अजूनकाही
राजकीय हत्यांच्या मागे षडयंत्र असतं आणि या षडयंत्रांचा कधीही छडा लागत नाही. त्यामुळे या षडयंत्राचं मनोवेधक आणि पटण्याजोगं चित्र रेखाटणं, हा विसाव्या शतकातील सर्वांत मोठा विरंगुळा बनला. विशेषतः अमेरिकेत. प्रसारमाध्यमांनी हा विरंगुळा कमालीचा लोकप्रिय केला आणि २१ व्या शतकात इतर राष्ट्रांमध्येही हे लोण पोचलं. करोना विषाणूच्या उदभवाबाबतही राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप विविध राजकारणी करू लागले आहेत. अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापारयुद्धाची किनार या वादाला आहे. भारतातील काही प्रसारमाध्यमांनी यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावली. करोना विषाणूची निर्मिती चीननेच केली, असा आरोप दै. ‘लोकसत्ता’ने केला, तर ‘इकॉनॉमिक टाइम्स’ (ईटी प्राईम) या माध्यमानेही चिनी सरकारने पुरस्कृत केलेल्या फसलेल्या प्रयोगातून करोना हा विषाणू निर्माण झाला आणि त्याचा प्रसार झाला, असं जाहीर केलं.
करोना विषाणूची लागण वाढत गेली आणि व्हॉटसअॅपवर अनेकांनी मला मॅसेज म्हणजे बातम्यांच्या व व्हिडिओंच्या लिंक्स पाठवून करोना विषाणू हे जैविक युद्धाचं हत्यार म्हणून कसं विकसित करण्यात आलं, यासंबंधातील बातम्या व लेख पाठवले. वुहान शहरातील चीन सरकारच्या प्रयोगशाळेत हा विषाणू तयार करण्यात आला, असं एका बातमीत म्हटलं होतं, तर दुसर्या बातमीत कॅनाडातील एका प्रयोगशाळेत काही चिनी वैज्ञानिकांनी या विषाणूची गुप्तपणे निर्मिती केली असा दावा केला. महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेचा संचालक (माहिती, शिक्षण आणि संवाद) काम करत होतो, त्या वेळी महाराष्ट्रातील एका नामवंत पत्रकाराने एड्सचा विषाणू निर्माण करण्यात अमेरिकेने कळीची भूमिका निभावली, असं छातीठोकपणे सांगितलं होतं.
जीवाणू आणि विषाणू यातला फरक न कळणारे पत्रकार निव्वळ काही घटनांच्या आधारे (त्याला ते परिस्थितीजन्य पुरावा म्हणतात!) जैविक युद्धासाठी एड्स, इबोला, सार्स आणि आता करोना विषाणूंची निर्मिती करण्यात आली, असा दावा करत असतात.
करोना विषाणूच्या बाबतीत परिस्थिती अधिक चिघळलेली आहे. राजकीय नेते या विषयावर शेरेबाजी करू लागले आहेत. अमेरिकेचे सिनेटर टॉम कॉटन यांनी दावा केला की, करोना विषाणू प्रयोगशाळेत बनवण्यात आला आहे. या विषयावर त्यांनी ट्विटसची मालिकाच चालवली आणि ज्या कोणी जगावर हे संकट लादलं आहे, त्यांना आरोपीच्या पिंजर्यात उभं करायला हवं, अशा आशयाची मागणी करणारं ट्विट केलं. ते म्हणाले की, यासंबंधात पारदर्शकता गरजेची आहे. अखेरीस त्यांनी चीनवर आपला रोख असल्याचं स्पष्ट केलं. कॉटन यांच्या दाव्याला उत्तर देताना चीन सरकारने अमेरिकेवर आरोप केला. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिजान झाओ यांनी दावा केला की, अमेरिकन लष्करानेच करोना हा विषाणू बनवला आणि चीनमधील वुहान शहरात सोडला. करोना विषाणूचा संसर्ग झालेला अमेरिकेतील पहिला रुग्ण कोणता, केव्हा त्याला बाधा झाली, कोणत्या इस्पितळात त्याच्यावर उपचार झाले, हा सर्व डेटा अमेरिकेने जाहीर करावा, अशी मागणीही त्यांनी केली.
प्रा. फ्रान्सिस बॉईल या कायदेतज्ज्ञाचा लेख इंग्लडमधील ‘एक्सप्रेस’ या टॅब्लॉईडने १२ मार्च रोजी छापला. फ्रान्सिस बॉईल हे कायदेतज्ज्ञ जैविक अस्त्रांसंबंधीच्या विधेयकाचा मसुदा करण्यात सहभागी झाले होते. त्यांनी असा आरोप केला की, करोना विषाणू चिनी लष्करानेच निर्माण केला. मात्र ‘एक्सप्रेस’ या टॅब्लॉईडने सदर लेखाला जोडलेल्या दुरुस्तीत असं म्हटलं की, प्रा. बॉईल यांनी ज्या संशोधन निबंधाचा संदर्भ दिला आहे, त्या निबंधात कुठेही करोना विषाणूशी छेडछाड करण्यात आल्याचा उल्लेख नाही. म्हणजे ही दुरुस्ती जोडून ‘एक्सप्रेस’ने आपली मूठ सोडवून घेतली पण षडयंत्राचं पिल्लू सोडून दिलं. इराणचे माजी अध्यक्ष, अहमदिनेजेनाद यांनी तर संयुक्त राष्ट्राच्या महासचिवांना पत्र लिहून, करोना विषाणू प्रयोगशाळेत निर्माण करण्यात आला, असा थेट आरोप केला. त्यांचा रोख अर्थातच अमेरिकेवर होता.
काँग्रेसचे प्रवक्ते आणि खासदार, मनिष तिवारी यांनी कोणतीही शहानिशा न करता ‘लंडनच्या एक्सप्रेस’मधील प्रा. बॉईल यांचा लेख ट्विट करून प्रसारित केला. आपल्या ट्विटमध्ये मनिष तिवारी म्हणतात, करोना विषाणू हे जैविक अस्त्राने हाताबाहेर जाऊन धुमाकूळ घालावा अशीच योजना होती. हे दहशतवादी कृत्य आहे असा निर्वाळाही त्यांनी दिला. जैविक अस्त्रांचा नायनाट करण्यासाठी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने यासंबंधात कसून चौकशी करायला हवी, अशीही पुस्ती त्यांनी जोडली.
शेखर गुप्ता हे भारतातले नामवंत पत्रकार. ‘द इंडियन एक्सप्रेस’चे ते प्रमुख संपादक होते. सध्या ‘द प्रिंट’ नावाचं वेबपोर्टल ते पाहतात. ते लेख लिहितात, कॅमेर्यासमोर उभं राहून बडबड करतात, प्रणव रॉय यांच्यासोबत निवडणूक सर्वेक्षणात सहभागी होतात. मात्र त्यांनी कधीही सार्वजनिक आरोग्य या विषयावर वृत्तांकन केलेलं नाही. परंतु करोना विषाणूच्या वादात पडलो नाही, तर पत्रकार म्हणून कसं मिरवणार असा प्रश्न त्यांना छळत असावा. त्यांनी असा दावा केला की, चिनी लोकांना जंगली पशुंचं मांस खायला आवडतं. त्यातून करोना विषाणूचा फैलाव झाला.
करोना विषाणू जंगली पशूंमधून संक्रमित झाला का, या विषयावर संशोधन सुरू आहे. परंतु हे संशोधन अद्याप अपूर्ण आहे. या संबंधात ‘नेचर’ या विज्ञानविषयक नियतकालिकात एक लेख आला होता. सदर लेखात खवले मांजर (पँगोलिन) चीनमध्ये विशेष लोकप्रिय आहे. त्याच्या मांसातून या विषाणूचा संसर्ग झाल्याची शक्यता तपासली जात आहे असं म्हटलं होतं. माहितीच्या महाजालाच्या नळावर पाणी भरून शेखर गुप्तांनी घरात चुळा मारायला सुरुवात केली! वस्तुतः संशोधन पूर्ण झाल्याशिवाय, निष्कर्ष हाताशी आल्याशिवाय या प्रकारची शेरेबाजी करायची नसते, हा पत्रकारितेचा मूलभूत नियमही शेखर गुप्तांनी पाळला नाही. पत्रकारांची प्रसिद्धीची असोशी राजकारण्यांपेक्षा कमी नसते!
जैविक अस्त्रं नाहीतच का? आहेत. अमेरिका, इराक, रशिया यांनी जैविक अस्त्रं बनवली होती. त्यांचा साठा केला होता, ती वापरलीही होती. या जैविक अस्त्रांना प्रत्युत्तर देणार्या संशोधन संस्थाही स्थापन करण्यात आल्या. सेंटर फॉर डिसिस कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन, युएस डिपार्टमेंट ऑफ हेल्थ अँड ह्यूमन सर्विसेस, द नॅशनल बायोडिफेन्स अॅनालिसिस आणि काऊंटरमेजर्स सेंटर, यूएस फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन, अशा अनेक अमेरिकन आणि आंतरराष्ट्रीय संस्था जैविक अस्त्रांचा धोका, त्यावरील उपाययोजना यांवर संशोधन करत असतात. जागतिक आरोग्य संघटनाही त्यावर लक्ष ठेवून असते. यापैकी एकाही जबाबदार व मान्यवर संस्थेनं करोना विषाणू प्रयोगशाळेत निर्माण करण्यात आला, या दाव्याला कोणताही आधार दिलेला नाही.
करोना विषाणूच्या जगभर झालेल्या संसर्गामुळे आर्थिक क्षेत्रात प्रचंड उलथापालथ घडत आहे. जनजीवन विस्कळीत झालं आहे. अशा काळात या संकटाला कोणीतरी जबाबदार असणारच, त्यामागे षडयंत्र असणारच ही जनभावना आहे. कारण ‘परमेश्वर मेल्याचं’ नित्शेनं जाहीर करून अनेक वर्षं लोटली आहेत. परमेश्वर मेला असेल तर या सर्व उत्पाताला माणूसच जबाबदार असणार, कोणीतरी षडयंत्र रचलेलं असणार, असा विश्वास आपल्याला वाटू लागतो. माणूस सर्वशक्तिमान आहे, या धारणेतून ही भावना आणि घबराट निर्माण होते. राजकारणी आणि पत्रकार ही घबराट फक्त प्रक्षेपित करतात. सामान्य जनांएवढेच तेही अज्ञानी असतात!
.............................................................................................................................................
लेखक सुनील तांबे मुक्त पत्रकार आहेत.
suniltambe07@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment