अजूनकाही
निसर्ग-पर्यावरण पत्रकार आरती कुलकर्णी यांचा ‘समुद्राचं गाव’ हा कवितासंग्रह नुकताच ग्रंथालीतर्फे प्रकाशित झाला आहे. या संग्रहाला ‘चाणक्य मंडल’चे संचालक, वक्ते व लेखक अविनाश धर्माधिकारी यांनी लिहिलेली ही प्रस्तावना...
............................................................................................................................................................
बहुधा नुकतीच बारावी झालेली आरती १९९६ मध्ये म्हणजे स्थापनेच्या वर्षीच चाणक्य मंडल परिवारामध्ये आली. आमचा ‘फाउंडेशन’ नावाचा कोर्स करण्यासाठी. नावाप्रमाणेच ते जीवनाचं ‘फाऊंडेशन’ आहे. स्वतःला ओळख, त्यानुसार तुझं कामाचं-जगण्याचं क्षेत्र निवड आणि निवडलेल्या क्षेत्रात उत्तमता आणि प्रतिभा साध्य कर, हे त्या ‘फाऊंडेशन कोर्स’चं सूत्र आहे.
आरतीच्या मनात बहुधा स्पर्धा परीक्षांद्वारा करिअर करण्याचा विचार होता. पण यथावकाश तिला स्वतःची ओळख पटली आणि तिनं पत्रकारितेत करिअर करायचं ठरवलं. निसर्गाशी जशी आरतीची घनिष्ठ मैत्री बनत गेली, तशी तिची पत्रकारितासुद्धा पर्यावरण आणि निसर्गाशी एकरूप होत गेली. पर्यावरण पत्रकारितेबद्दल तिला रामनाथ गोएंका हा पत्रकारितेतला सर्वोच्च पुरस्कार दोनदा मिळाला आहे.
आरतीनं निसर्गाशी निगडित असलेलेच तीन अतिशय प्रतिभावंत असे माहितीपट बनवले. कोकणचा किनारा आणि त्याची कानात सतत घुमणारी गाज, महाराष्ट्रापासून कन्याकुमारीपर्यंत पसरलेला पश्चिम घाट, असं करत करत आरतीचा निसर्ग आणि पर्यावरणाचा शोध थेट नाईलपर्यंत पोचला. कलाकृती म्हणूनसुद्धा हा प्रत्येक माहितीपट उत्तम आहे. तितकीच उत्तम, आता आरती घेऊन येत असलेली ही कलाकृती आहे - तिचा कवितासंग्रह... ‘समु्द्राचं गाव’.
१९९६ पासून तिच्याशी जुळलेले ऋणानुबंध पुढं जास्त घनदाट होत गेले. वेळोवेळी संपर्क चालू राहिला. आरती तिच्या कविता सांगत-दाखवत राहिली. तंत्रज्ञानाच्या कृपेनं आलेल्या फेसबुक, व्हॉट्सॲप, ई-मेल यांनीसुद्धा संपर्काची नवनवी साधनं दिली आणि आमचा कवितारूपी संवाद निसर्गामध्ये खेळत खेळतच चालू राहिला.
आरतीची कविता ही निसर्गाची ‘आरती’ आहे. आरती आणि कविता निसर्गाशी एकरूप झाल्या आहेत, असं विलक्षण अद्वैत तिच्या कवितांमधून व्यक्त होतं. आरतीच्या कवितांमध्ये आहे सह्याद्री आणि हिमालय, इतकंच काय, आल्प्ससुद्धा आहे. तिच्या कवितांत समुद्र भेटतो, कोकणची किनारपट्टी भेटते; झाडं, ऋतू, फ्लेमिंगो, पाऊस, फुलपाखरं, चांदणं, अरण्यातली हरणं - इतकंच काय आरतीच्या कवितेत राधा-कृष्णसुद्धा निसर्गातच प्रकट होतात आणि आपलं नृत्य करतात.
आरतीच्या कविता एकामागून एक, भरभर वाचता येणं शक्य नाही. शांतपणे एकावेळी एक कविता वाचली पाहिजे. तिच्या निसर्गामध्ये भेटणाऱ्या विलक्षण स्तब्धतेमध्ये आपणही काही काळ दिला पाहिजे. आरतीची एकेक कविता ही शब्दांमधलं ‘पेंटिंग’ आहे. चित्रासमोरून जसं भर्रकन पुढं सरकायचं नसतं, तसं या कविताही पानं उलटत वाचायच्या नाहीत. चित्राकडं जसं पाहत राहिलं पाहिजे, चित्रातली एकेक रेष, त्यात चित्रकारानं भरलेला एकेक रंग आपण आपल्यामध्ये भरून घेतला पाहिजे; तशी आरतीची कविता वाचली पाहिजे.
आरतीच्या कवितांमध्ये तसा सार्वजनिक जीवनात आता दुर्मीळ असणारा निरागस भाव, एखाद्या बालकाची सततची उत्सुकता आपल्याला भेटत राहते. निसर्गाशी असलेल्या एकरूपतेमुळेच आरतीच्या कवितांना काळाचं बंधन नाही. ती कविता वाचतावाचता कवितेप्रमाणेच आपणही कालातीत होतो. काही ‘स्पेस-टाईम’चे संबंध आलेच तर ते ‘स्पेस-टाईम’च्या पलीकडं जाण्यासाठीच येतात. म्हणजेच रेहकुरीच्या अरण्यापासून, मालदीव, आल्प्स आणि पॅरिस नावाची नितांत सुंदर नगरीसुद्धा निसर्गरूपातच प्रकट होते.
या सर्व कविता वाचताना जंगलामधली विलक्षण शांतता अनुभवायला येते. निसर्गाच्या सान्निध्यात ऑक्सिजनचा पुरवठा जास्त होतो, म्हणून आपला मेंदू आणि सर्व अस्तित्व तरतरीत बनतं, तशा आरतीच्या कविता आहेत. विशेष गोष्ट ही की, सिमेंटच्या जंगलांनी बनलेल्या शहरांतसुद्धा आरतीला निसर्गच भेटतो. कवितांच्या क्षेत्रात एक ‘स्कूल’ अशी होऊन गेली की, जिनं शहरं ही मानवतेच्या अधोगतीचं प्रतीक मानलं; अस्तित्ववादासोबत दाटून आलेली निराशा आणि नकारात्मकता मांडायला ‘शहर’ या प्रतीकाचा वापर केला. आरतीच्या शहरामध्ये चंद्र, आकाश, समुद्र आहे. शहरसुद्धा स्वतःचं सौंदर्य घेऊन प्रकट होतं. कवितांच्या एका ‘स्कूल’मध्ये शहर म्हणजे विरोधाभास आणि विद्रुपता अशी दाखवली गेली. पण आरतीला तिच्या गावासारखाच शहरामध्येही समुद्र भेटत राहतो.
आज मात्र ते लालगडद प्रतिबिंब
मी माझ्यासकट
समुद्राच्या अंतरंगात बुडवलं आहे...
पुन्हा एकदा मी मुंबईच्या समुद्राची
अन मुंबईचा समुद्र माझा झाला आहे!
अशा रीतीनं जीवनाच्या सर्व यश-अपयश, सुख-दुःखं या उंचसखलतांना सामोरं जातानाही आरतीशी शहरही निसर्गसंवाद करतं आणि सांगतं –
म्हणूनच दूर कुठेतरी खाडीच्या टोकावरून
या शहरात रात्र बिचकत येते
आणि चंद्रानंही शोधलीय
फ्लायओव्हरच्या बाजूची
कोपऱ्यातली एक छोटी जागा...
शहर आपल्याच मस्तीत जगतं आहे
उशिरा आलेल्या रात्रीकडे
सकाळ उधार मागतं आहे!
कवितांच्या रूपातून आरतीनं केलेली ही निसर्गाची ‘आरती’ सर्वांनाच विलक्षण आणि प्रतिभाशाली शांतता देईल!
............................................................................................................................................................
‘समुद्राचं गाव’ या कवितासंग्रहाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5175/Samudrach-Gao
............................................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment