अजूनकाही
करोनाची साथ आता गांभीर्य ते विनोद निर्मिती, अशा व्यापक परिघावर फिरतेय. ही साथ जगभरच पसरल्याने त्याची(च) चर्चा चालू आहे. ‘पादऱ्याला पावट्याचे निमित्त’ या आधाराने अनेक गोष्टींतून अनेकांनी हात झटकून (किंवा धुवून) घेतलेत. त्यात प्रतिबंधक उपाय म्हणून जगभरच विविध गोष्टींवर घातलेली बंदी, भारतातही लागू झाली आणि आधीच कामचुकार असलेल्या आपल्या देशात अनेकांना मज्जाच आली असेल. फक्त विविध बंधनांनी त्यांच्या या सुट्टीला एंजाॅयमेंट अथवा सेलिब्रेशनचं स्वरूप देता येत नसल्याने किंचितसा हिरमोड झाला असेल, पण किंचितसाच. कारण एखादी गोष्ट बंद करा म्हटलं की, आपल्याकडे ती चोरटेपणाने किंवा नियम वाकवून सुरू कशी ठेवायची, याची सक्रियता वाढते. तशी ती आताही वाढणार.
करोनाबाबत सर्वप्रथम बंदी महाराष्ट्रापुरती मराठी वृत्तवाहिन्यांवर घालायला हवी. त्यांनी प्रबोधनाच्या नावाखाली जो काही उच्छाद मांडलाय, त्याला आवर घालायला हवा.
बातमी आधी देण्याच्या नादात क्रिकेटचा स्कोअर सांगावा तसा व कोणी रुग्ण सापडल्यास दाऊद इब्राहिम हाती लागल्याच्या उत्साहात वार्तांकन केलं जातंय.
दोनच उदाहरणे या वाहिन्यांचा अर्धशिक्षित बेजबाबदारपणा दाखवायला पुरेसा आहे.
एकाच वाहिनीवरील ही दोन उदाहरणे आहेत.
१) वृत्तनिवेदिका पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचा बाईट दाखवते. त्यात ते म्हणतात, ‘करोनाग्रस्तांची ओळख, तपशील उघड करू नका, कारण त्यातून काही वेगळे सामाजिक प्रश्न उभे राहताहेत.’
त्यांचे हे विधान दाखवून मध्ये एक बातमी जाते व लगेच मुंबईचा प्रतिनिधी मुंबईत नव्याने बाधित रुग्ण सापडल्याची बातमी देतो. त्यावर हीच निवेदिका उत्साहाने विचारते की, ते कोण आहेत? त्यांचे काही तपशील मिळालेत. त्यावर तो प्रतिनिधीच पडेल आवाजात म्हणतो, ‘नाही, त्यांची ओळख, तपशील उघड करता येणार नाही.’ हा भांग प्यायल्यासारखा उत्साह येतो कुठून?
२) याच वाहिनीवर देशभरात विविध राज्यांत किती रुग्ण आहेत याचे ग्राफिक्स दाखवले जात होते. त्यात हरयाणात ११ जण बाधित आहे, असे सांगत अत्यंत सहजपणे निवेदिका म्हणते, ‘पण ते सर्व परदेशी आहेत. त्यामुळे काळजीचे कारण नाही!’ त्यानंतर कुठल्याही राज्यातील परदेशी रुग्णांची माहिती देताना निवेदिकेचा स्वर तसाच, हे फार दखलपात्र नाही असाच होता.
आता अशीच वॄत्ती अनेक भारतीय जे परदेशात अडकलेत वा बाधित झालेत त्यांच्याबाबत तेथील सरकार, जनता व माध्यमे यांनी दाखवली तर चालेल आपल्याला!
याशिवाय सरकारने काही जाहीर करायच्या आत हे ‘ब्रेकिंग न्यूज’मध्ये वाट्टेल ते बेपर्वाईने ठोकून देतात. आपल्या काही नेत्यांना या वाहिन्यांना आतल्या बातम्या देत स्वत:चे प्रमोशन एरव्ही या ना त्या निमित्ताने करत राहण्याची, लागेबांधे वा थेट व्यावसायिक पद्धतीने संबंध ठेवण्यात इंटरेस्ट असतो. तसाच तो वाहिन्यांनाही असतो. ‘सूत्रांकडून कळते’ या नावाखाली बरेच काही खपवले जाते!
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अत्यंत संयमाने व पायरी पायरीने या संकटाबाबत निर्णय घेत असताना या वाहिन्यांच्या घिसाडघाईने संपूर्ण नियोजनातच गोंधळ उडू शकतो.
तेव्हा मुख्यमंत्र्यांनी सर्वप्रथम या वाहिन्यांसाठी वेगळा वॉर्ड निर्माण करावा व पंधरा दिवस यांना तिथे कोंडावे.
सरकारने वृत्तवाहिन्यांवरील करोना प्रबोधन बंद करून फक्त सरकारच्या आरोग्य खात्याकडून येणारी माहितीच प्रसारित करण्यास परवानगी द्यावी. कारण यांची अभिव्यक्ती,संयमित खबरदारी उपाययोजनेला सुरुंग लावायची.
बाकी रामदास आठवलेंचे ‘गो करोना’ असो की, गोमूत्रांने करोना दूर करणारे गोपालक किंवा ‘करोना बंगाली बाबा’ असो, हे असे अशा काळात निपजतच असतात. त्याकडे विरंगुळा म्हणूनच पहावे!
करोनाचे गांभीर्य आता जनतेनेचे स्वयंप्रेरणेने घेतले आहे. समाजमाध्यमांवरील मीम्सच्या पलीकडे जाऊन नेटवरून अभ्यासपूर्ण माहिती शोधून घबराट कमी करणारे जसे आहेत, तसेच मास्क वगैरेचा उतावळेपणा टाळणारेही आहेत.
करोनाबाबतची ही स्थिती, जागरूकता, केंद्र व राज्यांसह नागरिकांची जी सामूहिक शक्ती दिसतेय ती मरणाच्या भीतीतून? का साथीच्या रोगाने येणाऱ्या मरणाबद्दल(च) आमची संवेदना जागॄत होते, ती कार्यप्रवण होते?
हे म्हणण्याचे कारण गेल्या काही महिन्यांत व वर्षात घडलेल्या घटनांचे स्मरण करायला हरकत नाही. कारण आज जशी एकतानता, सावधानता दिसतेय, तशी ती त्या त्या वेळी दिसली नाही.
करोनाने जसे एक मरणाचे सावट सर्वदूर पसरलेय, तसेच त्या वेळीही मरणाचे सावट सर्वदूर पसरले होते. करोनात जसा विषाणू नवा व उपाय माहीत नाही अशी जी अवस्था आहे, ती मात्र त्या वेळी नव्हती. आपल्याला विषाणूही माहितीचा होता, उपायही माहीत होते, तरीही आपण हजारो माणसे मरू दिली! त्या मरणांचे भय आपल्याला वाटले नाही किंवा असं म्हणूया आपल्यातल्या काहींनाच वाटले असेल. तर काहींना त्या मरणांबद्दल क्षोभ व वेदना दोन्ही झाल्या. तर एका मोठ्या गटाला त्या मरणांचा उत्सवच साजरा करावासा वाटला, उन्माद वाटला आणि त्या उन्मादात ते पुढच्या मरणांची अभिनिवेशी घोषणाही करू लागले. मरणापेक्षाही भयावह होती ही अमानवी निर्दयता.
देशात गेल्या साडेपाच वर्षात रुजवलेल्या धार्मिक ध्रुवीकरणाने हजारोंचे बळी घेतले. झुंडीने घेतले. नुकत्याच दिल्लीत घडवलेल्या दंगलीत ५० च्या वर बळी गेले. अनेकांचे संसार, व्यवसाय नामशेष केले गेले. हा ध्रुवीकरणाचा विषाणू करोनाएवढाच किंवा त्यापेक्षा घातक नाही?
साथीच्या रोगावर कालांतराने लस सापडते. आज एडसही असाध्य रोग राहिलेला नाही. करोनाही औषध कंपन्यांच्या वेळापत्रकानुसार लस सापडून आटोक्यात येईल. पण पिढ्यानपिढ्यांच्या या विषाणूचं काय करायचं? सर्वोच्च न्यायालयाने भडखाऊ भाषण करणाऱ्यावर गुन्हे दाखल करा म्हटले, त्यावर त्या न्यायधीशांकडून ती केस काढून घेऊन दुसऱ्याकडे देत सरकारने कालहरणाचा खेळ केला आणि ते नेते हिंदू व भाजपचे असल्याने बेदाग राहिलेत, तर आम आदमी पार्टीचा आमदार जो मुस्लीम आहे, त्याच्यावर तातडीने कारवाई केली गेली.
असाच प्रकार करोनावर गोमूत्राचा उपचार सांगणारे बाहेर आणि करोना बंगाली बाबा, मुसलमान असल्याने तातडीने जेलात!
याबद्दल जनता व माध्यमे करोनाप्रमाणे एकतानता दाखवतील? त्याची माहिती ताबडतोब देतील. यासाठीच्या प्रतिबंधात्मक उपायांसाठी प्रबोधन, जागरण करतील?
नाही करणार कारण धर्मांधतेचा, जातीयतेचा, लैंगिक विषमतेचा विषाणू डीएनए असल्यासारखा भारतीयांच्या रंध्रारंध्रात आहे. लक्षणे कमी-जास्त, बाधेची मात्रा राजकीय सामाजिक पर्यावरण कसे बनवले जाते त्यावर अवलंबून. आणि ही महामारी आम्हाला हवी असते. कधी कारसेवा, संस्कॄती रक्षा, धर्मरक्षा तर कधी जिहाद म्हणून.
हा साथीचा रोग घालवण्याची सर्व साधने, उपाय आम्हाला ज्ञात असूनही आम्ही ती उपयोगात आणत नाही. आणि मागच्या साडेपाच वर्षांत तर ही महामारी पसरवण्याचे पद्धतशीर प्रयोग राबवले जाताहेत. दिल्लीत दिसले पुढे पश्चिम बंगाल, बिहारमध्ये दिसतील.
करोनाच्या सावटातच हा विचार करणे गरजचे आहे, कारण साथीचे मरण वाचवताना एकाच साथीचा विचार करून कसा चालेल?
जाता जाता : आता ३१ मार्च नंतर गेल्या साडेपाच वर्षात अर्थव्यवस्थेत शिरून ती पोखरल्ल्या विषाणूचे परिणाम दिसायला लागतील. बघूया जनता व आश्रित माध्यमे तेव्हा कुठला मास्क वापरतात. सरकारला सवाल करणारा की झाकपाक करणारा?
...............................................................................................................................................................
हेही पाहा, वाचा
साथीचे आजार आणि जागतिकीकरण यांचा संबंध आता अधिक गुंतागुंतीचा बनला आहे!
https://www.aksharnama.com/client/article_detail/4103
करोनाचा तात्पुरता ‘साईड इफेक्ट’ : पर्यावरणपूरक जीवनशैली
https://www.aksharnama.com/client/article_detail/4100
करोना विषाणूमागे षडयंत्र असणार आणि या संकटाला कोणीतरी जबाबदार असणार, ही जनभावना आहे!
https://www.aksharnama.com/client/article_detail/4099
करोना व्हायरस : तज्ज्ञ डॉक्टर काय सांगतात, ते आणि तेवढंच ऐका; अफवांवर विश्वास ठेवू नका, घाबरून जाऊ नका
https://www.aksharnama.com/client/article_detail/4106
...............................................................................................................................................................
लेखक संजय पवार प्रसिद्ध नाटककार व पटकथाकार आहेत.
writingwala@gmail.com
............................................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment