पहिल्या महायुद्धाचा भडका उडायला कारणीभूत झाली, ती ऑस्ट्रियाचा युवराज आर्च ड्युक फ्रांझ फर्डिनांड आणि त्याची पत्नी सोफी शोटेक यांची हत्या
सदर - पहिले महायुद्ध... १०० वर्षांनंतर
आदित्य कोरडे
  • ऑस्ट्रियाचा युवराज आर्च ड्युक फ्रांझ फर्डिनांड आणि त्याची पत्नी सोफी शोटेक यांच्या हत्येचं एक पेंटिंग... विकीपीडिया व हिस्ट्री डॉट कॉमवरून साभार
  • Tue , 10 March 2020
  • सदर पहिले महायुद्ध... १०० वर्षांनंतर पहिले महायुद्ध First World War आर्च ड्युक फ्रांझ फर्डिनांड Archduke Franz Ferdinand

गेल्या आठ भागांत आपण पहिल्या महायुद्धाला कारणीभूत ठरलेल्या युरोपातील राजकीय परिस्थिती आणि सत्तासमतोल वा सत्ता असमतोल यांचा धावता आढावा घेतला. सर्वसाधारणपणे इतिहासकार आर्च-ड्युक फ्रांझ फर्डिनांड याच्या खुनापासून पहिल्या महायुद्धाची कहाणी सुरू करतात आणि तिथे आता आपण येऊन पोहोचलो आहोत.

१९व्या शतकात युरोपात बऱ्याच घडामोडी, उलथापालथी घडत होत्या, पण त्याची दखल मात्र फारशी घेतली जात नव्हती. औद्योगिक क्रांतीनंतर युरोपात कामगार वर्ग - मध्यमवर्ग उदयाला आला आणि झपाट्याने फोफावला. विशेष म्हणजे हा वर्ग चरितार्थाकरता म्हणून का होईना, पण शिकलेला आणि मुख्य म्हणजे इतर शेतकरी, शेतमजूर वर्गाप्रमाणे जमिनीशी बांधलेला न राहता कामाच्या शोधात देशांतर करणारा होता. शिक्षणाचा आणखी एक परिणाम (साईड इफ्फेक्ट म्हणा हवं तर) म्हणजे या वर्गात वैचारिक चळवळी मूळ धरू लागल्या.

फ्रेंच राज्यक्रांतीनंतर जनता फक्त निष्क्रिय पार्श्वभूमी/ मूकदर्शक न राहता सक्रीय घटक बनू लागली. राजेशाह्या, सामंतवाद यांना या नवीनच सक्रीय झालेल्या घटकाशी जुळवून घेत पुढचे डावपेच आखावे लागणार होते. त्यामुळे राजा, देवधर्म यांच्यासाठी बलिदान करण्याच्या भावनाप्रधान आव्हानाला देश, देशप्रेम, देशभक्ती, राष्ट्रभक्ती यांची खमंग फोडणी दिली गेली. राष्ट्रवादाचा उगम आणि त्याची १९व्या (आणि विसाव्याही) शतकातली उत्क्रांती याचीच साक्ष देतात. वरकरणी राजाला नामधारी केलेलं आहे आणि राज्यशकट हाकण्यात जनतेला काही अधिकार दिले गेले आहेत, असे दाखवून काही काळ तरी या नव्या घटकाला काबूत ठेवण्याचे प्रयत्न केले गेले. त्याला मर्यादित यशही मिळाले. पण सर्वसामान्य जनतेतून वर आलेल्या अनेक विचारवंतांना यातला फोलपणा कळत होता. मार्क्स-एंगल्स, रोझा लग्झेम्बर्ग, लेनिन असे अनेक लोक राष्ट्र व राष्ट्रवाद या फोल आणि भ्रामक संकल्पना असून त्या एकजूट होऊ पाहणाऱ्या शेतकरी-कामगार वर्गात फुट पाडून त्यांचे शोषण करण्यासाठी, त्यांना गुलाम बनवण्यासाठी वापरल्या जातात, अशा प्रकारची मते मांडू लागले होते.

या नव-मध्यमवर्गाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तो राजकारण, अर्थव्यवस्था, शासनाची धोरणे या बाबत कमालीचा जागरूक होता. शिवाय नव्याने उदयाला आलेल्या शहरांमध्ये, औद्योगिक वसाहतींमध्ये एकत्र झालेला होता. शिक्षण, पुस्तक, पत्र, प्रवास, निरनिराळी संमेलने आणि मंडळे, बातम्या  अशा निरनिराळ्या मार्गाने तो सांधला गेलेला होता.

ही परिस्थिती विचारमंथन आणि वैचारिक प्रबोधनाला अत्यंत पोषक ठरत होती. हा वर्ग मोठ्या प्रमाणात ग्राहकही असल्याने नवअर्थव्यवस्थेचा कणा बनत चालला होता. १७व्या-१८व्या शतकात साम्राज्यवादी सत्ता वसाहतीतून मसाले, कापडचोपड, चहा, जडजवाहीर, रेशीम असल्या चैनीच्या वस्तू आणत. त्या प्रामुख्याने अल्पसंख्य असलेल्या श्रीमंत, धनिक, जमीनदार, सरंजामदार, राजे-उमराव यांच्यासाठीच असत. म्हणजे आंतरारष्ट्रीय व्यापार कितीही फायद्याचा असला तरी त्याचा मुख्य घटक जो ग्राहक तो या संभ्रांत वर्गातून येत असल्याने त्यांच्या इच्छा, मर्जी याचीच कदर व्हायची. पण औद्योगिक क्रांतीनंतर या व्यापाराचे किंवा व्यवहाराचे स्वरूप अमूलाग्र बदलले. कच्चा माल वसाहतीतून आणून त्यावर प्रक्रिया करून तो विकणे अधिक किफायतशीर होते, पण त्याकरता मध्यमवर्गाची, त्यांच्या क्रयशक्तीची गरज होती. त्यामुळे नव्याने उदयाला आलेल्या भांडवलदार वर्गाला त्याची दखल घेणे भाग होते. 

औद्योगिक क्रांतीनंतर धर्माची सर्वसामान्य लोकांवरची, त्यांच्या जीवनावरची पकड जसजशी ढिली होऊ लागली, तसतसे प्रबोधनाचे एक पर्व युरोपात सुरू झाले. १९व्या शतकाचा इतिहास पाहिल्यास हे आपल्याला सहज जाणवते. नवनवे वाद (isms), क्रांत्या, चळवळी, सामाजिक प्रयोग यांनी १९व्या शतकाचा युरोप ढवळून निघालेला दिसतो. यातला सगळ्यात प्रभावी वाद म्हणजे राष्ट्रवाद. औद्योगिक क्रांतीनंतर झालेल्या प्रगतीचे एक फलित म्हणजे तिने वसाहतवादाला, साम्राज्यवादाला, सरंजामशाहीला दिलेले बळ.

युरोप बाहेरच्या उर्वरित जगाला (म्हणजे अमेरिका सोडून, आशिया आणि आफ्रिका प्रामुख्याने) आपल्या दावणीला बांधून, गुलाम बनवून त्यापासून मिळणाऱ्या ऊर्जेवर युरोपची उच्च(!) मानवी संस्कृती बहरत होती. कला, साहित्य, समाजकारण, राजकारण, संशोधन अशा निरनिराळ्या विषयांत नेत्रदीपक प्रगती होत होती. उच्चतर अशा मानवी संस्कृतीने युरोपात चांगलेच बाळसे धरले होते, पण अर्थात तिथेही दैन्य, उपासमारी, बेकारी, बकाली होतीच. शेतकरी–शेतमजूर यांच्या बरोबर नव्यानेच उदयाला आलेल्या कामगार वर्गाचे जीवन हलाखीचे होते. त्यांना रोजी १६-१६ तास काम करावे लागत होते आणि तरी पगार तुटपुंजा मिळत असे... कामगारांचे हक्क वगैरे गोष्टी प्रत्यक्षात यायला अजून बराच काळ जायचा होता. कामगार स्त्रिया आणि मजुरी करणाऱ्या लहान मुलांचा प्रश्न अजूनच जटील होता.

कामगार चळवळी हळूहळू का होईना, पण निश्चित आकार घेऊ लागल्या होत्या. त्यांच्या मागण्यांना हळूहळू धोरणात्मक स्वरूप येत चालले होते. भांडवलदार मालक-कारखानदारांना अर्थातच हा फार तापदायक प्रकार वाटत होता आणि ते कोणत्या मार्गाने कामगार लढा दाबून टाकता येईल याच्या विचारात होते.

जॉन जॉरेस हा त्या सुमारास फ्रान्समधला मोठ्या वकुबाचा कामगार नेता. (इथे हे स्पष्ट केले पाहिजे की, हे फ्रेंच किंवा जर्मन उच्च्चार इंग्लिशप्रमाणे नसल्याने जसे आपण त्यांचे स्पेलिंग वाचतो, तसे ते उच्चारात नाहीत. उदा., जॉन जॉरेस शब्द किंवा नाव, फ्रेंच लोक त्याचा उच्चार ज्यां जॉरे असा करतात.) तो गेले काही दिवस मोठ्या काळजीत होता. युरोपातले बडे कारखानदार आणि अनेक राजकारणी कामगारांचा लढा दाबून टाकण्याचा एक सोपा आणि प्रभावी उपाय म्हणून आता उघड उघड युद्ध सुरू केले पाहिजे असे बोलू लागले होते. राष्ट्राराष्ट्रातली स्पर्धा आणि परस्परांना शह-कटशह देण्यासाठीचे गुप्त/उघड करारमदार यामुळे अभावितपणे सगळी युरोपियन राष्ट्रे शस्त्रसाठा करू लागली. पण १८७० नंतर म्हणजे जवळपास ४४ वर्षे युरोपच्या मुख्य भूमीवर युद्ध झालेच नव्हते. युरोपातल्या बहुतांश राष्ट्राच्या सेनानींना (ब्रिटनचा अपवाद वगळता- पण त्यांनादेखील आफ्रिका, भारत, अफगानिस्तान, सुदान, चीन अशा ठिकाणी युद्धाचा अनुभव होता.) प्रत्यक्ष युद्धाचा अनुभव असा नव्हताच. शिवाय मधल्या जवळपास अर्ध्या शतकाच्या कालखंडात  झालेली औद्योगिक प्रगती युद्धावर, युद्धतंत्रावर कोणते इष्ट-अनिष्ट परिणाम करणार आहे, याचे अंदाज तर कुणालाच येणे शक्य नव्हते.

नेपोलीयानिक युद्धात युरोपची हानी भरपूर झाली. त्यामुळे मुख्य युरोपियन भूमीवर(तरी) युद्ध होऊ न देणे हे जवळपास सगळ्या युरोपियन सत्तांचे उद्दिष्ट होते. युद्ध म्हणजे बुद्धिबळाच्या पटावरच्या चाली फक्त नसतात. पण डावपेच मात्र बुद्धिबळासारखेच. मग एकमेकांना शह देण्यासाठी, आपले स्थान सुरक्षित करण्यासाठी गुप्त-उघड करारमदार, तह, वचननामे यांचा सपाटा सुरू झाला. प्रतिस्पर्ध्याला दहशत बसावी म्हणून शस्त्रसाठे करणे, आर्थिक व्यापारी आणि राजनैतिक डावपेच आखून समोरच्याला नामोहरम करणे असले प्रकारही आले. एकुणात युद्ध टाळण्याच्या हेतूने झालेल्या या गोष्टीमुळे अंतिमत: युद्ध अटळ झालेच, पण त्यात सगळेच ओढले गेले-प्रत्यक्ष संबंध असो वा नसो.

असो. तर आपण १९व्या शतकातल्या युरोपचा धावता आढावा घेत जी घटना पहिल्या महायुद्धाचा भडका उडायला कारणीभूत झाली, त्या घटनेपाशी म्हणजेच ऑस्ट्रियाचा युवराज (म्हणजेच क्राऊन प्रिन्स) आर्च ड्युक फ्रांझ फर्डिनांड आणि त्याची पत्नी सोफी शोटेक यांच्या हत्येच्या घटनेपाशी  आलो आहोत.

ऑस्ट्रियाचा युवराज आर्च ड्युक फ्रांझ फर्डिनांडचा जन्म १८६३ साली झाला. तो आणि राज्यपरिवारातले इतर ६९ जण आर्च ड्युक होते. युवराज सिंहासनाचा उत्तराधिकारी नव्हता. त्याचा एक चुलत भाऊ ड्युक फ्रान्सिस ऑफ मोडेर्ना हा निपुत्रिक वारला आणि त्याच्या सर्व संपत्तीचा उत्तराधिकारी बनल्यामुळे सर्व ७० भावंडांत तो सगळ्यात जास्त श्रीमंत बनला. पुढे १८८९ मध्ये ऑस्ट्रियाचा युवराज क्राऊन प्रिन्स रुडोल्फ (म्हणजेच सम्राट फ्रान्स जोसेफचा मुलगा) याने आत्महत्या केली आणि मग फ्रांझ फर्डिनांड सिंहासनाचा उत्तराधिकारी म्हणजे ऑस्ट्रियाचा युवराज बनला. खरे तर त्याचे वडील कार्ल ल्युडविग हेच सिंहासनाचे उत्तराधिकारी व्हायचे, पण त्यांनी गादीवरचा आपला हक्क सोडला आणि त्यांचा थोरला मुलगा म्हणून फ्रांझ ऑस्ट्रियाचा युवराज बनला. अर्थात ८४ वर्षीय सम्राट जोसेप्फ अजून हयात होता.

फ्रांझला शिकारीचा अतिरिक्त नाद होता. आपल्या ५० वर्षांच्या आयुष्यात त्याने जवळपास अडीच लाख प्राण्यांच्या शिकारी केल्या. प्रत्येक शिकारीची नोंद करून ठेवली आणि तिला नंबरही दिला. हे कदाचित एक रेकॉर्डच असेल. त्याच्या कोनोपिस्ट येथील मोठ्या गढीत या सगळ्या शिकारी जतन करून ठेवल्या आहेत. आज तेथे संग्रहालय आहे. शिकारीसाठी तो जगभर फिरला, अगदी भारतातही येऊन गेला होता.

दुसरे म्हणजे त्याचे लग्न. तो सोफिया शोटेक या एका बोहेमियन उमराव घराण्यातल्या स्त्रीच्या प्रेमात पडला. ही सोफिया उमराव घराण्यातली असली तरी कुठल्याही राजघराण्याच्या नात्यात नव्हती. म्हणजे तिच्या धमन्यांतून वाहणारे रक्त राजपरिवाराचे नव्हते. (त्या काळी राजाचा राज्य करण्याचा अधिकार ईश्वरदत्त असतो, असे मानले जात असल्याने सर्वसामान्य माणसांहून राजपरिवारातले लोक वेगळे मानले जात) त्यामुळे खुद्द सम्राट जोसेप्फ आणि ऑस्ट्रियाच्या राजपरिवाराचा या विवाहाला कडाडून विरोध होता. त्याने सोफियाशी लग्न केले तर त्यांच्या मुलांना सिंहासनावर हक्क मिळणार नाही, अशी अट जोसेप्फ्फने घातली, पण फ्रान्झने ती अटदेखील मान्य केली. एवढेच नव्हे तर इतर कशाचीही तमा न बाळगता तिच्याशीच लग्न केले. तो मरेपर्यंत तिच्याशी एकनिष्ठ राहिला. तो काळ, त्याचे एकंदर सनातनी विचार व कर्मठपणा पाहता, ही गोष्ट नक्कीच वेगळी आणि खास होती.

तिसरी गोष्ट म्हणजे त्याचे कर्मठ विचार आणि तरीही आंतरराष्ट्रीय घडामोडींची समज आणि त्यानुसार धोरण ठरवण्याचा समंजसपणा. तो विचारांनी अतिशय सनातनी, राजेशाही समर्थक, राजाचा राज्य करण्याचा हक्क दैवी असल्याचे मानणारा होता. त्याला त्याचा काका सम्राट जोसेप्फ याने हंगेरीचे केलेले लांगुलचालन पसंत नव्हते. तो हंगेरियन लोकांचा तिरस्कार करत असे. स्लाववंशीयांना रानटी, अर्धमानव मानत असे. त्याने सर्बियन लोकांचा चक्क ‘डुक्कर’ म्हणून अनेकदा उल्लेख केलेला आपल्याला आढळतो.

रशियन राजघराण्याने अनेक सामाजिक चळवळी नृशंसपणाने मोडून काढत सत्ता राखली, त्याचा तो चाहता होता. त्याचबरोबर तो रशियाला शत्रू मानायला तयार नव्हता. सम्राट जोसेप्फपासून सगळे ऑस्ट्रियन राजघराण्यातले लोक, सेनाधिकारी, राजकारणी रशियाच्या विरोधात होते आणि संधी मिळताच रशियाला युद्धात चेचला पाहिजे, या मताचे होते. तुर्कस्तानच्या जोखडातून मुक्त होऊ पाहणाऱ्या / झालेल्या स्लाववंशीय देशांना रशिया जी फूस लावून आपले बगलबच्चे असलेले देश तयार करायचा प्रयत्न करत होता, त्याची पार्श्वभूमीही या विरोधाला होती.

ऑस्ट्रियन साम्राज्य हे जर्मन, हंगेरियन, स्लाव, पोलिश, झेक, युक्रेनियन, इटालियन, क्रोएट, रोमानियन अशा भिन्न भिन्न नऊ वांशिक गटांचे कडबोळे होते. त्यातले जर्मन – ऑस्ट्रियन, हंगेरियन आणि स्लाववंशीय हे संख्येने जास्त होते. तेव्हा हा साम्राज्याचा गाडा व्यवस्थित चालू राहायचा असेल तर त्याला ऑस्ट्रिया, हन्गेरी आणि स्लाववंशीयांचे त्रि-राष्ट्रकुल अशा प्रकारचे रूप देऊन प्रत्येक गटाला अंतर्गत बाबीत काही अधिकार, स्वातंत्र्य देऊनच साम्राज्य टिकवले जाऊ शकते, या मताचा तो होता. साम्राज्याताल्या एखाद्या गटाला पुरेसे स्वातंत्र्य, अधिकार, हक्क दिले नाहीत, तर ते बाहेरील मदत मिळवून ते मिळवायचा प्रयत्न करतात, हे तो जाणून होता 

ज्या बोस्नियन तरुणाने फ्रांझ फर्डिनांड आणि सोफिया शोटेक या शाही दाम्पत्याचा खून केला, तो होता गाव्रीलो प्रिन्सीप. २५ जुलै१८९४ रोजी बोस्नियाच्या ब्रोसंस्को ग्राहोवो नावाच्या खेड्यात जन्मलेला हा माणूस ‘यंग बोस्नियन्स’ नावाच्या एका क्रांतिकारी संघटनेचा सदस्य होता. तुर्की जोखडातून स्वतंत्र होऊ घातलेल्या बोस्निया आणि हर्जेगोविनियाचा जेव्हा ऑस्ट्रियाने १९०८ साली  घास घेतला, तेव्हाच प्रिन्सीप आणि त्यासारख्या अनेक बोस्नियन-सर्ब तरुणांनी याचा मुकाबला करायचे ठरवले होते. मदतीला होती ‘The Black Hand’ ही सर्बियन संघटना आणि तिचा सर्वेसर्वा एपिस.

मार्च १९१४ मध्ये जेव्हा ऑस्ट्रियन सरकारने घोषणा केली की, आपल्या लग्नाचा १४वा वाढदिवस साजरा करण्यासाठी आणि सारायेव्हो शहराबाहेर ऑस्ट्रो हंगेरियन सैन्याच्या कवायती पाहण्यासाठी म्हणून फ्रांझ फर्डिनांड आणि सोफिया शोटेक हे शाही दाम्पत्य जून १९१४ मध्ये तेथे येताहेत, तेव्हा आपल्या देशाच्या स्वातंत्र्याच्या नरडीला नख लावू पाहणाऱ्या साम्राज्याच्या युवराजचा काटा काढायची ही उत्तम संधी आहे, हे ओळखून त्यांनी त्याला मारण्याची योजना बनवायला सुरुवात केली.

प्रिन्सीप आणि त्याचे सहा सहकारी या कटात सामील झाले. ‘The Black Hand’ तर्फे त्यांना काही ब्राउनिंग पिस्तुल, काडतुसं, हातबॉम्ब, पकडले गेल्यास पटकन आत्महत्या करून मरता यावं म्हणून सायनाईडच्या कुप्या असे साहित्य पुरवले गेले. सर्बियन गुप्तचर विभागातला (आणि black handचा सदस्य) मेजर ऑस्कर व्होया टान्केस्चीच्ज हा त्यांचा प्रशिक्षक होता. मे १९१४मध्ये बेलग्रेडच्या (सर्बियाची राजधानी) कुशिद्नियाक पार्कमध्ये ते नेमबाजीचा सराव करत. (त्या काळी सर्बियात, राजधानी बेलग्रेडमध्ये दिवसाढवळ्या काही तरुण बागेत जाऊन नेमबाजीचा सराव करत असत!)

२८ जून ही तारीख एका अर्थी खूप महत्त्वाची होती. एकीकडे हा त्यांच्या लग्नाचा वाढदिवस (१४वा आणि शेवटचा), तर सर्बियन लोकांकरता या तारखेचे ऐतिहासिक महत्त्व आहे. २८ जून १३८९ रोजी सर्बिया आणि तुर्कस्तानच्या ओट्टोमान साम्राज्याच्या फौजांमध्ये कोसोवो येथे एक महाभयानक युद्ध झाले होते. यात सर्बियाची जरी हार झालेली असली तरी तुर्कस्तानच्या ओट्टोमान फौजांनाही चांगलाच फटका बसला होता. त्या दिवसापासून आपले स्वातंत्र्ययुद्धच सुरू झाले होते, असे सर्बियन लोकांचे मानणे होते. त्या दिवसाच्या ५२५व्या वर्धापन दिनी ऑस्ट्रिया मुद्दाम सैन्य संचालन आणि सैन्य कवायती करते आहे, हे सर्बियन लोकांना डिवचल्यासारखे होते.

पुढे या टान्केस्चीच्जने दिलेल्या माहितीप्रमाणे प्रिन्सीप हा त्या सात लोकांत सगळ्यात खराब नेमबाज होता. इतका की, १५-२० दिवसाच्या सरावानंतरही त्याचा नेम ५-१० फुटावरच्या लक्ष्याला लागत नसे. पण पिस्तुलाचा चाप ओढताना अभावितपणे तो डोळे मिटत असे. तो फार काही या कटात करू शकेल अशी अपेक्षाच नव्हती. ज्याचा खून/ हत्या प्रिन्सीपच्या हातून झाला तो फ्रांझ कसलेला नेमबाज शिकारी… केवढा दैवदुर्विलास! त्यावर कडी म्हणजे ज्या पद्धतीने ही हत्या घडली ती जर पहिली तर त्यात काळजीपूर्वक केलेले नियोजन आणि शिस्तबद्ध रीतीने केलेली त्याची कार्यवाही असे काहीही नसून केवळ योगायोग आणि नशीब यांच्या जोरावर नियतीनेच ही घटना घडवून आणली की, काय असे वाटू लागते.

.............................................................................................................................................

या सदरातील आधीच्या लेखांसाठी पहा -

१) २०१८ साली ११ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता पहिले महायुद्ध संपल्याला १०० वर्षे पूर्ण झाली!

https://www.aksharnama.com/client/article_detail/3952

२) पहिल्या महायुद्धाची कारणे शोधताना आपल्याला कमीत कमी १०० वर्षे तरी मागे जावे लागते!

https://www.aksharnama.com/client/article_detail/3977

३) बिस्मार्कची भविष्यवाणी खरी ठरली! जुलै १८९८मध्ये बिस्मार्क वारला आणि नोव्हेंबर १९१८मध्ये पहिले महायुद्ध संपले. त्यात जर्मनीचा नामुष्कीकारक पराभव झाला.

https://www.aksharnama.com/client/article_detail/3992

४) कैसर विल्हेल्म दुसरा हे पहिल्या महायुद्धातले सगळ्यात जास्त प्रसिद्ध पात्र असेल!

https://www.aksharnama.com/client/article_detail/4007

५) जर्मनी अब्रू वाचवून बाहेर पडला. युद्ध टळले आणि बाकीच्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. पण नाटक संपले नव्हते, फक्त पहिला अंक पार पडला होता!

https://www.aksharnama.com/client/article_detail/4022

६) रशिया, फ्रान्स आणि इंग्लंडने जर्मनीसारख्या प्रगत राष्ट्राच्या आकांक्षांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले. जमेल तेवढे त्याला दाबण्याचे, एकटे पाडण्याचे राजकारण केले!

https://www.aksharnama.com/client/article_detail/4039

७) ऑस्ट्रिया-हंगेरी, सर्बिया आणि इतर बाल्कन राष्ट्रे

https://www.aksharnama.com/client/article_detail/4051

८) पहिले आणि दुसरे बाल्कन युद्ध महाविनाशक युद्धाची नांदी ठरले यात शंका नाही!

https://www.aksharnama.com/client/article_detail/4063

.............................................................................................................................................

लेखक आदित्य कोरडे टाटा मोटर्स, पुणे इथं डिझाईन इंजिनिअर म्हणून कार्यरत आहेत.

aditya.korde@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......