अजूनकाही
कमी वेळात मोठं काहीतरी उलगडण्याचा पायंडा ‘शॉर्ट फिल्म्स’ संस्कृती सिनेजगतात पाडत आहे. अनेक उत्तम कलाकार त्यांमध्ये अभिनय करून अधिकाधिक दर्शकांना खेचत आहेत. या परंपरेला पुढे नेणारी आणि अल्पावधीतच ‘ट्रेंडिंग’कडे वाटचाल करणारी ‘देवी’ नावाची शॉर्ट फिल्म नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. चुकवून चालणार नाही, अशी कल्पना आणि एका भयाण वास्तवाचा अंगावर येणारा हा लेखाजोखा अस्वस्थ करून सोडणारा आहे.
पहिल्या फ्रेमपासून एक दर्शक म्हणून तुमची उत्सुकता ताणली जाते. टीव्ही रिमोट घेऊन धडपड करणारी ती, खुर्चीत रेलून बसलेली काहीशी त्रासलेली ती, भक्तिभावाने प्रार्थना करणारी ती, पत्ते खेळण्यात रमलेल्या त्या, अभ्यास करणारी ती, पायाचं व्हॅक्सिंग करत आपल्याच मस्तीत असलेली ती, दारूची बाटली घेऊन नशेत असलेली ती - आणि या सगळ्यांना जोडणारी काहीशी एक अस्वस्थ गूढ शांतता.
प्रत्येक मिनिट आणि मिनिट महत्त्वाचं असणाऱ्या शॉर्ट फिल्मसारख्या माध्यमात पहिली काही मिनिटे तुम्ही अंदाज घेत राहता की, हे नक्की काय आहे. एका बाजूने वेशभूषा, केशभूषा, धर्म, वय, क्षमता, जीवनशैली, विचार, वर्तन - अशा सर्वतोपरी भिन्न असणाऱ्या व्यक्तिरेखा तुम्हाला कोड्यात टाकत राहतात.
तर दुसऱ्या बाजूने काजोल, नेहा धुपिया, नीना कुलकर्णी, मुक्ता बर्वे, ज्योती सुभाष यांसारख्या मातब्बर अभिनेत्रींची मांदियाळी तुमच्या अपेक्षा उंचावत राहते. टीव्हीवरील प्रथम पत्रकार क्रूर घटनेचं वर्णन करतो, पण घटना काय ते स्पष्ट सांगत नाही.
फिल्म पुढे सरकते आणि कथेतील पात्रे बोलू लागतात, भांडूच लागतात. त्यांनी व्यापलेल्या अवकाशात एक नवीन स्त्री येण्याची सूचना असते. कोणी तिथे राहावे आणि कोणी राहू नये, याचे अंगावर शहारे आणणारे निर्देश चर्चिले जातात आणि तुम्हाला दर्शक म्हणून कथेचा अंदाज येतो. बलात्कार आणि नंतर खून किंवा मृत्यू झालेल्या पीडितांच्या जगात तुमचा शिरकाव होतो. आणि जेवणात भाजी कुठली करायची, अशा प्रकारच्या सहज वाटणाऱ्या संवादातून भारतीय समाजाचे एक नग्न सत्य तुम्हाला बोचू लागते. टीव्हीवरील दुसरी पत्रकार तुम्हाला अधिक स्पष्ट स्वरूपात, देशात असलेल्या बलात्कार प्रकरणाची बातमी देते.
आपण साऱ्याच एकाच अन्यायाच्या बळी आहोत, हे लक्षात आल्यावर भांडण थांबते आणि नवीन पीडितेला सामावून घेण्यासाठी दरवाजा उघडतो. ती आत येते आणि सगळ्यांचेच काळीज द्रवल्याशिवाय राहत नाही. एक दर्शक म्हणून तुम्ही सुन्न होता. ८० टक्क्यांहून जास्त भारतीय देवीची पूजा करतात आणि त्या देशात दर दिवशी साधारण ९० बलात्कारांच्या घटना नोंदवल्या जातात. अशा प्रकारचं क्रूर सत्य पडद्यावर तरळतं आणि ‘देवी’ हे आंतरविरोध स्पष्ट करणारे सत्य तुम्हाला या समाजाचा घटक म्हणून लाज वाटायला भाग पाडतं.
एक समाज म्हणून आरसा दाखवणाऱ्या अशा कलाकृतींची ताकद आज निरनिराळ्या अन्यायाच्या बाबतीत किती गरजेची आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट होते.
.............................................................................................................................................
लेखक अनुज घाणेकर मानववंशशास्त्रज्ञ व समुपदेशक आहेत.
anujghanekar2@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment