साथीचे आजार आणि जागतिकीकरण यांचा संबंध आता अधिक गुंतागुंतीचा बनला आहे!
पडघम - राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
माधव दातार
  • प्रातिनिधिक चित्र
  • Tue , 17 March 2020
  • पडघम राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय करोना विषाणू करोना व्हायरस Coronavirus

जागतिकीकरण आणि साथीच्या रोगांचा संबंध खूप जुना आहे. इ.स. १४९२मध्ये कोलंबस अमेरिकेच्या किनाऱ्यावर पोचल्यावर या युरोपीय दर्यावर्दीने त्याच्याबरोबर आणलेल्या विषाणूंच्या प्रभावाने तिथले अनेक स्थानिक (रेड इंडियन्स) लोक मृत्युमुखी पडले! नंतरच्या ५२५ वर्षांत वैद्यकीय तंत्र आणि जागतिकीकरण यांत अर्थातच मोठे बदल झाले आहेत. त्या परिणामी साथीचे आजार आणि जागतिकीकरण यांचा संबंध आता अधिक गुंतागुंतीचा बनला आहे. जागतिकीकरणामुळे विविध देशांमधील वस्तू, सेवा आणि भांडवल यांची देवाणघेवाण तर वाढली आहेच, पण आंतराष्ट्रीय प्रवासही सुलभ झाला आहे. व्यापार, पर्यटन, शिक्षण यासाठी होणारा प्रवास प्रचंड वाढला आहे.

या सर्वांचा प्रभाव डिसेंबर अखेरीस चीनच्या वुहान प्रांतात प्रथम प्रादूर्भाव झालेल्या करोना विषाणूचा प्रसार ज्या पद्धतीने जगभर झाला/होत आहे त्यावर दिसून येतो. हा विषाणू नवा नसला – आपल्या सर्वांच्या परिचयाच्या डेटॉलवरही ते करोना विषाणूचा नायनाट करते, असा दावा केलेला असतो - तरी त्याने प्रथम चीनमध्ये थैमान घातले आणि ज्याची आता सर्व जगात लागण होत आहे. त्याला ‘कोविद-१९’ असे विशेषनाव मिळाले आहे. 

त्याचा प्रसार आणि प्रभाव याचा तीन पातळ्यांवर विचार करता येतो. साथीचा (पक्षी वेगाने प्रसार पावणारा) रोग म्हणून मानवी जीवनाला संभवत: धोका निर्माण करणारा तो एक घटक आहेच. जागतिकीकरणामुळे विविध देश अधिक परस्परावलंबी बनल्याने ज्या घटकांचा प्रभाव पूर्वी मुख्यत: स्थानिक असे, तो आता सुलभ (आणि म्हणून वाढलेल्या) व्यापार, गुंतवणूक, प्रवास यांतून अधिक व्यापक बनला आहे, हे दुसरे परिमाण. शिवाय या सर्व बाह्य बदलांचा परिणाम मानवी वर्तनावर झाल्याने या वर्तनात्मक बदलांचा परिणाम परत साथीच्या तीव्रतेवर – वास्तविक किंवा भासमान – होतो, ही याची तिसरी बाजू आहे.

वैद्यकीय परिमाण       

साथीचे रोग आणि मानवी समाज यांचा जुना संबंध आहे. त्याचा प्रादूर्भाव कशाने होतो, याचे ज्ञान नसल्याने आणि त्याची लागण वेगाने होत असल्याने त्याचा चांगलाच धसका असे. आरोग्याच्या सार्वजनिक बाजूकडे फारसे लक्ष नसल्याने दूषित पाणी आणि प्राणी यांच्या मार्फत पसरणारे साथीचे रोग जसे नियमित असत, तसेच जीवघेणेही. साथीच्या भिन्न रोगांवर नियंत्रण मिळाल्यानेच सरासरी आयुर्मान वाढले आहे आणि आरोग्य सेवांची उपलबद्धता सर्वत्र समान किंवा सारखीच परिणामकारक नसली तरी सुधारलेल्या मानवी जीवनमानाचे ते एक महत्त्वाचे परिमाण आहे.  

शंभर वर्षांपूर्वी म्हणजे १९१८-१९२० या काळात सर्व जगभर इन्फ्लुएंझाची मोठी साथ आली होती. याचा प्रसार प्रथम पहिल्या महायुद्धात सहभागी राष्ट्रात झाला असला तरी युद्धमान देशांनी ही बातमी दडपून ठेवली. स्पेन मात्र युद्धात सहभागी नसल्याने तेथील लागण जगाला प्रथम समजली. त्यामुळे ही साथ स्पेनमध्ये सुरू झाली, या समजातून या आजारास ‘स्पेनिश फ्ल्यू’ असे नाव मिळाले. भारतात - विशेषत: नागरी भागात - त्याचा प्रभाव दिसून आला. लागण झालेले लोक ओळखून त्यांना वेगळे ठेवणे तेव्हा अधिक कठीण असल्याने मृतांची संख्या लक्षणीय (१ ते २ कोटी) होती. यांचा आर्थिक परिणामही –राष्ट्रीय उत्पन्नाची तेव्हा मोजणी होत नसली तरी – मोठा होता. भारतासाठी १९१८ ची नोंद एक खडतर वर्ष म्हणून आर्थिक इतिहासकार करतात.

पण वर्तमानाचा विचार करताना एकविसाव्या शतकात तर विविध विषाणूचा प्रभाव – सार्स, मर्स, इबोला –नियमितपणे दिसला आहे. त्यामुळे साथीच्या रोगांवर नियंत्रण मिळवल्याचा दावा आता टिकून राहीलच असे म्हणवत नाही. कोविद १९ हा सार्स किंवा मर्सच्या तुलनेत कमी घातक असला तरी त्याचा प्रसार वेगाने  होतो असे आढळले. कोविद १९ मुळे जगभर मरण पावलेल्यांची संख्या (आतापर्यंत ४६१३) हृदयविकार अगर कर्करोग किंवा रस्ते अपघात यांद्वारे होणाऱ्या मृतांच्या तुलनेत कमी आहे, असे सांगितले जाते. मात्र विविध प्रदेशांतील मृतांचे प्रमाण सार्वजनिक आरोग्य सेवांची स्थिती आणि उपलब्धता यावरही अवलंबून असेल.

लागण झाल्याची बातमी चीन सरकारने काही काळ तरी लपवून ठेवल्याचा आरोप खरा असला तरी, नंतर प्रादूर्भाव झालेल्या वुहान शहरास निराळे करून ते बंद ठेवण्याचे काम तत्परतेने झाले, हे आता मान्य होत आहे. ज्या गतीने विशेष रुग्णालये सुरू झाली आणि अर्थव्यवहार थांबवून लोकांनी एकत्र येणे नियंत्रणात आणले, त्याचा परिणाम रोगाचा चीनमधील प्रसार आणि तेथील मृतांची संख्या (आदमासे ३१७३) नियंत्रित राहण्यात झाला असावा.

चीनी आकडेवारीबाबत अविश्वास सामान्य असला तरी कोविद-१९ची हाताळणी तिथे परिणामकारक ठरली, याचे एक गमक चीनला रोगाचा प्रादूर्भाव विशिष्ट प्रदेशात मर्यादित राखता आला यांत आहे. रोगाची चाचणी आवश्यक त्या मोठ्या प्रमाणात दक्षिण कोरिया आणि इटली या देशांत झाली, पण इराण व अमेरिकेत मात्र ती झाली नाही. अमेरिकेत सार्वजनिक आरोग्य सेवा फार विस्तृत नसल्याचा हा परिणाम असावा. आवश्यक त्या प्रमाणात तपासण्या/चाचण्या न झाल्यास लागण किती झाली आणि त्यात मृतांचे प्रमाण किती होते यांचे मापनही सदोष राहते.  

चीनमधील साथ आटोक्यात येत असतानाच इतरत्र तिचा प्रसार वाढताना दिसतो. युरोपमध्ये मृतांची संख्या तुलनेत जास्त आहे. कोणत्याही कारणाने ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली आहे, त्यांना कोविदचा सामना करणे कठीण जाते असा अनुभव आहे. कदाचित युरोपात वृद्ध लोकांचे प्रमाण जास्त असल्याने तेथे जास्त लोक मृत्यूलोकी गेले असावेत. भारतात आजवर मृत पावलेल्या दोन्ही व्यक्ती जास्त वयाच्या होत्या.

आजवर भारतात सापडलेले संशयित रुग्ण (११०) आणि मृत व्यक्ती (२) यांची संख्या कमी राहिली आहे, ही सुदैवाची बाब आहे. पण आजाराचा प्रसार थांबवणे हे महत्त्वाचे आव्हान आहे. रोग चाचणी/तपासणीच्या सोयी सरकारी संस्थातच आणि मर्यादित आहेत. आता कोविद-१९च्या निमित्ताने खाजगी प्रयोगशाळाना यांत सहभागी केले जाणार आहे, ही बाब स्वागतार्ह आहे. आपल्या सार्वजनिक आरोग्य सेवांची स्थिती लक्षात घेता जर खरोखरच कठीण परिस्थिती निर्माण झाली तर आपण तिचा सामना किती/कसा करू शकू यांचा विचार सर्वांनी करायला हवा.

चीनच्या कार्यक्षमतेचा उल्लेख झाला की, तेथील हुकूमशाहीचा मुद्दा हमखास पुढे येतो. पण त्वरित निर्णय घेणे आणि त्याची काटेकोर/त्वरित अंमलबजावणी हे हुकूमशाहीचे व्यवच्छेदक लक्षण कधीच नव्हते. शिवाय डॉक्टर/इस्पितळे, तेथील खाटा यांची उपलब्धता चीनमध्ये जास्त आहे, याचीही नोंद घेणे आवश्यक आहे. 

करोना विषाणूचा प्रादूर्भाव चीनमध्ये झाल्यापासून भारतीय जीवन पद्धतीचे (शाकाहारी आहार, योग, मृतांचे दहन करण्याची पद्धत इ.) गोडवे समाजमाध्यमांवर गायले जात असले तरी त्याचा परिणाम आपल्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत वाढ, बदल/सुधारणा करण्याची गरज नाही, असा समज होण्यात झाला तर ते धोकादायक ठरेल. स्वच्छतेचा विचार केला तर घरगुती/वैयक्तिक स्वच्छता आणि सामाजिक स्तरावर कमालीचा गदळपणा यांचे मिश्रण खास भारतीय किंवा आशियाई आहे!.

कोविद-१९ वयस्कर लोकांस जास्त हानिकारक आहे - भारतात ६० वर्षावरील व्यक्तींचे प्रमाण फक्त ९ टक्के आहे – आणि येथील उष्ण हवामान – जे विषाणू प्रसारास प्रतिबंधक मानले जाते – या दोन्ही बाबी भारतात विषाणू प्रसार होण्यास काहीशा रोधक ठरल्या तरी लोकसंख्येची जास्त घनता आणि पाण्याची कमी (आणि असमान) उपलबद्धता ( सतत हात धुण्यास आवश्यक) या दोन गोष्टी विषाणूच्या जलद प्रसारास सहाय्यभूत ठरू शकतील.  

आर्थिक परिमाण

पूर्वीच्या शेती आधारित, ग्रामीण जीवनपद्धतीत रोगप्रसाराच्या शक्यता मर्यादित असल्याने त्यांचा प्रभाव – वैद्यकीय आणि आर्थिक - स्थानिक स्वरूपाचा राही. पाण्याद्वारे पसरणारे आजार नद्यामुळे पसरत किंवा तीर्थक्षेत्री मोठा समुदाय जमे त्यातून. उद्योग, व्यापार यांचे प्रमाण कमी असल्याने आर्थिक परिणाम स्थानिकच राहत. आता ही स्थिती बदललेली आहे, हे रोग प्रसाराच्या बातम्यांतूनच दिसून येते. इटालियन प्रवासी जयपूरला निराळा/अलग करावा लागला किंवा दुबईहून परतलेला संशयित रुग्ण हिंगोलीला आढळतो, या सारख्या घटनातून प्रवासाचा परिणाम दिसतो.  

चीन सर्व जगाशी घनिष्ठ संबंध असलेली मोठी अर्थव्यवस्था असल्याने कोविद-१९चा सामना करण्यासाठी जे बंदी नियम लागू झाले, त्याचा परिणाम चीनच्या अर्थव्यवस्थेवर तर होईलच, पण चीनकडून कच्चा माल आयात करणाऱ्या इतर देशांतील विविध उद्योगही प्रभावित होतील, हे अपेक्षित होतेच. जागतिकीकरणाने वस्तू उत्पादन विखुरलेल्या पद्धतीने होऊ लागल्याने वस्तू उत्पादनाची पुरवठा साखळी आंतरराष्ट्रीय बनते. या साखळीतला एखादा दुवा जरी निखळला तरी तरी अनेक देशांत त्याचा परिणाम जाणवतो.

चीनमधील घडमोडींचा परिणाम  कंपन्या किती साठा बाळगतात आणि आयातीला किती वेळ लागतो, यावर हा परिणाम किती वेगाने होतो, हे अवलंबून राहील. चीन व्यवहार बंद झाल्याचा परिणाम चीन आयात वस्तूंच्या पुरवठ्यावर दोन-अडीच महिन्यांनी दिसतील अशी अपेक्षा होती. भारतातील इलेक्ट्रॉनिक्स, औषध आणि रसायन उद्योग चीनमधील करोनाने प्रभावित होतील अशीही अपेक्षा होती. मात्र त्याचा प्रादूर्भाव इतर देशात – विशेषत: युरोप अमेरिका– दिसू लागल्यावर हे चित्र बदलले. रोगप्रसाराला आळा घालण्यासाठी आंतरराष्ट्रीय प्रवासावर आणि देशांतर्गत जेथे लोक मोठ्या संख्येत एकत्र येतात, तेथे (मॉल, सिनेमा/नाट्यगृहे, खेल) बंधने आल्याने पर्यटन, हॉटेल आणि करमणूक या क्षेत्रांवर परिणाम झाला.

चीनच्या तुलनेत हे निर्बंध जरी सौम्य असले तरी पुरवठा साखळीतील अडचणीमुळे वस्तूंचा पुरवठा कमी होतानाच, या निर्बंधांमुळे मागणीही कमी होण्यास सुरुवात झाली. बाजारपेठा सामान्यत: टोकाची भूमिका घेत असल्याने जागतिक अर्थ व्यवहार मंदावतील, या भीतीने क्रूड तेलाचे भाव ३० टक्क्यांनी कमी झाले आणि शेअर बाजारही गडगडला.

भारतात येस बँक संकटात आल्याने हा परिणाम जास्त गंभीर होता. जागतिक उत्पन्नात किती टक्के घट येईल, यांचे आता अंदाज बांधणे सुरू आहे. कोणत्याही कारणाने अर्थ व्यवहार मंदावतील अशी पुसटशी शंका आली तरी जगभरातील मध्यवर्ती बँका व्याज दर कमी करतात आणि व्यापारी बँकांना जास्त पैसा उपलब्ध करून देतात. पण विविध सरकारी निर्बंध आणि त्या जोडीला खबरदारी म्हणून ऐच्छिकरित्या जे व्यवहार (काही काळ तरी) कमी होतील, त्याला व्याज दर कमी केल्याने कसा अटकाव कसा होईल हे स्पष्ट नाही. माहितीचा स्फोट झाल्याने जनतेचा प्रतिसाद कसा असेल त्यावरही आर्थिक परिणाम अवलंबून राहील.

भारतात रिझर्व बँकेने अजून रेपो दर कमी केला नसला तरी एप्रिलच्या सुरुवातीस तो कमी झाल्यास काहीच नवल नाही. राष्ट्रीय उत्पन्न किती कमी होईल यांचा अचूक अंदाज करता येणे शक्य होणार नाही, कारण छोट्या असंघटित व्यवसायातील उलाढाल आणि उत्पन्न मोजण्याची आपली पद्धत खूप ढोबळ आहे. कोविद-१९ चा प्रसार रोखण्यात आपण यशस्वी झालो, तर साथीचे आर्थिक  परिमाणही अर्थातच मर्यादित राहील.

मानवी वर्तन

संसर्गजन्य रोगांचा प्रादूर्भाव होणे ही बाब मानवी इतिहासात नवीन नसली तरी वर्तमानात फेसबुक, ट्विटर आणि व्हॉटसअ‍ॅपसारख्या समाजमाध्यमांचे प्रभावशाली अस्तित्व अशा प्रसंगी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. २००३ साली सार्सचा उद्रेक झाला तेव्हा फेसबुक किंवा व्हॉटसअ‍ॅप असे काहीच नव्हते. २००९ मध्ये स्वाईन फ्ल्यू आला तेव्हा फेसबुक वापरणारे १५ कोटी लोक होते. २०१४ मध्ये इबोला उद्भवला तेव्हा व्हॉटसअ‍ॅप वापरणारे ४५ कोटी लोक होते. २०१९ मधील कोविद १९च्या आगमनप्रसंगी  व्हॉटसअ‍ॅप वापरणारी संख्या २०० कोटी आणि फेसबुकवाले १७० कोटी लोक होते.

यातील दोन्ही माध्यमांचा वापर करणारे बरेच लोक आहेत हे गृहीत धरले तरी ‘जोडलेल्या’ लोकांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे हे उघड आहे. याचा उपयोग रोगाचे स्वरूप, लक्षणे, त्याचा प्रसार आणि त्यावरील उपचार याबाबतची माहिती वेगाने लोकांपर्यंत पोचवण्यास उपयोगी ठरेल. याचा उपयोग साथ नियंत्रणात होऊ शकतो. रोगाचा प्रादूर्भाव झालेल्या ज्या लोकांना एकांतवासात राहावे लागेल, त्यांना या समाजमाध्यमाद्वारे आपल्या माणसांच्या ‘संपर्कात’ – त्यांना इजा न पोचवता- राहता आल्याने त्यांचे मन:स्वास्थ्य चांगले राहून रोगप्रतिकार अधिक प्रभावीपणे करता येईल. या उलट रोग प्रसाराच्या खोट्या, अतिरंजित बातम्या वेगाने पसरल्याने घबराट होऊन रोगाचा आर्थिक परिणाम अधिक गडद होण्याचा जसा धोका आहे, तसाच भारतीय जीवनपद्धतीत या रोगाचा सामना करण्याची शक्ती आहे.

यामागे चीन/अमेरिका यांचा परस्परांवर मात करण्याचा हेतू आहे किंवा पाश्चात्य औषध कंपन्यांचा आपला व्यवसाय/नफा वाढवण्याची ती एक शक्कल आहे, असा अपप्रचार (याला अपप्रचार म्हणणे ही बाबही समाजमाध्यमांवर टीकेची राळ उठण्यास पुरेशी ठरू शकते!) करण्यासाठीदेखील हे माध्यम - त्याच्या दृक्-श्राव्य परिणामामुळे - अधिक प्रभावी ठरू शकते. याचा विपरीत परिणाम साथीचा मुकाबला करण्यावर होऊ शकतो. समाजमाध्यमे दोन्ही बाजूंना उपलब्ध आहेत. त्यामुळे फक्त त्यांना दोष देता येणार नाही; फक्त त्यांचाच दोषही नसतो!

.............................................................................................................................................

साभार - https://madhavdatar.blogspot.com/2020/03/19.html

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......