व्हिएतनाममधील मित्राला सहज म्हणून पाहा, ‘‘करोना’मुळे जरा तीन-चार महिने नॉन व्हेजपासून दूर राहा.’ तो हसून म्हणेल, ‘‘करोना’ झाला तरी परवडेल, पण हे दूर राहणे नको.’
पडघम - सांस्कृतिक
जीवन तळेगावकर
  • प्रातिनिधिक चित्र
  • Tue , 10 March 2020
  • पडघम सांस्कृतिक खाद्यसंस्कृती व्हेज नॉन व्हेज करोना व्हायरस

‘अन्नाद् भवन्ति भूतानि’ या श्लोकातून प्राणिमात्रांसाठी अन्नाचे महत्त्व, हा संदर्भ ‘श्रीमद्भगवद्गीते’त आला आहे. त्यामागे पर्जन्य, यज्ञ, कर्म, ब्रह्म वगैरे सूक्ष्म विचार आहे. पण  सकृतदर्शनी विचार केला तर ज्या प्राणिमात्रांना शरीर आहे, त्यांचे वर्गीकरण चार प्रकारे सांगितले आहे- स्वेदज (घाणीतून उत्पन्न), अण्डज (अंड्यातून उत्पन्न), उद्भिज (भूमीतून उत्पन्न) आणि जरायुज (गर्भोत्पन्न). जरायुज मनुष्याने काय खावे, काय नाही याचेही वर्णन वेगवेगळ्या भूमिकांतून केले आहे. म्हणजे सात्त्विक, राजस, तामस इत्यादी. आजकाल स्पष्टपणे जगाच्या पाठीवर तामसाचे प्राबल्य वाढत असल्याचे दिसते. याचे थोडक्यात नेमके वर्णन ‘ज्ञानेश्वरी’च्या १८ व्या अध्यायात आले आहे- ‘आणि अपेयाचेनि पानें। अखाद्याचेनि भोजनें। स्वैरस्त्रीसंनिधानें। होय जें सुख॥’ (ओवी ८०६). नेमके हेच जगात सगळीकडे होताना दिसते.     

एखाद्या देशाचे खाद्यजीवन त्या देशाच्या सांस्कृतिक जडणघडणीतून अंगवळणी पडलेले असते. त्यामागे जसे भौगोलिक व ऐतिहासिक घटक असतात, तसेच आर्थिकही असतात. कामानिमित्त जगभर झालेल्या प्रवासातून मला हे घटक अगदी जवळून अनुभवता आले, त्यातील बारकावे यथावकाश ध्यानात आले.

जगाच्या पाठीवर सगळीकडेच भारतीय रेस्टॉरंट्स असतात, पण जेव्हा आपण कार्यालयीन कामासाठी जातो, तेव्हा प्रत्येक वेळी भारतीय रेस्टॉरंटमध्ये जाणे होतेच असे नाही. बऱ्याच वेळा ऑफिसातील कँटीनमध्येच दुपारचे जेवण घ्यावे लागते, बऱ्याच वेळा ते चुकते, कधी कस्टमर किंवा वेगवेगळ्या देशांतील सहकाऱ्यांसोबत त्यांच्या आवडीच्या रेस्टॉरंटमध्ये जाणे होते. जेव्हा मांसाहारी माणसे वेगवेगळ्या देशांतील पदार्थांचा चवीने आस्वाद घेत असतात, तेव्हा शाकाहारी माणूस सवयीने सॅलड आणि ऑलिव्ह ऑईल वगैरे खाऊन वेळ निभावून नेतो, पण या निमित्ताने त्याला जगातील खानपानाचे दर्शन होत राहते.

बहुधा सगळ्याच देशात समुद्रातील किंवा गोड्या पाण्यातील कोणताही जलचर खाण्यास वर्ज्य नसतो, पण दक्षिण आशिया आणि चीनमध्ये हे प्रकरण भयानक आहे. रेस्टॉरंटमध्ये काचेच्या मोठ्या मोठ्या पात्रांत पाणी ठेवून त्यात जलचर सोडले जातात. त्यांचे जिवंत प्रदर्शनच मांडले जाते. त्यात छोटे-मोठे मासे, शंख, शिंपले, ऑक्टोपस, कासव, कोळंबी, कलामारी, खेकडे, झिंगे, साप आणि कित्येक अनोळखी जलचर असतात. आपापल्या आवडीप्रमाणे प्रत्येकाने बोटाने दाखवलेला जलचर उचलून बकेटमध्ये टाकला जातो, त्याचे वजन होते आणि थोड्याच वेळात तो पदार्थ बनून ताटात भूक शमवण्यासाठी हजर असतो. मग ‘कसा मी माहीत नसलेला अनोळखी जीव निवडला’, याची चर्चा रंगत राहते. ‘साप घशातून कसा वळवळ करत गेला’ हेही ऐकवले जाते. मध्येच एखाद्याच्या सांगण्यावरून हिरव्या चटणीसारखी डिश आणली जाते. बहुधा ते ‘किडे’ असतात. त्यांच्या तिखटपणाचा मूळ पदार्थांसोबत तोंडी लावून आस्वाद घेतला जातो. हे चित्र थायलंड, हाँगकाँग, व्हिएतनाम, मलेशिया, इंडोनेशिया, सिंगापूर इथे दिसत राहते.  

चीनमध्ये एखाद्या विशेष प्रसंगी अॅलीगेटरदेखील भाजून खाल्ला जातो, व्हिएतनाममध्ये कुत्रा किंवा मांजर, इंडोनेशियामध्ये मोठी पाल, ऑस्ट्रेलियात कांगारू, स्वीडनमध्ये रेनडिअर, लॅटिन अमेरिकेत  कुत्र्याचा गर्भ, चीनमध्ये अबॉर्ट झालेला माणसाचा गर्भदेखील! मात्र ही सगळी सामान्य पर्यटकांसाठी स्थानिक मित्रांनी विश्वासातून दिलेली माहिती असते. अशा प्रसंगी केवळ स्थानिक लोकच पंगतीला असतात, हे पदार्थ सहसा पर्यटकांसाठी नसतात. चार पायांवर चालणारे सगळे प्राणी म्हणजे ‘व्हेज’ आणि दोन पायांवर चालणारे ‘नॉनव्हेज’ असे मानणारी ही संस्कृती!

भारतात बीफ मिळत नाही म्हणून दक्षिण आशियात जाणारे लोक पण खूप आहेत, कारण जवळजवळ काहीच खाण्यासाठी वर्ज्य नसते… अगदी किडे, मुंग्या आणि झुरळदेखील. मध्य पूर्वेत मात्र भारतीयांसारखाच मांसाहार होतो. त्यात बीफचे प्रमाण जास्त असते हा भाग निराळा, त्यात उंट, बकरी, मेंढी आणि कोंबडी तर आलीच. इजिप्तमध्येही असेच, पण सोबतीला हरियाणासारखा ‘शिशा’ (हुक्का) असतो, रंगीबेरंगी काचेच्या तावदानांतून सजलेला. सौदीमध्ये ‘शिशा’ आणि ‘अपेय’ वर्ज्य, दुबईला सगळे चालते, फक्त लायसन्स असावे लागते. तसेच आफ्रिकेत सगळा आहार भाजून किंवा व्यवस्थित शिजवून मसाल्यांमध्ये घोळवून ग्रहण केला जातो. टर्कीमध्ये सोबतीला स्थानिक गोड पदार्थ असतात, पण युरोपात मात्र एखाद्यावेळी दक्षिण आशिया आणि चीनप्रमाणे पाण्यात अर्धवट उकळून किंवा क्वचित कच्चे मांस खाल्ले जाते.

त्यामुळेच एखादा रोग पसरण्याची शक्यता वाढते. अशा वेळी प्राण्यांमधून होणाऱ्या विषाणू संक्रमणाची बाधा झाल्यास नवल नाही. मुंगीत प्रोटीन असतं म्हणून ‘लाल मुंग्यांची ब्रेड’ आताशा फिनलँड आणि स्वीडनमध्ये प्रसिद्ध होते आहे. त्यातल्या त्यात उत्कृष्ट मांसाहारी पदार्थ आणि त्यांच्या दर्जाबाबत खात्री फक्त जपान देऊ शकतं, असा दावा पट्टीचे मांसाहारी लोक करतात. जगाच्या पाठीवर जपानसारखे उच्च दर्जाचे मांसाहारी जेवण इतरत्र मिळत नाही, मात्र कामसूपणामुळे त्यांना स्वतःचे असे खासगी आयुष्य फार कमी असते. नवी पिढी आता कामाला अति-महत्त्व देत नसली तरी ती खूप वेळ काम करणे, मग उशिरापर्यंत बिअर पित बसणे आणि कधी कधी ‘ट्यूब’मध्येच झोपण्याचे व्यसन वागवत जगते आहे.

जिथे सगळे लोक मांसाहारी आहेत, अशा देशात मांसाहारी खाद्यपदार्थांच्या किमतीमागील अर्थशास्त्र कसे असते? म्हणजे ज्याला आपण चांगले मांस म्हणू - फिश, चिकन, रेड मीट वगैरे - ते महाग असल्यामुळे अति-सामान्यांना रोज परवडणारे नसते. मग साहजिक ते उंदीर, वटवाघूळ, साप, कृमी वगैरेंकडे वळतात. तसेच या अति-मांस सेवन करणाऱ्या देशांत झाले आहे आणि त्यांच्या या खानपान पद्धतीमुळे हे लोक प्रतिकूल युद्ध परिस्थितीत काहीही खाऊन जगू शकले, याचे मोठे ऐतिहासिक उदाहरण २० वर्षं चाललेल्या ‘व्हिएतनाम वॉर’चे आहे.

‘हो ची मिन्ह’मध्ये आजही ‘कू-ची टनल्स’ पाहिल्यावर २०० चौरस किमी क्षेत्रात भूमिगत होऊन लोक कसे राहिले असतील, जगले असतील याचे नवल वाटते. त्यांच्या लवचीक आहार पद्धतीला याचे श्रेय दिले पाहिजे. ‘महानायक’ या विश्वास पाटील यांच्या कादंबरीत बर्मामध्ये जपानी सैनिक निबिड अरण्यात पाऊस पडत असताना मिळेल ते खाऊन जगले, पण ‘आझाद हिंद’ फौजांच्या भारतीय सैनिकांचे खाद्यजीवनामुळे हाल झाल्याचा उल्लेख आहे.

इटलीसारख्या देशात एखाद्यावेळी तुमच्या सोबत्यास ‘स्पेशल डिश’ हवी असते, मग तो वेटरला बोलावून काय हवे ते सांगतो. तो एका काचेच्या सुंदर पारदर्शक भांड्यात ‘जिवंत ऑक्टोपस’ घेऊन येतो आणि ‘हा चालेल का?’, असे आदबीने विचारतो. होकार मिळाला की, थोड्याच वेळात सलाड, अर्धे कापलेले लिंबू वगैरेंनी ‘गार्निश’ केलेला ऑक्टोपस पुढ्यात ठेवून ‘Bon Appetit’ असे म्हणून वेटर जातो.

हे जर दक्षिण आशियामध्ये झाले तर ग्राहकाला कच्चा ‘ऑक्टोपस’ फोर्कने लगेच तोडून टेस्ट करण्याचा मोह आवरता येईलच याची खात्री देता येत नाही. अशा वेळी आपणही उगाच किळसवाणे वाटून घ्यायचे नसते. फ्रान्समध्ये असाल तर जेवणासोबत रेड किंवा व्हाईट वाईन घेणारा साथीदार असतो. अगदी नियम असा नसला तरी, ‘व्हाईट मीट’सोबत ‘व्हाईट वाईन’ आणि ‘रेड मीट’सोबत ‘रेड वाईन’ असा अलिखित संकेत असतो. त्याला साथ करणाऱ्याने त्याच्या डोळ्यात पाहून ‘चिअर्स’ म्हणायचे असते आणि एक घोट घेऊन ग्लास खाली ठेवायचा असतो, डोळ्यात न पाहता अंगचोरपणा केला तर समोरच्या व्यक्तीवर अविश्वास दाखवल्यासारखे होते.

फ्रान्स आणि स्पेन वगैरे ठिकाणी उगाच दुपारच्या जेवणाच्या वेळी आपल्याला एकट्यालाच काम आहे, हे भासवायचे नसते. दुपारचे जेवण दोन-तीन तास चालू शकते. स्पेनमध्ये दोन तासांच्या जेवणानंतर एखादा तास वामकुक्षी (‘सिअस्ता’) घेतली जाते. ही दुपारच्या जेवणानंतरची ‘वामकुक्षी’ (Power nap) अमेरिकेत काही ठिकाणी आणि चीनमध्ये बऱ्याच ठिकाणी दिसते. या कंपन्यांच्या भारतातील ऑफिसात पण ही प्रॅक्टिस त्या त्या देशांच्या नागरिकांसाठी चालते. त्यांचे पाहून एखादा भारतीय झोपला तर ते मात्र व्यवस्थापकांना चालत नाही. ‘हे तुमच्या संस्कृतीत नाही’, असे कर्णकटू बोल ऐकायला येतात. अशा लोकांनी पुरणपोळीचे किंवा आमरसाचे जेवण झाल्यावर दुपारी ‘ताणून देणारे’ भारतीय लोक पाहिलेले नसतात!

दक्षिण आशियात दुपारचे १२ वाजले की, लोक ‘अलार्म’ वाजल्यासारखे जेवायला जातात आणि एका तासात परत येतात. बहुधा कोणी घरून डबे वगैरे आणण्याच्या भानगडीत पडत नाही, कारण या देशांत ७० टक्क्यांच्या वर महिला काम करतात. त्याही लवकर घर सोडतात. त्यामुळे आठवड्यातून पाच दिवस नैमित्तिक तीन जेवणं बाहेर ठरलेली असतात आणि त्यांची वाट पाहणारे दुकानदार अगदी जे पाहिजे ते बनवून तयार ठेवतात. ऑफिसच्या बाहेर ‘हॉकर्स’ची रेलचेल असते.

चीनमध्ये ग्राहकासोबत महत्त्वाची ‘डील’ साइन करण्यासाठी डिनरला जाताना पूर्ण रात्र घालवायची तयारी ठेवून जावे लागते. चीनी ग्राहक बेधुंद होईपर्यंत पेगवर पेग चढवत असतात आणि त्यांना तुमची शेवटपर्यंत साथ हवी असते. मध्येच बैठकीतून उठून जाणे सभ्य मानले जात नाही. तेव्हा अशा बैठकांसाठी आपणही आपल्या बाजूचा तरबेज खेळाडू निवडायचा असतो. त्यालाच ‘बॉस’ बनवायचे असते. बहुधा ‘डिफेन्स’ पार्श्वभूमी असलेला मित्र यात तरबेज असतो. इतका की, तो सुगंधावरून (अरोमा) (अ)पेय कोणत्या देशाचे, किती वर्षं जुने वगैरे सांगू शकतो. त्यांचा सुखसंवाद चाललेला असताना आपण कुठे मोकळा पांढरा भात (एग, चिकन, बीफचे तुकडे न टाकलेला) किंवा सलाड किंवा ओळखीचा ब्रेड तरी मिळतो का, हे शोधायचे असते. हाँगकाँगमध्ये असेच टेबलावर इतके पदार्थ वाढलेले असतात, पण त्यातील एक शाकाहारी असेल तर खरे!               

युरोपात कोणत्या हातात चमचा, कोणत्या काटा आणि चॉप्सस्टिक्स वगैरे कसे वापरायचे, जेवण झाल्यावर ऑर्डर द्यायची नसेल तर काटा चमचा ‘क्रॉस’मध्ये ठेवायचा, यासारखे निरर्थक नियम पाळत बसावे लागते, पण ते त्या संस्कृतीचा भाग आहेत, ते न पाळणाऱ्यास सभ्य समजले जात नाही. इंग्लंड याबाबतीत काटेकोर आहे, अगदी ब्लॅक डिनर सूट, व्हाईट शर्ट आणि ‘बो’ नसला तर रेस्टॉरंटमध्ये प्रवेशही नाकारला जाऊ शकतो.

एखादवेळी आपण मोठ्या मिटिंग्जमध्ये पूर्वकल्पना देऊनही शाकाहारी माणसाकडे जाणता दुर्लक्ष केले जाते, कारण एका माणसासाठी त्रास करून घ्यायला ‘शेफ’ तयार नसतो. साऊथ कोरियामध्ये मोठ्या शंखामध्ये नॉनव्हेज जेवण येतं किंवा फिनलंडमध्ये मुलाखतीत दोघांसाठी छान दिसणारं सँडविच येतं, पण ते चिवडताच डोळे काढून आपल्याकडे पाहणारे ‘श्रिम्पस’ दिसतात. अशा वेळी आपण ‘भूक नाही’ म्हणून टाळायचे असते, तर कधी भूक लागल्यामुळे हट्ट पुरवून घ्यायचा असतो, तेव्हा पूर्ण तयारीनिशी वाद घालायचा असतो. मग नाराजीने स्वीडनमध्ये आपल्यापुढे उकडलेले बटाटे आपटले जातात किंवा ‘एग वा सी फूड’ व्हेज असतं, हे आपल्याला पटवून देण्याचा प्रयत्न होतो. आपण अडून पडलो की, मग ‘दूध किंवा दही बरं चालतं तुम्हाला?, ते पण तर गाईंपासून येतं’, असा कुत्सित प्रश्न केला जातो. आपणही पूर्ण तयारीनिशी ‘व्हेजिटेरियन’मध्ये काही प्रकार असतात- ‘ओव्हो’ म्हणजे अंडी चालणारे, ‘लॅक्टो’ म्हणजे दुग्धजन्य पदार्थ चालणारे, असे सांगून आपले ज्ञान पाजळायचे असते!

आता तरी लोकांना ‘व्हेज’ वा ‘वेगन’ म्हणजे काय हे बऱ्यापैकी लक्षात येते, पण दीड दशकापूर्वी असे नव्हते. स्वित्झर्लंडमध्ये ‘व्हेज सँडविच’ मागण्यासाठी एका स्टोअरमध्ये १० मिनिटांचा संवाद साधावा लागला. काय म्हणजे ‘व्हेज’ हे सांगण्यापेक्षा काय नको ते सांगणं सोपं गेलं… ‘नो मीट, नो फिश, नो चिकन, नो बीफ, नो एग’ तत्सम… यात ‘नेति नेति’चा पुरेपूर प्रत्यय आला. या १० मिनिटांच्या संवादानंतर तिनं हवं ते ‘व्हेज सँडविच’ बनवून दिलं, तेव्हा दयार्द्र दृष्टीकोनातून विचारलं देखील- ‘How do you live?’

साऊथ आफ्रिकेत आपण ‘बीफ’ खात नाही म्हटल्यावर एका मोठ्या सुखाला पारखे झालो, असा भाव ठेवून कार्यालयीन मित्र दयार्द्र दृष्टीने पाहतात. ग्रीकांना फ्रेश फ्राईड सी फिश आणि त्यावर फ्रेश ऑलिव्ह ऑइल आणि सोबत बिअर वा नंतर कॉफी यासारखं दुसरं सुख काही आहे, असे वाटत नाही. व्हिएतनाममधील मित्राला सहज म्हणून पाहा, या ‘करोना’मुळे जरा तीन-चार महिने नॉन व्हेजपासून दूर राहा ना, तर हसून तो म्हणेल, ‘मी तीन-चार ताससुद्धा राहू शकत नाही. तू महिन्यांची काय गोष्ट करतोस? ‘करोना’ झाला तरी परवडेल पण हे दूर राहणे नको.’ आपलं खाद्य आपल्या जगण्याचा भाग झालेलं असतं; आपल्याला जे ‘असभ्य’ वाटतं, ते दुसऱ्या संस्कृतीत ‘सभ्य’ असू शकतं.

एखाद्या शाकाहारी माणसाने भारतात आपल्याला ‘मॅकडोनाल्ड’मध्ये ‘व्हेज बर्गर’ मिळतं म्हणून बाहेरच्या देशात ते शोधलं, तर त्याच्या पदरी निराशाच येते. तिथे बहुधा ‘व्हेज’ नावाचा एकही पदार्थ ‘मेन्यू’मध्ये सापडत नाही. स्वित्झर्लंडसारखा एखादा देश अपवाद समजावा. आता इटलीमध्ये ‘पिझ्झा’ आणि ‘पास्ता’ सगळीकडे मिळतो, पण त्याला इंडियन ‘पिझ्झा’ आणि ‘पास्ता’ची चव नसते. कारण तिथे आपले मसाले नसतात, ते खरे ‘ऑथेंटिक इटालियन फूड’.

भारतात ‘मला चायनीज खूप आवडते’ म्हणणाऱ्यांनी खरंच चायनामध्ये जाऊन ‘ऑथेंटिक चायनीज’ खाऊन दाखवावे. त्यांना ते घशाखाली उतरणारच नाही. छोट्या कपातून वेगवेगळ्या फ्लेवरचा चहा मात्र हवा तेवढा आपण चीनमध्ये पिऊ शकतो. त्यामुळे वजन वाढत नाही आणि पचन चांगले होते, असे मानले जाते. एकदा मी ‘आता नको’ म्हणून चहा लवकर पिऊन टाकला, पण कप लगेच भरला जाऊ लागला. शेवटी मी सांगितले ‘मला बस्स’, तर माझा मित्र म्हणाला, ‘हा अपमान समजला जातो. तुला नको असेल तर कप रिकामा करू नको. थोडा चहा ठेव त्यात, म्हणजे ते पुन्हा ओतणार नाहीत.’ असे कित्येक खानपानासंबंधीचे बारकावे हळूहळू उलगडत जातात.

वेगवेगळ्या देशाच्या खानपानाच्या पद्धती समजून घेऊन, त्याचा ‘ऑथेंटिक’ रूपात आस्वाद घेणारे लोक खूप आहेत. ते ‘थाई’, ‘चायनीज’, ‘इटालियन’ वा ‘जपनीज’ फूड कसे खावे त्याबद्दल वेळोवेळी मार्गदर्शन करत राहतात. असे लोक भारतीयांना विचारतात, ‘तुमचे एक कळत नाही, ज्या देशात जाता तिथे आधी ‘भारतीय रेस्टॉरंट’ का शोधत असता? लोकल ऑथेंटिक फूड का नाही खात?’ त्यांना कमीत कमी वर्षभर भारतात राहिल्याशिवाय भारतीय खानपानाचे महत्त्व पटवून देणे व्यर्थ असते.

अजून तरी भारतात ‘नॉनव्हेज’ ही ‘पूरक डिश’ असते. त्यासोबत खवय्ये रोटी किंवा भात खातात. बाहेरच्या देशात असे नसते. बहुधा वेगवेगळे मांसाहारी पदार्थच ‘मेन कोर्स’ असतात. वेगवेगळ्या देशांत फिरताना आपण अनुभवसमृद्ध होत असतो. कधी दोन बोटांनी टेबलावर ‘Kneeling’ करणारा साऊथ कोरियन वेटर असतो, तर कधी अमेरिकेत त्याचा जन्मसिद्ध हक्क म्हणजे ‘टीप’ आवेशात मागणारा वेटर असतो, कधी गिऱ्हाईकांसोबत फोटो काढणाऱ्या नॉर्थ कोरियन रेस्टॉरंटमधील मुली असतात, कधी ग्रीक रेस्टॉरंटमध्ये गाण्यानंतर मजा म्हणून पायांवर कडाकड प्लेट्स फोडणारे ‘स्टंटमेन’, तुम्ही डिनरला एकटे जरी असला तरी आपले काम करणे भाग म्हणून तासभर गाणारी व्हिएतनामी गायिका असते, तर कधी साऊथ आफ्रिकेत चेहऱ्यावरून तुम्ही भारतीय आहात, हे जाणून राज कपूरच्या सिनेमातील जुने गाणे वाजवणारा ‘मूळ नेदरलँड’चा पण आफ्रिकेचा झालेला गौरवर्णीय ‘पिअनिस्ट’!

बऱ्याच देशात भाजीपाला आणि फळे मात्र अगदी ताजी असतात, हे निर्विवाद. भारतात अन्नभेसळ ‘आम बात’ आहे, तसेच कृत्रिम पद्धतीने पिकलेली फळे, हानिकारक रसायने वापरून हे सगळं केलं जातं आणि यातील दोषींवर अगदीच नाममात्र कारवाई होते किंवा तीही होत नाही. आपण लोकांच्या जीवाशी खेळतोय हेही ध्यानी येत नाही. या कामी असलेल्या यंत्रणेचे मूल्यमापन ढिलाईने होते. त्यामुळे भारतात ‘कॅन्सर’चे प्रमाण वाढत चालले आहे. आत्ताच वाचले की, प्रत्येक सहा माणसामागे भारतात एकाला भविष्यात ‘कॅन्सर’ हॊईल, त्यांचा काहीही दोष नसताना!

आता या भेसळीविरुद्ध मोठी मोहीम उघडावी लागणार आहे आणि सक्त कारवाई करावी लागणार आहे. आपल्याला माहीत असेल की, https://www.fssai.gov.in याद्वारे आपण तक्रार नोंदवू शकता, पण ही तक्रार निवारण यंत्रणा अगदीच जुजबी आणि या तंत्रज्ञानयुगात न शोभणारी, थोडक्यात मागास आहे. तुम्ही केलेल्या तक्रारीचा क्रमांकदेखील मिळत नाही साधा, तिथे निवारण होण्याची आशा बाळगणे व्यर्थ आहे. हे बदलले पाहिजे नक्की. त्यासाठी सगळ्यांनी https://www.pmindia.gov.in/en/ या संकेतस्थळावर जाऊन तक्रार नोंदवणे आवश्यक आहे. आजच्या घडीला ही एकच ‘तक्रार निवारण यंत्रणा’ जबाबदारीने काम करते आहे.                                                                           

 .............................................................................................................................................

लेखक जीवन तळेगावकर हे माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील दिल्लीस्थित कंपनीत मोठ्या हुद्द्यावर काम करतात.

jeevan.talegaonkar@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......