अजूनकाही
भारतातील प्रत्येक भागाला, प्रत्येक प्रांताला संतांची थोर परंपरा लाभली आहे. महाराष्ट्राचे तर विचारूच नका. आपल्याकडे ज्ञानेश्वर माऊली, तुकोबाची वैभवशाली परंपरा आहे. सातआठशे वर्षं झाली तरी या संतांचा, त्यांच्या काव्याचा समाजावर असलेला प्रभाव कमी झालेला नाही. या संतांच्या परंपरेत जसे पुरुष आहेत, तशाच स्त्रियाही आहेत. जनाबाई, मुक्ताबाई ही चटकन समोर येणारी नावं. असंच एक नाव म्हणजे काश्मीरमधील स्त्री-संत लला योगेश्वरी ऊर्फ लालेश्वरी ऊर्फ लाल देद (इ.स. १३२०-१३९२).
अलिकडेच मुंबईतील ‘जी 5 ए’ या आगळ्यावेगळ्या नाट्यगृहात लाल देदच्या जीवन व तत्त्वज्ञानावर आधारित एकपात्री प्रयोग बघण्याची संधी मिळाली. हा प्रयोग मीता वशिष्ठ यांनी सादर केला होता. या प्रयोगाची संहिता, त्यासाठीचे संशोधन, दिग्दर्शन व अभिनय सबकुछ मीता वशिष्ठ यांचे आहे. मीता वशिष्ठ ज्येष्ठ अदाकारा, प्रशिक्षित अभिनेत्री आहेत. त्यांनी हिंदी चित्रपटात मोजक्याच, पण महत्त्वपूर्ण भूमिका केल्या आहेत. आमीर खानच्या ‘गुलाम’मध्ये त्यांनी सामाजिक बांधीलकी असलेल्या वकिलाची भूमिका केली होती. अलीकडेच त्यांनी गणेश यादव दिग्दर्शित व प्र.ल. मयेकरांच्या ‘अग्निपंख’च्या हिंदी अवतारात ब्राह्मण जमीनदाराच्या पत्नीची भूमिका जीव ओतून केली होती. मीता वशिष्ठसारखी मंडळी रंगभूमीवर सतत निरनिराळे प्रयोग करत असतात. त्यामुळे रंगभूमी सळसळत राहते. मात्र ‘लाल देद’चा प्रयोग बघताना मीता वशिष्ठच्या व्यक्तिमत्त्वाचा नवा पैलू समोर आला.
आपल्याकडील संतांच्या रचनेला जसे ‘अभंग’ म्हणतात, तसेच लाल देदच्या रचनांना ‘वाख’ म्हणतात. वाख ही चार ओळींची कविता असते. वाख म्हणजे आवाज. लाल देदचे काव्य इंग्रजीत उपलब्ध आहे. तिच्या काव्यावर इ.स. २०० साली दिल्लीत एक राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित केले होते. त्यातून ‘रिमेंबरींग लाल देद इन मॉडर्न टाईम्स’ हा ग्रंथ सिद्ध झाला.
लाल देद शिवभक्त होती (काश्मिरी शैववाद). तिच्यावर इस्लामचा, सुफी संतांचा प्रभाव होता. आपल्याकडे जसे सर्वसामान्यांच्या ओठावर तुकारामाचे अभंग असतात, तसे काश्मीरमध्ये लाल देदचे वाख असतात. तिने धर्मातील कर्मकांड नाकारले व थेट देवाशी संवाद साधावा, अशी मांडणी केली.
लाल देदचा जन्म श्रीनगरपासून जवळ असलेल्या पंद्रेथान या गावी एका काश्मिरी पंडिताच्या घरी झाला. त्या काळी अल्लाउद्दीन खिलजीची सत्ता होती. ‘लाल देद’चे जीवन कोणत्याही संताच्या नशिबी असते, तसेच होते. त्या काळाच्या रीतीनुसार तिचे लहान वयात म्हणजे बाराव्या वर्षी लग्न झाले. अशा लोकांचे संसारात त्या अर्थाने लक्ष नसते. त्याबद्दल सासू/नवरा वगैरेंचे टोमणे व चारित्र्याबद्दल संशय वगैरे एक प्रकारे टिपिकल असा वाहत गेलेला जीवनाचा प्रवाह.
एका प्रसंगी तर पाणी भरायला बाहेर पडलेली लाल देद नेमकी काय करते, हे तिच्या मागे गुपचूप गेलेल्या नवऱ्याला जेव्हा दिसते की, ती तळ्यातील पाण्याशी बोलते, तेव्हा त्याला वाटते की, हिला वेड लागले आहे.
सर्व प्रकारचे प्रयत्न करूनही त्यांना लाल देदच्या वागण्यात खोट काढता येत नाही. हळूहळू लाल देद जीवनातून निवृत्त होते, पण तिच्या जगण्यात काव्य सुरू राहते. तिने वयाच्या २४ व्या वर्षी घर सोडले. लाल देद तब्बल ७२ वर्षं जगली! नंतर नंतर तर ती अंगावर कोणतेच कपडे ठेवत नसे. एका प्रसंगी नग्न अवस्थेत फिरत असलेल्या लाल देदला लहान मुलं वेडी बाई समजून दगडं मारतात. हे लाल देद शांतपणे सहन करते. हे सर्व बघून एक प्रौढ माणूस तिला विचारतो की, तुला या दगडांचा मार लागत नाही का? लाल देद त्याच्याकडे आश्चर्याने बघत म्हणते- ‘कोणती दगडं? कोण मारते? कोणाला मारते?’ येथे मला ‘कॉकटेल’ चित्रपटातील (दिपिका पदुकोन, सैफ अली खान) एका गाण्यातील ओळ आठवली- ‘मै हूं ही नहीं इस दुनियाकी’. अशा अवस्थेला पोहोचलेल्या लाल देदपर्यंत म्हणूनच हा दगडांचा मार पोहोचत नाही.
या नाटकाबद्दल ‘सबकुछ मीता वशिष्ठ’ अशी जवळपास स्थिती आहे. यात मीताने सर्वस्व ओतलेले आहे. ‘मीता वशिष्ठ’ हे नाव गेली २० वर्षं चित्रपट व नाट्यरसिकांच्या परिचयाचे आहे. मीताने दिल्लीच्या ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’तून शिक्षण घेतले आहे. गजेंद्र अहिरेच्या ‘शेवरी’ या मराठी चित्रपटात मीताने महत्त्वाची भूमिका केली होती. ‘लाल देद’च्या प्रयोगाच्या आधी ती प्रयोगाबद्दल छोटेसे निवेदन करते आणि प्रयोग संपल्यानंतर तिनेच ‘लाल देद’च्या जीवनावर केलेला माहितीपट दाखवते. या निवेदनात मीता तिच्या जीवनात लाल देद कधी व कशी शिरली हेही सांगते. हा प्रयोगपूर्व व प्रयोगोत्तर भाग प्रत्यक्ष प्रयोगाइतकाच महत्त्वाचा आणि तितकाच नाट्यपूर्ण आहे.
मीता सांगत होती की, “आपण दर पाच-दहा वर्षांनी स्वतःकडे नव्याने बघतो आणि कळत-नकळत स्वतःच्या जीवनाची पुनर्रचना करण्याचा प्रयत्न करतो. मी तिशी ओलांडल्यानंतर २००२ साली स्त्रीवादी साहित्याचा धांडोळा घ्यायला लागले. पण मला उपलब्ध साहित्यापैकी काही फारसे आवडले नाही. माझ्या लक्षात आले की, हे सर्व लेखन एका प्रकारे प्रतिक्रियावादी आहे. माझे लक्ष आपोआपच संत साहित्याकडे, त्यातही महिला संतांच्या काव्याकडे गेले. तेथे मला मीराबाई, अक्का महादेव आणि लाल देद सापडल्या. सुरुवातीला मी या तिघींच्या साहित्यावर नाटक करण्याचा प्रयत्न करून पाहिला. या दरम्यान मी जास्तीत जास्त लाल देदकडे ओढली गेले. लाल देदच्या जीवनात मला उच्च दर्जाचा व्यक्तीवाद आढळला. तिची जीवनाकडे, देवाकडे बघण्याची दृष्टी वेगळीच होती. ती अनेकदा तिच्या काव्यातून भगवान शंकराला म्हणते की, ‘देवा, तू आणि मी काही वेगळे नाही. फक्त एकच फरक आहे. तुझा तुझ्या सहाही इंद्रियांवर ताबा आहे, तर माझा नाही. म्हणून तर मी अजूनही अशी भटकत आहे आणि ज्या दिवशी मला माझ्या इंद्रियांवर ताबा मिळवता येईल त्या दिवशी मी तू होईन.’ ”
मीता नंतर तिच्या जीवनावर लाल देदच्या अभ्यासाचा काय परिणाम झाला हे सांगत होती. येथे मला रिचर्ड अॅटेनबरो यांनी केलेला ‘गांधी’ आठवला. अॅटेनबरांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, गांधी नीट समजल्याशिवाय त्यांच्या जीवनावर नाटक वा सिनेमा करताच येणार नाही. त्या मुलाखतीतील अॅटेनबरोंचे प्रतिपादन आणि प्रेक्षकांशी थेट संवाद साधत उभी असलेली, लाल देदच्या अभ्यासाने प्रगल्भ झालेली मीता… विलक्षण साम्य!
नंतर मीता प्रयोग सुरू होण्याअगोदर प्रेक्षकांसह लाल देदचा एक ‘वाख’ सामूहिकरीत्या का म्हणायला सांगते, त्याचा खुलासा करते. कारण एखादा वाख म्हटला की, आपण हळूहळू, काही प्रमाणात का होईना लाल देदच्या जवळ जाऊ शकतो.
या संवादाच्या एका टप्प्यावर मीता सांगत होती की, लाल देदला स्त्रीवादी म्हणता येत नाही, तसंच निधर्मीवादीसुद्धा म्हणता येत नाही. याचे कारण म्हणजे ती या सर्व तात्त्विक वादांच्या फार पुढे निघून गेली होती. मीता म्हणाली, ‘तात्त्विक वाद आला की, तुम्ही कोणाच्या बाजूने उभे राहता, त्याचप्रमाणे कोणाच्या विरोधातही असता. लाल देदला भक्तांच्या रांगा नको होत्या, तसेच कोणत्याच प्रकारची आध्यात्मिक सत्ता नको होती. लाल देद सतत सांगायची की, ईश्वराकडे जाण्याचे हजारो मार्ग आहेत. कोणत्याही मार्गाने जा.
दीडदोन तास चाललेला हा प्रयोग (की संवाद?) संपतो, तेव्हा प्रेक्षक एका वेगळ्याच जगात जातात.
.............................................................................................................................................
लेखक प्रा. अविनाश कोल्हे समीक्षक व कादंबरीकार आहेत.
nashkohl@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment