अजूनकाही
करोना विषाणूच्या संसर्गाचा एक अनपेक्षित ‘साईड इफेक्ट’ जग कदाचित अनुभवू लागलेलं आहे ते म्हणजे जागतिक पर्यावरण बदलास काही प्रमाणात आळा बसत आहे. हा युक्तिवाद वाचून कुणी असं म्हणू शकेल की, इथं लोक मृत्युमुखी पडत आहेत, मानवजातीच्या अस्तित्वावर बेतलं आहे आणि तुम्ही पर्यावरण बदलाचं काय सांगत आहात! अर्थात पर्यावरण बदल रोखण्यासाठी करोनासारखे उपाय समाज म्हणून आपल्याला नक्कीच नको आहेत.
माणसाला नजीकचं संकट नेहमीच जास्त महत्त्वाचं वाटत असतं, पण दूरगामी विचार केला तर करोनाच्या परिणामाची मीमांसा ही मुळात माणसाच्या आरोग्यदायी भविष्याचाच विचार आहे.
बेसुमार औद्योगिकीकरण, शहरांची वाढ, वृक्षतोड आणि आपल्या सगळ्यांची कार्बन उत्सर्जन पुरस्कृत करणारी जीवनशैली, या सगळ्याचा परिपाक म्हणजे पर्यावरण बदल, पृथ्वीचं वाढत चाललेलं तापमान, नैसर्गिक आपत्तींच्या आणि विविध आजारांच्या प्रमाणात वाढ. करोना विषाणूचा पर्यावरण बदलाशी तसा काही प्रत्यक्ष संबंध नाही, पण त्याच्या फैलावामुळे अप्रत्यक्षपणे पर्यावरण बदलास कारणीभूत ठरणाऱ्या अनेक कृती मात्र कमी नकळत कमी होताना दिसत आहेत.
जागतिक पातळीवर कमी कार्बन उत्सर्जन
नासानं फेब्रुवारी महिन्यात चीनमध्ये जिथं करोना संसर्गाची सुरुवात झाली तेथील काही उपग्रहाद्वारे टिपलेले नकाशे प्रसिद्ध केले. हे नकाशे दर्शवतात की, जानेवारी महिन्यानंतर तेथील नायट्रोजन ऑक्साईड या घातक वायूच्या हवेतील प्रमाणात कमालीची घट झाली आहे. गेल्या काही महिन्यांत चीनमधील उत्पादन, वाहतूक कमी झाली. त्याचा हा परिणाम आहे. इटलीमध्ये, जिथं संसर्ग मोठ्या प्रमाणावर आहे, तिथं प्रदूषणाची पातळी आश्चर्यकारकरित्या कमी झाली आहे.
विमान प्रवास हे एक महत्त्वाचं कारण आहे, ज्यामुळे कार्बन उत्सर्जन प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढतो. स्वीडनमधील पर्यावरण बदलाचे अभ्यासक डॉकटर निकोलस यांच्या मते, न्यूयॉर्क ते लंडन दरम्यान ये-जा केलेला विमान प्रवास इतका हरितगृह वायू निर्माण करतो, जितका घटवण्यासाठी आठ वर्षे वस्तूंचा पुनर्वापर करावा लागेल.
करोना जेव्हा जागतिक आरोग्य परिषदेनं ‘वैश्विक संकट’ म्हणून जाहीर केला, तेव्हा अनेक देशांनी आपल्या विमान प्रवासावर बंधनं घातली आणि अनेक प्रवासी तर स्वतःच विमान प्रवास रद्द करत आहेत. साहजिकच याचा खूप मोठा फायदा पर्यावरण बदलास सध्या तरी होत आहे.
अनेक जागतिक परिषदा, कार्यशाळा या प्रत्यक्ष भेटून करण्यापेक्षा वेबिनार, व्हिडिओ परिषद या मार्गानं करण्याचा कल वाढत आहे. चीनमध्ये तर अनेक शाळा व्हिडिओ माध्यमांद्वारे सुरू आहेत. त्यामुळे अशा कार्यक्रमांमध्ये होणारी बेसुमार ऊर्जा वाचत आहे. आणि या पर्यावरण पूरक मार्गांची नकळत जगाला कदाचित सवयसुद्धा होत आहे.
देशांतर्गत परिस्थिती
महाराष्ट्र, दिल्ली अशा अनेक ठिकाणी सरकारने सार्वजनिक जीवनावर बंदी घातली आहे. जितकी कमी गर्दी, तितका कमी संसर्ग, असा हा साधा सोप्पा उपाय आहे. अनेक मॉल्स, सिनेमागृहं, उद्यानं, व्यायामशाळा आता बंद आहेत. या ठिकाणी बऱ्याचदा गरज नसतानाही उधळली जाणारी वीज, या निमित्तानं वाचत आहे. लग्न कार्य आणि असे सोहळे आपोआपच कमी खर्चात, ऊर्जेच्या कमी वापरानं घडत आहेत.
शहरांमधील वाहतूकदेखील तुरळक झाली आहे. सार्वजनिक वाहतुकीचा वापर कमी झाला तर विशेष फरक पडत नाही, कारण त्यातून कित्येक लोक प्रवास करतात, पण खाजगी वाहतुकीवर निर्बंध आल्यानं साहजिकच कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण घटतं.
नुकत्याच झालेल्या एका जगातील सर्वेक्षणामध्ये भारतातील बंगळूर, मुंबई आणि पुणे ही शहरं वाहन संख्येमध्ये अग्रगण्य होती. परंतु आता नाईलाजानं रस्त्यावर वाहनं काढणं लोक स्वतःच टाळत आहेत. अनेक कंपन्या ‘घरी बसून काम’ करण्याच्या सूचना आपल्या कामगारांना देत आहेत. त्यामुळे अर्थातच कामगारांची वाहतूक, कार्यालयातील वीज अशा अनेक गोष्टी वाचत आहेत. यातून होणारं कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण आपोआप कमी होत आहे.
तात्पुरती का होईना, पर्यावरणपूरक जीवनशैली
वास्तविक पाहता पर्यावरण पूरक जीवनशैलीचा आग्रह पर्यावरणवादी नेहमीच करत असतात. ज्यामध्ये या सर्व गोष्टी सुचवल्या जातात की, वाहनांचा वापर कमी करा, वीज वाचवा, इत्यादी. पण वस्तुस्थिती अशी आहे की, जोपर्यंत एक समाज म्हणून आपल्याला निसर्गाचा तडाखा बसत नाही, तोवर आपण जागे होत नाही.
आत्ता करोनामुळे या कृती घडत आहेत, परंतु हा म्हणजे ‘जुलमाचा रामराम’ आहे. हे बदलत्या जीवनशैलीचं स्थित्यंतर आपण कायम ठेवू, अशी अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे. कारण इतके आपण नैसर्गिक संसाधनं उधळपट्टी करण्याच्या जीवनशैलीमध्ये गुंग झालेलो आहोत. तसंच जागतिक पातळीवर सध्याचा आर्थिक तुटवडा भरून काढण्यासाठी पुढे आपण कोणत्या थरास जाऊ आणि त्यातून पर्यावरणाचं किती नुकसान होईल, हे आत्ता सांगणं कठीण आहे.
परंतु निदान सध्या तरी एक समाज म्हणून संसाधनं अत्यल्प वापरण्याचा अनुभव आपल्याला मिळतो आहे. हात कसे धुवावेत याचं मूलभूत शिक्षण आपण घेतो आहोत आणि त्याचा वापर करतो आहोत. आपल्याहून आकारानं कितीतरी छोटा असणारा एक विषाणू आपल्याला धारेवर धरू शकतो, याचा प्रत्यय आपल्याला येतो आहे. यानिमित्तानं निसर्ग नेहमीच आपल्याहून जास्त शक्तिमान आहे, याची एक सामाजिक जाणीव आपल्या सामूहिक मनःस्थितीमध्ये रुजत आहे, अशी आशा ठेवायला हरकत नाही.
संदर्भ -
२. https://www.axios.com/pollution-levels-italy-coronavirus-30ce759a-c4f2-4517-832d-59facef2f5c6.html
३. https://www.nytimes.com/2020/03/13/climate/coronavirus-habits-carbon-footprint.html
४. https://www.edutopia.org/article/what-teachers-china-have-learned-past-month
.............................................................................................................................................
लेखक अनुज घाणेकर मानववंशशास्त्रज्ञ व समुपदेशक आहेत.
anujghanekar2@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment