रोमन साम्राज्य आणि युरोपातलं अंधारयुग
पडघम - विदेशनामा
सुनील तांबे
  • प्रातिनिधिक चित्र
  • Tue , 17 March 2020
  • पडघम विदेशनामा रोमन साम्राज्य Roman Empire

रॉम्युलस आणि र्‍हिमस नावाचे दोन अनाथ जुळे भाऊ होते. त्यांचा सांभाळ म्हणे लांडग्यांच्या मादीने केला. खरं-खोटं माहीत नाही, कारण ही दंतकथा आहे इसवीसनपूर्व ७५३ सालची. तर या दोन भावांनी ठरवलं- एक नवं राज्य स्थापन करायचं. नव्या राज्याचा राजा कोण होणार यावरून दोघांमध्ये वाद विकोपाला गेला. रॉम्युलसने र्‍हिमसला ठार करून तो प्रश्न सोडवला. नवीन राज्याचं नाव त्याने आपल्या नावावरूनच ठेवलं—रोम.

राज्य तर स्थापन केलं, पण राज्यात लोक हवेत तर तिथे उत्पादन होणार, व्यापार-उदीम बहरणार, पैसा येणार. रॉम्युलसच्या राज्यात यायला कुणीही तयार नव्हतं. कारण आसपासच्या राज्यांतील लोक भाषा, जमात, कुल अशा धाग्यांनी एकमेकांशी जोडले होते. रॉम्युलस म्हणाला काही हरकत नाही, आपण चोर, लुटेरे, तस्कर, पळून आलेले गुलाम कोणालाही आश्रय देऊ. अट एवढीच की, त्याने राज्यात प्रामाणिकपणे राहायचं. महत्त्वाकांक्षी पण वाळीत टाकलेले लोक रोममध्ये येऊ लागले. आपआपल्या समूहाची संस्कृती, विज्ञान, तंत्रज्ञान ते घेऊन आले. रोममध्ये आल्यावर या तंत्रज्ञानाची देवाण-घेवाण होऊ लागली, आपल्या गरजांची पूर्तता करायला जुन्या तंत्रज्ञानाचा वापर करायचा, त्यामध्ये प्रयोग करून नवीन तंत्र विकसित करायचं. खुलेपणा ही रोमची खासीयत बनली. रस्ते बांधणी, कालवे काढून बोगद्यातून पाणी शहरामध्ये आणणं, हे तंत्र रोमन लोकांनी आसपासच्या समूहांकडून आपलंसं केलं आणि त्यामध्ये प्रयोग करून ते पूर्णत्वाला नेलं.

कोवेका मॅक्सिमा या नावाने ओळखली जाणारी सांडपाण्याच्या निचऱ्याची रोममधील व्यवस्था आजही कार्यरत आहे. इसवीसनपूर्व ३१२ मध्ये रोमन लोकांना रस्ते बांधणीचं तंत्रज्ञान विकसित केलं. रोम ते कंपानिया हा १३२ किलोमीटरचा रस्ता त्यांनी बांधला. एवढा लांबलचक रस्ता बांधायचा तर नकाशा बनवायला हवा. टापूतील जमिनीचा उंचसखलपणा ध्यानी घ्यायला हवा. सरळ रेषेत रस्ता बांधणी करण्याचं तंत्र विकसित करायला हवं. पावसाचं पाणी रस्त्यावरून साठणार नाही, याची खबरदारी घ्यायला हवी, रस्ता खचणार नाही याची काळजी घ्यायला हवी. त्यावरून सैन्य आणि मालाने भरलेल्या वॅगन्स जायला हव्यात. रस्ता सरळ रेषेत हवा, कारण वळणं कशी आखायची हे रोमन इंजिनीयर्सना माहीत नव्हतं, म्हणून ते डोंगर वा टेकड्या कोरायचे. रस्ते काटकोनातच वळत.

ऑगस्टस ज्युलियस सीझर या रोमच्या पहिल्या सम्राटाने रोमच्या छोट्या राज्याचा विस्तार साम्राज्याएवढा केला. त्यामुळे लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या सिनेटमार्फत रोमचा कारभार करणं अशक्य बनलं. ज्युलियस सीझरने स्वतःला तहहयात सम्राट घोषित केलं. त्याचा रुबाब, डौल, संघटन कौशल्य, नेतृत्वगुण वादातीत होते. पण निरंकुश सत्ता हवी होती त्याला. सत्तेत कुणालाही वाटा द्यायला तो तयार नव्हता. म्हणून तर सिनेटर्सनी त्याचा खून केला. ‘ब्रूटस, यू टू!’ हे सीझरचे अखेरचे शब्द आजही इंग्रजीच काय मराठी लेखातही वापरले जातात. मात्र तोपावेतो रोमन साम्राज्य तीन खंडात—युरोप, उत्तर आफ्रिका आणि आशिया, पसरलं होतं.

ज्युलियस सीझरच्या नंतर गादीवर आलेल्या ऑगस्टस सीझरने हमरस्त्यांचं जाळं अवघ्या साम्राज्यात विणलं. रोमच्याच धर्तीवर नवीन शहरं युरोपात वसवली. लंडन, पॅरिस, बॉन यासारखी युरोपातील अनेक शहरं रोमन साम्राज्याच्या काळात वसवण्यात आली. शहराचा पाणी पुरवठा, सांडपाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था, रस्ते, इमारती, बाजारपेठा, वस्त्या, स्टेडियम्स, अ‍ॅम्फी थिएटर्स, सार्वजनिक स्नानगृह, डोळे दिपवणाऱ्या भव्य इमारती, त्यांचे महाकाय घुमट आणि अल्पकाळात ते बांधण्याचं व्यवस्थापन कौशल्य ही रोमची खासीयत होती. सुखकर, पुरोगामी, ऐषारामी आणि आदर्श जीवन रोममध्ये होतं. साम्राज्यातील शहरांच्या दर्शनानेच प्रजा दबून जायची. रोमच्या शिस्तबद्ध वा कवायती सैन्याचा दरारा होताच.

तीन खंडात पसरलेल्या या साम्राज्यात ईजिप्तपासून ते ब्रिटानिया, जर्मेनिया, आर्मेनिया एकच कायदा होता, एकच बाजारपेठ होती. चीनमधील रेशीम, भारतातील सुती वस्त्रं, मसाल्याचे पदार्थ, अरबस्थानातील काचेच्या वस्तू, नाईल नदीच्या खोर्‍यातील अन्नधान्य, भूमध्य समुद्राच्या प्रदेशातील विविध फळं इत्यादी वस्तूंनी रोमची बाजारपेठ भरून गेलेली असे. रोम साम्राज्यात विविध भाषांचे, वंशांचे, श्रद्धांचे लोक एकत्र होते. ‘आयडिया ऑफ रोम’ साकारली ती शहरं आणि बाजारपेठांमधील सुबत्तेमुळे. ग्लॅडिएटर पाहिला आहे का रसेल क्रो याचा. ‘आयडिया ऑफ रोम’ त्या चित्रपटाच्या प्रत्येक दृश्यात भरून राहिली आहे. अमेरिका या राष्ट्र-राज्याच्या संस्थापकांची प्रेरणाच रोम आहे. रोमन साम्राज्यातील सीझरची जागा अध्यक्षाने घेतली आहे, सिनेटही आहे. गरूड हे रोमन साम्राज्याचं चिन्ह अमेरिकेने स्वीकारलं आहे.

या रोममध्ये दर तीन नागरिकांमागे एक गुलाम होता. गुलामांच्या अपरिमित शोषणातून हे साम्राज्य म्हणजे रस्ते, पूल, कालवे, इमारती वा आजच्या भाषेत बोलायचं तर इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहिलं. या साम्राज्याचा विस्तार एवढा झाला की, तत्कालीन ज्ञान-तंत्रज्ञानाच्या आधारे एवढ्या मोठ्या साम्राज्याचा एकछत्री कारभार चालवणं अशक्य होऊन बसलं. अखेरीस हे साम्राज्य आपल्याच वजनाने कोसळलं. शहराला पाणी पुरवठा करणारे कालवे तथाकथित बार्बेरियन्स वा जंगली लोकांनी तोडून टाकले. पाण्यावाचून रोमचे नागरिक तडफडू लागले. जे जे रोमन ते ते सर्व बार्बेरियन्सनी उद्ध्वस्त केलं. रोम एक भुतांचं शहर बनलं.

१०-२० लाख लोकसंख्येच्या शहरात केवळ काही हजार लोक उरले. लोक गावांकडे, डोंगरात पळून गेले. रोमन इंजिनिअरिंग विस्मृतीत गेलं. रस्त्यांचं जाळं दबलं गेलं. लोक लाकडांच्या घरात राहू लागले. सोक्रॅटिस, प्लेटो, अरिस्टॉटल कधीचेच विस्मृतीत गेले होते. रोमन साम्राज्याच्या स्मृतीही गाडल्या गेल्या. एवढ्या प्रचंड इमारती का होत्या, कशासाठी बांधल्या, त्यात काय करायची माणसं असे प्रश्न युरोपियनांना पडू लागले. पण प्रश्नांची उत्तरं शोधण्याचं बौद्धिक त्राण त्यांच्यामध्ये नव्हतं. व्यापार ठप्प झाला होता. ख्रिश्चन धर्माचं प्रस्थ एवढं वाढलं होतं की, चर्चची निरंकुश सत्ता युरोपमध्ये होती.

राजे, उमराव घराण्यामधील लोकही प्राचीन रोममधील सुखवस्तू माणसाचं जीवन जगत नव्हते. असे हे राजे व उमराव एकूण युरोपच्या लोकसंख्येच्या फक्त १ टक्का होते. हे होतं युरोपातलं अंधारयुग.

.............................................................................................................................................

लेखक सुनील तांबे मुक्त पत्रकार आहेत. 

suniltambe07@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......