‘ईशावास्योपनिषद’ : या उपनिषदात केवळ १८ मंत्र आहेत, पण या मंत्रांचे आधुनिक व्यवस्थापनाशी घनिष्ठ नाते आहे.
पडघम - सांस्कृतिक
जीवन तळेगावकर
  • प्रातिनिधिक चित्र
  • Mon , 16 March 2020
  • पडघम सांस्कृतिक ईशावास्योपनिषद Ishavasyopanishad उपनिषद Upanishad

‘उपनिषद’ हे भारतीय तत्त्वज्ञानाचा संग्रह आहेत. ‘उप+नि+सद’ म्हणजे, ‘जवळ बसून शिकणे’ असा या शब्दाचा अर्थ होतो. शिक्षण या प्रक्रियेत दोनच घटक महत्त्वाचे असतात, ज्यांच्याशिवाय शिक्षण संभवत नाही, ते म्हणजे ‘शिक्षक (शिकवणारा)’ आणि ‘शिष्य (शिकणारा)’. जोपर्यंत हे दोघे शिक्षणाच्या प्रकियेत आहेत, तोपर्यंत ‘उपनिषद’ हा शब्द गैरलागू होणार नाही. म्हणून याला शाश्वत म्हणायचे. कारण तंत्रज्ञानामुळे शिकवणारा आणि शिकणारा यांच्यात हजारो मैलांचे अंतर पडू शकेल, ते एकमेकांना ओळखत नसतील, हे शिक्षण ‘व्हर्च्युअल क्लासरूम’मधून दिले जाईल, ‘वेबिनार’ असेल किंवा ‘टेलीप्रेझेन्स’ पण ‘काळाचे’ आणि ‘वेळेचे’ बंधन जरी सैल झाले तरी, शिकवणाऱ्या स्त्रोतासमोर बसून ज्ञान ग्रहण करण्याची प्रक्रिया बदलली नाही आणि जोपर्यंत ती बदलणार नाही, तोपर्यंत ‘उपनिषदा’ला अर्थ आहे.

‘उपनिषदां’चा काळ फार जुना, अज्ञात म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यासारखी ती आहेत का? तर, नाही! संत ज्ञानेश्वरांनी दहा उपनिषदे महत्त्वाची म्हणून गौरवली आहेत- ‘उपरी दशोपनिषदें । जियें उदारें ज्ञानमकरंदें । तियें कुसुमें मुकुटी सुगंधें । शोभती भलीं ।।अध्याय १, ओवी १८।।’

‘उपनिषदे’ समृद्ध जीवन जगण्याचे तत्त्वज्ञान आहे, पण या लेखापुरता फक्त एका उपनिषदाचा विचार आपण करू, ‘ईशावास्योपनिषद’. आणि तोही केवळ ‘व्यवस्थापनशास्त्रा’च्या संदर्भात. ‘ईशावास्य’ उपनिषदात केवळ १८ मंत्र आहेत, पण या सगळ्या मंत्रांचे आधुनिक व्यवस्थापनाशी निगडित सार, तेवढे आपण वेचून पाहू.   

आताशा व्यवस्थापनशास्त्राच्या (Management) अभ्यासक्रमात ‘व्यवसाय नीतिशास्त्र’ (Business Ethics) नावाचा विषय असतो, पण तो असून नसल्यासारखाच शिकवला जातो, कारण तो जर विद्यार्थ्यांनी व्यवस्थित अंगिकारला आणि आपल्या आचरणात रुजवला तर, ‘येस बँके’सारखे घोटाळे होणारच नाहीत. कारण घोटाळे करणारी माणसंच असतात, त्यांनाही ‘षड्रिपू’ छळतच असतात. अति-हव्यासापोटी चुकीचा मार्ग अंगिकारतात आणि व्यवसायाचे नीतिशास्त्र पायदळी तुडवतात. परिणामी भ्रष्टाचार होतो आणि स्व-उत्थानाच्या नादात अधिकाचे अधिक नुकसान केले जाते. ‘जे जे आपण शिकतो ते ते आपण अंगिकारतो’, असे मानणे पण भाबडेपणाचे आहे, हे मान्य केले तरी, शिक्षणाच्या क्षेत्राशी निगडित अभ्यासक्रमात काय असावे आणि काय नाही, याचा ऊहापोह होणे गरजेचे आहे. म्हणजे भारतात, जिथे नीतिशास्त्राचे पाठ घडले, तिथे नीतिशास्त्राच्या अभ्यासक्रमात ‘उपनिषदांचा आणि श्रीमद्भग्वद्गीते’चा समावेश नसावा हे न पटणारे आहे. या स्खलनाचे दुष्परिणाम आपण भोगत राहणार आहोत. आता तरी अधिकाऱ्यांद्वारे सामान्यांचे ओरबाडले जाणे चव्हाट्यावर आल्यावर शिक्षणाला वळण लागणे अतिआवश्यक नसावे का?

‘आपण कॉर्पोरेट क्षेत्रात एकमेकांच्या छातीवर खुशाल पाय देऊन पुढे जा’ सांगणारा ‘मॅकियावेली’ शिकतो, पण नीतीचे पाठ देणारा ‘चाणक्य’ शिकत नाही, हे आपले न्यून आहे. भविष्याच्या संवर्धनासाठी ते दूर झाले पाहिजे. यात ‘मॅकियावेली शिकू नका’ हे सांगणे अभिप्रेत नाही, पण ‘चाणक्य शिका’ हे सांगणे आहे. अर्थात त्यांच्याही काही विचारांचा अंतर्भाव आताशा होऊ घातला आहे. श्रीमद्भग्वद्गीतेचाही होतोय, पण ‘आयआयएम’सारख्या काही अग्रणी विद्यापीठांत आणि भारताबाहेर.

आपण विसरतो तो एक मूलभूत विचार. माणूस हा जन्मापासून धर्माचे संस्कार घेऊन मोठा होतो. त्याच्यावर बालपणी संस्कार करणारा धर्म त्याला स्नातकोत्तर अभ्यासक्रमाशीदेखील मूल्यदृष्ट्या संलग्न आहे, हे जाणवले पाहिजे. आणि त्यासाठी आधुनिक नीतिशास्त्रात धर्ममूल्यांचा (मूल्य, हा शब्द महत्त्वाचा मानावा) अंगीकार आवश्यक आहे. कारण धर्मावर माणसाची जन्मापासून ‘श्रद्धा’ असते. आणि मानसशास्त्र असे सांगते की, माणूस ‘श्रद्धे’ची अवहेलना करणे ‘पाप’ समजतो. म्हणून अभ्यासक्रमात काय हवे-नको याचा सर्वांगीण विचार होणे अगत्याचे आहे.

भारतरत्न महामहोपाध्याय पां. वा. काणे यांनी ‘धर्मशास्त्राचा इतिहास’ पाच इंग्रजी खंडांतून मांडून मूलगामी कार्य करून ठेवले आहेच. गरज आहे ती त्या कार्याचा अंतर्भाव आधुनिक शिक्षण व्यवस्थेत करण्याची. असे झाले तर भारतीय नीतिशास्त्राचा अभ्यास जगभरातील विद्यापीठांमध्ये होईल. 

ईशावास्यातला पहिला विचार आहे, ‘तेन त्यक्तेन भुञ्जीथा’ (Leave to Live). एखाद्या कंपनीच्या कार्यकारी अधिकाऱ्यास साजेसे निकष काय असावेत, हे या एका-एका मंत्रांतून स्पष्ट होत जाते. आपण जेव्हा अधिकाराच्या सर्वोच्च ठिकाणी असतो, तेव्हा आपण कसे वागले पाहिजे, याचा उपनिषदातील मंत्र निकष स्थापित करून देतात. कारण हे मंत्र ‘जे जे उत्तम उदात्त उन्नत’ ते ते प्रकट करणारे आहेत. या मंत्रांना कोणाची ‘हां जी, हां जी’ करण्याची गरज नाही, म्हणून ते स्पष्ट आहेत, संदिग्ध नाहीत. आणि म्हणून ते तेवढ्याच उच्च प्रतीच्या जबाबदारी निर्वाहाची अपेक्षा बाळगणारे आहेत.

याचा सर्वोच्च आदर्श आधुनिक इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज आहेत. उगाच समर्थ रामदास स्वामींनी त्यांचा उल्लेख ‘उपभोगशून्य स्वामी’ असा केला नाही. हाच आदर्श असावा सर्व क्षेत्रातील कार्यकारी अधिकाऱ्यांसाठी. म्हणजे तुम्ही ज्या वेळी ‘बळाच्या पदा’वर (Position of Power / चांगल्या शब्दांत ‘ऑथॉरिटी’) असता, तेव्हा तुम्ही सार्वजनिक जीवनात आणि प्रशासनात ‘संविधानाप्रती आणि पर्यायाने जनतेप्रती’ आणि व्यवसायात ‘स्टेकहोल्डर्स-प्रती’ उत्तरदायी असता. तेव्हा तुमच्या हातून त्या पदाचा उपयोग ‘इदं न मम्, आस्थापनाय स्वाहा’ या भावनेने करता आला पाहिजे, हाच या मंत्राचरणाचा अर्थ आहे.

याचा दुसरा अन्वय आपल्याला महात्मा गांधींच्या ‘Trusteeship’ या तत्त्वज्ञानाशी लावता येईल. म्हणजे मी केवळ माझ्या ‘minority stake-holder’s’चा प्रतिनिधी म्हणून इथे आहे, ही संपत्ती माझी नाही, मी या संपत्तीचा केवळ ‘विश्वस्त’ आहे, हा विश्वास कार्यकारी अधिकाऱ्यांना आपल्या उदात्त आचरणातून देता आला पाहिजे. त्यासाठी त्यांना हे बाळकडू शिक्षणातून मिळणे आवश्यक आहे. म्हणून शिक्षण ‘योग्य वळण लावणारे’ हवे.

निदान खासगी क्षेत्रात तरी या दर्जाच्या अधिकाऱ्यांना भरपूर वेतन दिले जाते. ते त्यांच्या बुद्धिमत्तेचे आणि अनुभवाचे परिचायक मानले तर त्यांनी अपहार करणे निंद्य ठरावे आणि त्यासाठी कठोर शिक्षा ही हवीच. प्रशासनात अपहार कमी करण्यासाठी या दर्जाच्या अधिकाऱ्यांची वेतनवाढ करावी, हा जर दुसरा अर्थ लावायचा झाला, तर तोही गैरलागू ठरू नये, पण त्याआधी नियमबाह्य आचरणास कठोर शिक्षेचे प्रावधान बळकट करणे आवश्यक आहे.

अजून साधा ‘लोकपाला’चा निर्णय आपण यशस्वीपणे राबवू शकत नाही, यावरून या सुधारणेचा पाया आपल्या देशात अजून किती कमकुवत आहे, हे ध्यानात येईल. सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांवर ‘शुचितेचा अंकुश’ असावा असे आपण मानतो. कारण जॉन अ‍ॅक्टन सांगतो- ‘Power corrupts and absolute power corrupts absolutely’. (अधिक शक्ती अधिक अधःपातास कारणीभूत ठरते) म्हणून ल्यूथर गुलिक एक उपाय सुचवतो, ‘Power needs control and absolute power needs absolute control’. (‘अधिक शक्ती अधिक करकचून आवळली पाहिजे.) या पार्श्वभूमीवर अमेरिकेत आर्थिक गैरव्यवहारांची किती कठोर शिक्षा आहे, हे आपण ‘इन्सायडर ट्रेडिंग’च्या प्रकरणातील निकालांवरून जाणतोच. 

दुसरा विचार आहे ‘मा गृधः कस्यस्विद्धनम्‌’. म्हणजे थोडक्यात समर्थ रामदासांनी सांगितल्याप्रमाणे ‘नको रे मना द्रव्य ते पूढिलांचे’. आपल्या वाट्याचे जे आहे तेच प्रामाणिकपणे आपले म्हणावे, आपल्या पुढील ‘सात पिढ्यांचे’ धन आपण आत्ताच कमावून ठेवू, ही ईर्ष्या जेव्हा बळावते, तेव्हा अधिकारी पदांवरील व्यक्तींकडून दुर्व्यवहार होतो.

जे. आर. डी. टाटा व्यावसायिकांसाठी मूलमंत्र देतात, ‘Earn honestly, and spend judiciously’. तोच संत तुकाराम महाराजांनी व्यवहारात दिलेला असतो- ‘जोडोनिया धन उत्तम वेव्हारें। उदास विचारें वेच करी’. धनापहारासंबंधी कौटलीय अर्थशास्त्रात फार स्वच्छ सांगितले आहे, ‘Whether one wishes or not, honey or poison kept on tongue gets tasted eventually.’ (मूळ श्लोकाचे इंग्रजी भाषांतर) म्हणून अपहाराविरुद्ध कठोर शासन हवे. भारताच्या मा. पंतप्रधानांनी याच दोन उपनिषदातील मंत्र-चरणांवर आधारित संदेश २०१८च्या दावोसमधील ‘जागतिक आर्थिक परिषदे’त (World Economic Forum) दिला होता.  

तिसरा विचार आहे, ‘पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते’. ज्ञान (मूळ अर्थ ‘ब्रह्म’) हे एक पूर्ण आहे. त्यातून पूर्ण जरी वजा केले तरी पूर्ण शिल्लक राहते. अर्थात ‘इन्फिनिटी मायनस इन्फिनिटी इज इन्फिनिटी’. जर ज्ञान अगाध आहे तर ते इतरांना देण्यात प्राणिमात्राने संकोच का करावा? सर्वांचे ज्ञानामुळे भले व्हावे, ही उदात्त भावना या विचारांच्या मुळाशी आहे. पण आजकाल विपरीत दिसते. सगळ्याच क्षेत्रांत ‘ज्ञान’ गुप्त ठेवले जाते.

‘Information is power’, असा आधुनिक व्यवस्थापनातून प्रसृत झालेला चुकीचा संदेश घात करतो. एकाच टीममध्ये एकमेकांपासून माहिती लपवली जाते, प्रत्येकाला आपल्याला काहीतरी इतरांपेक्षा वेगळे, अधिक माहिती आहे. यामुळे आपली नोकरी चालणार आहे, असे वाटत असते. त्यामुळे माहितीचे सामान वाटप होत नाही, ती संकीर्णच राहते, ‘Silos’मध्ये काम होते. त्यामुळे आस्थापनांच्या किंवा राष्ट्राच्या यशाचा विस्तार हव्या त्या गतीने होत नाही, त्या वेळी ही जबाबदारी त्या त्या क्षेत्रांशी निगडित अधिकारपदावरील व्यक्तीची असते. त्याने आपल्या कंपनीत किंवा विभागात माहितीचा समानाधिकार सर्वांना राहील हे पाहिले पाहिजे. अर्थात यात काही ‘Classified Information’ अपवाद समजावी. पण म्हणून सगळ्याच माहितीला ‘कोडीफाय’ करू नये आणि त्याद्वारे नवे ‘चातुर्वर्ण्य’ प्रस्थापित करून नये, आणि करायचेच झाले तर भगवद्गीतेत सांगिल्याप्रमाणे गुण आणि कर्माधारित करावे, धर्म आणि जन्माधारित नव्हे!

चवथा विचार आहे, ‘आत्महनो जनाः अन्धेन तमसावृता: लोका प्रेत्याभिगच्छन्ति’. जे लोक वाईट मार्गाचा अवलंब करतात, ते अज्ञानाच्या अंधःकाराने वेष्टिलेल्या लोकांत मार्गस्थ होतात. हा विचार गैर-व्यवस्थापनाच्या दृष्टीने एक इशारा आहे, वाईट कृतींची परिणती शिक्षेत होते हे सांगण्याचा, थोडक्यात, The bad meets its Waterloo.

पाचवा विचार आहे, ‘तद्दूरे तदन्तिके’. म्हणजे काहींसाठी दूर तर काहींसाठी जवळ. थोडक्यात ध्येयाची सापेक्षता, हा आहे. याचा अर्थ प्रत्येक जण माणूस म्हणून सारख्याच योग्यतेचा असला तरी, प्रत्येकाचे प्रयत्न कमी-अधिक असू शकतात, प्रत्येकाचा Sphere of competence वेगळा असू शकतो. त्याचे प्रत्यंतर त्यांना मिळणाऱ्या उण्या-अधिक फळात होते. त्यामुळे एखादे संस्थात्मक ध्येय काही जणांना गाठणे शक्य होत नाही, तर काहींना शक्य होते. ध्येय तेच असूनही निर्माण होणारी शक्याशक्यता ही प्रत्येक माणसासाठी ते विशिष्ट ध्येय त्याच्या क्षमता (झोन ऑफ एक्सेप्टन्स- हर्बर्ट सायमन) किंवा उदासीनता (झोन ऑफ इंडिफरेन्स- चेस्टर बर्नार्ड) क्षेत्राच्या किती जवळ आहे, यावर अवलंबून असते. त्यामुळे प्रत्येकाने संथात्मक ध्येयाच्या पूर्तीसाठी आपली कार्य-क्षमता वाढवणे अतिशय गरजेचे आहे.                      

सहावा विचार आहे, ‘एकत्वमनुपश्यतः’. अर्थात दबावाखाली न येता तटस्थतेने निर्णय घेण्याची क्षमता अंगी बाळगणे हा आहे. ही तटस्थता कार्यकारी अधिकाऱ्यांचा मोठा गुण ठरते, निर्णय घेताना अप-पर भाव असावयास नको, व्यावहारिक निर्णय घेताना तथ्याधारित (फॅक्ट/ Empirical) निर्णय घेण्याची क्षमता हवी, अनुकंपाधारित (व्हॅल्यू/ Normative) नव्हे. तथ्य समोर असले की, तटस्थ वृत्तीने घेतलेले निर्णय संस्थेच्या दीर्घकालीन भल्याचे असतात. या उलट झाले तर निर्णय तात्कालिक ठरतात.

कंपन्यांमध्ये लोकांना भरती करताना किंवा कमी करताना बरेच निर्णय व्यक्तिनिष्ठ असतात, तथ्याधारित असत नाहीत, अशा वेळी श्रीकृष्णाने जसा आप-अनाप्त भेट न करता जे जे दुष्ट त्यांचे धर्म संस्थापनेसाठी निर्दाळण केले, तसे नेत्याला कठोरपणे ‘उडदामाजीं काळे गोरे’ निवडता आले पाहिजे. तद्वतच राजकीय प्रणालीत ‘Spoils System’ असते; म्हणजे निवडून आले की, आपले आप्त आजूबाजूला गोळा करण्याची ‘किचन कॅबिनेट’ बनवण्याची पद्धत, असे ‘होयबा’ चांगल्या तटस्थ माणसाने गोळा करू नयेत, ‘नायबा’ जर हिताचे सांगणारे असतील तर ते ही भोवती असू द्यावेत अर्थात, योग्यायोग्यता हा एकच निकष असावा, असे खडे बोल सुनावणारा संपृक्त दूरदृष्टी वाहणारा हा विचार आहे. ‘Nice Guys Finish Second’ मागची हीच तर गोम आहे. यामुळे राष्ट्र किंवा संस्था उभारणीतून चांगली माणसं दूर राहतात.

सातवा विचार आहे, ‘कविः मनीषी’. ‘कवि’ (संस्कृत) हा शब्द Visionary किंवा Statesman या अर्थाने आला आहे, ज्याच्याकडे Coup d'œil आहे किंवा कोर्टसेन्स आहे असा आणि ‘मनीषी’ म्हणजे मनावर नियंत्रण असणारा किंवा विवेकी अथवा संयमी. अगदी ‘तस्यां जागर्ति संयमी’मध्ये आलेलाच (‘तुझें आहे तुजपाशीं’मध्ये पुलंनी उडवलेली खिल्ली अगदीच विरुद्धार्थी आहे), तौलनिक निर्णय घेणारा, हे सद्गुण असावेत कार्यकारी अधिकाऱ्यांचे. आधुनिक व्यवस्थापनशास्त्रात Leadershipची व्याख्याच आहे- 'One who takes her/ his people from where they are to where they not have been.’ हे त्यालाच शक्य होते, ज्याच्याकडे नेतृत्वगुण असतात आणि दूरदृष्टी असते. पण याच्या जोडीला काय हवं तर, संयम. कारण माणूस खूप हुशार असून संयमी नसला तर त्याच्या हुशारीचा उपयोग होण्याऐवजी संस्थेला तोटाच होतो.

आठवा विचार आहे, ‘पर्यगात’. म्हणजे 'सर्वव्यापी' किंवा Ubiquitous, म्हणजे सर्वांगीण विचार करणारा. या अर्थाने याकडे पाहिले म्हणजे जाणवते; जो एकाच बाजूचा विचार न करता आस्थापनेतील सगळ्या आयामांचा सम्यक विचार करतो, तोच योग्य निर्णय घेऊ शकतो. उदा. एखाद्या बहुराष्ट्रीय कंपनीत भारतात जे काम केलं जातं किंवा जे सॉफ्टवेअर कोडिंग होतं; ते नेमकं कुठे, कोणकोणत्या नव्या आयामांमध्ये बसवून नेमकं कोणत्या सिस्टिममध्ये वापरलं आहे, याची कल्पना त्यावर काम करणाऱ्या वेगवेगळ्या देशांतील इंजिनिअर्स ना असतेच असे नाही, त्यांना फक्त त्यांच्यापुरती तेवढी ‘प्रॉब्लेम स्टेटमेंट’ ठाऊक असते आणि तेवढी व्यवस्थित सोडवली म्हणजे त्यांचे काम झालेले असते. अशा हजारो तुकड्यांमध्ये गोळा झालेल्या लॉजिकमधून एक मोठे लॉजिक काय आणि कशासाठी जन्माला घालायचे आहे, याची कल्पना फक्त ‘कोअर टीम’ला असते.

कधी ‘बौद्धिक संपदा’ गहाळ होऊ नये म्हणून अशी काळजी घेतली जाते किंवा राष्ट्राच्या बाबतीत, आंतरराष्ट्रीय संबंधात नेहमीच अशा रीतीने काम होत असावे. थोडक्यात ज्या नेत्याला हे सगळे ठाऊक असते त्याच्याकडे ‘कवि आणि मनीषी’ हे दोन्ही सद्गुण असणे आवश्यक असते. अर्थात व्यूहात्मक निर्णय जिथे घ्यावे लागतात, तिथे ही कार्यपद्धती अंमलात आणली जाते, अन्यथा, टेरीने प्रतिपादलेले लोकशाही मूल्य संस्थांतर्गत संप्रेषणासाठी वापरले जावे, ही अपेक्षा असते. Communication is shared understanding of a shared purpose.         

नववा विचार आहे, ‘अपापविद्धम’ (Staying, Unblemished). भ्रष्टाचाराच्या या युगात यावर अधिक भाष्य न करणेच बरे. थोडक्यात, ज्याचे चरित्र डागाळलेले नाही, असा नेता असावा. याबरोबरच अजूनही गुण सांगता येतील. जसे, नेता ‘शुद्धम’ (Clean), ‘परिभूः’ (Commanding) आणि ‘स्वयंभूः’ (Self-Made) असावा इ. एन आर नारायणमूर्तींनी, ‘A Better India A Better World’, नावाच्या पुस्तकात कार्यकारी अधिकाऱ्यांसाठी काही सद्गुण आवश्यक आहेत हे सांगितले, ते पण अवश्य पाहावेत. त्यात त्यांनी सर्वांत जास्त महत्त्व ‘Courage’ (धैर्य) या गुणाला दिले आहे. त्याचे दिलेले कारण; बाकीचे गुण प्रकट करण्यासाठी आधी हा गुण असावा लागतो; असे चतुर आणि व्यावहारिक आहे.

दहावा विचार आहे, ‘शाश्वतीभ्यः समाभ्यः यथातथ्यतः अर्थान् व्यदधात्’. नियम हे शाश्वत असावेत; असा याचा अर्थ आहे. म्हणजे जसा गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे, तो शाश्वत आहे म्हणून चढ चढताना माणूस दमतो; मग त्याला व्यायामाने आपले शरीर सांभाळावे लागते, आहार विहारावर नियंत्रण ठेवावे लागते, म्हणजे मग त्याला या शाश्वत नियमाचा त्रास होत नाही. संस्थेचे तसेच असते. काम करत राहिले म्हणजे मन प्रसन्न राहते, नियमांचे ओझे वाटत नाही. ज्याला आपले आवडीचे काम श्रद्धापूर्वक करायचे असते, त्याला त्यातून आनंद मिळतो आणि ऊर्जा मिळते. ज्याला आला दिवस ढकलायचा आहे त्याला कामाचे आणि नियमांचे ओझे वाटत राहते. अशांसाठी म्हणून कार्यकारी अधिकाऱ्यांनी कार्यालयीन नियमांना मुरड घालायची नसते, तर काम न करणाऱ्यांना प्रेरीत करायचे असते. त्यासाठी आधुनिक व्यवस्थापनात दोन विचार आहेत.

एक आहे - डग्लस मॅकग्ग्रेगर, तो लोकांचे वर्गीकरणच ‘एक्स’ (X), म्हणजे काम न करणारे आणि ‘वाय’ (Y), म्हणजे काम करणारे, असे करतो, आणि असे मानतो की, दोन्ही वर्गातील लोकांना वेगळ्या पद्धतीने हाताळले पाहिजे.

दुसरा आहे, फ्रेडरिक हर्जबर्ग याचा प्रेरणा देणारा (मोटिवेशन) विचार. त्यात तो असंतोषाला जन्म देणारे घटक दूर करण्यास सांगतो. पण यामुळे संतोष वाढेल असे सांगता येत नाही, म्हणून संतोष वाढवणाऱ्या घटकांचा वेगळा उल्लेख करतो आणि त्यांना उत्तेजन देण्याची सूचना करतो.

उपनिषद सांगतं, जे चांगलं आहे ते चांगलंच राहिलं पाहिजे ते काम न करणाऱ्यांसाठी गढूळता कामा नये. करावे तसे भरावे. याचा अर्थ आपण सिंगापूरने जी कार्यपद्धती स्वीकारली त्याच्याशी जोडू शकतो, ली कुआन यू यांनी लोकांच्या क्षमतेत असमानता असते, हे मानून त्यांना वेगवेगळी कामं दिली, पण त्यात कामचुकारपणा खपवून घेतला नाही. म्हणून दीर्घ काळानंतर आज त्यांचे दरडोई उत्पन्न भारतापेक्षा १३ पटीने अधिक आहे. म्हणून प्रत्येकाने आपल्या पातळीवर नियमांना वाकवण्यापेक्षा स्वतःला अधिक चांगलं बनवण्याचा प्रयत्न करणं आवश्यक आहे. जॉन नॅश यांची ‘गेम थेअरी’ हेच सांगते - Minimise your maximum weaknesses and maximise your minimum strengths.

अकरावा विचार आहे, 'अन्धं तमः प्रविशन्ति येऽविद्यामुपासते, ततो भूय इव ते तमो य उ विद्यायाँ रताः', प्रा अनंत दामोदर आठवले यांनी ‘उपनिषदर्थ कौमुदी’च्या पाचव्या खंडात १० उपनिषदांवर भाष्य केले आहे. त्यातील पहिल्या खंडात ईशावास्यातील या मंत्रामागील अर्थच्छटा स्पष्ट केली आहे. जी परिचारिका असते ती इंजेक्शन देते, तेव्हा तिला शाबासकी मिळते, पण डॉक्टरला इंजेक्शन देता येत नाही, तेव्हा त्याला वाईट बोल ऐकावे लागतात. याचा अर्थ इंजेक्शन देणे हे परिचारिकेचे काम आहे मला ते जमत नाही, असे म्हणणे डॉक्टरकडून अपेक्षित नाही, त्याने ते न करणे वेगळे. थोडक्यात, मोठ्या कार्यकारी अधिकाऱ्याने खालच्या दर्जाचे काम न करणे वेगळे आणि त्याला ते न जमणे वेगळे. न जमणे हे अपेक्षित नाही, त्यात त्याच्या विद्येचा मोठा अपकर्ष आहे.

उपनिषद वाक्याचा अर्थ, विद्या (ज्ञान/ थिअरी) माहीत असताना त्याअंतर्गत अविद्येचा (कर्म/ प्रॅक्टिकल) आश्रय न घेणाऱ्याला अधिक अंधकार भोगावा लागतो. यासाठी उपनिषदाने घालून दिलेले निकष फार उच्च दर्जाचे आहेत, हे आपण लक्षात ठेवावे लागते. व्यवस्थापनात आपण सत्तेच्या वरच्या पायदानावर असताना किती गोष्टींचे ज्ञान आवश्यक असते, याची यावरून कल्पना येते. निदान अशांच्या अधिकारकक्षेत काम करणाऱ्यांची तशी अपेक्षा असते आणि ती सांभाळण्यासाठी अधिकाऱ्यांनी अधिक कष्ट घ्यावेत. त्यासाठी अधिकारीही सक्षम असावे लागतात, तेव्हाच आस्थापनांचे भले होते.

यावेळी एखादी गोष्ट माहीत नसली तर ती माहीत करून घेण्याची जिज्ञासा अंगी असावी लागते, या अनुभवावरील अलीकडचे उदाहरण म्हणून अच्युत गोडबोलेंचे ‘एल अँड टी इन्फोटेक’च्या सीईओ पदापर्यंतच्या प्रवासादरम्यान सॉफ्टवेअरमधील बारकावे समजून घेण्यासाठी केलेले यत्न जरूर वाचावेत. याचा दुसरा अर्थ, ज्या वरिष्ठ पदांवरील महाभागांना आपल्या विभागात काय चालते आहे, हे कळत नसले तरी चांगल्या-वाईट परिणामांची जबाबदारी त्यांच्याच अंगावर येते, इतरांपेक्षा खूप अधिक शिक्षेचा तो अधिकारी ठरतो.

बारावा विचार आहे, ‘अविद्यया मृत्युं तीर्त्वा विद्ययाऽमृतमश्नुते’. कर्म (अविद्या) आणि ज्ञान (विद्या) या एकाच सतत-प्रवासाच्या दोन बाजू आहेत (two ends of a continuum). कर्म करत ज्ञानाचा प्रवास करणाऱ्यास ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’, असा अनुभव येतो. आपण व्यवस्थापनाच्या भाषेत प्रॅक्टिकल आणि थिअरी यांचे एकत्र येणे असे म्हणू. हे एका माणसाच्या ठायी अनुभवास येणे अवघड असते, पण एका संस्थेच्या ठायी जुळून येणे अवघड नसते. जेव्हा ती संस्था वेगवेगळ्या कार्यक्षमतांना एकत्र आणते, म्हणजे ‘कर्मचारी’ आणि ‘विचारी’ दोघांच्या समन्वयाने चालते, तेव्हा ती उत्कर्षाप्रत जाते. मात्र सर्व विचारी माणसांनी कर्मचारी असणे आणि कर्मचाऱ्यांनी विचारी असणे, हा या व्यवस्थेचा उत्कर्षबिंदू आहे.

तेरावा विचार आहे, ‘अन्धं तमः प्रविशन्ति येऽसंभूतिमुपासते, ततो भूय इव ते तमो य उ संभूत्यां रताः’. असंभूती म्हणजे वेगवेगळे अवयव आणि संभूती म्हणजे त्यांचे एकत्र नांदणे, जसे शरीर. संस्थेचे किंवा कंपनीचे तसेच असते. त्यात वेगवेगळे विभाग असतात. त्यांनी एकत्र काम करायचे असते. मुख्य अधिकाऱ्याने जर एखाद्या विभागास अवास्तव महत्त्व दिले तर व्यावहारिक आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. जसे शरीरातील एक अवयव इतरांपेक्षा अतिमहत्त्वाचा मानून चालत नाही. जसे एफ. डब्ल्यू. टेलरचे विविध विभांगातील ‘Division of Work’ किंवा हेनरी फेयॉलचे कार्यपद्धतीसंबंधातील ‘POSDCORB’ या असंभूती आणि ज्याला हे सगळे विभाग जोडले जातात तो मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा CEO किंवा प्रमुख या संस्थारूपी शरीराची संभूती असे मानले तर ‘डिसेन्ट्रलायझेशन ते रिसेन्ट्रलायझेशन’ असा प्रवास आहे.

पण उपनिषदातील तत्त्व संभूतींना असंभूतींचे ज्ञान आहे हे धरून चालते, नव्हे तशी अपेक्षा ठेवते. म्हणजे जेव्हा आपण एखाद्या कंपनीचे प्रमुख असता, तेव्हा मला फक्त ‘सेल्स’ कळतं, ‘फायनान्स’ कळत नाही, असे म्हणून चालत नाही. या सगळ्या विविध विभागांचा एकच चेहरा असतो आणि कोणत्याही विभागात झालेल्या गैरव्यवहारास तोच जबाबदार असतो.                                      

चौदावा विचार आहे, ‘हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापिहितं मुखम्’. सत्याचे मुख हे सोन्याच्या पत्र्याने झाकलेले असते. म्हणजे मोठ्या पदावर काम करताना इतकी प्रलोभने येतात, ती डावलून प्रमुखाला सत्याच्या/ ध्येयाच्या मार्गाने अग्रेसर होता आले पाहिजे. कायम या प्रलोभनांच्या सावलीत अधिकारी वावरतो आणि आपल्या मूळ गाभ्यापासून भटकतो, असे होऊ नये म्हणून हा इशारा आहे.  

पंधरावा विचार आहे, ‘तेजो यत्ते रूपं कल्याणतमं तत्ते पश्यामि’. तुझे कल्याणकारक रूप मी पाहीन. म्हणजे ज्याच्यासाठी जे योग्य आहे ते त्याला या मुख्य अधिकाऱ्यांत दिसो. थोडक्यात कधी मुख्य अधिकाऱ्याला संस्थेच्या भल्यासाठी अभिनय करावा लागतो. म्हणजे तो समजा व्यवहारासंबंधी वाईट बातमी घेऊन ऑफिसात आला आणि समोर एक हसतमुख कनिष्ठ कर्मचारी भेटला, तर त्याला कटू न बोलता हसून बोलायचे, मात्र ज्याच्यावर रागवणे आवश्यक आहे, त्या वरिष्ठ अधिकाऱ्याना बातमी संबंधाने योग्य असल्यास फटकारायचे, ही दोन्ही रूपं एकाच वेळी दाखवता आली पाहिजेत.  

सोळावा विचार आहे, ‘योऽसौ पुरुषः सोऽहमस्मि’. हा फार मोठा संदेश आहे. कंपनीचा किंवा संस्थेचा एक ‘First among equals’ मुख्य कार्यकारी अधिकारी असला तरी इतर कर्मचारी त्याच्याच बरोबरीने वागवले जाणारे आहेत, म्हणून मानवाच्या ‘समानाधिकारा’चा (Egalitarianism) संदेश देणारा हा मंत्र आहे, असे मानावे. प्रत्येक कर्मचाऱ्याला त्याचे योगदान आणि त्याला मिळणारी संतुष्टी (Contribution Gratification Equilibrium) नुसार संस्थेत पुढे जाण्याचा सामानाधिकार असणार आहे. त्यातून तो पण उद्याचा मुख्य कार्यकारी अधिकारी बनू शकतो, जे जाणूनच त्याने संस्थेत कार्यमग्न राहायचे आहे. त्यात आपला उत्कर्ष साधताना संस्थेचा पण उत्कर्ष साधायचा आहे, हे गृहीतक आहे.

सतरावा विचार, ‘भस्मान्तं शरीरम्’. ‘Life is Finite’ हा आहे. याचा अर्थ ‘कल करे सो आज’. शेवटी मानवी शरीराचा भरवसा नाही. त्यामुळे आपल्या कामात टाळाटाळ न करता ते तत्परने करण्यावर विश्वास वाढवणारा हा मंत्र आहे. याची अध्यात्मिक बाजू न विचारात घेता लौकिक अर्थ जरी विचारात घेतला तरी वेळेचे महत्त्व सांगणारा वा ‘Time Management’ शिकवणारा हा विचार आहे.   

शेवटी, ‘अग्ने नय सुपथा राये अस्मान्’, ही प्रार्थना आणि ‘अवघे धरू सुपंथ’ हा विचार!

अजूनही उपनिषदे म्हणजे जुने बाड म्हणणार आहात की, काय? हे कालजयी तत्त्वज्ञान आहे, हे निश्चित!

 .............................................................................................................................................

लेखक जीवन तळेगावकर हे माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील दिल्लीस्थित कंपनीत मोठ्या हुद्द्यावर काम करतात.

jeevan.talegaonkar@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

                       

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......