असतं? त्यांचं निसर्गाशी एवढं नातं का असतं? आणि ते निघून गेल्यानंतर काय होतं? हे जरी प्रत्यक्ष या कादंबरीत आलेलं नसलं तरी आपल्याला ते जाणवतं. या कादंबरीचा कालखंड आहे नव्वदचा. नव्वदनंतर मराठवाड्यामध्ये निसर्गाची कत्तल निर्घृणपणे सुरू झाली होती. त्यामुळे आधी एलकुंचवारांनी म्हटल्याप्रमाणे ‘आधी ते तळं आटत गेलं’. मग निसर्गातलं तळं आधी आटलं की, आपल्या मनातलं तळं आधी आटलं? आपल्या मनातला, नात्यातला जिव्हाळा कमी झाला की निसर्गातला जिव्हाळा कमी झाला? आणि त्यामुळे बगळे दिसेनासेच झाले. या भावविश्वाकडे बारकाईने बालकाच्या नजरेतनं प्रसाद बघतो. जसा प्रकाश नारायण संतांचा लंपन आहे. तो अतिशय निरागस आहे पण अतिशय चाणाक्ष आहे. त्याला सर्व काही दिसतं. ही अतिशय अवघड गोष्ट आहे. बालकाच्या नजरेतून भाबडेपणाने न बघता, पण निरागस नजरेनं सर्व काही बघणं आणि त्यावर भाष्य करणं, त्यातून विनोदाची निर्मिती.
बगळा वाचताना अलगद, इतकं सहज, नकळत हसू येतं की, वाचकाला आपलं बालपण त्यात दिसायला लागतं, त्यातली निरागसता दिसायला लागते. त्यामध्ये कधी कधी लबाडी असते, कधी कधी चलाखी असते. ‘करलालाव’, ‘युलालाव’, ‘यीळनकाळ’ हे असे सगळे स्थानिक भाषेतले शब्द आणि ती सामाजिक रचना मग ती मीरा काकूच्या मधनं येते, कधी त्या अव्वाच्या मधनं येते. या सगळ्यातून असणारी जी एक भीती आहे, ती भीती दारिद्र्याची आहे. आपल्याला काही मिळणार की नाही याची भीती आहे. पण या सगळ्यामधले परस्परसंबंध या सगळ्या पलीकडचे आहेत. वर्गात पहिल्या येणाऱ्या बहिणीचा, पिंकीचा चिंतूला अभिमान आहे. आणि बहिणीला पण खंत वाटते की, माझ्या भावाला नेहमी अंडेच का मिळतात? आणि अंडे मिळणाऱ्यांनी शिकावं अशीपण इच्छा आहे. एखाद्याची फजिती झाली तर आनंद आहे, पण तो फार तात्पुरता आहे. हे जे सगळं सामाजिक पर्यावरण आहे, हे त्या काळामध्ये अतिशय सशक्त होतं, एकमेकांना जुळवून घेणारं होतं, परस्परावलंबी होतं आणि तरीदेखील स्वतःचं स्वत्व जपणारं होतं. हे सगळं बगळा या कादंबरीतून आपल्याला दिसतं.
मला प्रसादचं हे वैशिष्ट्य वाटतं की, या काळातही तो ते बघताना भाबडेपणाने बघत नाही. त्याचं तो उदात्तीकरण होऊ देत नाही. तो भावनिक अतिरेकात अडकत नाही. हे सगळं असं होतं एवढंच तो फक्त सांगतो. ते गेल्याबद्दल कुठेही शोक नाही. त्यामुळे ही दीर्घकाळ टिकून राहणारी मराठीतील एक अस्सल दर्जाची कादंबरी आहे. म्हणूनच प्रसादकडून पुढच्या कादंबरीची अपेक्षा आहे.
‘बगळा’ आणि ‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’मधून प्रसाद जे व्यक्त झालाय, ते बघून वाटतं की, मराठवाड्यामध्ये पहिली वेगळी वाट ही शेषराव मोहिते सरांनी चोखाळली. त्यानंतर आसाराम लोमटे पुढे आले. आता प्रसादमुळे लक्षात येत आहे की, आजपर्यंत मराठी भाषेत ग्रामीण म्हटलं की, दुःखाचं कड काढणारं किंवा खोटेपणाचं एक पर्यावरण तयार झालं होतं. त्याला पूर्णपणे छेद देऊन थेट वास्तव भिडावणारं, परंतु त्याचं चहूबाजूंनी निरीक्षण येत असल्यामुळे शेषरावनंतर आसाराम आणि आता प्रसाद कुमठेकरने आणि त्याच्या पिढीने आशा निर्माण केली आहे!
.............................................................................................................................................
‘बगळा’ या कादंबरीच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
http://www.booksnama.com/client/book_detailed_view/3745
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Gamma Pailvan
Sat , 21 March 2020
नमस्कार अतुल देऊळगावकर!
भाषा व तदनुषंगिक संस्कृती टिकून राहण्यासाठी एका पिढीकडून पुढील पिढीकडे कसलातरी (सांस्कृतिक?) ठेवा हस्तांतरित व्हायला हवा असतो. शेषराव मोहिते, आसाराम लोमटे, प्रसाद कुमठेकर यांच्या अथक प्रयत्नांमुळे हा वारसा पुढे चालणार आहे. असं मला वाटतंय. मी या तिघांचं इवलंसंही साहित्य वाचलं नाहीये. पण मराठीचा अभिमानी व प्रेमी म्हणून मला अशी जाणीव आतून होतेय. काही चुकलं असेल तर समजून घ्या.
आज मराठीतून व्यक्त होण्यासाठी धडपडणारा मराठी भाषिक वर्ग पुण्यामुंबईतनं घटत चालला आहे. आज ज्याला शहरी मराठी मध्यमवर्ग म्हणतात तो मुलांना इंग्रजी माध्यमातनं शिकवतो. पण तरीही या वर्गासाठी इंग्रजी ही केवळ पोट भरायची भाषा आहे. पोट भरण्यासाठी आपल्या भाषिक अस्तित्वाशी तडजोड करायची का, असा प्रश्न कधीतरी उभा राहील. त्या वेळेस प्रसाद कुमठेकर यांच्यासारख्या लेखकांचं साहित्य एक वेगळं दालन खोलून आपल्याच मुळांकडे परतायची संधी उपलब्ध करून देईल.
आपला नम्र,
-गामा पैलवान