‘दिठी’ : हा सिनेमा प्रचंड अस्वस्थ करून सोडणारा, सखोल आणि मनाला भावणारा असून त्यात जीवनविषयक व्यापक तत्त्वज्ञान सामावलं आहे.
कला-संस्कृती - मराठी सिनेमा
कबीर उषा लक्ष्मण बोबडे
  • ‘दिठी’चं पोस्टर आणि त्यातील एक प्रसंग
  • Sat , 14 March 2020
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti मराठी सिनेमा Marathi Movie आता आमोद सुनासि आले Aata Aamod Sunasi Aale दि. बा. मोकाशी D. B. Mokashi दिठी Dithee किशोर कदम kishor kadam शशांक शेंडे Shashank Shende अमृता सुभाष Amruta Subhash सुमित्रा भावे Sumitra Bhave

‘आमोद सुनासि आले हो, श्रुतीशी श्रवण निघाले हो’ हा अभंग हल्ली सारखा आठवत असतो. सुमित्रा भावेच्या सिनेमात हा अभंग आहे. त्यांचा ‘दिठी’ हा सिनेमा दोन वेळा पाहिला. पहिल्यांदा २०१९ मध्ये पिफमध्ये बघितला आणि दुसऱ्यांदा प्राच्य विद्या भांडारकर संशोधन केंद्रात. एक सात्त्विक, पारदर्शी कलाकृती असलेला हा सिनेमा प्रत्येकाच्या आयुष्यातील जीवन-मरण या गोष्टींवर आधारित असून एक आर्त अनुभव देऊन जातो.

दि. बा. मोकाशी यांच्या ‘आता आमोद सुनासि आले’ या विलक्षण कथेवर हा चित्रपट बेतलेला आहे. कथात्म आणि कलात्म काव्यानुभव व्यक्त करण्याची ताकद, दिग्दर्शकाची शैली ‘दिठी’तून अतिशय प्रभावीपणे व्यक्त झाली आहे. या कथेतील पात्रं, त्यांचं जीवन, सुखदुःखांचा कोलाज, त्यांना पडलेले प्रश्न यांचं तत्त्वचिंतनात्मक चित्रण म्हणजे ‘दिठी’! या सर्व प्रश्नांत सहज गुंफलेलं, विणलेलं तत्त्वज्ञान यांचं कमालीचं चित्रदर्शी वर्णन इतकं अफाट आहे की, आपल्या आत काहीतरी हलतं, डोकं सुन्न होतं... द्वैताकडून अद्वैताकडे, लौकिकतेकडून अलौकिकतेकडे प्रवास होतो.

एक आतून हलवून टाकणारा प्रसंग अजूनही मनातून जात नाही. तो असा - 

रात्रभर गाय गर्भारपणाच्या कळा सोसत राहते. पाऊस सारखा कोसळत राहतो, थांबायचं नाव घेत नाही. रामजीच्या डोळ्यातल्या दुःखाचा बांध फुटता फुटत नाही. ३०-३५ वर्षं पंढरीच्या विठ्ठलाची वारी करणारा रामजी तरुण पोरगा पाण्यात वाहून गेल्यावर गेल्यावर वेडापिसा झालेला... आणि विठ्ठलाला जाब विचारता विचारता मुळात विठ्ठल आहे का? आपल्या श्रद्धा आपल्याला साथ देत नाही, तेव्हा काय करायचं? त्याला श्रद्धा बेगडी वाटायला लागतात… शिवाय, आपण तरी खरेच आहोत का? हे सगळे प्रश्न त्याला पडतात. त्याच्या जीवाची तडफड होते. मुलाला आठवून आठवून वेडापिसा झालेला हा बाप सूनेला म्हणतो, ‘‘तुला मुलगा होईल आणि माझा मुलगा मला परत देशील असं वाटलं होतं, पण मुलगी झाली. आता तिचं रडणं नाही ऐकवत. जा तुम्ही दोघी. मसणात जा, नाहीतर कुठं बी जा.”

इतरांच्या सुख-दु:खाला आपल्या शब्दांनी फुंकर घालून धीर देणारा रामजी पोराच्या विरहात एकटा पडला होता... दुसऱ्यांना धीर देणाऱ्या रामजीला आता दुसऱ्यांच्या समजुतीची गरज होती आणि त्याच्या भोवतालची माणसं त्याचं दुःख आपलं करून घेऊ पाहतात, मात्र त्यांना त्याच्याशी तादात्म्य पावता येणं कठीण असतं. मग त्याला ते विठ्ठलाच्या पोथीवाचनात मन रमेल म्हणून घेऊन जातात; पण साक्षात विठ्ठल आहे की नाही, हा प्रश्न निर्माण झालेला असताना पोथी त्याला तोकडी वाटू लागते.

पण रामजीला गाईच्या पोटातलं वासरू बाहेर काढताना जगण्यातलं सौंदर्य, गमक समजत जातं. जगण्याची आस त्याला तगवते. त्याची जगण्याची आसक्ती पुन्हा जागी होते. श्रद्धेला तडे गेल्यावर श्रद्धास्थानाविषयी साशंक झालेला रामजी विठ्ठलाच्या अस्तित्वाला आव्हान देता देता त्याच्याशी लीन होतो, त्याच्या भक्तीत तल्लीन होतो! आणि दुसऱ्या दिवशी आपल्या सुनेला म्हणतो, “या तुझ्या म्हाताऱ्या लेकराला माफ कर”.  

कंदिलाच्या उजेडात विठ्ठलाची पोथी वाचणारी माणसं... सतत ऊर फोडून कोसळणारा पाऊस... अडकलेली गाभण गाय... काही माणसांचे अगतिक चेहरे... आणि गायीच्या डोळ्यांपेक्षा करुण दिसणारा अगतिक बाप! हे सगळं बेचैन करणारं आहे.

हा सिनेमा प्रचंड अस्वस्थ करून सोडणारा आहे. वरपांगी साधा वाटणारा हा चित्रपट सखोल आणि मनाला भावणारा असून त्यात जीवनविषयक व्यापक तत्त्वज्ञान सामावलं आहे. त्यामुळे या सिनेमात केवळ कलामूल्ये नाहीत, तर जीवनमूल्येदेखील आहेत. 

संथ पाऊस, शेतं, शिवारं, गावातली घरं, चिखल, घरातले मिणमिणते उजेड देणारे कंदील या गोष्टी कथावस्तूच्या भावना गडद करत राहतात. त्यामुळे या कथेत एक टोकाची भावना सतत जाणवत राहते. मिणमिणत्या प्रकाशात घडणारे प्रसंग आपल्याला त्यांच्यात ओढून मनात अस्वस्थता पेरतात. विशिष्ट छायाचित्रणामुळे प्रेक्षकांच्या अनुभूतीला गडद करण्याचं सामर्थ्य सुमित्रा भावे यांनी पेललं आहे. 

त्यांच्या या आधीच्या बहुतेक सिनेमाप्रमाणेच ‘दिठी’चं दुर्लक्ष न करता येण्यासारखं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा सिनेमा स्थळ-कालातीत असतो. रामजी लोहाराची ही वैश्विक गोष्ट म्हणजे, पूर्ण चित्रपटात संथ बरसणाऱ्या पावसासारखी संथ कविता आहे.  

द्वैत, जन्म-मृत्यु, श्रद्धा, सहानुभूती हा कथेच्या केंद्रस्थानी असलेला विषय  सुमित्रा भावेंनी अतिशय सहजतेनं हाताळला आहे. एखाद्या कथावस्तूचं मूळ भावे बरेच दिवस आपल्या जगण्यात मुरवून घेतात, त्यामुळे त्या कलाकृतीशी तादात्म्य पावतात. त्यामुळे त्यांचा सिनेमा प्रेक्षकानुनय करत नाही, तर प्रेक्षकाभिमुख असतो. प्रेक्षकांच्या सर्जनशीलतेला आवाहन देऊन त्यांना जगण्याचा व्यापक दृष्टीकोन देतो. त्यांच्या चित्रपटाच्या कथेत भावोत्कटता असते, मात्र बेगडी भावूकतेला थारा नसतो. त्यांच्या चित्रपटांमधला संघर्ष माणसाच्या मनातील द्वंद्व, मनाचे खेळ, घुसमट अशा प्रकारचा असतो. ‘दिठी’मध्येही अशीच घुसमट भावे यांनी मांडली आहे.

मानसिक - भावनिक संघर्ष हा सुमित्रा भावे यांच्या सिनेमाचा केवक गाभाच नाही, तर ती त्यांची शैली आहे. त्यांनी केवळ कथा सांगून न थांबता चिरंतन मानवी मूल्यं यांना कथेच्या केंद्रस्थानी ठेवून प्रेक्षकांना अमृतानुभवाचं तत्त्वज्ञान पाजलं आहे. भावनेचा एक उत्तम आविष्कार म्हणून हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनाची पकड घेतो. मानवी अंतर्मनाचा शोध घेणं ही सुमित्रा भावे यांनी लकब यातही दिसून येते.

किशोर कदम यांनी रामजीची भूमिका अविस्मरणीय केली आहे. त्यांच्या डोळ्यांत साचलेलं दुःख, यातना, हतबलता आणि अगतिकता मनाला अस्वस्थ करते. शशांक शेंडे यांच्या अभिनयातील सहजपणा भावतो. अमृता सुभाषदेखील आपली भूमिका जगली आहे. याशिवाय मोहन आगाशे, दिलीप प्रभावळकर, उत्तरा बावकर, गिरीश कुलकर्णी, अंजली पाटील, कैलाश वाघमारे असे दिग्गज कलावंत या चित्रपटात असून सगळ्यांचा अभिनय उत्तम आहे. 

धनंजय कुलकर्णी यांनी सुरुवातीपासूनचा संततधार पाऊस फारच उत्तम टिपला आहे. तो पाऊस, आणि गर्भार गाय पूर्ण सिनेमात वावरतात. चित्रपटाचं पार्श्वसंगीत कथेच्या वातावरणाला आणखी उठावदार बनवतं. संगीत आणि पार्श्वसंगीताचा अतिशय कल्पक पद्धतीनं केलेला वापर अप्रतिम आहे! सतत पडणाऱ्या रिपरिप पावसापासून ते गाईच्या हंबरण्याच्या आवाजापर्यंत, सर्व गोष्टींचं साऊंड एडिटिंगही उत्तम आहे. 

दिठी म्हणजे दृष्टी. दिठी म्हणजे नजर. असे या शब्दांचे अर्थ आहेत. चित्रपटात वारकरी रामजी यांच्या चष्म्याच्या डाव्या काचेवर एक तडा आहे. तो रामजीच्या जगण्याच्या दृष्टीकोनाला गेलेला तडा आहे, असं वाटतं. मुलगा पुरात वाहून गेल्यानंतर रामजीत जे काही बदल होतात, हे सूचित करण्यासाठी, त्याची तडा गेलेली नजर अधोरेखित करण्यासाठी हा चष्मा सातत्यानं चित्रपटात येतो. 

न कळलेला किंवा विसंगत संदर्भ

चित्रपटातील एका दृश्यात अमृता सुभाषला भास होतो की, प्रत्यक्ष शंकर-पार्वती तिच्या मदतीला, अडचण सोडवायला आले असून पार्वती एक मनकवडा अमृता सुभाषला देते. आणि तुला हवं ते माग, असं सांगते. 

पूर्ण चित्रपटाला वारकरी संप्रदायाची पार्श्वभूमी आहे. गावकरीदेखील विठ्ठलाशी नातं सांगतात, पोथी वाचतात. रामजीदेखील प्रत्येक आषाढी एकादशीला पंढरीला पांडुरंगाच्या दर्शनाला जातो. मग एकाच प्रसंगात शंकर-पार्वती अवतात. त्याऐवजी विठ्ठल-रुक्मिणी दाखवले असते, तर कथेला साजेसं झालं असतं.

‘आता आमोद सुनासि आले’ ते ‘दिठी’

चित्रपट माध्यम हे केवळ साहित्य कलाकृतीसारखं बुद्धिगम्य कलामाध्यम नसून दृक-श्राव्य माध्यम आहे, याची जाण आणि समज असल्यामुळे भावे यांना जे ऐकू येतं, जे दिसतं, त्या जे ऐकतात, त्याहीपेक्षा अधिक काहीतरी प्रेक्षकांच्या मनात त्यांचा चित्रपट भाव निर्माण करतो. केवळ इतकंच नाही, तर चित्रपट संपल्यानंतरही त्यातील घटना, पात्रं प्रेक्षकांच्या मनात रुंजी घालतात. ‘दिठी’ या सिनेमात ‘आता आमोद सुनासि आले’ या कथेचा गाभा तर जशाच्या तसा आला आहे. मूळ कथेत मुलगा वाहून गेल्यानंतर रामजीच्या वाट्याला येणार दुःख मांडलं आहे. मात्र ‘दिठी’त ‘सून’ हे पात्र आहे. हा बदल का करावसा वाटला असेल, या संदर्भात सुमित्रा भावे यांना विचारलं असता, त्या म्हणाल्या- ‘‘मूळ कथेत ‘सून’ हे पात्र नाही. कथेत मुलगा पुरात वाहून जातो, त्याचं दुःख बापाला होतं. त्याला त्यातून सावरता येत नाही. मग वाहून गेलेल्या मुलाला बायको असती, तर तिचा नवरा वाहून गेला, याचं दुःख रामजीच्या दु:खापेक्षाही मोठं असतं. मला बापाचं दुःख आणि बायकोचं (सुनेचं) दुःख या दोन्ही गोष्टी दाखवायच्या होत्या. त्यामुळे तो बदल केला.” 

कथा आणि सिनेमा यात खूप फरक आहे. मात्र कथेचं दृक-श्राव्य माध्यमांत रूपांतर करताना भावे यांनी थोडे बदल केलेत, मात्र मूळ कलाकृतीच्या आशयाला कुठंही नख लावलं नाही, ही जमेची बाजू आहे. 

मानसी जीवनात अनेक गोष्टींमुळे, अनेक कारणामुळे संघर्ष उभे राहतात. याला बऱ्याचदा मानवी मन कारणीभूत असते आणि मानवी मनाचा शोध घेताना जगण्याविषयीची जाण समृद्ध करून जीवनाकडे बघण्याची नवी दृष्टी सुमित्रा भावे यांनी दिली आहे. ललित साहित्याचं माध्यमांतर करताना दृक-श्राव्य कलाकृती प्रेक्षकांच्या अभिरुचीला समाधान देऊ शकेल, ही दिग्दर्शक म्हणून असणारी जबाबदारी सुमित्रा भावे यांनी समर्थपणे पेलली आहे. 

.............................................................................................................................................

लेखक कबीर उषा लक्ष्मण बोबडे दृक-श्राव्य माध्यमात काम करतात.

kabirbobade09@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख