अजूनकाही
काही कलाकृतींमधील वैचित्र्यपणा हा त्यांचा गुणधर्म असू शकतो. साहजिकच हे प्रहसनात्मक (फार्सिकल) कलाकृतींना अधिक लागू पडते. मात्र अशा कलाकृतींमध्येही विचित्रपणाचं एक अंतर्गत तर्कशास्त्र असणं गरजेचं असतं. जेणेकरून ती कलाकृती खिळवून ठेवू शकेल आणि रंजक ठरेल. धर्मकीर्ती सुमंत लिखित आणि आलोक राजवाडे दिग्दर्शित ‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’मध्ये ही वैशिष्ट्यं आढळतात. म्हणजे या चित्रपटात फार्सिकल, अतर्क्य दृश्यं आहेत. मात्र, चित्रपटाचं अंतर्गत तर्कशास्त्र जरा गोंधळलेलं आहे.
‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’चा आकृतीबंध आणि रचना ही नाटकातून आलेली आहे. ज्यामुळे इथले सर्जनशील निर्णय आणि तांत्रिक कामगिरी (प्रकाशयोजना, स्टेजिंग) या बाबी नाटकाच्या माध्यमातून निपजलेल्या आहेत. अर्थात अशा प्रायोगिक रचनेला विरोध नसला तरी ही रचनेनं त्या विशिष्ट कलाकृतीच्या विश्वात आवश्यक ती कामगिरी करत प्रभाव पाडायला हवा. जे क्रांती कानडे दिग्दर्शित ‘सीआरडी’ (२०१७) या अशाच प्रकारच्या चित्रपटाबाबत घडतं. ‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’चं लेखन केलेल्या सुमंतनेच ‘सीआरडी’ लिहिलेला आहे. त्यामुळे सदर लेखकाचे या आकृतीबंधाशी निगडीत प्रयोग नक्कीच लक्षात घेण्यासारखे आहेत. मात्र ‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’मध्ये दृश्यशैलीवर आणि मांडणीच्या बौद्धिक बाजूवर भर देत असताना मर्म हरवलेलं आहे.
‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’मधील मध्यवर्ती पात्राला, आतिषला (अभय महाजन) भेडसावणारी समस्या भारतीय चित्रपटांत क्वचितच उल्लेखली जाते. तो पौगंडावस्थेपासून पॉर्नोग्राफिक पुस्तकं आणि चित्रफितींवर पोसलेला आहे. मात्र लैंगिक सुखापासून वंचित राहिलेला असल्याने त्याचं लैंगिक आयुष्य कधीच फारसं समाधानकारक राहिलेलं नाही. या माध्यमांतून मांडल्या गेलेल्या संकल्पनांचा त्याच्या विचारसरणीवर आणि जगाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनावर मोठा प्रभाव आहे. ज्यामुळे त्याच्या मनात असलेली खदखद आक्रमक लैंगिक विचारांतून बाहेर पडते. सनाच्या (पर्ण पेठे) प्रेमात असूनही त्याचा प्रतिसाद हा भावनिक नसून शारीरिक आणि लैंगिक प्रकारचा असतो. ज्यातून घडू नयेत अशा घटना घडतात.
पीव्हीच्या (विराट मडके) मालकीच्या निऑन लाईट्सने चमचमत्या बार-वजा ठिकाणी दहीहंडीच्या कार्यक्रमासाठी कोणत्या सेलिब्रिटीला बोलवायचं यावर कायम सविता भाभीची स्वप्नं पाहणारा आतिष तिचंच नाव सुचवतो. विशेष म्हणजे या नावावर शिक्कामोर्तबही होतं. खरं तर इथून पुढे वास्तव आणि कल्पनारंजन यांतील रेषा धूसर होत असताना काहीसा सरीयल अनुभव देऊ इच्छिणारा हा चित्रपट अधिक प्रभावी असायला हवा होता. मात्र, वास्तव आणि अवास्तवाच्या सरमिसळीची इथली संकल्पना लेखन आणि त्याची मांडणी अशा दोन्ही स्तरांवर समस्यात्मक होत जाते. ज्यामुळे ‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’ काही विशिष्ट जागी चांगला ठरतो, तर इतर वेळी अपरिणामकारक.
हे का होतं, याचं कारण विषयाच्या हाताळणीबाबत चित्रपटकर्त्यांच्या मनात असलेल्या संभ्रमात दडलेलं आहे. समोर एकीकडे तर्काची आणि स्पष्टीकरणाची गरज नसणाऱ्या, सरीयल अनुभव देणाऱ्या गोष्टी मांडल्या जातात, तर दुसरीकडे त्यांचं अतिसुलभीकरण करण्याचा प्रयत्न होतो. संवादांच्या आणि स्वगतांच्या माध्यमातून चमच्याने घास भरवण्याचं काम केलं जातं. जे इथल्या शैलीच्या अगदी विरुद्ध ठरतं.
याखेरीज चित्रपट फार्स आणि सरळसोट मांडणी या दोन्ही दृष्टिकोनांबाबतही गोंधळलेला आहे. उदाहरणार्थ, एक दृश्य आहे, ज्यात विद्यार्थिदशेत असणारा आतिष आणि त्याचे मित्र एका रिक्षाच्या सायलन्सरला काँडम लावतात. इथपर्यंत पाहिल्यास विनोद साधा आहे. मात्र पुढे जे घडतं ते अधिक विचित्र आहे. शाळेची मुख्याध्यापिका येते, रिक्षाच्या चालकाच्या जागी बसते नि रिक्षा चालवू लागते. काँडम फुटतो, ती निघून जाते. दृश्य संपतं. चित्रपटात अशी इतरही बरीच दृश्यं आहेत. जी इथल्या विशिष्ट अशा शैलीला साजेशी आहेत. मात्र त्यामध्ये सातत्य नाही. कारण नेमकं कुठल्या दिशेनं पुढे जायचं याबाबत गोंधळ तरी आहेत किंवा मग चित्रपटकर्त्यांना सामाजिक संदेश तरी देत बसायचा आहे. ज्यामुळे एकीकडे पात्रांचं पुस्तकी संवाद म्हणत राहणं सुरू असतं, तर दुसरीकडे कृत्रिम पद्धतीनं रचल्या गेलेल्या दृश्यांमधून सविता भाभी (सई ताम्हणकर) संदेश देत असते.
याखेरीज पात्रांचा विस्तार योग्य पद्धतीनं घडून आलेला नाही. आतिष हे मुख्य पात्र, सना, त्याचे इतर मित्र अशी सर्वच पात्रं मुबलक वेळ पडद्यावर असूनही त्यांच्याबाबत, त्यांच्या हेतूंबाबत फारशी माहिती मिळत नाही. त्यांच्यात भावनिक गुंतवणूक होणं शक्य होत नाही.
सत्यजित शोभा श्रीरामचं छायाचित्रण ही चित्रपटातील सर्वोत्कृष्ट बाजू आहे. काहीशा गास्पर नोए आणि इतर जागतिक स्तरावर नावाजलेल्या दिग्दर्शकांच्या चित्रपटांच्या धर्तीवर निऑन लाईट्सने गजबजलेल्या दृश्यांचं सुरेख चित्रीकरण केलं जातं. त्याचबरोबर साकेत कानेटकरचं संगीत. या दोन्ही बाबी इथल्या सरीयल अनुभवाच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावतात. बाकी सदर चित्रपटाकडे एक सदोष प्रयोग म्हणून पाहिल्यास दिग्दर्शक आलोक राजवाडेकडून अपेक्षा ठेवता येतील.
‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’ हा एक महत्त्वाकांक्षी प्रयत्न आहे. शिवाय समकालीन मराठी चित्रपटांच्या यादीत तो वेगळा उठून दिसण्याइतपत चांगल्या बाबी त्यात आहेत. हा प्रयत्न दाद देण्यालायक आहे, मात्र सर्वस्वी प्रभावी नक्कीच नाही.
.............................................................................................................................................
लेखक अक्षय शेलार चित्रपट अभ्यासक आहेत.
shelar.a.b.mrp4765@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment