२८ जून १९१४ला सारायेव्होच्या रस्त्यावर पडलेल्या ठिणग्यांनंतर बरोबर एक महिन्याने पहिल्या जागतिक महायुद्धाचा वणवा पेटला!
सदर - पहिले महायुद्ध... १०० वर्षांनंतर
आदित्य कोरडे
  • ऑस्ट्रियाचा युवराज आर्च ड्युक फ्रांझ फर्डिनांड आणि त्याची पत्नी सोफी शोटेक यांच्या हत्येचं एक पेंटिंग... इंटरनेटवरून साभार
  • Tue , 17 March 2020
  • सदर पहिले महायुद्ध... १०० वर्षांनंतर पहिले महायुद्ध First World War आर्च ड्युक फ्रांझ फर्डिनांड Archduke Franz Ferdinand

ऑस्ट्रियन युवराजवर प्राणघातक हल्ला होऊ शकतो, याची खबरबात बोस्नियन सरकारला तसेच ऑस्ट्रियन अधिकाऱ्यांना होती. त्यांनी फ्रान्झने आपली भेट रद्द करावी, अशी विनंतीही केली होती. पण तसे केल्यास ऑस्ट्रियन सरकार भेकड आहे, असा संदेश जाईल, म्हणून त्यांची मागणी फेटाळली गेली. सुरक्षेचा विचार करता भेट रद्द नाही केली तरी उघड्या मोटारीतून शहरातून दौरा तरी तहकूब करावा, जाहीर भाषणे टाळावी, ही विनंतीदेखील त्याच कारणासाठी नाकारली गेली. जून महिन्यात बोस्नियाच्या दौऱ्यावर असलेला युवराज आणि त्याची बायको २८ जूनऐवजी एक दिवस आधीच म्हणजे २७ जूनलाच सरायेव्होला येऊन पोहोचले. जीवाला धोका असतानाही ते सारायेव्होच्या रस्त्यावर उघड्या मोटारीतून भटकले. (एक दिवस लवकर येणार हे जसे इतरांना माहिती नव्हते, तसेच त्यांच्या मारेकऱ्यांनाही माहिती नव्हते.)

ऑस्ट्रिया समर्थक लोक बोस्नियात तसे भरपूर होते. तुर्कस्तानच्या जोखडातून मुक्त झाल्यावर या भागावर सर्बियाचा डोळा होता आणि सर्बियाच्या राज्यात पूर्वाश्रमीचे सत्ताधारी म्हणून तुर्की मुस्लीम समुदायाला दुय्यम वागणूक मिळत असे. तीच आपलीही गत होईल या भयाने बोस्नियन मुसलमान ही ऑस्ट्रिया समर्थक होते. खरे सांगायचे तर प्रिन्सिपसारखे काही सर्ब तरुण आणि काही संघटना सोडल्या तर बोस्नियन जनता फार काही ऑस्ट्रियाच्या विरोधात नव्हती.

बोस्नियाच्या रस्त्यावर भटकताना फ्रान्झची गाडी इंजिन खूप गरम झाल्याने बंद पडली आणि शाही दाम्पत्य तिची दुरुस्ती होईपर्यंत रस्त्यावरच उभे राहिले. त्या वेळी जणू भविष्यात काय घडणार आहे, याची चाहूल लागल्याप्रमाणे फ्रान्झ म्हणाला, “आमच्यावर जीवघेणा हल्ला होऊ शकतो अशी धोक्याची सूचना मिळते आणि इथे आमची गाडी ऐन रस्त्यात बंद पडते, काय योगायोग आहे!”

आज आपल्याला हे सगळे ऐकून आश्चर्य वाटते की, सुरक्षेबाबत हे लोक इतके कसे हलगर्जी असतील, पण त्यामागे एक कारण होते. सोफिया राजघराण्यात जन्मलेली नसल्याने त्यांच्या लग्नाला मोठ्या नाखुशीने परवानगी देताना त्यांना शाही दाम्पत्य म्हणून मिरवायला बंदी घातली होती. ऑस्ट्रियाचा युवराज असला तरी तो बायकोला त्याच्या लग्नाचा वाढदिवस (२८ जून) साजरा करायला घेऊन आला होता. म्हणजे तिला आणायचे हे कारण त्यांनी ऑफिशियली दिले होते आणि त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा शाही इतमाम नव्हता... असो.

त्यांच्यावर जीवघेणा हल्ला होऊ शकतो अशा बातम्या आल्यावर सुनारिक हा बोस्नियन पार्लमेंटचा एक सदस्य ज्याने पूर्वी त्यांना दौरा रद्द करण्याचा सल्ला दिला होता, तो जेव्हा २७ जूनला त्यांना भेटला. तेव्हा सोफिया त्याला म्हणाली, “तुम्ही जसे म्हणाला तसे बोस्नियाचे लोक काही आमच्या विरोधात दिसले नाहीत. उलट जेथे जाऊ तेथे त्यांनी आमचे प्रेमळपणे स्वागतच केले आहे.” त्यावर हा सुनारिक जे बोलला ते जणू भविष्यदर्शकच होते. तो म्हणाला “बाईसाहेब, मी देवाकडे प्रार्थना करतो की, उद्या संध्याकाळी आपण जेव्हा शाही जेवणाकरता परत भेटू तेव्हाही तुम्ही याच भावना व्यक्त कराल.”

दुसऱ्या दिवशी म्हणजे २८ जूनला ते जेव्हा सैन्य कवायती आणि सराव पहायला निघाले, तेव्हा त्यांच्यावर खुनी हल्ला करण्यासाठी सात मारेकरी त्यांच्या दौऱ्याच्या मार्गावर निरनिराळ्या ठिकाणी उभे होते. त्यात प्रिन्सीपदेखील होता. शाही दाम्पत्याला घेऊन निघालेला ताफा (त्यांच्या ताफ्यात  सहा मोटार गाड्या होत्या, ज्यात तिसऱ्या गाडीत फ्रान्झ-सोफिया बसलेले होते) मिल्केक नदीच्या काठाने असलेल्या रस्त्यावरून कमरजा नावाच्या पुलावर आला. या पुलावर तीन मारेकरी थांबलेले होते. त्यातील नेजेको काब्रीनोविकने फ्रान्झ-सोफिया बसलेल्या गाडीवर बॉम्ब फेकला, पण तो गाडीच्या मागील भागावरून टाणकन उडून मागच्या गाडीवर पडला आणि फुटला. गाडीत असलेला एक अधिकारी आणि रस्त्यावरचे एक-दोन लोक जखमी झाले.

सूचना मिळाल्याप्रमाणे खरोखरच हल्ला झाला, हे पाहिल्यावर ताफा तिथून त्वरेने  निघाला. प्रिन्सीप आणि इतर तिघे जेथे उभे होते, तिथून पुढे गेला. थोड्याच वेळापूर्वी स्फोटाचा आवाज ऐकला असल्याने बहुधा आपला कट यशस्वी झाला, असे वाटून ते बेसावध झाले होते. फ्रान्झ-सोफियाची गाडी वेगाने जाताना त्यांनी पाहिलीदेखील, पण त्वरेने काही करायच्या आत ताफा पुढे निघून गेला. इकडे बॉम्ब फेकल्यावर काब्रीनोविकने त्याला दिलेले सायनाइड विषप्राशन केले आणि नदीमध्ये उडी मारली. पण सायनाइड विष जुने किंवा भेसळयुक्त असल्याने त्याला काहीच झाले नाही. नदीलाही अगदी घोटाभर पाणी होते. त्यामुळे तो पुरता भिजलाही नाही. लोकांनी त्याला लगेच पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. आपला बेत फसला असे वाटून सगळे कटकरी हताश झाले.

इकडे भरधाव वेगाने निघालेला ताफा साराय्व्होच्या सिटी हॉलमध्ये येऊन पोहोचला. सारायेव्होचा महापौर तेथे त्यांचे स्वागत करायला उत्सुक होता. नुकत्याच झालेल्या हल्ल्यातून बचावलेल्या फ्रान्झ-सोफियाला थोडा सावरायला वेळ लागला. तरी त्यांनी महापौरावर राग काढलाच. आता खरेतर पुढील दौरा रद्द करून परिस्थिती आटोक्यात येईपर्यंत शांतपणे सुरक्षित ठिकाणी राहणे जास्त योग्य होते, पण तसे केल्याने एका बॉम्बस्फोटाने शक्तिशाली ऑस्ट्रियन साम्राज्याचा युवराज घाबरला असे वाटेल, म्हणून युवराजने आपला पूर्वनियोजित कार्यक्रम ठरल्याप्रमाणे उरकायचा मनोदय जाहीर केला. त्याला कुणीही विरोध केला नाही. फक्त त्याने त्याआधी  बॉम्बस्फोटात जखमी झालेल्या अधिकाऱ्याची भेट घेऊन त्याची चौकशी करण्यासाठी इस्पितळात जायचे ठरवले. आणि इथेच आतापर्यंत त्याच्यासोबत असलेल्या नशीबाने त्याची साथ सोडली.

तिथे जाण्याकरता त्यांना त्यांचा पूर्वनियोजित रस्ता बदलून जाणे भाग होते. मोटारींचा ताफा त्यांच्याबरोबरच विएन्नावरून आलेला आणि मोटारचालकही त्यांचा विश्वासू आणि शासकीय सेवेतला म्हणजेच विएन्नाचा होता. त्यामुळे त्यांना रस्ता नीट माहिती नव्हता.

यावेळी तीनच मोटारी होत्या आणि पुढच्या मोटारीत खुद्द महापौर बसला होता. तोच ड्रायव्हरला रस्ता दाखवत होता. पूर्वी आलेल्या रस्त्यावरूनच कमरजा पुलापर्यंत जाऊन मग पुलासमोर उजवे वळण घ्यायचे होते (नकाशात ४ या ठिकाणी) आणि पुढे फ्रान्झ जोसेफ रस्ता ओलांडून पुढच्या चौकातून डावीकडे वळून इस्पितळात जायचे होते, पण जेथे नुकताच स्फोट झाला, तिथे परत गाडी न्यायला बिचकल्यामुळे असेल किंवा रस्ता पोलिसांनी बंद केल्यामुळे असेल तो कमरजा पुलाआधी येणाऱ्या लीटनर पुलासमोरच्या रस्त्यावर वळला. (नकाशावर ७ या आकड्याजवळ) महापौराने त्याला हा रस्ता चुकीचा असून परत मागे वळून कमरजा पुलावर गाडी घ्यायला सांगितली. पहिल्या गाडीचा ड्रायवर थांबला, तशा मागच्या दोन्ही गाड्याही थांबल्या. आता सगळ्यात मागची गाडी हलवल्याशिवाय मागे जाता येणे शक्य नव्हते. अगदी तासाभरापूर्वी बॉम्बहला झालेला असतानादेखील मोटारगाड्या उघड्याच होत्या आणि त्यांच्याभोवती जादा सुरक्षारक्षकही नव्हते.

तिथेच अॅपल-क्वे या नावाच्या इमारतीत शिलर्स स्टोअर नावाच्या दुकानासमोर सँडविच घेता घेता कट फसल्यावर आपण इथून सुरक्षित कसे सटकायचे याच्या विवंचनेत असलेला प्रिन्सीप उभा होता. त्याच्या अगदी समोर फ्रान्झ-सोफिया बसलेली उघडी मोटार उभी होती. काय होते आहे हे कळायच्या आत त्याने खिशातून ब्राउनिंग पिस्तुल काढले, फ्रान्झवर रोखले आणि सटासट दोन गोळ्या झाडल्या. पहिली गोळी सोफियाच्या पोटाला लागली आणि दुसरी फ्रान्झच्या मानेतून आरपार गेली. ज्या माणसाचा नेम अगदी खराब होता, त्याने झाडलेल्या दोन्ही गोळ्यांनी दोन जीव घेतले. पुढे पोलिसांसमोर एका प्रत्यक्षदर्शीने सांगितल्याप्रमाणे प्रिन्सीपने गोळ्या झाडताना डोळे मिटून घेत मानही बाजूला वळवली होती, पण आज फ्रान्झ-सोफियाची वेळ भरली होती!

सारायेव्होचा गव्हर्नर ऑस्कर पोट्युरेक हा फ्रान्झच्या गाडीत ड्रायव्हर शेजारी बसलेला होता. गोळ्यांचा आवाज ऐकून त्याने मागे वळून पहिले तर फ्रान्झ-सोफिया गाडीत बसलेलेच होते. त्याला वाटले पुन्हा एका फसलेला हल्ला झालेला आहे. त्याने त्वरेने गाडी तिथून बाहेर काढायला ड्रायव्हरला सांगितले. गाडी लीटनर पुलाजवळ आली, तेव्हा फ्रान्झच्या गळ्यातून भळाभळा वाहणारे रक्त पाहून सोफिया चित्कारली, “अरे देवा! काय झालंय तुम्हाला?” (For Heaven's sake! What happened to you?) आणि ती बेशुद्ध पडली. पोट्युरेकला वाटले, भयाने तिला भोवळ आली असावी, पण तिला पोटात गोळी लागलेली होती आणि ती गंभीर जखमी झालेली आहे, याची जाणीव झालेला फ्रान्झ तिला म्हणाला, “सोफिया सोफिया, मरू नकोस, आपल्या मुलांसाठी तरी तुला जगावेच लागेल.” (Sopherl! Sopherl!, "Sterbe nicht! Bleibe am Leben für unsere Kinder! - Sophie dear! Sophie dear! Don't die! Stay alive for our children!)

गाडी इस्पितळाच्या वाटेवर असतानाच दोघांचाही अंत झाला. दोन गोळ्या झाडल्यावर प्रिन्सीपने तेच पिस्तुल स्वत:च्या डोक्यावर रोखले, पण आसपासच्या लोकांनी त्याला ताबडतोब पकडला आणि चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केला. झटापटीत त्याने पटकन सायनाइडची कॅप्सूल गिळली, पण हेदेखील भेसळ युक्त निघाले आणि दोन-चार उलट्याशिवाय प्रिन्सीपला काहीही त्रास झाला नाही.

फ्रान्झ फर्डिनांड-सोफियाच्या खुनाची बातमी लगोलग पसरली. बोस्नियात दंगल झाली. सातही मारेकरी आणि जवळपास ५००० सर्ब लोकांची धरपकड झाली. अनेकांना पुढे युद्ध चालू असताना फाशी दिली गेली. मुख्य आरोपी गाव्रीलो प्रिन्सीपला मात्र फाशी झाली नाही. ऑस्ट्रियन कायद्याप्रमाणे तो वयाने २० वर्षांच्या आत असल्याने (त्याला वयाची २० वर्षे पूर्ण व्हायला फक्त २७ दिवस बाकी होते) त्याला फाशी झाली नाही, पण २० वर्षांची शिक्षा झाली. १९१८ साली तुरुंगातच तो क्षयाचा रोग बळावल्याने मेला.

उघड आहे, तुरुंगात त्याची जाणूनबुजून खाण्यापिण्याची आणि औषधाची आबाळ केली गेली असणार! त्यामुळे त्याचा क्षयाचा रोग बळावला. मरताना त्याचे वजन फक्त ३९ किलो होते. युद्धानंतर त्याच्या पार्थिवाचे अंश त्याच्या गावी आणून एका हुतात्म्यासारखे समारंभपूर्वक पुरले गेले.

पण एक गोष्ट मात्र आज नक्की म्हणता येते की, Black Hand, एपिस, यंग बोस्नियन, सर्बियन राष्ट्रवादी क्रांतिकारक, प्रिन्सीप किंवा आणखी इतर कुणी जे या हत्याकांडात सामील होते, त्यांनी अगदी म्हणजे अगदी खरोखर चुकीचा माणूस मारला होता. फ्रान्झ हा विचारांनी कितीही सनातनी, राजेशाही समर्थक, राजाचा राज्य करण्याचा हक्क दैवी असल्याचे मानणारा वगैरे असेल, स्लाववंशीयांना रानटी-अर्धमानव मानत असेल, सर्बियन लोकांना ‘डुक्कर’ समजत असेल, पण तो सर्बिया आणि पर्यायाने रशियाशी युद्ध करायला राजी नव्हता. सम्राट जोसेप्फपासून सगळे ऑस्ट्रियन राजघराण्यातले लोक, सेनाधिकारी, राजकारणी हे सर्बिया आणि रशियाच्या विरोधात होते अन संधी मिळताच सर्बियाला युद्धात चेचला पाहिजे या मताचे होते. ऑस्ट्रियन सेनापती कोनराड फॉन हॉटझेनडोर्फने एक-दोन नाही तर तब्बल २० वेळा ऑस्ट्रियन सरकारकडे सर्बियाविरुद्ध (आणि पर्यायाने रशियाविरुद्ध) युद्ध पुकारण्याची मागणी केली होती आणि प्रत्येकवेळी फ्रान्झमुळेच ती फेटाळली गेली होती.

अख्ख्या ऑस्ट्रियन साम्राज्यात फ्रान्झ फर्डिनांड हा एकच असा माणूस होता, ज्याच्याकडे सर्व विनाशक असे युरोपियन युद्ध टाळण्याची खरोखर इच्छा आणि ताकद दोन्ही होते. त्याच्यामुळे ते आतापर्यंत भडकण्यापासून थांबलेलेही होते. मात्र त्या एकमेव माणसालाच प्रिन्सीपने मारून टाकले.

आता सर्बिया, ऑस्ट्रिया आणि युरोपची महाभयंकर विनाशाकडे अटळ वाटचाल सुरू झाली होती. लगेच हे अंत:प्रवाह समजून आले नाहीत, पण २८ जून १९१४ला सारायेव्होच्या रस्त्यावर सकाळी ११.०० वाजता पडलेल्या या ठिणग्यांनंतर बरोबर एक महिन्याने पहिल्या जागतिक महायुद्धाचा वणवा पेटला.

२० वर्षांच्या कारावासाची शिक्षा झालेला प्रिन्सीप २८ एप्रिल १९१८ रोजी तेरेझीन येथील तुरुंगात ३ वर्षे १० महिने शिक्षा भोगून वयाच्या २३व्या वर्षी वारला. आपण डोळे मिटून झाडलेल्या दोन गोळ्यांपासून भडकलेला महायुद्धाचा वन्ही त्याने नक्कीच पहिला असेल. तुरुंगात असला तरी त्याला काही बातम्या समजल्या असतीलच, काय वाटले असेल त्याला! पश्चात्ताप, संताप, दु:ख की निराशा?

१९१७ साली एका पत्रकाराने तुरुंगात त्याची भेट घेतली आणि नेमका हाच प्रश्न विचारला होता. तेव्हा महायुद्ध अगदी जोरात होते आणि त्याच्या प्राणप्रिय सर्बियाची वाताहत होत होती, पण तो म्हणाला, ‘मुळीच नाही. युरोपातले सत्ताधारी लोक आणि जनताही युद्धाला इतके उतावीळ झालेले होते की, मी नाहीतर इतर कुणामुळे हे युद्ध नक्की पेटले असते.’

हिंसाचार, हत्याकांड, रक्तपात यांनी प्रश्न सुटत नाहीत, उलट अधिक जटील तरी होतात किंवा नवेच प्रश्न त्यातून उद्भवतात, हा इतिहासदत्त धडा त्यातून पुन्हा एकदा मिळाला (अर्थात तो घेतला कुणी नाहीच!)

नियतीचा खेळ म्हणा, विचित्र योगायोग म्हणा किंवा ईश्वराची इच्छा म्हणा, पण कधी कधी घटना अशा घडतात किंवा अशा घडत नाहीत की, त्याचे आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. युरोपातली तेव्हाची एकंदर परिस्थिती पाहता फ्रान्झ मारला गेला नसता तरी इतर कुठल्या तरी कारणाने युद्ध पेटलेच असते.

या निर्णायक ठरलेल्या खुनाच्या घटनेच्या साधारण ५१ वर्षे आधी म्हणजे ७ मे १८६६ रोजी असाच एक खुनाचा प्रयत्न झाला, पण तो अयशस्वी ठरला होता. तो जर यशस्वी झाला असता तर मात्र युरोपचा १९ व्या शतकाच्या उत्तरार्धातला आणि मग अर्थात २० व्या शतकाचा, पहिल्या महायुद्धाचा इतिहास खूपच वेगळा असता असे आपण खात्रीशीरपणे म्हणू शकतो. या अत्यंत महत्त्वाच्या पण दुर्लक्षित अशा घटनेची माहिती थोडा विषयांतराचा दोष पत्करून सांगितली पाहिजे.

१८६६ साली ऑस्ट्रिया आणि प्रशियामध्ये तणाव वाढलेला होता. कारण नुकतेच प्रशियाने डेन्मार्ककडून होल्स्टीन आणि श्लेस्वीग प्रांत जिंकून घेतले होते. त्यामुळे प्रशियाचा दबदबा वाढला होता. हे ऑस्ट्रियाला सहन होत नव्हते. त्यामुळे त्यांनी प्रशियाकडे होल्स्टीन प्रांताचा ताबा मागितला. जो द्यायला अर्थातच चान्सेलर बिस्मार्कने नकार दिला. यावरून तणाव वाढत जाऊन दोन देशांत युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली. प्रशियात तरी अनेकांना ऑस्ट्रियाशी युद्ध नको होते. हा जर्मन बहुसंख्य असलेला देश, म्हणजे दोन जर्मन भाऊ एकमेकांत एका जर्मन भाषक प्रांतावरून लढणार, ही कल्पना अनेकांना सहन होत नव्हती. अनेक जण या करता काउंट बिस्मार्कला जबाबदार धरत होते. (अजून तो प्रिन्स बिस्मार्क व्हायचा होता. तो प्रिन्स बिस्मार्क झाला १८७१ साली फ्रान्सला हरवल्यावर)

त्यातलाच एक होता बाडेन या छोट्याशा जर्मन राज्यात जन्मलेला २२ वर्षीय जर्मन ज्यू फर्डिनांड कोहेन ब्लाइंड. त्याने या प्रश्नावर आपल्या कुवतीप्रमाणे नेहमीचाच उपाय शोधला- बिस्मार्काचा खून करण्याचा. ७ मे १८६६ला दुपारी बर्लिनमध्ये सम्राटाला भेटून परतत असताना राजवाड्यासमोरच्या रस्त्यात गाठून त्याने बिस्माकवर दोन गोळ्या झाडल्या. दोन्ही चुकल्या. गोळ्यांचे आवाज ऐकून पळापळ झाली, पण बिस्मार्क न डगमगता सरळ कोहेनला जाऊन भिडला. तो ५१ वर्षांचा होता, तर कोहेन २२ वर्षांचा. झटापटीत आणखीन तीन गोळ्या सुटल्या. तोपर्यंत पोलीस तिथे आले आणि त्यांनी कोहेनला ताब्यात घेतले. बिस्मार्कला काहीही झाले नव्हते. एकही गोळी त्याला लागली नाही. नंतर त्याचे कपडे तपासले तेव्हा तीन गोळ्या त्याच्या कोटातून, शर्टातून आरपार निघून गेल्याचे सापडले. कोहेनशी झटापट करताना जे काही थोडेफार ओरखडे त्याच्या अंगावर उमटले असतील तेवढेच. कोहेनने नंतर तुरुंगात असताना आत्महत्या केली.

जर्मन एकीकरणाच्या ध्येयाने झपाटलेला बिस्मार्क जर त्यावेळी मारला गेला असता, तर जर्मन एकीकरण नक्कीच झाले नसते किंवा बरेच लांबले तरी असते. एकीकृत जर्मनीबद्दल शंका, संशय अन विरोध असणारे अनेक जण होते आणि त्यांना पुरून उरेल असा राजकारणी/ मुत्सद्दी तेव्हा तरी जर्मनीच्या क्षितिजावर इतर कुणी नव्हता. जर्मन एकीकरणाचे काम पूर्ण व्हावे ही नियतीची इच्छा आहे, ते काम नियतीने आपल्यावर सोपवले असून त्यामुळेच आपण अशा जीवघेण्या हल्ल्यातून बचावलो, असे बिस्मार्कला नक्की वाटले असणार. तो अधिक जोमाने कामाला लागला. असे म्हणतात की, पोलिसांनी कोहेनाला जेरबंद केले आणि त्याला घेऊन जाताना त्याची आणि बिस्मार्काची परत एकदा दृष्टादृष्ट झाली, तेव्हा मान ताठ करत बिस्मार्क त्याला म्हणाला, “मला लोहपुरुष उगाच म्हणत नाहीत!” (They call me The Iron Chancellor!)

असो. तर फ्रान्झच्या खुनाने लगेच काही युरोपात किंवा उर्वरीत जगात खळबळ माजली नाही. अनेक लोकांना/देशांना ही युरोपातल्या दूरवरच्या त्या बाल्कन भागातली नेहमीचीच खून मारामारीची घटना वाटली.

.............................................................................................................................................

या सदरातील आधीच्या लेखांसाठी पहा -

१) २०१८ साली ११ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता पहिले महायुद्ध संपल्याला १०० वर्षे पूर्ण झाली!

https://www.aksharnama.com/client/article_detail/3952

२) पहिल्या महायुद्धाची कारणे शोधताना आपल्याला कमीत कमी १०० वर्षे तरी मागे जावे लागते!

https://www.aksharnama.com/client/article_detail/3977

३) बिस्मार्कची भविष्यवाणी खरी ठरली! जुलै १८९८मध्ये बिस्मार्क वारला आणि नोव्हेंबर १९१८मध्ये पहिले महायुद्ध संपले. त्यात जर्मनीचा नामुष्कीकारक पराभव झाला.

https://www.aksharnama.com/client/article_detail/3992

४) कैसर विल्हेल्म दुसरा हे पहिल्या महायुद्धातले सगळ्यात जास्त प्रसिद्ध पात्र असेल!

https://www.aksharnama.com/client/article_detail/4007

५) जर्मनी अब्रू वाचवून बाहेर पडला. युद्ध टळले आणि बाकीच्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. पण नाटक संपले नव्हते, फक्त पहिला अंक पार पडला होता!

https://www.aksharnama.com/client/article_detail/4022

६) रशिया, फ्रान्स आणि इंग्लंडने जर्मनीसारख्या प्रगत राष्ट्राच्या आकांक्षांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले. जमेल तेवढे त्याला दाबण्याचे, एकटे पाडण्याचे राजकारण केले!

https://www.aksharnama.com/client/article_detail/4039

७) ऑस्ट्रिया-हंगेरी, सर्बिया आणि इतर बाल्कन राष्ट्रे

https://www.aksharnama.com/client/article_detail/4051

८) पहिले आणि दुसरे बाल्कन युद्ध महाविनाशक युद्धाची नांदी ठरले यात शंका नाही!

https://www.aksharnama.com/client/article_detail/4063

९) पहिल्या महायुद्धाचा भडका उडायला कारणीभूत झाली, ती ऑस्ट्रियाचा युवराज आर्च ड्युक फ्रांझ फर्डिनांड आणि त्याची पत्नी सोफी शोटेक यांची हत्या

https://www.aksharnama.com/client/article_detail/4086

.............................................................................................................................................

लेखक आदित्य कोरडे टाटा मोटर्स, पुणे इथं डिझाईन इंजिनिअर म्हणून कार्यरत आहेत.

aditya.korde@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......