अजूनकाही
दुपारची वेळ होती.
पक्षाचं ऑफिस नेहमीप्रमाणे ओस पडलेलं होतं.
रोजच्याप्रमाणे आजही काही काम नव्हतं आणि रोजच्याप्रमाणेच आजही नेते-कार्यकर्ते-जनता यांच्यातलं कोणीही सकाळपासून फिरकलं नव्हतं… साहजिकच सकाळपासून ऑफिसात डुलक्या खात बसलेल्या आईचा दुपारच्या वेळी डबा खाऊन झाल्यावर बसल्याबसल्याच डोळा लागला होता… तिचा मोबाइल घेऊन कोपऱ्यात गेम खेळत बसलेल्या लेकाच्या फसफसून उतू जाणाऱ्या हसण्यामुळे तिची झोपमोड झाली…
कसंबसं हसू दाबत लेक हातातला मोबाइल आईपुढे करत म्हणाला, ‘हे बघ मा, कसला भारी मीम तयार झालाय तुझा-माझा…’
आईने डोळ्यांवरची पेंग उडवत चष्मा चढवला… मोबाइलवर त्याच माय-लेकरांचा फोटो दिसत होता आणि वर लिहिलं होतं, ‘तमसो मा ज्योतिर्गमय…’
आई भडकून म्हणाली, ‘बाळा, इथे माझे हिंदीचे वांधे आहेत, तू संस्कृत कुठून वाचायला लावतोस? काय लिहिलंय इथे? काय आहे याचा अर्थ?’
लेक पुन्हा हसू दाबत म्हणाला, ‘तमसो मा ज्योतिर्गमय म्हणजे तुम सो रही थी मा, तब ज्योतिरादित्य चला गया… हा हा हा हा’
फ्यॅ फ्यॅ हसणाऱ्या लेकाकडे काळजीने पाहत आई म्हणाली, ‘अरे गधड्या, लोकांनी आपल्यावर हसण्यासाठी हे चित्र तयार केलंय, ते तू मला दाखवतोयस आणि वर ते पाहून स्वत: हसतोयस? कधी रे अक्कल यायची तुला?’
लेक पोक्त चेहरा करून म्हणाला, ‘असं नाही मा, आपण टीकाही खिलाडूवृत्तीने स्वीकारली पाहिजे, तिच्यातून शिकलं पाहिजे…’
आई कपाळाला हात लावून म्हणाली, ‘बाळा, टीका वेगळी आणि थट्टा वेगळी… तुझी तर सगळे लोक खिल्लीच उडवतात… ती तर आणखी वाईट… तिच्यावर काय हसतोस? आपल्या पक्षाला केवढा मोठा फटका बसला आहे, आपलं एका राज्यातलं सरकार गडगडण्याच्या बेताला आहे. त्यावर विरोधक हसतायत ते ठीक आहे, तू कसा हसू शकतोस? मी झोपून राहिले असं म्हणतोयस, तू तरी काय वेगळं करत होतास?’
‘विरोधक वेडपट आहेत मा, लक्ष नको देऊस त्यांच्याकडे. आपल्या पक्षाचं काय वाईट झालंय मा? असा एखाददुसरा किरकोळ नेता गेल्याने खिळखिळा होणार आहे का आपला पक्ष? हसणारे हसू देत, हसतील त्यांचे दात दिसतील…’
आई म्हणाली, ‘अरे बाळा, त्यांच्याकडे दिसायला दात तरी आहेत… आपले दात घशात गेले आहेत… पक्ष खिळखिळा होणं म्हणजे आणखी काय वेगळं असतं? शिवाय जो गेला तो तुझा मित्र होता ना रे?’
बेटा फुरंगटून म्हणाला, ‘छ्याट, तो कसला मित्र? मागची निवडणूक हरल्यावर परदेशात जाताना मी त्याला त्याचा गॉगल मागितला तिकडे वापरायला, तर म्हणतो, मला काय देशील? मुख्यमंत्रीपद तरी दे नाहीतर खासदारकी तरी दे… याला काय दोस्ती म्हणतात का? अशा घमेंडखोर पैसेवाल्यांमुळेच पक्ष बदनाम होतो…’
‘अरे, पण तो कालपर्यंत आपल्याबरोबर होता, तेव्हा नाही बदनाम झाला पक्ष? मित्राला विश्वासात घेणं आणि समजावणं हे तुझं काम नव्हतं का?’
बेटा हात झटकत तालावर नाचत म्हणाला, ‘माझ्याकडे तर कोणतंच पद नाही, म्हणजे माझ्याकडे तर कोणतंच काम नाही… लाला लाला ल्ला ला लाला ला! तू पक्षाध्यक्ष आहेस, तुझी जबाबदारी आहे ना?’
‘अरे, पण तू कोणत्याही पदावर नसताना सगळ्या महत्त्वाच्या बैठकींना हजर असतोसच ना? सगळ्या निर्णयांमध्ये लोक तुझा विचार घेतातच ना? महाराष्ट्रात तो आदित्य निदान मंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारून वडिलांबरोबर फिरतोय, तू कसलीच जबाबदारी घ्यायला तयार नाहीस…’
मुलगा आईचा हात हातात घेऊन म्हणाला, ‘मा, अगं काय बोलतेयस काय तू? आपला आणि जबाबदारीचा काय संबंध? पक्षाला आपली गरज आहे, आपल्याला पक्षाची गरज नाही. आपण या पक्षाचा डिंक आहोत, आपण नसलो तर हा पक्ष कोलमडून पडेल पत्त्यांच्या बंगल्यासारखा. आपण इथले हायकमांड आहोत, अशी प्रत्येकाची समजूत वगैरे काढत बसलो तर दिवस-रात्र तेच करावं लागेल. तशी आपली परंपरा आहे का? शिवाय, राजेशाहीचा, घराणेशाहीचा एक वारसदार निघून गेल्याने काय आकाश कोसळणार आहे का पक्षावर? उलट पक्षावरचा बोजाच कमी होईल.’
आता आई तोंडावर पदर दाबून हसू लागली, म्हणाली, ‘बेटा, निदान आपण तरी घराणेशाही, राजेशाही वगैरेंवर बोलता कामा नये… आपलं आडनाव काढलं तर आपल्याकडे काय उरेल? या गतीने उद्या तू पक्षांतर्गत लोकशाहीबद्दलही बोलू लागशील… ते परवडेल का आपल्याला? मला इतकंच कळतं की तू थोडा पुढाकार घेऊन मित्राला दिलासा दिला असतास तर आज एक राज्य हातातून जाण्याची वेळ आली नसती…’
आता लेक नजर रोखून म्हणाला, ‘मा, मी अगदीच पप्पू वाटतो का गं तुलाही? मी त्याला समजावलं असतं, पण मग त्याने मागितलेलं काही ना काहीतरी द्यावं लागलं असतंच ना त्याला! ते दिलं असतं, तिकडचे दोन्ही काका वैतागले असते… ते तुझ्या कानी लागले असते… तू दाद दिली नसतीस तर त्यांच्यातल्या कोणीतरी हेच केलं असतं… मग तूही म्हणाली असतीस की, हा सगळा घोळ मीच घालून ठेवला… मग लोक काय बोलले असते, विरोधक काय बोलले असते? मी त्याला काही देऊ शकत नाही, तर त्याला अडवूही शकत नाही, सिंपल. त्यापेक्षा टिकटॉकवर व्हिडिओ बघत टाइमपास केलेला बरा नाही का?’
आई निरुत्तर होऊन लेकाकडे पाहत राहिली… या स्थितीबद्दल वाईट वाटून घ्यावं की, लेक वाटतो तेवढा पप्पू नाही, याचा आनंद मानावा, हे तिला कळेना… तेवढ्यात शिपायाने दारावर टकटक केली… मायलेक सावरून बसले… शिपाई आत येऊन म्हणाला, ‘सचिनसाहेब भेटायला आले आहेत… सचिन पायलट… काय सांगू?’
आईने सांगितलं, ‘दोन मिनिटं थांबायला सांग. मी बोलावून घेते.’
शिपाई गेल्यावर आईने लेकाकडे पाहिलं, तो मनाशी काहीतरी ‘पायलट, झटपट, लटपट, महाखट, आपट, धोपट’ असं बडबडत होता… आईने विचारलं, ‘अरे, हे काय बडबडतोयस तू?’
बेटा म्हणाला, ‘काय गं मम्मा, लिंक तोडलीस तू. आता परत सगळं जुळवावं लागेल…’
आई म्हणाली, ‘पण तू हे जुळवतोस काय हे?’
बेटा एकदम खासगी सुरात खुसफुसत म्हणाला, ‘अगं, उद्या हा सोडून गेला तर मस्त मीम जुळायला नको का? विरोधकांच्या आयटी सेलची एकंदर बुद्धी माहितीये ना किती आहे ती! त्यांच्यावर भरवसा ठेवता येईल का? आपणच काहीतरी मस्त रचलं पाहिजे ना? मी आतल्या खोलीत बसून झकास मीम रचतो… तू बोलून घे त्याच्याशी.’
आईच्या डोळ्यांसमोर त्या राज्यातलं सगळं चित्र उभं राहिलं… सगळ्या शक्यता उभ्या राहिल्या… तिने बेल वाजवून शिपायाला बोलावून घेतलं आणि सांगितलं, ‘आज वेळ नाही, आम्हीच बोलावून घेऊ असं सांग त्यांना.’
मग ती आतल्या खोलीकडे वळली… भविष्यातलं मीम रचण्यात लेकाला मदत करण्यासाठी!
.............................................................................................................................................
लेखक मुकेश माचकर पत्रकार-संपादक आहेत.
mamanji@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment