अजूनकाही
आनी अशा तऱ्हेने त्या ठिकाणी आठ मार्चचा अखिल जगातील महत्त्वपूर्ण दिवस जवळ जवळ येऊ लागल्याने लोकांयंच्या मनावरचा तान वाढू लागला. काय बॉ करावं यंदा म्हंजी आपला आठ मार्च अखिल विश्वात शोभायमान ठरून उठून दिसेल, याचा एक्स-रेगत उभा-आडवा विचार केल्यानंतर मंडळींनी मग कोणत्याही वादावादीची रिक्स न घेण्याचं बहुमुखी तोंडायंच्या वतीनं एकमुखानं जाहीर करून टाकलं. कुठल्हाही कोणायचाही भाषणाचा कार्यक्रम रद्द झाल्याने श्रोतूवर्गाला विठ्ठल विठ्ठल करायचा चानस गेला, तर म्हाराज कीर्तन करनार नसल्याने इकडं भूमाता कोपली. आता भूमाता कोपली म्हनल्यावर आईसाहेब शांत कशा काय बसतील? त्या निघाल्या ‘तीर्था’टनाला! तीर्थाटनात केवळ एकपत्नीवाल्या देवाचं नाव घेऊन अपर्ण रहायचा वसा घेतला म्हणतात त्यांनी. रामकृष्ण हरी.
कलियुग ओ, घनघोर कलियुग अवतरल्याची कबुली थ्रू कावळ्या करवीच समंध लोकायंच्या जातीजमातीला दिली गेली आहे. समद्या धर्मात रत्तीभर फरकाने ही गोष्ट सत्य युगापासून फिरतीये. तर कावळ्या थ्रू सांगन्यात आलेलं हाय का कलियुग अवतरल्यावर बाया-गियांची हुशारी मोक्कार वाढणार हाये, आधीच्या युगापेक्षा त्यांना काकनभर अधिकच ग्यान असनार हाये, म्हंजी आधीच्या युगात ते होतंच, पन आता त्याचं उपयोगी उपयोजन करायला त्या शिकतील. हे ग्यान प्राप्त करन्यासाठी त्यांना इविध अग्नीदिव्यातून पार व्हावं लागणार हाये.
आन ही दिव्यं तरी कशी म्हाराजा? घरात भिंतीत तोंड खुपसून मारण्यापासून रस्त्यावर तोंडावर असिड फेकन्यापर्यंत, घरापासून दारापर्यंत सर्व्यांना त्यांच्या शरीराचे लचके तोंडन्याची मुभा देन्यापर्यंत… घराची, पोरायंची सारी जबाबदारी घेन्यापर्यंतच्या अशा किरकोळ गोष्टी कराव्या लागण्यासोबुतच आपमान, बायागिया आसल्यानं प्रसंगी कमी पगार, पदोन्नती डावलने अशा फुटकळ बाबी सहन कराव्या लागतीलच. आन बाया त्या सहन करतील, कारण कनाकनानं बाईचा बाईमानुस होनार हाये आन त्यांचा सहनशकत्यांक १०० ते ० सेल्सिअसच्या मधी कसाबी फिरत रहानार हाये.
तवा कलियुगातल्या बाई मानसापासून सावध रहायचा विषारा काकदृष्टीने या आधीच देऊन ठेवतांना अजून एक वार्ता वदून ठेवलेली हाये. ती म्हनजे, बायामानसं साऱ्या अग्निदिव्यातून तावून सुलाखुन बाहेर पडल्या तर नुस्त्या मानसांचं मन त्यांना खायाला लागेल. नुस्ती मानसं मग पुरुष मानसीपना अधिक दाखवायला नाही ते उद्योग करतीलच म्हाराजा, पन बडा घर पोकळ वासा होईल पार बेट्यांचं.
पोरीबाळी गर्भात असल्यापासून चिवट रहातील. जित्ता रहायचं म्हंजी गर्भालाच प्रयत्न करावे लागतील. मंग तिथल्ल्या पोरी गर्भापासूनच बंडखोर व्हतील. बाहेरचे मारायचा प्रयोत्न करतील, पोरी त्यांचे हल्ले परतावून लावतील. चिगट जमातीच्या व्हतील. पोरायला मिळणाऱ्या सोयीसुविधा लहानपनापासुन नसतील, तर त्या त्या ठिकाणच्या पोरी सोयी कशा मिळतात हे हूडकतील! दरवाजे शिक्षणाकडं खुलत असतील तर पोरी जीव खावून शिकतील. थोडा काळ ‘चांगला नवरा मिळवण्यासाठी शिक्षण’ अशा विचारांचा बाजार नुस्ती मानसं उठवतील, पन पुढच्या अंगाला हे वारं बी बदलंल. बाया नोकऱ्या हुडकतील, लग्न – पोरवडा आपल्या मर्जीनं ठरवतील, आन तिथं त्या नुस्त्या माणसांच्या पुढं जातील…
‘सर्व्हायवल ऑफ द फिटेस्ट’ हा मंत्र गावलेल्या बाया अभ्यासात पुढं असतील. दाहावी, बारावी नामक कलियुगातील घनघोर अशा युद्धात अव्वल राहातील. इंजिनियर म्हनू नका, कारपेंटर म्हनू नका, देश चालवतील - अंतरीक्ष हाकतील. बाया पुढं जातील.
नुस्ती मानसं, वारश्याची विरासत कुठ्ठं जात नाही, या विश्वासाखाली चेंगरून मरतील. एक एक क्षेत्रातून अव्वल नंबराहून मागे पडतील, मग हळहळतील, घाबरतील, घुसमटतील, आजून आजून आजून जास्त आक्रमक व्हतील आन एका सांप्रत क्षनी नुस्ती मान्स बायामान्साना उभ्या जन्माचे दावेदार मानायला लागतील.
आन पार लहानग्या लहानग्या पोरासोरांपासूनपासून हे लोन वाढेल म्हणलाय एकाक्ष राजा. तो असंही म्हणलाय का, बाया पुढं जातील पन पिढीजात पगडा पुर्शी मानसिकता घट असल्यानं लोकायंचं प्रबोधन या काळात बी होत राहिल.
बेटी बचाव बेटी पढाव, स्त्री शक्तीचा जागर असल्या घोषना, पोरींची अभ्यासात, खेळात बाजी मारल्याचे फोटो, आन सतत पोरांच्यावर दाखविला जाणारा अविश्वास, त्यांना देन्यात येनारे नैतिकतेचे धडे, या साऱ्याच्या भडिमारापायी पोरं बावचळतील, आयांना कारन विचारतील. आया भूतकाळात जातील, त्यांच्या ल्हानपानात, मंग त्यांच्या आईच्या भूतकाळात डोकावतील, आजीच्या – पणजीच्या – त्याच्या मागच्या बायांच्या भूतकाळाचा संदर्भ सामाजिक इतिहासातून पोरायनला समजावून सांगतील.
पोरांना मनू बीनू माहिती असायचं कारन नाही, तरी खुमखुमीत, स्त्रिया आन शुद्र ताडनाचे अधिकारी हे वाक्य त्या सांगतील. मंग त्याआधीच्या काळात घुसतील गार्गी – मैत्रेयी – द्रौपदी – कुंती – गंगा - सीता बाजिंगी स्त्रियांचे दाखले देतील. गोष्टी रंगतील. मंग हळूच बोलतील- पुता, अॅडम आन इव्हच्या काळात चूक इव्हची म्हणतात रे सारे म्हणत हळूचशान डोळे पुसतील.
आधुनिक पुताला दोन गोष्टी समजतील, दोन शंका असतील, दोन निष्कर्ष तो काढेल.
काक म्हणतो, ऐका म्हाराजा पुत म्हणे मातेसी,
माता सांगे बायान्सी, बाया लिहिती ग्रंथांसी तीस स्त्रीवाद म्हणती।
त्या स्त्रीवादाचा हवाला देऊन काक सांगे सत्ययुगी, म्हणे पूत पुसता होईल मातेस कलियुगी |
कारन तू सांगितले आम्हास भूतकाळात जाउनी ते आता तरी कलियुगी दिसत नसे |
पोरीच आहे वरचढ, बळजोर आम्हा लागी कोणी पुसत नसे |
अन्यावच नसता पोरी रडता ओरडता कशाला आम्हा न कळे की,
सगळीकडे जोर तयांचा असता अधिक स्वारस्य त्यांच्या शिक्षणालागून कशास असे |
आम्ही नुस्ती माणसे पडलो एकाकी, बाया मानसे करतात शिरजोरी,
पैसा आनिक प्रसिद्धी त्यांनाही हवी असे |
या पैश्यालागून अपहार, खंडणी, वाम मार्गाचा भ्रष्टाचार करीत्या झाल्या |
आमची क्षेत्रे काबिजती, शतकांचा अन्याव जायला कालवधी लागेल म्हणती |
आमच्या मना नव्हता दुजाभाव, माध्यम आनी धर्मरक्षक, जुने पाने उगाळून मनुवाद मांडती |
माहिती कारणे रुष्ट होतो, सद्दी संपता होतो विषमभाव मनी |
या स्त्रियालागून कमी करा तयांचे अधिकार
अथवा सज्ज व्हा प्रतिकारास सांगून ठेवा त्यांचे लागी |
अशा प्रकारे लिंग युद्ध होनार हे आधीपासून योजिलेले असल्यानं नुस्ती मानसं बाया मान्सांशी युद्ध करती जाहली. उघड, छूपं जसं जमेल तसं. एकमेकांचा दुस्वास दोन्ही पार्ट्या करू लागल्या. काही बाया, मानसं झाल्या काही बाप्ये झाल्या. अन्यावाचा बदला अन्यावानेच होनार म्हणत, बाप्यांशी झगडू लागल्या. तशा नुसत्या मानसातला एक हुशार मानुस म्हनाला, मागं या, आपून तर हारनार हाओतच या लढाईत लिवून ठेवलं आहे तसं. मंग आपली हार पुढं ढकलूया. बाया बायांना झुंजवूया!
लढवय्या बाया विरुद्ध बाप्ये बाया म्हंजी रूढी-परंपरा जपणाऱ्या वगैरे,
शान्या बाया विरुद्ध दीड शान्या बाया,
मनू प्रिय बायांविरुद्ध मार्क्स प्रिय बाया,
मुलग्याची आय असलेल्या बायांविरुद्ध मुलगीची आय असलेल्या बाया,
टिकली लावणाऱ्या, मंगळसूत्र घालणाऱ्या, सासू माघारी तिला लाखोली वाहणाऱ्या,
ऐक पायरी वर चढायला शरीराची शिडी करणाऱ्या
असं काहीही एकमेकींविरुद्ध चालेल म्हणाला.
तो नुस्ता हुशार माणूस. जोडीला मालिका, सिनेमे घ्या म्हनाला, मग त्यांनी भव्य बायकांचे सामने लावले, नंतर बायकांचे भव्य सामने लावले, बाया बायांत डावपेच टाकले, बाया पेचात पडतील अशे डाव केले, निस्ता धिंगाना सुरू झाला. नुस्ती मानसं कड्यावर हुबे राहून गंमत पाहू लागली. यंदाचा आठ मार्च चांगलाच रंगतोय म्हनू लागली, त्रिलोकात शोभायमान होणारा सोन्याचा दिवस कधी येतोय याची वाट पाहू लागली.
.............................................................................................................................................
अपर्णा क्षेमकल्याणी
aparnakshemkalyani@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment