अजूनकाही
ज्येष्ठ पत्रकार-संपादक श्रीमंत माने यांचं ‘भक्ती-भीती-भास : फॅसिझमच्या छायेतील भारताचे दर्शन’ हे पुस्तक नुकतंच मनोविकास प्रकाशनातर्फे प्रकाशित झालं आहे. आजपर्यंत आपल्या देशापुढील विविध प्रश्नांचे विवेचन अनेकांनी अनेक प्रकारे केले आहे. परंतु त्या प्रश्नांचा विचार सामाजिक-राजकीय समालोचनाच्या पायावर क्वचितच झालेला दिसतो. तो श्रीमंत माने यांनी आपल्या ‘भक्ती-भीती-भास : फॅसिझमच्या छायेतील भारताचे दर्शन’ या पुस्तकात अत्यंत सखोलपणे मांडलेला आहे. या पार्श्वभूमीवर लेखनामागची भूमिका, दृष्टिकोन समजून घेण्यासाठी माने यांच्याशी साधलेला हा संवाद...
भारताचा आजचा कालखंड हा आपल्या संविधानकर्त्यांनी दूरदृष्टीने स्थापन केलेल्या लोकशाही प्रजासत्ताकाच्या संक्रमणाचा आहे. हे संक्रमण भविष्यात नेमकी कोणती दिशा घेईल? या प्रश्नाचं उत्तर आज नेमकेपणानं देता येत नसलं, तरी हा प्रश्न चिंता वाढवणारा आहे. त्या चिंतेतून आपण लोकशाही प्रजासत्ताकाकडून धर्माधिष्ठित राज्याकडे जात भारतीय शैलीतल्या फासीवादाला जन्म देणार की, पुन्हा प्रजासत्ताकाची वाट धरणार हे द्वंद्व विचारी मनात निर्माण झालं आहे. श्रीमंत माने यांनी नेमकेपणाने ते पकडत वर्तमानातील प्रश्नाचे अनेक सूक्ष्म तपशील या पुस्तकाद्वारे वाचकांसमोर मांडले आहेत. माने म्हणतात, ‘आज जे काही गंभीर प्रश्न आपल्या समोर आहेत, त्यांची थेट उत्तरे या मांडणीतून मिळतीलच असं नाही. परंतु कोणताही अभिनिवेश न बाळगता किमान काही प्रश्नांवर चर्चा व्हावी. लोकांनी त्या चर्चेतून त्यांचे निष्कर्ष काढावेत, हा या लेखनामागचा प्रामाणिक प्रयत्न आहे.'
.............................................................................................................................................
‘भक्ती-भीती-भास’ या पुस्तकाच्या माध्यमातून आपण अत्यंत गंभीर विषयाला हात घातला आहे. त्यामागची आपली भूमिका काय आहे?
श्रीमंत माने - देशात २०१४ मध्ये तीस वर्षांच्या खंडानंतर पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेवर आले. त्या बहुमतामुळे पुढच्या दोनेक वर्षांत सगळ्या घटनात्मक पदांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित व्यक्ती विराजमान झाल्या. भारतीय राज्यघटनेच्या, देशहिताच्या, समाजहिताच्या विरोधात कृती केल्याच्या आरोपाखाली अनेकदा बंदीचा सामना केलेल्या संघाचे हे सत्तेच्या केंद्रस्थानी येणे ऐतिहासिक आहे. यादरम्यान, संघाच्या संकल्पनेतील हिंदुराष्ट्राची चर्चा सुरू झाली. घरवापसी, गोरक्षा, झुंडीचे बळी अशा घटना घडू लागल्या. तेव्हा, हा फॅसिझम आहे, असा गलका झाला. म्हणून नेमका फासीवाद काय आहे, त्याची लक्षणे कोणती, राज्यघटनेतील धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वाला छेद देणारे त्यात काय आहे आणि समाजाच्या नेमक्या कोणत्या घटकांवर त्यामुळे अन्याय होणार आहे, याचा शोध घेण्याचा मी प्रयत्न केला.
त्याच्या जोडीला एक राष्ट्र म्हणून आपली सुरुवात कुठून व कशी झाली, हा नजीकच्या दीडशे-दोनशे वर्षांच्या इतिहासात राष्ट्रवादाच्या, समाजसुधारणेच्या कोणत्या प्रेरणा दडलेल्या आहेत, याचा विचार केला. या दोन्ही प्रकारच्या शोधात जे आढळले, ते या पुस्तकात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. एकूणच वर्तमानातल्या घटनांचा समाज व देशाची जडणघडण आणि राज्यघटनेच्या गाभ्याच्या अनुषंगाने अन्वयार्थ लावण्याचा हा प्रयत्न आहे.
खरं तर फासीवादाने अलीकडच्या काळात जगभर पुन्हा डोकं वर काढले आहे. सर्वांत मोठा लोकशाही देश म्हणून ओळख असलेला भारतही त्याला अपवाद राहिलेला नाही. याकडे एक पत्रकार, लेखक म्हणून तुम्ही कसे पाहता?
श्रीमंत माने - कडव्या उजव्या विचारांचे जगभरातले नेते नैसर्गिकरित्या एकत्र येताना दिसतात. मग तो भारत असो, अमेरिका, फ्रान्स असो की ब्राझील, कोरिया किंवा अन्य कोणते देश. अगदी मुसोलिनीचा इटली व हिटलरचा जर्मनीही जागतिक राजकारणात एकत्र होता. या अशा राजवटी त्यांच्या त्यांच्या देशात बहुसंख्याकांचे हित पाहणारी, अल्पसंख्याकांचे दमन करणारी, त्यातून विद्वेषाचे राजकारण करणारी धोरणे राबवतात. समाजातल्या दुबळ्या वर्गाच्या हितांकडे दुर्लक्ष होते. मानवी हक्कांबद्दल बेफिकिरी दाखवली जाते. विशिष्ट वर्गाला शत्रू घोषित करून त्याच्यावर झुंडी तुटून पडतात. लॉरेन्स ब्रिट यांनी सांगितलेली फॅसिझमची लक्षणे पुस्तकाच्या प्रस्तावनेत त्यासाठीच नमूद केलेली आहेत.
भारत हा जगातला सर्वांत मोठा लोकशाही देश तर आहेच, शिवाय हा धार्मिक, जातीय, भाषिक अशा सांस्कृतिक विविधतेचाही देश आहे. अगदी आहार-विहारापर्यंत आढळणारे हे वैविध्य भारतीय राज्यघटनेने एकत्र बांधले आहे. इतकेच नव्हे, तर आपल्या राज्यघटनेने व्यक्तीचे मानवी हक्क, अभिव्यक्ती स्वातंत्र्य याचा पुरस्कार केलेला आहे.
बहुसंख्याकवाद ही आपल्या देशातील सर्वांत मोठी समस्या आहे. फॅसिझम व धार्मिक उन्माद यांचा अत्यंत घातक संयोग हे मोठे संकट आहे. इतिहासाचे पुरेसे ज्ञान नसलेल्या, किंबहुना मोडतोड केलेला इतिहासच खरा मानणाऱ्या, फसव्या व विद्वेषी प्रचाराला बळी पडणाऱ्या झुंडींच्या लहरींवर सामान्यांचे जगणे अवलंबून असेल तर माणूस म्हणून त्यांच्या मूलभूत हक्कांची जपणूक दरवेळी होईलच असे नाही. शिवाय या झुंडी त्यांना न आवडणाऱ्या, ते ज्यांची भक्ती करतात त्या नेत्याला विरोध करणाऱ्यांवर टोळधाडीसारख्या तुटून पडतात. नेत्याला, त्याच्या राजकीय विचारांना विरोध हा देशद्रोह असल्याचे बिंबवण्याचा प्रयत्न होतो. लेखक, कवी, पत्रकार, कलाकार यांच्या वर्तुळात भीतीचे वातावरण तयार होते. बहुतेक वेळा अशा घटनांमधील तात्कालिक, नैमित्तिक कारणांचाच उहापोह होतो. तो उन्माद, विद्वेष, भर हे एक सुनियोजित षडयंत्र असते, याकडे आपले लक्षच नसते. भक्ती-भीती-भासमध्ये त्याकडे भारतीय संदर्भांनी थोडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.
सर्वसामान्य बहुसंख्याकांनाही लोकशाही समाजव्यवस्थेपेक्षा हुकूमशाही व्यवस्था यावी असं वाटत राहतं. हे जनमत लोकशाही उत्सव समजल्या जाणाऱ्या निवडणुकांमधूनही व्यक्त होताना दिसतं. याबद्दल काय सांगाल?
श्रीमंत माने - हुकूमशाही वरवर नेहमीच आकर्षक असते. जोवर तिचे चटके आपल्याला बसत नाहीत, तोवर ती तशीच असते. कारण हुकूमशाही राबवणारे सुप्रीम नेत्यांच्या मर्जीतले असतात. प्रजासत्ताक लोकशाहीत मात्र सामान्यांचे सामूहिक शहाणपण महत्त्वाचे असते. राजवटी स्थापन करणे, त्या बदलणे हा त्या सामूहिक शहाणपणाचा आविष्कार असतो. तो निवडणुकांमध्येही व्यक्त होताना दिसतो. ही फूटपट्टी प्रत्येक निवडणुकीला लागतेच असे नाही. पण बहुतेक वेळा सामान्य मतदार त्याच्या जीवनमरणाच्या, उपजीविकेच्या, जिव्हाळ्याच्या मुद्यांवर मत तयार करतो. हे खरे आहे की, भारतात अशा जनमताच्या या निर्मितीला धर्म व जातीचा एक जास्तीचा कंगोरा असतो. पण, प्रजासत्ताकाचा विचार सम्यक करायचा असतो हे नक्की.
मुळात भारतात प्रजासत्ताक लोकशाही कशी आली, रुजली यासंदर्भात जनसामान्यांमध्ये बऱ्यापैकी अज्ञान आहे. वेद, उपनिषद, श्रुतीस्मृती, बुद्ध-महावीराचा काळ अनुभवलेल्या, परकी आक्रमणांचा सामना केलेल्या आपल्या देशाने ब्रिटिशांनी १९३५ मध्ये प्रस्तावित केलेल्या इंडिया अॅक्टच्या रूपाने लोकशाहीचा स्वीकार कोणत्या परिस्थितीत केला हे समजावे यासाठी फैजपूर काँग्रेसवरचे प्रकरण पुस्तकात आहे. स्वातंत्र्यानंतर प्रजासत्ताक व्यवस्था स्वीकारण्याच्या वेळचे संदर्भ वापरले आहेत. मुळात आपण आज अनुभवतो तसा भारतीय समाज इतिहासात नव्हता. ब्रिटिश राजवट स्थिरावल्यानंतर प्रथम सामाजिक सुधारणा आल्या. शिक्षणाचा प्रसार होत असताना राजकीय भान आले. धर्म व जातींच्या हितरक्षणाचीही नवी मांडणी झाली. त्यातून स्वातंत्र्य चळवळ पुढे जात राहिली आणि एका टप्प्यावर जुनी व्यवस्था सोडून आपण नवी राजकीय व्यवस्था स्वीकारली. हे सारे तपशिलाने समजून सांगण्याचा प्रयत्न या पुस्तकात मी केला आहे.
वर्तमानातील समस्यांचे तपशील इतिहासातील घटनाक्रमात शोधताना आपण फासीवादाचा धोका कसा निर्माण होतो, हे या पुस्तकाद्वारे सांगता. पण आजच्या एकूण परिस्थितीत सामान्य वाचकाने तो समजून घेताना काय दृष्टिकोन बाळगला पाहिजे?
श्रीमंत माने - महाराष्ट्र-कर्नाटकमधल्या विचारवंतांच्या हत्या बारकाईने पाहिल्या तर या प्रश्नाचे उत्तर मिळते. डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, एम. एम. कलबुर्गी, गौरी लंकेश या प्रगतीशील विचार मांडणाऱ्यांच्या हत्या एका पाठोपाठ झाल्या. अशा घटना किंवा सत्तेवर, तिच्या जवळ असलेल्यांच्या कृती, सरकारची धोरणे, निर्णय, न्यारालयांचे निवाडे आदींचा अन्वयार्थ लावताना त्या त्या विषयाचा आपला इतिहासातला प्रवास, जागतिक संदर्भ माहीत नसतील तर वरवर चर्चा होते. फ्रिंज इलेमेंट म्हणून आपण काही संघटनांना किरकोळ ठरवतो. बऱ्याच वेळा अर्धवट माहितीमुळे संघर्षाची स्थिती उद्भवते. तलाक-परित्यक्ता स्त्रियांचे हक्क, गोरक्षा अशा विषयांबाबत हेच झाले. या साऱ्या विषयांचा थेट संदर्भ फॅसिझमशी आहे, हे बव्हंशी देशवासीयांच्या लक्षातच आले नाही. पुरस्कारवापसीसारख्या मोहिमांची खिल्ली उडवण्यात आपण धन्यता मानली. म्हणून या घटनांचे स्वातंत्र्यापूर्वीचे व नंतरचे संदर्भ काय आहेत, हे सांगण्याचा प्रयत्न मी केला आहे.
मुळात हे पुस्तक लोकांनी का वाचले पाहिजे? त्यातून वाचकांच्या हाती नेमकं काय लागेल?
श्रीमंत माने - एकतर ‘भक्ती-भीती-भास’ हे पुस्तक इतिहासाची संदर्भहीन उजळणी अजिबात नाही. तरुणाईच्या बळावर जागतिक महासत्ता बनू पाहणाऱ्या भारतात स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षांनंतरही बेरोजगारी, सर्वाधिक रोजगार देण्याची क्षमता असलेल्या शेतीपुढचे विविधांगी संकट, शेतकरी आत्महत्या, स्त्रिया व बालकांचे अनारोग्य या समस्या आपण समजतो, त्यापेक्षा कितीतरी अधिक गंभीर आहेत. दुष्काळाचा, अनारोग्याचा इतिहास त्यासाठी समजून घेण्याची गरज आहे. या समस्यांचा आकडेवारीसह वेध घेतानाच फॅसिझममध्ये अशा प्रश्नांकडे दुर्लक्ष का व कसे होते, हे मांडण्याचा प्रयत्न पुस्तकात केला आहे. मुळात आरोग्य, शिक्षण, रोजगार, उपजीविका असे प्रश्न सोडवण्यात यश आले नाही की, धर्माधर्मांमध्ये भांडणे लावण्याचे, विद्वेषाचे राजकारण केले जाते. धार्मिक व जातीय सौहार्द्र, सलोखा टिकला तरच देश प्रगती करू शकतो. पण याच कारणांनी हा देश मुळात टिकणारच नाही, अशी भाकिते वर्तवण्यात आली होती. समाजातल्या सामान्यांच्या जाणिवा सजग असल्या, विज्ञानवाद जोपासला, त्यातून चिकित्सक वृत्ती तयार झाली, राज्यकर्त्यांच्या प्रत्येक कृतीचे योग्य आकलन करता आले, भेदाभेदाच्या पलीकडे जाऊन भूमिका घेता आल्या, स्त्रिया-बालके-वृद्धांची काळजी घेतली गेली अन् अशा विचारशील वातावरणात प्रगल्भ जनमत तयार होत राहिले, तर देश आपोआप समृद्ध होतो. देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून खस्ता खाणाऱ्यांना, तसेच घटनाकारांना हेच अभिप्रेत होते.
.............................................................................................................................................
‘भक्ती-भीती-भास : फॅसिझमच्या छायेतील भारताचे दर्शन’ या पुस्तकाची प्रस्तावना वाचण्यासाठी क्लिक करा -
https://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/4041
.............................................................................................................................................
‘भक्ती-भीती-भास : फॅसिझमच्या छायेतील भारताचे दर्शन’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5171/Bhakti-Bhiti-Bhas
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment