अजूनकाही
मागच्या वर्षीचे ‘टकाटक’, ‘आटपाडी नाईट्स’ यांसारखे काही सिनेमे लैंगिक शिक्षण/संबंधांवर भाष्य करणारे होते. त्यांच्या कथानकातला मनोरंजनाचा एकसुरीपणा या सिनेमांना ठाम राहू देत नाही. पण आलोक राजवाडे दिग्दर्शित ‘अश्लील उद्योग मित्रमंडळ’ हा सिनेमा लैंगिक शिक्षणाच्या अभावाला अधोरेखित करतो. त्याचबरोबर नातेसंबंधांतील आयामही उलगडून दाखवतो. पण तो नुसता मनोरंजनाला धरून बसत नाही, तर असा अवकाश उभा करतो, ज्यातून रेखाटलेलं प्रत्येक दृश्य नकळत संदेश देऊन जातं. कथानक ‘नाजूक’ विषयाला हात घालणारं असल्यामुळे त्यातून तरुण पिढीची लैंगिक, मानसिक आणि भावनिक स्तरावरची घालमेल सहजरीत्या बाहेर येते. ही घालमेल बाहेर आली नाही तर व्यक्तिगत पातळीवर नैराश्य यायला लागतं. याचं चित्रण दिग्दर्शकानं प्रत्येक दृश्यातून दाखवलं आहे.
ट्रेलर पाहून आणि शीर्षक वाचून यात द्विअर्थी संवादाचा भरणा असेल असं वाटतं. मात्र इथं त्याला छेद दिलेला आहे. त्यामुळे सिनेमा अंतर्मुख करतो. तरुण पिढीचं लैंगिकतेविषयी असलेलं अज्ञान इथं दिसत नाही. त्याचं कारण कथानकातली पात्रं शहरी भागातली आहेत आणि हे तरुण बऱ्यापैकी समज आलेले आहेत. मात्र हे तरुण वासनेत पूर्णतः वाहवत गेलेले आहेत. त्याचा वापर दिग्दर्शकानं दोन पिढीतलं अंतर आणि सामाजिक पातळीवर लैंगिकतेविषयीचा संकुचित दृष्टीकोन दाखवण्यासाठी केला आहे. त्यामुळे एकाच सामाजिक पार्श्वभूमीवर वाढलेली, पण तरीही परस्परभिन्न असलेली पात्रं कथानकाला वास्तविक ठरवतात.
आतिष (अभय महाजन) हा पुण्यातला तरुण. लैंगिक वासनेच्या आहारी गेलेला. त्याला शाळेत असल्यापासून लैंगिकतेबद्दल प्रचंड आकर्षण असतं. त्यातूनच टीव्हीवर फॅशन शो पाहणं, पॉर्न व्हिडिओ पाहणं आणि पॉर्न कॉमिक्स वाचणं यात तो वाहवत जातो. हा भाग काहीसा ‘बालक-पालक’ची आठवण करून देतो. पण त्यावर दिग्दर्शकानं भर दिलेला नाही. आतिषचे त्याच्याच वयाचे चार मित्र असतात. त्यांचं व्यसनं करणं, दारूच्या पार्ट्या करणं, मुलींकडे वासनेच्या नजरेनं पाहणं असले उद्योग सुरू असतात.
आतिष अशाच काळात सनाच्या (पर्ण पेठे) प्रेमात पडतो. त्याला त्यांच्या नात्यातही वासनेशिवाय काहीच सुचत नाही. त्यामुळे दोघांत वाद व्हायला लागतात. दिवस-रात्र त्याच विचारात गुंग राहणाऱ्या आतिषला कॉमिक्समधलं एक काल्पनिक पात्र सविता भाभी (सई ताम्हणकर) सोबत असल्याचा भास व्हायला लागतो. आणि याच भासाला घेऊन तो जे काही करतो, त्यातून आतिषच्या आयुष्यात एक वळणं येतं.
यातल्या पात्रांची घुसमट एका टप्प्यानंतर व्यक्तिगत पातळीवरची राहत नाही. त्याला वेगवेगळे आयाम आहेत. लैंगिक शिक्षणाचा अभाव आणि परस्परभिन्न लिंगी व्यक्तीबद्दल वाटणारं आकर्षण, यात खचलेली पिढी हा या सिनेमाचा मोठा भाग आहे. कथानक त्यावर थेट भाष्य करतं. एका संवादात काल्पनिक सविता भाभी आतिषला म्हणते, ‘पॉर्न कॉमिक्स आणि आयपीएलनं तुमच्या पिढीचं बोन्साय केलंय.’
संवाद आणि पटकथा धर्मकीर्ती सुमंत यांची आहे. तरुणाच्या मनातल्या घुसमटीला लक्षात घेऊन लिहिलेले संवाद परिणामकारक ठरतात. बरेच संवाद असंबंध आहेत. मात्र पात्राची मनोवस्था त्यातूनच नेमकेपणानं दिसून येते. त्याचं श्रेय सुमंत यांना द्यावं लागेल. स्त्री-पुरुष इतकी सीमित मांडणी न राहता समलैंगिकतेलाही दिग्दर्शकानं सहज स्पर्श केला आहे.
पॉर्न कॉमिक्समधून सविता भाभीबद्दल निर्माण झालेली उत्सुकता वाढवताना दिग्दर्शकानं केलेली दृश्याची मांडणी उत्सुकता वाढवते. म्हणजे सविता भाभी आणि आतिष यांच्यात संवाद सुरू होतात, त्या वेळी पार्श्वभूमीला वाजणारं संगीत आणि प्रकाश योजना यांचा वापर दृश्याला उंचीवर घेऊन जातो.
अभिनयाच्या बाबतीत अभयनं हावभावापासून भाषेच्या लहेजापर्यत प्रत्येक गोष्टीला न्याय दिला आहे. पर्णचा निरागसपणा तिच्या भूमिकेला साजेसा आहे. सईनं साकारलेलं पात्र भाषिक अंगानं थोडंसं मागे पडतं. तिचे हिंदी भाषेतील संवाद फारच कृत्रिम वाटतात. अमेय वाघ छोट्या भूमिकेत दिसतो, तर विराट मडके, ऋतुराज शिंदे, केतन विसळ आणि अक्षय टांकसाळे यांनी चांगलं काम केलं आहे.
या सिनेमाच्या केंद्रस्थानी एकटेपणा, भावविश्व आणि समलैंगिकता हे त्रिकुट दिसतं.
.............................................................................................................................................
लेखक धनंजय श्रीराम सानप पत्रकारितेचे विद्यार्थी आहेत.
dhananjaysanap1@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment